Monday, May 20, 2024
Homeदेश२२ जानेवारीला घरामध्ये राम ज्योती प्रज्वलित करा

२२ जानेवारीला घरामध्ये राम ज्योती प्रज्वलित करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २२ जानेवारी रोजी सायंकाळी तुमच्या घरामध्ये श्री राम ज्योती प्रज्वलित करण्याचे मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो. कालपासून आपण देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान सुरू केले आहे. देशभरातील मंदिरं स्वच्छ केली जाणार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जुनागडमधील (गुजरात) ‘आई श्री सोनल माँ’ यांच्या जन्मशताब्दी समारंभाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान म्हणाले, सोनल माँ यांचे जीवन पाहिले तर सर्वांच्या लक्षात येईल की, असे कुठलेही यूग नाही, ज्या युगात या भारतभूमीवर महान आत्मे अवतरले नसतील. गुजरात आणि सौराष्ट्रची भूमी ही महान संतांची भूमी आहे. सौराष्ट्रच्या मोठ्या संत परंपरेतील श्री सोनल माँ या आधुनिक युगासाठी दीपस्तंभ होत्या. त्यांची अध्यात्मिक ऊर्जा, मानवतावादी उपदेश, तपश्चर्या आणि शिकवण कायमच आपल्या लक्षात राहील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की, सोनल माँ यांच्या व्यक्तिमत्वात एक अद्भूत दैवी गूण होता, ज्याचे लोकांना खूप आकर्षण होते. आजही तुम्ही जुनागडमधील सोनलधामला भेट दिली तर तुम्हाला ती दैवी शक्ती अनुभवता येईल. सोनल माँ यांनी शिक्षणाच्या क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली होती. तसेच त्यांनी समाजाचे प्रबोधनही केले. लोकांना व्यसनापासून मुक्त केले. व्यसनांच्या अंधारातून समाजाला बाहेर काढण्यासाठी आणि त्याच समाजात नवा प्रकाश निर्माण करण्यासाठी सोनल माँ यांनी मोलाचे योगदान दिले.

नरेंद्र मोदी म्हणाले, सोनल माँ यांनी समाजातला अंधकार नष्ट करण्याचे काम केले. देशाची एकता आणि अखंडतेसाठी प्रयत्न केले. देशातील एकात्मतेसाठी त्या भक्कम भींत बनून उभ्या राहिल्या. भारताची फाळणी झाली तेव्हा जुनागड तोडण्याचे षडयंत्र काहींनी रचले होते. तसेच जुनागड भारतापासून हिरावण्याचे प्रयत्नही चालू होते. परंतु या सर्वांविरोधात श्री सोनल माँ चंडीप्रमाणे उभ्या राहिल्या. आता २२ जानेवारी रोजी अयोध्येतील श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. ते पाहून सोनल माँ खूप आनंदी होतील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -