Friday, July 5, 2024
Homeक्रीडाIPL 2024गुजरातसमोर कोलकाता हतबल

गुजरातसमोर कोलकाता हतबल

७ विकेट राखून टायटन्सचा सोपा विजय

ईडन गार्डन : गोलंदाजीसह फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर दमदार सांघिक कामगिरी करत यंदाच्या हंगामात लयीत असलेल्या गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर ७ विकेट राखून सहज विजय मिळवला. हंगामातील या सहाव्या विजयामुळे गुणतालिकेत १२ गुणांसह गुजरातचा संघ अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

कोलकातातील ईडन गार्डन स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात १७९ धावा करत गुजरातला विजयासाठी १८० धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने १७.५ षटकांतच ३ गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पूर्ण केले. गुजरातला सलामीवीर शुभमन गिल आणि वृद्धिमान साहाने बरी सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ४१ धावांची भागीदारी केली. रसेलने पाचव्या षटकात साहाला १० धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर हार्दिक आणि गिलने डाव पुढे नेत दुसऱ्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी केली. हार्दिकला अकराव्या षटकात बाद करत हर्षित राणाने ही जोडी फोडली. त्यानंतर पुढच्याच षटकात सुनील नरिनने शुभमन गिलला ४९ धावांवर बाद केले. त्यानंतर डेव्हिड मिलर आणि विजय शंकरने नाबाद राहिले. गुजरातने विजयी लक्ष्य १७.५ षटकांत पूर्ण केले.

गुजरातकडून विजय शंकरने मॅच विनिंग ५१ धावांची खेळी केली. त्याला डेव्हिड मिलरने ३२ धावांची मोलाची साथ दिली. कोलकाताकडून हर्षित राणा, आंद्रे रसेल आणि सुनील नारायणने प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी गुजरातने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाताचा एन जगदीशन तिसऱ्या षटकात १९ धावांवर आऊट झाला. मोहम्मद शमीने त्याची विकेट घेतली. त्यानंतर आलेल्या शार्दुल ठाकूरची विकेटही मोहम्मद शमीने पाचव्या षटकात घेतली. शार्दूल शून्यावरच बाद झाला. व्यंकटेश अय्यर आणि रहमानउल्लाह गुरबाजने संघाचा डाव पुढे नेला. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ३७ धावांची भागीदारी केली. जोशुआ लिटलने अकराव्या षटकात ११ धावा करणाऱ्या अय्यरचा अडथळा दूर केला. अय्यरनंतर नितीश राणालाही त्याने ४ धावांवर बाद केले. त्यानंतर गुरबाज आणि रिंकूने डाव पुढे नेला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी केली. ८१ धावांची स्फोटक खेळी करणाऱ्या गुरबाजला सोळाव्या षटकात नूर अहमदने आऊट केले. गुजबाजच्या विस्फोटामुळेच कोलकाताला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. तळात आंद्रे रसेलने ३४ धावांची भर घातली, तर रिंकूला १९ धावा जमवता आल्या. त्यामुळे कोलकाताने निर्धारित षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात १७९ धावा जमवल्या. गुजरातच्या मोहम्मद शमी, जोश लिट्टल आणि नूर अहमद यांनी गोलंदाजीत छाप सोडली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -