Thursday, May 2, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सअधूनमधून ‘भरतरत्न’

अधूनमधून ‘भरतरत्न’

  • राजरंग : राज चिंचणकर

मराठी नाट्यसृष्टीत आता एका नव्या पुरस्काराची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. मात्र हा पुरस्कार कुणी पुरस्कृत केलेला नाही; तर खिशात दमडाही नसलेल्या एका अवलियाने हा पुरस्कार सुरू केला आहे. ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य व्यवस्थापक अशोक मुळ्ये यांनी हा पुरस्कार जन्माला घातला आहे आणि त्यांनी हा पहिला-वहिला ‘भरतरत्न’ पुरस्कार अभिनेता भरत जाधव यांना प्रदान केला आहे. पण हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येणार नसल्याची चर्चा आहे आणि ही चर्चा खरी असल्याचे संकेत साक्षात अशोक मुळ्ये यांनीच दिले आहेत. त्यामुळे या पुरस्काराची ‘अधूनमधून देण्यात येणारा पुरस्कार’ म्हणून नाट्यसृष्टीत नोंद घेतली जाणार आहे.

साधारणतः एखादा पुरस्कार देण्यास प्रारंभ होतो आणि दरवर्षी तो मान्यवरांना दिला जातो. अशोक मुळ्ये यांनीही त्यांच्या ‘माझा पुरस्कार’ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ‘भरतरत्न’ पुरस्कार हा पहिला-वहिला आहे, असे जाहीर केले होते. त्यामुळे यापुढे दरवर्षी एखाद्या रंगकर्मीला हा पुरस्कार ते देतील अशी अपेक्षा होती. मात्र तसे काही होणार नसल्याचे निदान सध्यातरी चित्र आहे. अर्थातच यावर या अवलियाशी संवाद साधल्यावर मिळालेली माहिती रंजक आहे.

यंदा भरत जाधव यांचे ‘अस्तित्व’ हे नवीन नाटक रंगभूमीवर आले आणि या नाटकात त्यांनी चक्क गंभीर स्वरूपाची भूमिका रंगवली आहे. त्यांची ही चाकोरीबाहेरची भूमिका पाहून अशोक मुळ्ये यांना त्यात ‘विशेष’ वाटले आणि या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी भरत जाधव यांना ‘भरतरत्न’ पुरस्कार दिला. त्यामुळे अशी ‘विशेष कामगिरी’ कुणा रंगकर्मीने केली, तर आणि तरच हा पुरस्कार अशोक मुळ्ये यांच्याकडून दिला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. ‘भरतरत्न’ पुरस्कार स्वीकारल्यावर भरत जाधव जे म्हणाले तेही महत्त्वाचे आहे. “मुळ्ये काकांनी हा पुरस्कार मला जाहीर केल्यावर लोकांनी मला ‘भारतरत्न’च मिळाला की काय अशा पद्धतीने फोन केले. पण मी सांगू इच्छितो की मला एकवेळ ‘भारतरत्न’ नाही मिळाला तरी चालेल, पण हा ‘भरतरत्न’ पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा आहे”, अशा शब्दांत अानंद व्यक्त केला. अशोक मुळ्ये यांना पुढेही नाट्यसृष्टीत अशी काही ‘विशेष रत्ने’ सापडली; तर त्यांना ते हा पुरस्कार नक्कीच देतील. पण आता त्यांचा हा ‘भरतरत्न’ पुरस्कार दरवर्षी सुरू राहावा; अशी कामगिरी करण्याची जबाबदारी मात्र रंगकर्मींवर आपसूकच येऊन पडली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -