Tuesday, May 21, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखगृहनिर्माण प्रकल्पात ज्येष्ठांना ‘महारेरा’चा आधार

गृहनिर्माण प्रकल्पात ज्येष्ठांना ‘महारेरा’चा आधार

घरात लहान मुलं आणि आजी-आजोबा असतील, तर घर खेळतं राहतं, असे बोलले जाते. मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांत चाळसंस्कृतीच्या जागी फ्लॅटसंस्कृती आली आहे. पूर्वी चाळीत राहणाऱ्या वयोवृद्ध व्यक्तींना शेजारधर्मामुळे कधी एकाकी वाटत नसे. घरातील वडीलधारी मंडळी आजारी पडली की, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी शेजारचा बंड्या नेहमीच धावून येत असायचा. आता इमारतींमधील फ्लॅटमध्ये एखादी वयस्कर व्यक्ती आजारी पडली, तर त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी जवळ राहणारा कोण नातेवाईक किंवा मित्र जवळपास आहे?, याचा विचार करावा लागतो.

इमारतीतून ज्येष्ठ आजारी व्यक्तींना उपचारासाठी घेऊन जाताना मुंबईतील अनेक इमारतींमध्ये सोयी-सुविधांची वानवा असल्यामुळे या कठीण समयी इमारतीतील अनेक समस्याही प्रकर्षाने जाणवतात. या बाबींचा विचार केला, तर महाराष्ट्रात ‘महारेरा’ने सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांच्या सोयी-सुविधा विचारात घेऊन गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्त्वांच्या आदेशाचा मसुदा जाहीर केला आहे. असा मसुदा जाहीर करणारे महारेरा हे देशातील पहिलेच प्राधिकरण ठरले आहे, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. हा आदेश लागू झाल्यानंतर विकासकांनाही या तरतुदींचा विक्रीकरारात यथायोग्य पद्धतीने समावेश करावा लागणार आहे.तसेच यापुढे उभारण्यात येणारे गृहनिर्माण प्रकल्प हे विकासकांना आदर्श मार्गदर्शक तत्त्वानुसारच बांधावे लागणार आहेत.

विशेष म्हणजे केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने याबाबतची आदर्श मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वीच जारी केलेली आहेत. सर्व राज्यांनी त्यांच्या राज्यात याबाबत उचित पावले उचलावीत, असे केंद्र सरकारकडून सुचविले होते. यानुसार महारेराने यात ज्येष्ठांच्या गरजांनुसार इमारतींशी संबंधित सर्वच अंगांचा सांगोपांग विचार करून तरतुदी सुचविल्या आहेत. एका मजल्यापेक्षा जास्त मजल्याच्या इमारतीला लिफ्ट असावी. इमारतीच्या आतील आणि बाहेरील भागात व्हीलचेअरवर सुद्धा कुठल्याही अडथळ्याशिवाय फिरता येईल असे आरेखन असावे. आवश्यक तेथे रॅम्पसची व्यवस्था असावी, त्यादृष्टीने दरवाजेही ९०० एमएमपेक्षा मोठे असावेत. प्राधान्याने स्लायडिंगचे दरवाजे असल्यास उत्तमच. दरवाजाचे हँडल्स, कड्या सहजपणे व्यवस्थित पकडता येतील असे आणि दणकट असावे. यातील फर्निचरही वजनाला हलके, दणकट आणि कुठल्याही अणकुचीदार टोकांशिवाय असावे. सर्व लिफ्टला द्रृकश्राव्य व्यवस्था असावी. या लिफ्टमध्ये व्हीलचेअर सहजपणे आतबाहेर करता यावी. जिन्यांची रुंदी १५०० एमएमपेक्षा कमी नसावी. शिवाय जिन्याच्या दोन्ही बाजूंना हँडल्स असावे. पूर्ण उघडा आणि वर्तुळाकार जिना असू नये. दोन पायऱ्यांमधील अंतरही फार असू नये. जिनाही १२ पायऱ्यांपेक्षा मोठा असता कामा नये.

इमारतीच्या कॉरिडॉरमध्ये कुठेही पायऱ्या असू नये. खूपच गरज असेल, तर रॅम्पसची व्यवस्थाही असावी. भिंतीलगत गरजेनुसार विशिष्ट उंचीवर हँडल्सही असावेत.स्वयंपाकघरात गॅस प्रतिरोधक यंत्रणा असावी. स्नानगृहात सहजपणे पकडता येईल अशा हँडल्ससह वॉश बेसिन असावे. हँडल्स दणकट असावेत. न घसरणाऱ्या टाइल्स असाव्यात. शौचालयाचा दरवाजा बाहेर उघडणारा असावा. विजेची पर्यायी व्यवस्था असावी, अशा यातील काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत. सेवानिवृत्त, ज्येष्ठांसाठीचे गृहनिर्माण प्रकल्प, ही बदलत्या समाजाची गरज आहे; परंतु या वर्गाच्या विशिष्ट अशा अगदी प्राथमिक गरजा लक्षात घेऊन ही बांधकामे होताना दिसत नव्हती. म्हणून ज्येष्ठांची होऊ शकणारी फसवणूक आणि भ्रमनिरास टाळण्यासाठी महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांनी अशा विशिष्ट गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार केला आहे. त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्त्वपूर्ण घटक असल्याने त्यांचे राहणीमान सुसह्य व्हावे, आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या पालन-पोषणाची जबाबदारी व अधिकार यांची जाणीव समाजाला आणि त्यांच्या पाल्यांना व्हावी, म्हणून केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आई-वडील, ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम, २००७ पारित केला आहे. हा अधिनियम महाराष्ट्रात १ मार्च, २००९पासून लागू करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांमार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या अपेक्षांची पूर्ती होणे अपेक्षित असते; परंतु आतापर्यंतची परिस्थिती पाहता ज्येष्ठ नागरिकांचे हित आणि निगा संगोपनात शासकीय अनास्था, निरुत्साह आणि उदासीनता दिसून आली आहे.

महाराष्ट्र राज्याची सध्याची अंदाजे लोकसंख्या १३ कोटी इतकी असून त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांची अंदाजे संख्या एक कोटीच्या घरात आहे. कुटुंबात मिळणाऱ्या सोयी-सुविधा, आधुनिक उपचार पद्धती, वैद्यकीय सुविधा, राहणीमान, सकस आहार व आरोग्याविषयी जागृती निर्माण झाल्यामुळे आयुष्यमान वाढत आहे, ही जमेची बाजू आहे. शिक्षणाचे प्रमाण वाढल्याने व रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने तरुण वर्ग व्यवसाय, नोकरीनिमित्ताने ग्रामीण भागातून शहराकडे व एका शहरातून दुसऱ्या शहराकडे स्थलांतरित होत आहे. त्यामुळे स्थलांतराच्या वाढत्या प्रमाणाबरोबरच विभक्त कुटुंब पद्धती रूढ होत आहे. शहरात महागाई, राहण्यासाठी छोटी जागा या कारणामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. या परिस्थितीत आता वेळीच बदल घडवून आणणे तितकेच महत्त्वाचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -