Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीMaratha Andolan : सदावर्तेंनंतर मराठा आंदोलकांकडून ठाकरे गटाच्या माजी आमदाराच्या गाडीची तोडफोड

Maratha Andolan : सदावर्तेंनंतर मराठा आंदोलकांकडून ठाकरे गटाच्या माजी आमदाराच्या गाडीची तोडफोड

सर्वपक्षीय नेत्यांवर मराठा समाजाचा रोष

बीड : मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळावे म्हणून सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावे अन्यथा गावागावात उपोषण करण्यात येईल, असा इशाराही मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. मराठा समाज पेटून उठला असून गावागावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या संतापातून आंदोलक कधी आत्महत्या तर कधी तोडफोड अशी बेकायदेशीर पावले उचलत आहेत.

दोनच दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची त्यांच्या राहत्या घरासमोर तोडफोड करण्यात आली. यानंतर आता ठाकरे गटाचे (Thackeray Group) माजी आमदार बदामराव पंडित (Badamrao Pandit) यांच्यादेखील गाडीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे मराठ्यांनी केवळ सत्ताधारीच नव्हे तर मागील काळात आरक्षण न देऊ शकलेल्या विरोधकांनाही टार्गेट केले आहे.

बीड जिल्ह्यात असताना हा गाडी फोडण्याचा प्रकार घडला. ठाकरे गटाचे माजी आमदार बदामराव पंडित हे मोही माता यात्रेसाठी गेले होते. दरम्यान, मादळमोही येथे संतप्त मराठा तरुणांनी त्यांची गाडी फोडली. गाडी फोडल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. या घटनेमुळे मराठा समाज आणखी काय काय पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -