Thursday, May 2, 2024
Homeमहत्वाची बातमी‘स’कारात्मक भारत विकास परिषद

‘स’कारात्मक भारत विकास परिषद

शिबानी जोशी 

सन १९६२-६३च्या सुमारास देशावर चिनी आक्रमण झालं होतं आणि आपण पराभवाच्या छायेत होतो. अशा वेळी देशातल्या तरुणांमध्ये एक प्रकारचं नैराश्य आल्याची भावना निर्माण झाली होती. त्याशिवाय १९६३ मध्ये स्वामी विवेकानंद यांचे जन्मशताब्दी वर्ष होतं. स्वामी विवेकानंद यांनी विशेषतः देशातल्या तरुणांसाठी एक आदर्श घालून दिला होता. त्यामुळे स्वामी विवेकानंदांचे विचार घेऊन दिल्लीमधले काही समाजसेवक, संघ कार्यकर्ते, उद्योगपती, दिल्लीचे माजी महापौर काका हंसराज, डॉ. सूरजप्रकाश यांच्यासारखे काही समाज कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी जानेवारी १९६३मध्ये ‘नागरिक समिती’ स्थापन केली.

त्यानंतर १० जुलै १९६३मध्ये त्याचं ‘भारत विकास परिषद’ असे नामकरण होऊन या संस्थेची स्थापना झाली. स्वामी विवेकानंद यांच्या विचारानुसार स्वस्थ, समर्थ आणि सुसंस्कृत भारत बनण्यासाठी परिषदेनं पंचसूत्री राबवली. संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा, समर्पण या ‘स’कारात्मक पंचसूत्रीवर आधारित परिषदेचं काम चालतं. संपर्क झाला की, मग एकमेकांशी सहयोग होतो, सहयोगातून संस्कार घडतात. संस्कार आले की, सेवा प्रकल्प करायचे. ज्या काही गोष्टी करायच्या त्या समर्पण भावनेने करायच्या, ही
पंचसूत्री आहे.

संपूर्ण भारतभर आता परिषदेच्या साडेचौदाशे शाखा आहेत. परिषदेचे एकंदर ७३ प्रांत आहेत आणि सभासद साधारणत: दीड लाखांपर्यंत आहेत. ग्रामसेवा, ग्रामविकास, आदिवासी पाड्यांवर काम करणे अशा प्रकारची अनेक कामे विविध शाखा करतात. याशिवाय देश पातळीवर अनेक प्रकल्प राबवले जातात. या प्रकल्पांमध्ये तीन मुख्य कार्य देशस्तरावर दरवर्षी राबवली जातात. एक गोष्ट म्हणजे, राष्ट्रीय समूहगान स्पर्धा. ही स्पर्धा हिंदी आणि संस्कृतमध्ये घेतली जाते. संस्कृत राष्ट्रभक्ती गीतांची स्पर्धा घेणारी ही एकमेव संस्था आहे. संस्कृत आणि हिंदी या दोन्हींच्या वेगळ्या-वेगळ्या स्पर्धा होतात. यात देशभरातून लाखो विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. राष्ट्रगानातून मुलांमध्ये बालवयातच राष्ट्रभक्ती निर्माण करणं, हा या स्पर्धेचा हेतू आहे.

दुसरी स्पर्धा ‘भारत को जानो’ ही आहे. आज मुलांना जगाची माहिती उपलब्ध आहे. पण त्यांना देशातील अनेक गोष्टी माहीत नसतात. यात देशाचं पुराणकाळ, विज्ञान, खेळ, राजकारण, इतिहास, संस्कृती याविषयी प्रश्नमंजूषा घेतात. शाळेतले दोन-दोन विद्यार्थी अशी शाखास्तरावर आणि मग प्रांतस्तर, राष्ट्रीय स्तर अशा रीतीने स्पर्धा होत असते. स्वस्थ, समृद्ध आणि समर्थ भारत हे स्वामी विवेकानंद यांचं स्वप्न होतं. त्यातील संस्कार आणि सेवा या परिषदेच्या पंचसूत्रांतील अन्य दोन सूत्रं आहेत. ज्या स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत होत्या. त्यामुळेच स्वामीजींच्या विचारांवर परिषदेचे काम चालतं.

तिसरा प्रकल्प म्हणजे ‘गुरुवंदन, छात्र अभिनंदन’ अशा नावानं चालवला जातो. अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टीतही जी मुलं प्रावीण्य मिळवतात, त्यांचा सत्कार, कौतुक या योजनेद्वारा केलं जातं. अभ्यासाव्यतिरिक्त एखादा नाटकात छान काम करणारा असू शकतो, तबला वादक असतो, खेळाडू असतात अशांचं गुणगान केलं जातं. तसेच काही शिक्षक पण शिकवण्याव्यतिरिक्त काही वेगळे काम करत असतात. पर्यावरण क्षेत्र, प्रदूषण, विज्ञान, लेखन अशा क्षेत्रांत चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांचाही सत्कार केला जातो. आज लाखो मुलं आपल्या गुरूंना वंदन करतात. आपल्या संस्कृतीमध्ये गुरू-शिष्य परंपरेला खूप मानलं जातं. त्यामुळे गुरू-शिष्याचं नातं दृढ करण्यासाठी हा प्रकल्प संपूर्ण देशभर राबवला जातो. या तीन प्रमुख उपक्रमाशिवाय प्रत्येक शाखा आपापल्या भागात वेगवेगळे उपक्रम हाती घेत असते. कोकण प्रांत हे वेगवेगळे उपक्रम राबवत असतं. सध्या कोकण प्रांताचे अध्यक्ष महेश शर्मा, सचिव यतिश गुजराती आणि खजिनदार भीमजीभाई रूपानी आहेत.

उदाहरणार्थ, डोंबिवली शाखेने उपक्रम प्रकल्प केला होता ‘एकलव्य योजना’. ज्या विद्यार्थ्यांना वर्षाला ७०० रुपये ते २१०० रुपये फी भरता येत नाही, अशा जवळजवळ अठराशे मुलांची फी परिषद भरेल, असं शाळेला सांगितलं गेलं. चांगला, प्रामाणिक उपक्रम असल्यामुळे लोकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. अठराशे मुलांची फी भारत विकास परिषदेने भरली असल्याचं कोकण प्रांताचे माजी अध्यक्ष डॉ. शरद माडीवाले यांनी सांगितलं. डोंबिवली आणि आजूबाजूच्या लोकांना आता जयपूर फूट मोफत पुरवत आहेत. एकाची किंमत आठ हजार रुपये आहे आणि १०० जणांना हे फूट देण्यात येत आहेत. परिषदेतर्फे दरवर्षी तीन ते चार लाख जयपूर फूट देशभरात
दिले जातात.

पनवेल शाखेतर्फे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम राबवला जातो. यात सीमेवरच्या जवानांना यंदा १४ हजार फराळांची पाकिटे पाठवली. कोरोना काळामध्ये मुंबईमध्ये परिषदेच्या अनेक शाखांनी खूप कामं केली. बीएमसीमार्फत तीन कोरोना लसीकरण सेंटर उभी केली आणि ती तीन महिने चालवली. दिवसाला दोनशे ते अडीचशे जणांचे लसीकरण तिथे झालं. ज्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख गेले, त्यांनाही जवळजवळ वर्षभर मदत केली होती. ‘डेली किचन’ चालवले होते. त्याच्या माध्यमातून दिवसाला तीनशे ते चारशे जणांना फूड पॅकेट्स दिले जात होते. पंतप्रधान सहाय्यता निधीला जवळ दोन कोटींची रक्कम परिषदेने सुपूर्द केली होती.

गरजू लोकांना जे आवश्यक आहे आणि समाजाचा स्तर उंचावण्यासाठी जे काही करता येईल, ते परिषदेने केलं होतं. मेडिकल कॅम्प, आदिवासींचे सामूहिक विवाह, दिव्यांग सहायता टीबी कॅम्प, गरजूंना कायदेविषयक सल्ला, नेत्रशिबीर, अॅम्ब्युलन्स सेवा, वाचनालय असे सोळाशेहून अधिक प्रकल्प देशभरात परिषदेतर्फे सुरू आहेत. परिषदेचं कोटा येथे २२० खाटांचं सुपर स्पेशालिटी रुग्णालय
असून येथे दरवर्षी २ लाख जण उपचार घेत आहेत. अशा रीतीने गेली ५८ वर्षे भारत विकास परिषदेचे काम निरंतर सुरू आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर चालत असल्यामुळे ते जोमाने वाढतच आहे. joshishibani@yahoo.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -