Share

विशेष: डॉ. सुकृत खांडेकर

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागले असून, आज या मतदारसंघात अठराव्या लोकसभेसाठी मतदान होत आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात उबाठा सेनेचे विनायक राऊत अशी लढत असली, तरी राणे यांचे वलय, करिष्मा, त्यांनी गेल्या चार दशकांत कोकणात केलेले काम, त्यांचे मजबूत संघटन, नेतृत्व कौशल्य आणि अफाट लोकसंपर्क यापुढे महाआघाडीचा उमेदवार हात चोळत बसेल, असे वातावरण आहे. स्वत: राणे यांनी चिपळूणपासून दोडामार्गपर्यंत विस्तारलेला हा मतदारसंघ प्रचाराने ढवळून काढलाच; पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे सुप्रिमो राज ठाकरे यांच्या सभांनी सारे वातावरण महायुतीला अनुकूल झाले आहे.

राज ठाकरे यांच्या सभेने तर उबाठा सेनेचे धाबे दणाणले. उद्धव ठाकरे यांचा त्यांनी आपल्या भाषणातून जबर समाचार घेतलाच; पण नारायण राणे यांच्या कार्यकर्तृत्वाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. राज ठाकरे व नारायण राणे हे दोघेही नेते शिवसेनाप्रमुखांच्या संस्कारातून तयार झाले आहेत. उद्धव यांच्या मनमानीला कंटाळूनच, दोघे नेते अविभाजित शिवसेनेतून पाठोपाठ बाहेर पडले. म्हणूनच आपल्या मित्र प्रेमापोटी आपण राणे यांच्या प्रचाराला आलो, हे त्यांनी आवर्जून सांगितले. नारायण राणे यांचे मताधिक्य लक्षणीय वाढणार, हे राज ठाकरे यांच्या विक्रमी गर्दीच्या सभेनंतर स्पष्ट झाले.

राणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ एकदम व्हीआयपी बनला. विनायक राऊत हे दोन वेळा खासदार म्हणून येथून निवडून आले, तेव्हा अविभाजित शिवसेना व भाजपा युतीचे ते उमेदवार होते. तेव्हा मोदींच्या नावाचे वलय त्यांच्या पाठीशी होते. या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी मोदी नाहीत, तर राहुल गांधी यांचे नाव घेऊन, त्यांना मते मागावी लागली, हे त्यांचे व त्यांच्या पक्षाचे दुर्दैव आहे. नारायण राणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री आहेत. राणे यांना मत म्हणजे मोदींना मत हे मतदारांना चांगले समजते. भाजपाची सर्व ताकद राणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उदय सामंत व दीपक केसरकर हे मंत्रीद्वय राणेंबरोबर आहेत. उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राऊत यांच्या प्रचाराला आले आणि आडवा करीन, गाडून टाकीन अशी शिवराळ भाषा वापरून निघून गेले. या भाषेला कोकणातील मतदार आज कमळावर बटण दाबून उत्तर देईल.

अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्या सभांनी राज्यातील व केंद्रातील भाजपाची सर्व शक्ती राणे यांच्या पाठीशी उभी आहे, हा संदेश जनतेला मिळाला. राज ठाकरे यांच्या सभेने जुन्या शिवसैनिकांचे मीलन झाल्याचे बघायला मिळाले. राणे- राज ठाकरे एकाच मंचावर आल्याने नव्या- जुन्या शिवसैनिकांचे जणू संमेलनच कणकवलीला बघायला मिळाले. राज यांचे मनसैनिक बहुतांशी हे मूळचे शिवसैनिक आहेत आणि राणे यांचे निष्ठावान कार्यकर्ते हेही मूळचे शिवसैनिक आहेत. राज यांच्या सभेत सच्चे शिवसैनिक एकत्र आल्याचे दिसून आले.

राज ठाकरे यांनी आजवर त्यांच्या भाषणातून कोणाचाही मुलाहिजा न राखता, रोखठोक सडकून टीका केली आहे. जे पटत नाही, ते खणखणीत शब्दात मांडतात. जे आवडले त्याचे मनापासून ते कौतुक करतात. त्यांनी २०१९च्या निवडणुकीत मोदी-शहांवर परखड शब्दात टीका केली होती. ती टीका वैयक्तिक नव्हती. नोटाबंदीसारखे निर्णय त्यांना पटले नाहीत, ते त्यांनी जाहीरपणे मांडले. तशी हिंमत कोणत्याही विरोधी पक्षांनी तेव्हा दाखवली नव्हती. राज यांनी आजवर नारायण राणे यांच्यावर कधीच टीका केली नाही. राणे यांच्याशी त्यांनी आपली मैत्री जपली. आपल्या मैत्रीची ग्वाही देण्यासाठीच ते राणे यांच्या प्रचाराला आले होते. राज ठाकरे हे अन्य रजकीय पक्षांच्या व्यासपीठावर कधी गेले नव्हते किंवा त्यांच्या प्रचारात सामील झाले नव्हते. राणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ते प्रथमच भाजपाच्या मंचावर आले व कमळावर बटण दाबून राणे यांना निवडून द्या, असे त्यांनी आवाहन केले.

राणे यांच्या कार्याची राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून प्रशंसा केली. बॅ. ए. आर. अंतुले यांच्या नंतर कार्यक्षम, तडफदार व वेगवान काम करणारे नारायण राणे हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आहेत, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वत: आपल्याला म्हणाले होते, अशी सुखद आठवणही राज यांनी या सभेत करून दिली. राणे हे विधानसभेत विरोधी पक्ष नेते असताना, अभय बंग यांची आपण त्यांच्याशी भेट घालून दिली व त्यांनी राणेंकडे कुपोषणाची समस्या किती गंभीर असल्याचे सांगितले. दुसऱ्याच दिवशी राणे यांनी सभागृहात कुपोषणाने होणारे मृत्यू या विषयावर तासभर अभ्यासपूर्ण भाषण करून, सरकारला ठोस निर्णय घेणे कसे भाग पाडले, याचीही राज यांनी याच सभेत आठवण करून दिली.

आपण इथे आलो नसतो, तरी नारायण राणे निवडून येणारच होते; पण त्यांचा फोन आल्यावर आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही, असे सांगून राज ठाकरे यांनी आपल्या मैत्री संबंधाचा पुनरुच्चार केला. लोकसभेत निवडून गेल्यावर नुसता बाकड्यावर बसणारा खासदार पाहिजे की, निवडून गेल्यावर मंत्री होणारा व विकासकामे झपाट्याने करणारा खासदार पाहिजे असा प्रश्न राज यांनी मतदारांना विचारला. राणे हे निवडून गेल्यावर मोदी सरकारमध्ये पुन्हा मंत्री होणार व त्याचा लाभ कोकणाला होणार हे राज यांनी आवर्जून सांगितले.

कोकणात उद्धव ठाकरे यांच्या दोन सभा झाल्या. पक्षाचे अस्तित्व टिकविण्यासाठी धडपड करण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. ज्यांनी पक्ष गावागावात पोहोचवले ते कुणीही आज उबाठा सेनेत नाहीत. उद्धव यांनी त्यांच्या सभेत मोदी-शहांवर जे जे आरोप केले, त्यांचा समाचार राज ठाकरे यांनी कणकवलीच्या सभेत घेतला व सत्तेसाठी उद्धव यांनी कशी सौदेबाजी केली याचा पंचनामा केला. भाजपाने मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे मान्य केली असती, तर उद्धव आज मोदींच्या विरोधात जे बोलत आहेत, ते बोलू शकले असते का? त्यांच्या तोंडात भाजपाने सत्तेचा बोळा कोंबला असता, तर ते मोदी- शहांवर टीका करू शकले असते का? या राज यांच्या प्रश्नांनी उद्धव यांचे राजकारण उघडे पाडले.

अगोदर भाजपाबरोबर पाच वर्षे व नंतर मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षे सत्तेत असताना महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले होते, तर तेव्हा उद्धव यांनी विरोध का केला नाही, असाही प्रहार त्यांनी केला. कोकणात प्रत्येक प्रकल्पाला उद्धव ठाकरे विरोध करतात; पण त्यामागे जमिनीचे व्यवहार कसे होतात, याचेही गणित राज यांनी उलगडून सांगितले. अणूऊर्जा प्रकल्प कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश, तारापूर येथे असताना उद्धव ठाकरे, कोकणात प्रकल्प आणला, तर येथे विनाश होईल, असे का सांगतात? मुंबईत भाभा अणुसंशोधन केंद्र असताना, त्याला कधी विरोध केला नाही. मग जैतापूर, नाणारला विरोध का? असे प्रश्न विचारून, त्यांनी उद्धव यांना झाप झाप झापले….

कोकणात प्रथमच धनुष्यबाण हे चिन्ह नाही. उबाठा सेनेचा उमेदवार मशाल चिन्हावर लढतो आहे. भाजपा प्रथमच कमळ चिन्ह घेऊन मैदानात आहे. महायुतीची जागा आपल्याकडे खेचून घेण्यात भाजपाला यश मिळाले आहे. या निवडणुकीत प्रथमच कोकणात कमळ फुलणार व भाजपाचा खासदार नारायण राणे यांच्या रूपाने विजयी होणार आहे. अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या सभांनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांत उत्साहाला उधाण आले आहे, तर उबाठा सेनेमध्ये नैराश्य पसरले आहे. कोकणच्या लाल मातीवर कमळ फुलेल, असे वातावरण आहे.
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Recent Posts

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

9 mins ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

23 mins ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

34 mins ago

महापालिका सफाई कर्मचारी सुनील कुंभार यांनी सापडलेले १५ तोळे सोने दिले पोलिसांकडे!

महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केला कुंभार यांचा सत्कार मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका…

1 hour ago

Licence : २० मे रोजीची अपॉइंटमेंट घेतली असल्यास मुंबईत वाहन परवाना चाचण्यांच्या वेळेत बदल

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातल्या अखेरच्या टप्प्यातले मतदान उद्या होत असल्यामुळे वाहन चालनाच्या कोणत्याही प्रकारच्या…

1 hour ago

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे निधन

सातारा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे त्यांच्या…

2 hours ago