Sunday, May 5, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यराजकीय ‘कार्यकर्ता’ ठेकेदारीत हरवला...!

राजकीय ‘कार्यकर्ता’ ठेकेदारीत हरवला…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

राजकीय, सामाजिक कार्यकर्ता म्हटला की, नि:स्वार्थ भावनेने लोकहितासाठी झटणारी गावातील एखादी जबाबदार व्यक्ती, स्वत:ची मिठभाकरी खाऊन सामाजिक उपक्रमात आणि कार्यामध्ये सतत झटणारा तो कार्यकर्ता. निवडणूक असो की कोणतेही सामाजिक काम त्यात तो अग्रेसर असायचा. त्याच्या दृष्टीने समाजात काही चांगलं होत असेल तर त्यासाठी सतत झटत, धडपडणारा कार्यकर्ता पूर्वी दिसायचा. एककाळ ‘कार्यकर्ता’ या शब्दाला मोठं वलय होतं. या वलयामागे नि:स्वार्थ भाव होता. त्याला प्रामाणिकतेची, निष्ठेची जोड होती. त्यामुळे या अशा कार्यकर्त्यांचा समाजात एक रुबाब होता. समाजालाही त्याचा सार्थ अभिमान वाटायचा. कार्यकर्ता हा काही फक्त राजकीय पक्षाचे काम करणारा असं त्याचं स्वरूप कधी असत नाही.

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत काम करणारा तो कार्यकर्ता; परंतु गेल्या पंचवीस वर्षांत कार्यकर्ता या नावाला अनेक दूषणं जोडली गेली. म्हणजे कार्यकर्त्यातला माणूसच बदलला. यामुळे कार्यकर्ता जो डोळ्यांसमोर येतो तो समाजवादी पक्षाच नि:स्वार्थपणे काम करणारा कार्यकर्ता. तेव्हा देण्यासारखं त्या काळच्या नेत्यांकडेही काही नव्हत. त्यामुळे स्वार्थभावना कुठेच नव्हती. एेंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा मूलभूत विचार घेऊन काम करणारा शिवसैनिक समाजातील गोरगरिबांच्या अडचणीत धावून जायचा. कोणत्याही नेत्यांच्या वाढदिवसाचे औचित्य न करता आरोग्य शिबिरं व्हायची. त्या शिबिरात गोरगरीब गरजूंना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हायची. एकूणच गेल्या काही वर्षांत राजकीय पोत बदलला. काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मारी बिस्किटं आणि चहा मिळाला तरी तो त्यावेळचा कार्यकर्ता खूशच होता. याचे कारण जनता दलाच्या समाजवादी कार्यकर्त्याला चहा देखील मिळत नव्हता; परंतु याच कोकणात बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते यांच्यासाठी उपाशी फिरणारे, विचाराने भारावलेले कार्यकर्ते या महाराष्ट्राने पाहिले आहेत; परंतु विचाराने ज्ञान वाढेल परंतु पोटाची खळगी भरता येत नाही. हा विचार समाजामध्ये रूढ होत गेला. मग ‘कार्यकर्ता’ नावाच्या माणसाची चहा बिस्किटं, वडापाव, बिर्याणी आणि मग पुढे सारंच वाढत गेलं. यात प्रामाणिकता, नि:स्वार्थपणा, निष्ठा सर्वकाही कुठल्या-कुठे गळून पडले. सारं स्वरूपच बदललं. राजकारणच बदललं. गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, त्यासाठीच्या योजना, वीज, शिक्षणाच्या सुविधा अशा काही मूलभूत सुविधापुरता विकासाची कल्पना होती. त्यासाठी झटणारा गावचा कार्यकर्ता होता. त्यानंतर अलीकडच्या काळात राजकारण बदललं. विकासाच्या संकल्पना बदलल्या आणि यात गावोगावी काम करणारा कार्यकर्ताही बदलला.

या बदलत्या राजकीय, सामाजिक स्थित्यंतरातही कार्यकर्ता नावाचे नि:स्वार्थी, साधेपणाने वावरणारे काही चेहरे दिसतात; परंतु एवढ्या मोठ्या स्वार्थी दुनियेत नि:स्वार्थ भावनेने काम करणारा कार्यकर्ता नेत्याच्या दृष्टीसही पडेनासा होतो. ‘सब घोडे बारा टक्के’ असंच होऊन जातं. पण एक गोष्ट सत्य आहे. चांगुलपणाने चांगलं काम करणारी काही माणसं या समाजात चांगलं काम करत वावरत आहेत. त्यांच्यातला चांगुलपणा जागो-जागी दिसतो. याच अशा चांगलेपणावर आजच्या समाजव्यवस्थेचा गाढा पुढे जातोय. कार्यकर्त्यांच्या व्याख्येतील हा बदल काही कुठल्या एखाद्या राजकीय पक्षापुरता किंवा एखाद्या सामाजिक संघटनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याचं स्वरूप खूप मोठं आहे. सगळीकडे एकाच मुखवट्यात वावरणारे कार्यकर्ते दिसतात. खरं असे मुखवटे धारण करणारे ठेकेदार कम कार्यकर्ते ते कोणा एकाचे वा कोणत्या एका पक्षाचे मुळीच नसतात. ते त्यांच्या व्यावसायाशी प्रामाणिक असतात. एवढे मात्र खरं. यात दोष कोणी कोणाला द्यायचा हा प्रश्नही निर्माण होता. खरोखरीच कोणी प्रामाणिकपणे काम करू लागला तरीही त्याची प्रामाणिकता शंभर नंबरी सोन्यासारखी असली तरीही त्याला इतरांच्या बरोबरीतच नेऊन बसवले जाते. एवढंच कशाला प्रशासनातील एखादा अधिकारी जरी प्रामाणिक असेल, नॉन करफ्ट असेल तरीही समाजमन त्याच्या या प्रामाणिकतेवरही प्रश्न उपस्थित करताना दिसतो. कालचा प्रामाणिकपणा आजचे जग स्वीकारत नाही. शंका-कुशंकांची माळा घेऊनच त्या प्रामाणिकतेचे स्वागत होते. हे समाजाचे दुर्दैवच आहे. या अशा बजबजपुरीत कार्यकर्ता इतका बदलत गेला की, तो थेट कार्यकर्त्यांचा ठेकेदार कधी झाला हे त्याचं त्यालाच कळल नाही. कोणताही व्यवसाय म्हटला की, आपोआपच जीवघेणी स्पर्धा, या स्पर्धेत टिकून राहण्यासाठीची सर्वांचीच असलेली धडपड. यात धडपडीत कामाची गुणवत्ताही शोधावी लागते. म्हणूनच रस्ते तयार झाल्यावर सहा महिन्यांत त्याचा मुलामा निघून गेलेला असतो आणि मग कोणत्याही मार्गावर कितीही लाख खर्च झाला तरी वाहनचालक आणि प्रवाशांच्या नशिबी येतो तो दगड, धोंडे आणि खड्ड्यातून मार्ग काढत जाणारा प्रवास करण्यात आयुष्य आढळ-आपटमध्ये व्यथित करावे लागते.

समाजव्यवस्थेत बदल हा घडतच असतो. त्याबद्दल कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही; परंतु या बदलात बदलत्या परिस्थितीत ‘कार्यकर्ता’च हरवला आहे हे अतिशय बारकाईने पाहिले की निश्चितच लक्षात येईल. तो दिसतो पण तरीही तो व्यावसायिकतेत त्याला आपण कार्यकर्ता आहोत याचंही भान राहात नाही. व्यासपीठावर सर्वच कार्यकर्तेच असतात. प्रत्यक्षात व्यावहारिक जीवनात हा कार्यकर्ता हरवलाय एवढं खरं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -