Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यRBI : ‘‘कर्जे महाग रेपो दरात वाढ...’’

RBI : ‘‘कर्जे महाग रेपो दरात वाढ…’’

या आठवड्याची सुरुवात जरी तेजीने झाली तरी या संपूर्ण आठवड्यात निर्देशांकामध्ये अत्यंत मर्यादित हलचाल झाली. शुक्रवारच्या सत्रात अचानक आलेल्या नफा वसुलीमुळे निर्देशांकात घसरण झाली. या आठवड्यात सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते, ते रिझर्व्ह बँकेच्या (RBI) द्वैमासिक पतधोरणाकडे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्य असलेल्या पतधोरण समितीची बैठक या आठवड्यात झाली. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून या आठवड्यात पतधोरण जाहीर करण्यात आले. या पतधोरणात रेपो दरामध्ये ०.३५ टक्क्यांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आता रेपो दर ६.३५ टक्के झाला.

पतधोरण समजण्यासाठी यातील काही गोष्टींचा अर्थ समजणे अत्यंत आवश्यक आहे. पतधोरणात अनेक महत्त्वाचे घटक असतात त्यामधील एक म्हणजे रेपो दर. रिझर्व्ह बँक बँकांना जे कर्ज देते आणि त्या दिलेल्या कर्जावर जे व्याजदर लावले जातात त्याला “रेपो दर” असे म्हणतात. त्याचप्रमाणे बँका रिझर्व्ह बँकेकडे ज्या ठेवी ठेवतात त्या ठेवलेल्या ठेवींवर बँकांना जो परतावा मिळतो त्याला “रिव्हर्स रेपो दर” असे म्हणतात. सी. आर. आर म्हणजे बँका आपल्या निव्वळ मागणी आणि वेळ देयातांची एक निश्चित प्रमाणात रोखी मालमत्तेच्या स्वरूपात राखून ठेवते यास “सीआरआर” असे म्हणतात. थोडक्यात भारतातील व्यावसायिक बँकांना ग्राहकांना क्रेडिट देण्यापूर्वी सोने आणि सरकारमान्य सिक्युरिटीमध्ये काही मालमत्ता ठेवावी लागते. सध्या सीआरआर हा ४.५० टक्के आहे.

“कॅश रिझर्व्ह रेशो” अर्थात “रोख राखीव प्रमाण दर” हा रेशो म्हणजे बँकेच्या ठेवींपैकी एक निश्चित टक्केवारी आहे. ज्यामध्ये बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरक्षित केलेल्या रकमेच्या स्वरूपात किमान अंशी काही ठेव ठेवणे आवश्यक आहे. सीआरआर म्हणून निर्देश केलेली रक्कम ही नगद आणि रोख अशा समकक्षांमध्ये असते. “सीआरआर”चा उपयोग अर्थव्यवस्थेमध्ये पैसे पुरवठा नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो. सीआरआर रेशो जास्त असेल तर लिक्विडीटी म्हणजे द्रव्यता कमी होते. सीआरआरचा उद्देश बँकांची तरलता आणि पतपुरवठा निश्चित करणे हा आहे. ज्यावेळी रिझर्व्ह बँक ही सीआरआर वाढविते त्यावेळी रिझर्व्ह बँकेकडे मोठ्या प्रमाणावर रोख ठेवण्यासाठी कमी निधी उपलब्ध असतो.

सद्यस्थितीला अल्पमुदतीचा विचारकरता व्ही गार्ड, कमिन्स इंडिया, लार्सेन अँड टुब्रो यांसह अनेक शेअर्सची दिशा ही तेजीची आहे. आपण आपल्या लेखमालेतील लेखात कमिन्स इंडिया हा शेअर ११८० रुपये किमतीला असताना खरेदी योग्य म्हणून सांगितलेला होता. केवळ ३ महिन्यांतच या शेअरने १५५० पर्यंत मजल मारलेली आहे. टक्केवारीत पाहावयाचे झाल्यास या शेअरमध्ये ३१ टक्क्यांची मोठी वाढ झालेली आहे. निर्देशांकाची दिशा ही अजूनही तेजीचीच आहे जोपर्यंत निर्देशांक सेन्सेक्स ६१९०० आणि निफ्टी १८३०० या पातळ्यांच्या वर आहे, तोपर्यंत निर्देशांकातील तेजी टिकून राहील. शेअर्समध्ये व्यवहार करीत असताना निर्देशांकाच्या पातळ्या लक्षात ठेवून टेक्निकल अॅनालिसीसनुसार तेजीची दिशा असणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. शुक्रवारी निर्देशांक सेन्सेक्स ६२१८१ आणि निफ्टी १८४९६ या अंकांना बंद झाले. सध्या निर्देशांक अत्यंत मर्यादित पातळीत हालचाल करीत आहेत, त्यामुळे जोपर्यंत निर्देशांक या पातळ्यांच्या मधून बाहेर पडत नाहीत तोपर्यंत निर्देशांकात फार मोठ्या प्रमाणात तेजी किंवा मंदी होणार नाही. कमोडीटी मार्केटचा विचार करता सोने आणि चांदी यांची दिशा ही तेजीची असून जोपर्यंत सोने ५३००० च्या वर आहे, तोपर्यंत सोन्यातील तेजी कायम राहील. कच्च्या तेलामध्ये या आठवड्यात मोठी घसरण झाली. जोपर्यंत कच्चे तेल ६२०० या पातळीच्या खाली आहे तोपर्यंत अल्पमुदतीचा विचार करता कच्च्या तेलामध्ये आणखी घसरण होऊ शकते.

शेअर बाजाराची मुख्य दिशा तेजीची असेल, तर येणारे करेक्शन ही खरेदीची संधी असते. याउलट शेअर बाजाराची मुख्य दिशा मंदीची असेल, तर येणारे करेक्शन अर्थात बाऊन्स ही शेअर्स विक्रीची संधी असते. सध्या शेअर बाजाराची दिशा ही तेजीची आहे. मात्र टेक्निकल आणि फंडामेंटल बाबतीत निर्देशांक हे उच्चांकाला असल्याने शेअर्स खरेदी करण्यासाठी संयम ठेवणे आवश्यक आहे. तसेच यापुढे काही काळ कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करीत असताना स्टॉपलॉस लावून केवळ अल्पमुदतीचा अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी.

-डॉ. सर्वेश सोमण

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -