Saturday, June 1, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलव्यायाम व वाचन

व्यायाम व वाचन

प्रा. देवबा पाटील

अवंतीपूरच्या गावक­ऱ्यांनी एकमताने शाळा गावापासून थोडी दूर बांधली होती. गावापासून या शाळेपर्यंत जाण्यासाठी एक छोटासा, सुरेखसा रस्ता गावक­ऱ्यांनी तयार केला होता. शाळेमध्ये बगीचा होता. प्रशस्त मैदान होते. शेजारून एक ओहळ वाहत असे. चहुबाजूंनी हिरवीगार वनश्री होती. निसर्गसौंदर्याची पखरण झालेली होती. या विद्यामंदिरातील शिक्षक प्रेमळ, मनमिळाऊ, ज्ञानी, निर्लोभी, निमर्त्सर होते. हसत हसत विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते केव्हाही तयार असत. तेथील विद्यार्थीसुद्धा अभ्यासू, गुणवान, धैर्यवान, आज्ञाधारक होते. आपल्या गुरूंवर त्यांची अतोनात श्रद्धा होती. गुरुजनांचा विद्यार्थ्यांत तसाच पालकांमध्येसुद्धा नेहमी मानसन्मान, आदर असे.

सातव्या वर्गामध्ये एकाच बाकावर बसणारे सुहास व विकास जीवलग मित्र होते. त्यांचा अभ्यास हा अभ्यासाच्या वेळेलाच व्यवस्थित पूर्ण होत असे. म्हणूनच आज रविवारला सकाळच्या वेळी ते फिरायला निघाले. दोघेहीजण नाल्यावर आले. एका स्वच्छ हिरवळीजवळ चांगल्यापैकी कोरड्या खडकावर त्यांनी आपले ठाण मांडले.

एवढ्यात बाजूने येणा­ऱ्या पावलांच्या आवाजाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांचे मराठीचे वयोवृद्ध गुरुजी त्यांच्याकडेच येताना दिसत होते. गुरुजींना बघून दोघेही आदराने उभे राहिले. “बसा! खाली बसा.” गुरुजी त्यांच्याजवळ येत म्हणाले.

सुहास व विकास गुरुजींसोबत पुन्हा खाली बसले. गुरुजी, आज तुम्ही इकडे कसे काय आलेत फिरायला? विकासने प्रश्न विचारला. गुरुजी म्हणाले, “मी दररोज सकाळी इकडेच निसर्गाच्या सान्निध्यात, स्वच्छ व मोकळ्या हवेत फिरायला येत असतो. शरीर निरोगी राहण्याकरिता व्यायामाची, खेळांची, फिरण्याची, शुद्ध व मोकळ्या हवेची अत्यंत आवश्यकता असते. निरोगी शरीर हा माणसाच्या सुखाचा अमोल ठेवा आहे. सपाटून भूक लागणे, अन्नपचन व्यवस्थित होणे, रात्री स्वस्थ झोप लागणे ही निरोगी आरोग्याची प्रमुख लक्षणे आहेत. ही म्हण तुम्हाला माहीतच असेल?” गुरुजींनी प्रश्न केला. “शरीर धड, तर मन धड, अशी एक म्हण मला माहीत आहे”, विकास म्हणाला.

“तेच, एकाच अर्थाच्या अशा अनेक म्हणी असतात.” गुरुजी म्हणाले. “वयोमानानुसार व वार्धक्यामुळे मी आता मैदानी खेळ खेळू
शकत नाही किंवा जोरकस व्यायामही करू शकत नाही म्हणून दररोज नियमितपणे सकाळ-संध्याकाळ फिरायला जात असतो. तुम्ही मात्र
रोज सकाळी व्यायाम करीत जा आणि सायंकाळी खेळ खेळत जा.”

“पण गुरुजी! व्यायामाने तर शरीर खूपच दुखते, ठणकते असे म्हणतात.” सुहासने आपली शंका प्रदर्शित केली. “तसे काही नाही.” गुरुजी सांगू लागले. “सुरुवातीला चार-पाच दिवस तसे होते; परंतु व्यायाम हळूहळू वाढवित जावा म्हणजे थोड्याच दिवसांत शरीराला व्यायामाची सवय होते व त्यानंतर मात्र शरीर मुळीच दुखत नाही वा त्रासही देत नाही.”

“गुरुजी! खेळण्याचा, व्यायामाचा आपणास काय फायदा होतो?” विकासने विचारले.
“खेळांना आपल्या जीवनात फार मोठे स्थान आहे. त्यामुळे शरीर चपळ बनते, चांगले आरोग्य प्राप्त होते, माणूस सदैव आनंदात-उत्साहात राहतो. धडाडीचे काम करण्याची अंगात हिंमत येते. खेळांमुळे शरीरातील स्नायूंना व्यायाम होतो. भूक चांगली लागते. अन्नपचन नीट होते. व्यायामामुळे अंगात ताकद येते, शरीर पीळदार, बलवान होते. आयुरारोग्य वाढते.”

“गुरुजी, तुम्हाला एवढी माहिती कशी काय माहीत झाली?” सुहासने विचारले.

गुरुजी म्हणाले, “मला दररोज नियमितपणे वाचन करण्याची सवय आहे. माझ्या वाचनामध्ये ऐतिहासिक, पौराणिक, आधुनिक, वैज्ञानिक लेख, कथा, कविता, कादंब­ऱ्या इ. सर्व प्रकारच्या साहित्याचा समावेश असतो. यामधील जे काही मला चांगले, उपयोगी, ज्ञानसंवर्धक, उद्बोधक असे वाटते ते मी लिहून ठेवीत असतो. तुम्हीसुद्धा चांगली चांगली पुस्तके वाचीत जा. जी जी पुस्तके आपण वाचू त्यावर चिंतन केले पाहिजे. भराभर वाचून काही उपयोग नाही. भराभर केलेले पाठांतर सर्वथा व्यर्थच तर असते.”

“आपण जितके अन्न पचवू त्याच प्रमाणात शक्ती येते, जितके खाऊ त्या प्रमाणात नव्हे. वाचनालाही
तो नियम लागू आहे. मनन करून जितके बुद्धीत राहील, आपणास अनुभवता येईल तितकेच आपल्या उपयोगी पडेल. बाकीचे व्यर्थ जाईल.”

“तुम्हीसुद्धा ‘अति तेथे माती’ हे तत्त्व लक्षात ठेवून वाचन करीत जा. वाचनामध्ये आलेल्या पुस्तकांतील चांगला, उपयुक्त, बोधप्रद, संस्कारक्षम, शीलवर्धक व वैज्ञानिक असा मजकूर एका वहीमध्ये लिहीत जा. ज्यावेळी आपणास वाचावयास कोणतेच पुस्तक नसेल, अशा वेळी ही वही वाचीत जा.”

“गुरुजी! आम्ही आजपासूनच या शुभ कामास सुरुवात करतो.” विकासने सांगितले.
“होय गुरुजी.” सुहासही म्हणाला.
“ठीक आहे.” गुरुजी म्हणाले नि सुहास, विकास व गुरुजी खडकावरून उठून गावाकडे चालू लागले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -