Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीChandrayaan - 3 : 'चांद्रयान-३' चं प्रोपल्शन मोड्यूल पृथ्वीच्या कक्षेत सुखरुप रिटर्न!

Chandrayaan – 3 : ‘चांद्रयान-३’ चं प्रोपल्शन मोड्यूल पृथ्वीच्या कक्षेत सुखरुप रिटर्न!

चांद्रयान-३ मोहिमेचा आणखी एक टप्पा यशस्वी

मुंबई : भारताची महत्त्वाकांक्षी मोहिम ‘चांद्रयान-३’ (Chandrayaan-3) फत्ते करुन भारताने अवघ्या जगासमोर एक आदर्श घालून ठेवला होता. यानंतर इस्रोकडून (ISRO) विविध प्रयोग आणि चाचण्या करण्यात येत आहेत, ज्या आगामी चंद्रमोहिमांसाठी (Lunar Missions) महत्त्वाच्या ठरणार आहेत. आता याच चांद्रमोहिमेचा आणखी एक टप्पा यशस्वी करत भारत पुन्हा एकदा कौतुकास पात्र ठरला आहे. अंतराळात केवळ यान पाठवणंच नव्हे तर ते सुरक्षितरित्या पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत आणणं भारताने शक्य करुन दाखवलं आहे. चांद्रयानचं प्रॉपल्शन मॉड्यूल (Propulsion Module) लूनार ऑर्बिटमधून पृथ्वीच्या कक्षेत परतलं आहे.

चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरने (Vikram Lander) २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर ऐतिहासिक लँडिंग केलं आणि इतिहास रचला. चांद्रयान-३ च्या १४ जुलैच्या प्रक्षेपणानंतर प्रॉपल्शन मॉड्यूल आधी पृथ्वी आणि त्यानंतर चंद्राला प्रदक्षिणा घालत होतं. त्यातून लँडर आणि रोव्हर वेगळे झाले, जे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. आता लूनार ऑर्बिटमधून म्हणजेच चंद्राला प्रदक्षिणा घालणारं प्रॉपल्शन मॉड्यूल इस्रोनं परत माघारी पृथ्वीच्या कक्षेत आणलं आहे.

इस्रोने सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत या संदर्भात माहिती देताना लिहिलं आहे की, आणखी एका अनोख्या प्रयोगात प्रॉपल्शन मॉड्यूल (PM) ला चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणण्यात आलं आहे. चंद्राच्या दक्षिणेकडील ध्रुवीय प्रदेशाजवळ सॉफ्ट लँडिंग करून विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरमधील उपकरणे वापरून चंद्रावर संशोधन आणि प्रयोग करणे हे चांद्रयान-३ मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होतं. भारताचं चांद्रयान-३ १४ जुलै २०२३ रोजी प्रक्षेपित करण्यात आलं होतं.

ISRO ने एका निवेदनात म्हटले आहे की, “चांद्रयान-3 मोहिमेची उद्दिष्टे पूर्णपणे साध्य झाली आहेत. प्रोपल्शन मॉड्यूलचे प्राथमिक उद्दिष्ट पृथ्वीच्या कक्षेपासून (GTO) चंद्राच्या ध्रुवीय कक्षापर्यंत लँडर मॉड्यूल लाँच करणे होते. चंद्राच्या कक्षेत पोहोचून त्याला लँडर वेगळे करावं लागलं. लँडर विभक्त झाल्यानंतर, पेलोड ‘स्पेक्ट्रो-पोलारिमेट्री ऑफ हॅबिटेबल प्लॅनेट अर्थ’ देखील प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये कार्यरत होते. हे प्रोपल्शन मॉड्यूल पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत आणण्यात इस्रोला यश आलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -