अतिसुरक्षित हेलिकॉप्टर्सच्या अपघातांचं गूढ

Share

अजय तिवारी

कोणत्याही देशासाठी प्रमुख राजकीय नेते आणि संरक्षण विभागाच्या प्रमुखांची सुरक्षा महत्त्वाची असते. त्यांच्या सुरक्षेसाठी काही नियम केलेले असतात. ते पाळले नाही की काय होतं हे कुन्नूरमधल्या सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या घटनेतून पुढे आलं. शत्रूराष्ट्राच्या कारवाईची भीती आणि अपघातात एकाच वेळी अनेक महत्त्वाचे नेते, अधिकारी गमावले जाऊ नयेत, म्हणून एकाच वेळी, एकाच वाहनातून प्रवास न करण्याचा राजशिष्टाचार आहे. तो पाळला जाणं आवश्यक असतं.

तसंच अशा नेत्यांच्या किंवा संरक्षण दलाच्या वरिष्ठांच्या प्रवासाच्या वेळी ते वापरलं जाणारं वाहन, हेलिकॉप्टर सुरक्षित आहे का, उड्डाणापूर्वी त्याची तपासणी झाली आहे का, ते ज्या भागात जाणार, तिथलं हवामान कसं आहे, त्या भागाची भौगोलिक रचना कशी आहे, आदींची माहिती घेतली जाते. उच्चपदस्थ नेते, संरक्षण दलाचे अधिकारी एका हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात तेव्हा त्यांच्यासोबतच आणखी एक हेलिकॉप्टर दिलं जातं. असं असताना कुन्नूरच्या घटनेत त्रुटी कशा राहिल्या, असा प्रश्न उपस्थित होतो.

या गंभीर घटनेनंतर रावत आणि अन्य उच्चाधिकारी प्रवास करत असलेल्या एमआय १७-व्ही ५ हेलिकॉप्टरच्या सुरक्षिततेची चर्चा सुरू झाली आहे. हवाई दलातलं हे हेलिकॉप्टर रशियननिर्मित असून अत्यंत सुरक्षित आणि सर्वश्रेष्ठ समजलं जातं. हे एमआय-८/१७ या हेलिकॉप्टरच्या श्रेणीचाच भाग आहे. हे हेलिकॉप्टर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आणि शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असं समजलं जातं. शोधमोहीम, गस्त घालणं, मदत आणि बचावकार्य या कामांसाठीही या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. अगदी पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अनेक उच्चपदस्थ याच हेलिकॉप्टरचा वापर करतात. भारतातच नव्हे, तर जगात अनेक ठिकाणी या हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. तिथेही उच्चपदस्थांसाठी हेच हेलिकॉप्टर सुरक्षित मानलं जातं.

भारतात आणि जगात एमआय १७-व्ही ५ आणि त्याच्या श्रेणीतली हेलिकॉप्टर्स जेवढी अत्याधुनिक समजली जातात, तेवढीच धोकादायक देखीलही आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये एम-१७ हेलिकॉप्टर्सचे सहा अपघात झाले असून तब्बल २८ जणांना जीव गमवावा लागला आहे. ६ मे २०१७ रोजी अरुणाचल प्रदेशमधील तवांगजवळ हवाई दलाचं एमआय-१७ हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं होतं. या अपघातात पाच जवानांसह इतर दोन जणांचा मृत्यू झाला.

हवाई दलाच्या माहितीनुसार, या हेलिकॉप्टरने सकाळी सहा वाजता उड्डाण केलं होतं. त्यानंतर काही वेळातच ते दुर्घटनाग्रस्त झालं होतं. ३ एप्रिल २०१८ रोजी उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये एमआय-१७ हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. गुप्तकाशीवरून बांधकामाचं साहित्य घेऊन येणारं हे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरण्यापूर्वी ६० मीटर अंतरावरच दुर्घटनाग्रस्त झालं. या हेलिकॉप्टरमधून सहाजण प्रवास करत होते. यापैकी एकजण किरकोळ जखमी झाला, तर इतर सर्वजण सुरक्षित बचावले. २७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता जम्मू-काश्मीरमधल्या बडगाम जिल्ह्यात एमआय-१७ हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या दुर्घटनेत हवाई दलातल्या सहा अधिकाऱ्यांसह एका नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात निष्काळजीपणामुळे घडला असल्याचं चौकशीत स्पष्ट झालं. यावेळी काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.

कोणत्याही मोठ्या अपघातानंतर चौकशी होते. त्यात काही शिफारसी केलेल्या असतात. या शिफारशींचं नंतर काय होतं, हा प्रश्न कायम अनुत्तरीत राहतो. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’ असं कधीच त्यातून होत नाही आणि पुढचा अपघात होईपर्यंत मागची घटना विसरून गेलेली असते. २०१८ नंतर २०१९ मध्येही केदारनाथमध्येच एमआय-१७ हेलिकॉप्टरचा अपघात झाला. २३ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी उड्डाण करताना हेलिकॉप्टर कोसळलं. सुदैवानं अपघातात हेलिकॉप्टरच्या पायलटसह सहाजण बचावले. गेल्याच महिन्यात १८ नोव्हेंबरला एमआय १७ व्ही हे हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान अरुणाचल प्रदेशमध्ये कोसळलं. सुदैवानं यामधून प्रवास करणारे पाच क्रू मेंबर्स बचावले. अपघातांची ही मालिका पाहता त्यात मानवी दोष किती, हवामानाचा दोष किती आणि तांत्रिक अडचणी किती याचा तपास करायला हवा.

जगातल्या सर्वात प्रगत वाहतूक हेलिकॉप्टर्समध्ये एमआय १७-व्ही ५चा समावेश होतो. समुद्रातलं वातावरण आणि वाळवंटातल्या वेगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा उड्डाण करण्याच्या दृष्टीनं या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये एमआय १७-व्ही ५ गटातल्या हेलिकॉप्टर्सना झालेले अपघातही चर्चेत आले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने एप्रिल २०१९ मध्ये एमआय १७ व्ही-५ हेलिकॉप्टर्सच्या रिपेअरिंग आणि देखरेखीसाठी चंदीगडमध्ये एक केंद्रही स्थापन केलं होतं. भारतासह रशिया, इराण आणि इतर देशांमध्ये या हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो. अमेरिकन सैन्यानेही या हेलिकॉप्टर्सचा वापर केला आहे. अफगाणिस्तान आणि इराकमध्येही त्यांचा वापर झाला आहे. मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने या हेलिकॉप्टर्सना काही वेळा अपघातांना सामोरं जावं लागलं होतं. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या अपघातांमुळे एमआय

१७-व्ही ५ हेलिकॉप्टर्स चर्चेत आली होती. सर्रास वापर होत असल्यानेच अपघातांमध्येही या हेलिकॉप्टर्सचं नाव येणं साहजिक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. लष्करी अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टर प्रवासासाठी काही नियम करण्यात आले आहेत, त्यात दोनपेक्षा जास्त जनरल रँकचे अधिकारी एकत्र प्रवास करू शकत नाहीत, दोन इंजिन असलेलं हेलिकॉप्टर प्रवासासाठी आवश्यक, सुरक्षा तपासणी अत्यंत महत्त्वाची, ठरावीक आणि ठरलेल्या वेळीच प्रवासाची परवानगी अशा नियमांचा समावेश असून ही वेळ बदलली जात नाही.

हवामान आणि ठरावीक काळाप्रमाणे प्रवास निश्चित असतो. ज्या ठिकाणी उतरणार किंवा जिथून उड्डाण घेणार त्या ठिकाणी पुरेसा इंधनसाठा असावा, आपत्कालीन परिस्थितीत हवाई रुग्णवाहिका आणि वैद्यकीय मदतीची तयारी असावी, असे नियम असताना सरसेनाध्यक्षांच्या कुन्नूर अपघाताचा आढावा घेताना या नियमाची चोख अंमलबजावणी झाली होती का, असा प्रश्न पडतो. संजय गांधी, माधवराव शिंदे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री

वाय. एस. राजशेखर रेड्डी, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू, लोकसभेचे माजी अध्यक्ष जी. एम. सी. बालयोगी, विख्यात उद्योजक व राजकीय नेते

ओ. पी. जिंदाल यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री बन्सिलाल यांचा मुलगा सुरिंदर सिंग यांचा आणि वैमानिकाचाही या अपघातात मृत्यू झाला. हे एवढे महत्त्वाचे नेते हवाई अपघातात गमावूनही आपण त्यातून नेमका बोध का घेत नाही, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची गरज आहे.

Recent Posts

तिसऱ्या टप्पासाठी आज मतदान

महाराष्ट्रातील ११ जागांसह १२ राज्यांतील ९४ जागांवर उमेदवारांचे भवितव्य आज होणार ईव्हीएममध्ये बंद मुंबई :…

14 mins ago

विवेकानंद वैद्य प्रतिष्ठान, सांगली

सेवाव्रती :शिबानी जोशी सांगलीच्या विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानची स्थापना आणि त्या नंतरच्या सुरुवातीच्या कामाची माहिती आपण गेल्या…

14 mins ago

कोकणात कमळ फुलणार…

विशेष: डॉ. सुकृत खांडेकर रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागले असून, आज या…

59 mins ago

MI vs SRH: ‘सुर्या’ च्या प्रकाशाने मुंबई झळकली, ७ गडी राखुन हैदराबादवर विजय…

MI vs SRH: मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादकडून सलामीवीर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. हेडने…

2 hours ago

Lok Sabha Elections 2024: तिसऱ्या टप्प्यात अमित शाह,नारायण राणे, उदयनराजे यांची प्रतिष्ठा पणाला

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या(loksabha election 2024) तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. देशातील १२ राज्ये…

2 hours ago

व्होट बँकेमुळे ममता बॅनर्जींचा सीएएला विरोध

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आरोप दुर्गापुर : काँग्रेस ७०-७० वर्षांपासून राम मंदिराची उभारणी रखडवत होती,…

4 hours ago