Share

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीची एकापाठोपाठ एक अशी भ्रष्टाचार, वसुली, अनधिकृत बांधकामे, शैक्षणिक पातळीवरील उदासीनता वगैरे अनेक प्रकरणे समोर येत आहेत. त्यातून सरकारी यंत्रणा, पोलीस दल, विद्यार्थी-पालक यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. आता मराठी भाषेचाही स्तर खालावण्याचा प्रकार या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरला. त्यावरून वादंग निर्माण झाला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने याबाबत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. मरिन ड्राइव्ह पोलिसांकडे तक्रार दाखल करून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची मागणी भाजपने लावून धरली आहे.

एकीकडे भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी वरळीतील गॅस सिलिंडर स्फोटाबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेनेने आक्रमक होत, मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि त्याआधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. आमदार आशीष शेलार यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महिलांचा अपमान करणे, हा माझा स्वभाव नाही आणि आमचे संस्कारही नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास केल्याचे आमदार शेलार यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे याच शिवसेनेच्या खासदाराने विरोधकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. आमदार शेलार यांनी किमान न्यायालयात जाऊन आपली भूमिका मांडण्याची तयारी केली आहे, पण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मात्र प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडिया यांचा आधार घेत आपले म्हणणे कसे आक्षेपार्ह नाही, हा तर्क मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तो न पटण्याजोगा आहे.

संसद सदस्य असलेल्या संजय राऊत यांनी आपण वापरलेला आक्षेपार्ह शब्द असंसदीय नसल्याचा दावा केला आहे. बोलीभाषेत मूर्ख, पढतमूर्ख या अर्थासाठी हा शब्द वापरला जातो, असा खुलासा त्यांनी केला आहे. मुळात कोणत्याही भाषेत प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो आणि काही वेळेस मागे-पुढे येणाऱ्या शब्दांनुसार त्या शब्दाचा अर्थही बदलतो. आता खासदार संजय राऊत यांनी बोली भाषेतील अर्थानुसारच या शब्दाचा उच्चार केला का? हा प्रश्न निर्माण होतो. दुसरा प्रश्न असा आहे की, महाविकास आघाडीच्या कारभारावरून भाजप आक्रमक झाल्याच्या संतापातून हा शब्द वापरला गेला का? शिवाय, त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा शब्द वापरल्याचा दाखला दिला आहे. पण इथे हे सयुक्तिक वाटत नाही. आपल्या अयोग्य कृतीबद्दलची ही निव्वळ सारवासारव आहे, असेच म्हणावे लागेल.

ठाकरे सरकारमधील तत्कालीन गृहमंत्र्याचे मनी लॉण्डरिंग प्रकरण, शिवसेनेशी संबंधित माजी पोलीस अधिकाऱ्याचे वसुली आणि हत्या प्रकरण, माजी पोलीस अधिकाऱ्यावरील वसुली आणि भ्रष्टाचाराचा आरोप, परिवहनमंत्र्यांचे अनधिकृत बांधकाम प्रकरण असे अनेक प्रकार या दोन वर्षांत भाजप आणि तपास यंत्रणांनी समोर आणले आहेत. दोनच दिवसांपूर्वी राज्यसभेतील निलंबित खासदारांनी संसदेसमोर धरणे आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या आंदोलकांची भेट घेतली. त्यावेळी खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यासाठी खुर्ची उचलून आणली. याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. त्यावरून भाजपने खासदार राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून विरोधकांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरला गेला का? उल्लेखनीय म्हणजे, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत मौन बाळगले आहे. तसेच इतरांच्या संस्काराबद्दल बोलणाऱ्या आघाडीच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यानेही याबाबत कोणतेही भाष्य केलेले नाही.

विशेष म्हणजे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, अशी मागणी होत असताना आघाडी सरकारने प्रत्येक शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य केली आहे आणि घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून मात्र या भाषेचा स्तर खाली आणला जात आहे. हे आताच होत आहे, असे नाही तर, याच भाषेच्या दर्जाबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या वर्षीच्या जानेवारी महिन्यात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील भाषेबद्दल या दैनिकाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिले होते. या वृत्तपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय नेते तसेच राज्यातील भाजप नेत्यांबद्दल खालच्या स्तराची भाषा वापरण्यात येत असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य असल्याने त्यांच्या शब्दभांडारातून काही शब्द घेत असतो, असेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मुळात बाळासाहेबांची भाषा ‘ठाकरी भाषा’ म्हणून ओळखली जात असली तरी, ते शब्दांचा वापर करतानाही पूर्णपणे तारतम्य बाळगत होते. माध्यमांसमोर बोलतानाही ते संयमानेच आणि तर्कसंगत बोलत होते. त्यामुळे शब्दभांडार जरी त्यांचा असला तरी, तो कुठे आणि कसा वापरायचा, याचे भान ठेवणे क्रमप्राप्त आहे. बोलीभाषेतील गोडवा आपल्या राजकीय हेतूमुळे नष्ट होऊ नये, हे पाहणे देखील गरजेचे आहे. अन्यथा अशा प्रकारे बोलीभाषेचे वेष्टन चढवून आक्षेपार्ह शब्दांचा वापर सर्रास होऊ लागला, तर कविवर्य कुसुमाग्रजांच्या मराठी अभिमान गीताप्रमाणे ‘आपल्याच घरात हाल सोसते मराठी’, असे म्हणावे लागेल.

Recent Posts

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

25 mins ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

1 hour ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

1 hour ago

काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले! जमशेदपूर…

2 hours ago

पतंजलीच्या उत्पादनाचा दर्जा निकृष्ट! सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल, तिघांना तुरुंगवास

नवी दिल्ली : फसव्या जाहिरातींप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यामुळे पतंजली कंपनीचे संस्थापक रामदेव बाबा आणि बाळकृष्ण…

2 hours ago

महापालिका सफाई कर्मचारी सुनील कुंभार यांनी सापडलेले १५ तोळे सोने दिले पोलिसांकडे!

महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केला कुंभार यांचा सत्कार मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका…

2 hours ago