Saturday, May 4, 2024
Homeअध्यात्मपंडित स्वामींचे दासच झाले

पंडित स्वामींचे दासच झाले

गोविंदराव तीर्थयात्रा करून मुंबईस आले. नंतर त्याबद्दल त्यांनी मावंदे घातले. श्री स्वामींबद्दल आलेल्या प्रचितीची कहाणी गोविंदरावांच्या तोंडून ऐकल्यावर लक्ष्मण पंडितास आश्चर्य वाटले. अक्कलकोटचे महाराज आपल्याही अडीअडचणींचे निराकरण करतील, असा त्यास विश्वास वाटू लागला. म्हणूनच तो म्हणाला, माझे कर्ज जर आठ दिवसांत फिटले, तर आपण अक्कलकोटास जाऊन श्री स्वामी समर्थांचे दास होऊ. गोविंदरावास श्री स्वामींचा अनुभव आलेला होता. त्यांनी लक्ष्मण पंडितास खात्री दिली की, तुमचे कार्य खचित होईल.

लक्ष्मण पंडिताला कर्ज झाले होते ते लवकरात लवकर फिटावे या चिंतेत ते होते. साधारणतः आनंदात परमेश्वराची आठवण क्वचितच येते. दुःख-अडचणी-पीडा-संकटे परमेश्वराची आठवण करून देतात. पंडित गळ्यापर्यंत कर्जात बुडाल्याने त्यास देवाची आठवण येणे साहजिकच होते. गोविंदरावांनी लक्ष्मण पंडितास मावंदे घालण्याचे कारण सांगितले. त्यातूनच त्यांस श्री स्वामी महाराजांचे दर्शन घेण्याची व भेटण्याची ऊर्मी निर्माण झाली. त्यामुळे तर लक्ष्मण पंडितानेही श्री स्वामींस नवस केला. पंडिताचा बुडत्याचा पाय खोलात म्हणून की काय ते हरिभाऊ तावडे व गजानन खत्री यांच्या बुडीत व्यवहारास जामीन राहिल्याने त्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली.

येथे लक्ष्मण पंडित हे साधेसुधे-सरळ प्रापंचिक गृहस्थ वाटतात. कारण ते स्वतः कर्जात गळ्यापर्यंत बुडालेले असतानाही हरिभाऊ आणि खत्रीस जामीन राहिले. व्यवहारात इतका चांगलुपणा आणि भलेपणा चालत नाही. तेव्हा एकवेळ ठीक होते. पण सद्यस्थितीत तर तो पूर्णतः अव्यवहारीपणा अथवा मूर्खपणाच ठरेल. यातील पूर्वसुकृताचा भाग म्हणा वा त्यांचे पूर्वप्रारब्ध म्हणा, पंडितांना गोविंदरावांसारख्याच्या घरी मावंद्याच्या निमित्ताने जाता आले आणि अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या. त्यातूनच ते नवस बोलले. अक्कलकोटला श्री स्वामींकडे मार्गस्थ होण्याचा त्यांना शुभ संकेत मिळाला, हा सुसंकेतच त्यांना लाभदायी ठरला. पंडित स्वामींची सेवा करू लागले.

विलास खानोलकर

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -