Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडी‘राष्ट्रीय महामार्ग ५४८ अ’ अत्यंत निकृष्ट दर्जाचे?

‘राष्ट्रीय महामार्ग ५४८ अ’ अत्यंत निकृष्ट दर्जाचे?

नेरळ  : दोन जिल्ह्यांतून जाणाऱ्या ‘राष्ट्रीय महामार्ग ५४८ अ’चे काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट झाले असल्याने त्या कामाची गुणवत्ता तपासण्याची मागणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली. गुरुवारी लोकसभेत खासदार बारणे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत केंद्रीय रस्तेविकास राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांच्याकडे अल्पावधीत खराब झालेल्या रस्त्याची गुणवत्ता कोण तपासणार, असा तारांकित प्रश्न उपस्थित केला.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून येणारी वाहने यांच्यासाठी शहापूर तालुक्यातील वशेणी येथून मुरबाड-कर्जत-खोपोली-वाकण असा राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहे. रायगड जिल्ह्यात हा राष्ट्रीय महामार्ग ५४८-अ खोपोलीजवळील हाळ येथे मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गाला जोडतो. हा राज्यमार्ग समृद्धी महामार्गावरून जवाहरलाल नेहरू पतन जेएनपीटीकडे जाणारी वाहतूक नियंत्रित करणारा महामार्ग म्हणून राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित केला आहे. ग्रीन हायवे म्हणून नियोजित असलेल्या महामार्ग रस्त्याचे बांधकाम महाराष्ट्र सरकारच्या राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केले जात आहे.

ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून जात असलेल्या या राष्ट्रीय महामार्ग रस्त्याचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण होत आले आहे. त्यातील रायगड जिल्हा हद्दीमधील रस्त्याचा भाग १० मीटर रुंद काँक्रिटचा बनवला जात आहे. मात्र या रस्त्यावर नवी दिल्ली येथून नेमलेल्या ठेकेदारांनी रस्त्यावर केलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे या रस्त्यावरून प्रवास करताना दिसून येत आहे. त्यात निकृष्ट दर्जाचे काम केल्याने काँक्रिटच्या रस्त्याला भेगा पडणे, रस्त्यातील काँक्रिट बाहेर येणे, रस्त्याचा भाग खचून सपाट रस्त्यावर खोलगट भाग तयार होणे, असे प्रकार घडले असून काँक्रिटचा रस्ता बनला असला तरी या रस्त्याने वेगाने वाहने चालवणे धोक्याचे होऊन गेले आहे. रस्ता एकसंध बनवला गेला नसल्याने रस्त्यावर ८० किलोमीटर वेगाने वाहने जात असताना समुद्रातील लाटांप्रमाणे वाहने वर-खाली होत असतात. याबाबत कर्जत आणि खालापूर तालुक्यातील वाहनचालकांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -