Thursday, May 2, 2024
HomeदेशBihar politics : बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी; आज होणार नितीशकुमार सरकारची बहुमत...

Bihar politics : बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी; आज होणार नितीशकुमार सरकारची बहुमत चाचणी

काल रात्री तेजस्वी यादव यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त… नेमकं काय घडलं?

पाटणा : फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रीय जनता दलाची (RJD) साथ सोडत पुन्हा एकदा भाजपसोबत (BJP) सरकार स्थापन केले. त्यामुळे जेडीयू (JDU) आणि भाजप सरकारची आज बहुमत चाचणी (Majority test) पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय वातावरण (Bihar politics) तापलं असून प्रत्येक पक्ष आपल्या आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

एकूण २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत बहुमतासाठी १२२ आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. सध्याच्या घडीला जेडीयू आणि भाजपकडे मिळून १२८ आमदारांचे संख्याबळ आहे. तर काँग्रेस, राजद आणि डाव्या पक्षांकडे मिळून ११४ आमदारांचे पाठबळ आहे. सध्या भाजप आणि नितीशकुमार यांच्या सरकारचं काठावरचं बहुमत असल्याने प्रत्येक पक्षाला आपले आमदार फुटण्याची भीती वाटत आहे.

बहुमत चाचणीला आमदार आपल्या विरोधात मतदान करु शकतात, अशी भीती बिहारमधील पक्षांना वाटत आहे. काल रात्री उशिरापर्यंत जेडीयूच्या काही नेत्यांशी संपर्क होऊ शकत नसल्याच्या बातम्या पसरत होत्या. फ्लोअर टेस्टपूर्वी काल (रविवारी) जेडीयूच्या विधिमंडळाची बैठक झाली. यावेळी सर्व ४५ आमदार उपस्थित नव्हते. जेडीयूचे ४ आमदार विमा भारती, सुदर्शन, दिलीप राय आणि रिंकू सिंग या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत शिवाय त्यांचे फोनही बंद होते. त्यामुळे भाजप सरकार आज बहुमताची चाचणी कशी पार करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तेजस्वी यादव यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांच्या घराबाहेर काल रात्री मोठं राजकीय नाट्य सुरु होतं. अनेक आमदार तेजस्वी यादव यांच्या घरातच वास्तव्याला होते. पोलिसांचा बंदोबस्त या गोंधळानंतर वाढवण्यात आला. याचे मुख्य कारण म्हणजे राजदचे आमदार चेतन आनंद यांच्याबाबत पाटणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती की, त्यांचे अपहरण करून त्यांना तेजस्वीच्या घरी ठेवले आहे. यानंतर पोलीस तपासासाठी आले, मात्र चेतन आनंदने आपण स्वत:च्या इच्छेने येथे असल्याचे पोलिसांना सांगितले. यानंतर पोलीस परतले.

यानंतर मध्यरात्रीपर्यंत पोलीस पुन्हा एकदा तेजस्वीच्या घरी पोहोचले. बिहार पोलीस तेजस्वी यादव यांच्या घरी दोन वेळा पोहोचले. सर्व आमदार तेजस्वी यांच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आरजेडीवर हल्लाबोल करत एक्स पोस्ट करण्यात आली.

पोलीस पुन्हा तेजस्वी यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर आरजेडीचे आमदार चेतन आनंद तेथून निघून गेले. तेजस्वी यादव यांचे घर सोडल्यानंतर ते आपल्या घरी परतले असल्याचे समोर आले आहे. चेतन आनंदच्या प्रकरणाबाबत पोलीस वारंवार तेजस्वीच्या घरी भेट देत होते.

भाजप नेते शाहनवाज हुसेन यांचा तेजस्वींवर हल्लाबोल

भाजप नेते शाहनवाज हुसेन म्हणाले, “तुम्ही (तेजस्वी यादव) आमदारांचे अपहरण करत असाल आणि आमदाराच्या कोणत्याही नातेवाईकाने तक्रार दाखल केली तर पोलीस नक्कीच येतील. तुम्ही (तेजस्वी यादव) कोणत्याही आमदाराला घरात बांधून ठेवले तर पोलीस नक्कीच कारवाई करतील. त्यामुळे ते (पोलीस) त्यांचे काम करत आहेत. आरजेडी आणि काँग्रेस फक्त संभ्रम पसरवत आहेत. जेडीयू आणि भाजप मिळून विधानसभेत बहुमत सिद्ध करतील. कोणीही (आमदार) बाहेर नाही. केवळ संभ्रम पसरवला जात आहे. एनडीएचे सर्व आमदार एकत्र आहेत. आरजेडी आणि काँग्रेसमध्ये हरवलेल्या लोकांचा विचार करायला हवा.

काय उलथापालथी होणार?

मुख्यमंत्री नितीशकुमार, तेजस्वी यादव, जीतन राम मांझी हे बिहार विधानसभेत पोहोचले आहेत. १२८ आमदारांचा नितीशकुमार यांना पाठिंबा असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात आता नेमक्या काय उलथापालथी होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -