चेपॉक स्टेडियममध्ये झालेल्या चेन्नई आणि कोलकता सामन्यात रवींद्र जडेजाने चाहत्यांची चांगलीच फिरकी घेतली. संघाला विजयासाठी ३ धावांची गरज असताना शिवम दुबे क्लीन बोल्ड झाला. त्यामुळे त्याच्यानंतर जडेजा फलंदाजीला येणार हे निश्चित होते. कारण महेंद्रसिंह धोनी ७किंवा ८व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. चेन्नईच्या चाहत्यांना या मोसमात धोनी कधी एकदा मैदानावर फलंदाजी करताना पाहण्याची संधी मिळते याती आस लागली होती. धोनीनेही चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत चाहत्यांची ही इच्छा पू्र्ण केली. पण त्याआधी जडेजाने चाहत्यांची मजा घेतली ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
महेंद्रसिंह धोनी फलंदाजीला येणार या अपेक्षेने चाहते खूप उत्सुक होते. सर्वांच्या नजरा या चेन्नईच्या डगआऊटवर खिळल्या होत्या. तेवढ्यात रवींद्र जडेजा बॅटिंग किट घालून ड्रेसिंग रूममधून बाहेर आला. जणू काही तो फक्त फलंदाजीसाठीच जात होता. त्याला पाहताच प्रेक्षकांचा आवाज थोडा कमी झाला, पण नंतर थोडे पुढे गेल्यावर जडेजा वळला आणि ड्रेसिंग रूममध्ये परतला. हे पाहून चेन्नईच्या डगआऊटमध्ये बसलेल्या सपोर्ट स्टाफलाही हसू आवरता आले नाही.