Tuesday, May 21, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमुंबई-गोवा महामार्ग वास्तव अन् अवास्तव...!

मुंबई-गोवा महामार्ग वास्तव अन् अवास्तव…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. महामार्ग रखडल्याचा त्रास ज्यांना रस्तामार्गाने कोकणात किंवा गोव्याला जायचे आहे त्यांना निश्चितच होतो. वीस-वीस वर्षे एखादा महामार्ग पूर्ण होत नाही हे कोकणवासीयांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. मुंबई ते गोवा व्हाया कोकण जोडणारा हा महामार्ग खरंतर केव्हाच पूर्ण व्हायला हवा होता; परंतु यातील अडचणी दूर करण्याची इच्छाशक्ती दाखवली गेली नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप ते पत्रादेवी हा महामार्ग कालमर्यादेतच पूर्ण झाला; परंतु रायगड जिल्ह्यातच या महामार्गाचे काम प्रदीर्घ काळ रखडले गेले. या महामार्गासाठी २ ऑक्टोबर २००७ रोजी रायगडच्या पत्रकारांनी महामार्ग चौपदरीकरणासाठी आंदोलन छेडले. या महामार्गासाठी झालेले ते पहिले आंदोलन होते. त्यानंतरही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा विषय वृत्तपत्रातून सतत जागता ठेवला. राजकीय पक्षाचे पुढारी आणि नेत्यांनी त्यांच्या-त्यांच्या स्तरावर आणि कार्यपद्धतीनुसार मुंबई-गोवा महामार्गाच्या विषयाला चालना देण्याचा प्रयत्न केला; परंतु महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती मात्र प्राप्तच होऊ शकली नाही. कधी ठेकेदार तर कधी शासनाची उदासीनता यामुळे त्या मार्गाचे काम हे गती घ्यायलाच तयार नाही अशी स्थिती होती.

कोकणातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यात निवळी येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, विद्यमान केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यानंतर कुडाळ येथेही या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. आजच्या घडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौपदरीकरणाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. दुर्दैवाने रत्नागिरी जिल्ह्यातील काम अपूर्णच आहेत. वास्तविक सिंधुदुर्गातील काम पूर्णत्वाकडे जात असताना रत्नागिरी जिल्ह्यातील काम आजही अपूर्णच आहे. याची कारणं रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने तपासली पाहिजेत. झाराप-पत्रादेवी महामार्ग विद्यमान केंद्रीय मंत्री माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याने केंद्रातील काँग्रेस सरकारमधील रस्ते विकास मंत्री जोशी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पूर्ण केला.

खारेपाटण ते झाराप या महामार्गाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठीही केंद्रीय मंत्री नारायण राणे, नितेश राणे, माजी प्रमोद जठार, माजी खासदार निलेश राणे सतत पाठपुरावा करत राहिले. याला रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिसादही दिला आणि काही ठरावीक वेळेत पूर्णत्वाकडे जात आहे. त्यात रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात आजही काम रखडले आहे. कोलाड, वडखळ येथे सतत अपघात होत होते. पूर्वीच्या मुंबई-गोवा महामार्गावर शेकडोजण अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग तातडीने व्हावा असे कोकणवासीयांना वाटत होते; परंतु तसे घडले नाही. आजही कोकणातील या महामार्गावरून प्रवास करणे अवघडच झाले आहे. यामध्ये कोकणातील जनतेनेही जमीन देण्यातही काही ठिकाणी जी काही ठिकाणी आडमुठी भूमिका घेतली त्याचा परिणामही या महामार्गाच्या कामगिरीवर झाला आहे. वनविभागाची अडवणुकीची भूमिका, पर्यावरणवाद्यांकडून घेण्यात आलेली भूमिका, ठेकेदाराचा वेळकाढूपणा, रायगड जिल्ह्यातील प्रकरण प्रदीर्घ काळ न्यायालयातच होते. असा सार्वत्रिक परिणाम रस्ता रखडण्यामागे आहे. मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यामागे कोकणातील जनतेचा दोष फार कमी आहे. कोकणातील जनतेमुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडलेला नाही, तर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला सूरच सापडला नाही.

सिंधुदुर्गातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत आले; परंतु रत्नागिरी आणि रायगडमध्ये मात्र काम तसेच रखडले. वास्तविक रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेनेही यासाठी उठाव करायला हवा होता; परंतु तसे कधीच घडले नाही. जनताही तितकीच सतर्क असायला हवी; परंतु महामार्ग झाला किंवा नाही झाला तरीही आम्हाला काही पडलेले नाही अशी उदासीनता असेल, तर विकास कधी, कसा होणार. यावर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा असे आजच्या घडीला तरी सरकारचे प्रयत्न आहेत. कोकणातील जनतेला यावर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जाताना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. येत्या पंधरा दिवसांत या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यासाठी आवश्यक असणारा निधी तत्काळ उपलब्ध करण्याविषयी या चर्चेत सुचित केले आहे. गेली काही वर्षे गणेशोत्सवात येणाऱ्या कोकणवासीयांना फारच त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे-पुणे-कोल्हापूर घाटमार्गे कोकण असा हा प्रवास करावा लागतोय. हा प्रवास यामुळे टळू शकेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

सोशल मीडियावरही कोकणातील या महामार्गाविषयी बरेच दाखवले जातेय. यात वास्तवता आहेच. यात वाद नाही; परंतु संपूर्ण महामार्गच पूर्ण खराबच आहे. हे चित्र मात्र अवास्तवच म्हणाव लागेल. कोकणच्या या महामार्ग चौपदरीकरणाचे काम आणि यातल वास्तव, अवास्तव काहीही असले तरीही यावर्षी जानेवारीपर्यंत तरी चौपदरीकरण पूर्ण होवोत ही श्री गणेशाकडे प्रार्थना. यात काही अडचणी असतील तर दूर होऊन काम पूर्ण झाले पाहिजे. यासाठी कोकणातील सर्वांनीच प्रयत्न करावेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -