Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणNarayan Rane : उबाठाची कोल्हेकुई : ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणावरील प्रेम बेगडी

Narayan Rane : उबाठाची कोल्हेकुई : ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणावरील प्रेम बेगडी

पर्यटन मंत्री पदावर ठाकरे असतानाच पाणबुडी प्रकल्प गुंडाळला : नारायण राणे

मुंबई (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला पळविण्यात आला अशी ओरड करत उबाठा गटाच्या अनेकांनी राज्य सरकारवर टीका केली होती. परंतु केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी शुक्रवारी एक्स (ट्विटर) वर ट्वीट करत मविआ सरकारच्या काळात पर्यटन मंत्री पदावर आदित्य ठाकरे असतानाच पाणबुडी प्रकल्प गुंडाळला असल्याचे स्पष्ट करताना उबाठा गटाच्या आरोप करणाऱ्यांचे पूर्णपणे वस्त्रहरण केले आहे.

ट्वीट करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले की, सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प गुजरातला पळवला, अशी खोटी आवई उठवून शिवसैनिकांनी कोल्हेकुई सुरु केली होती. खरी वस्तुस्थिती समोर आल्याननंतर त्यांची तोंडे आता कुलुपबंद झाली आहेत.

२०१८ मध्ये राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने वेंगुर्ल्यात पाणबुडी प्रकल्पाला सुरुवात केली. २०१९ च्या सुरुवातीला त्यासाठी निविदाही निघाली. परंतु या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्यांदाही या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ३० नोव्हेंबर २०१९ ते २६ जून २०२२ पर्यंत आदित्य ठाकरे हे राज्याचे पर्यटन मंत्री होते. त्यांच्या कारकिर्दीच्या कालावधीत पर्यटन विभागामध्ये पाणबुडी प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय झाला. उद्धव ठाकरे आणि मंडळींचे कोकणावरचे प्रेम कसे बेगडी आहे ते दाखविणारा हा आरसा आहे. कदाचित बॉलिवूड पर्यटनात गुंतून पडल्यामुळे सिंधुदुर्गासाठी वेळ देता आला नसावा, असा टोलाही नारायण राणे यांनी ठाकरे पिता-पुत्रांना लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणबुडी प्रकल्प कोकणात होईल, अशी ग्वाही दिलेलीच आहे. उध्दव ठाकरे व त्यांच्या मुलाने घातलेला आणखी एक घोळ ते नक्कीच सोडवतील, असा आशावाद नारायण राणे यांनी ट्वीटच्या अखेरीस व्यक्त केला आहे.

या ट्वीटमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एका वर्तमानपत्राचे कात्रणही जोडले आहे. त्या कात्रणामध्ये स्पष्टपणे ‘पाणबुडीच्या पाठपुरावा करण्यात राज्य सरकार अपयशी, ‘सरकारी’ कारभाराने अडला पाणबुडी प्रकल्प, माझगाव डॉकचा करार’ असा स्पष्टपणे तपशील आहे.

पाणबुडी प्रकल्पावरून उबाठा गटाने खोटे आरोप करत महाराष्ट्रीयन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला होता. परंतु नारायण राणे यांच्या ट्वीटनंतर उबाठा गटाचा पाणबुडी प्रकरणातील खोटारडेपणा उघडकीस आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -