Thursday, May 2, 2024
Homeदेश'या' साठी महापारेषणला स्कॉच पुरस्कार

‘या’ साठी महापारेषणला स्कॉच पुरस्कार

नवी दिल्लीत घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) : नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ७६ व्या स्कॉच पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये ‘पॉवर आणि एनर्जी’ या विभागांतर्गत ‘ईएचव्ही लाईन पॅट्रोलिंग’मध्ये ड्रोनचा उपयोग` यासाठी महापारेषणला राष्ट्रीय स्तरावर सिल्व्हर पारितोषिकाची घोषणा झाली. महापारेषण कंपनीने दुर्गम भागातही ड्रोनच्या सहाय्याने वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी व विजेचे वहन करण्यासाठी याचा वापर केला आहे. या पारितोषिकाबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतूक केले आहे.

स्कॉच ग्रुपच्या वतीने दरवर्षी शासन अर्थ, बॅंकिंग, तंत्रज्ञान, सांघिक नागरिकत्व, आर्थिक या क्षेत्रातील वाढीसाठी हा पुरस्कार दिला जातो. महापारेषणच्या वतीने नामांकन भरून सदर पुरस्कार गुणांकन पध्दतीने मिळविला आहे. महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी या यशाचे श्रेय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहे.

या पुरस्काराबद्दल दिनेश वाघमारे म्हणाले,“महापारेषणच्या यशाचे श्रेय मी माझ्या टीमला देतो. अधिकारी व कर्मचारी यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे महापारेषणला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महापारेषणने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्यामुळे भविष्यातही महापारेषणचे अधिकारी व कर्मचारी चांगले काम करतील.“

महापारेषणमधील अति उच्च दाब वाहिनी आणि उपकेंद्रांचे स्कॅनिंग व देखरेख करण्यासाठी २४ ड्रोन वापरात आहेत. हे ड्रोन हाय रेझोल्यूशन, सामान्य व्हिजन व थर्मोव्हिजन कॅमेरा तसेच जीपीएस यंत्रणेसह सुसज्ज आहेत. ड्रोन मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक देखभाल हेतूसाठी वापरले जात आहेत. विशेष म्हणजे अशा ठिकाणी जेथे कंडक्टर/टॉवर ॲक्सेसरीज/हार्डवेअर फिटींगची दृश्यमानता योग्य नसते. यामुळे अति उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचे निरीक्षण कमी वेळेत पण अधिक अचूकपणे करता येते. परिणामी, अति उच्च दाब वाहिनी आणि उपकेंद्रांमधील बिघाड कमी वेळेत दूर केले जातात व उच्चतम उपलब्धता राखली जाते.

महापारेषण मधील सर्व अति उच्च दाब (संचलन व सुव्यवस्था) मंडळ व परिमंडळ कार्यालयात ड्रोन यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. हा प्रकल्प विशेष लक्षणीय आहे. परीक्षकांनी सदर उपक्रमाबद्दल महापारेषणचे कौतुक केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -