Thursday, May 2, 2024
Homeमहत्वाची बातमीकबड्डी आत्मा, तर शरीरसौष्ठव श्वास : विजू पेणकर

कबड्डी आत्मा, तर शरीरसौष्ठव श्वास : विजू पेणकर

मुंबई (वार्ताहर) : आज मी जे काही आहे ते कबड्डी आणि शरीरसौष्ठव खेळामुळे. हे दोन्ही खेळ माझे सर्वस्व आहेत. याच खेळांनी मला नाव आणि लौकिक मिळवून दिले. म्हणूनच माझ्यासाठी कोणताही एक खेळ मोठा नाही. कबड्डी माझा आत्मा आहे, तर शरीरसौष्ठव माझा श्वास आहे. या खेळांनी मला खूप काही दिले आहे. आता उर्वरित आयुष्यात मला या खेळासाठी आणि समाजासाठी द्यायचे आहे, अशी भावना आपल्या भारत श्री किताबाची पन्नाशी पूर्ण करणाऱ्या राष्ट्रीय कबड्डीपटू आणि शरीरसौष्ठवपटू विजू पेणकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राला पहिलावहिला भारत श्री हे राष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्यपद पटकावून देणाऱ्या विजू पेणकर यांच्या या सोनेरी कामगिरीचा सुवर्णोत्सव साजरा करण्यासाठी मराठी क्रीडा पत्रकार संघांने विशेष कार्यक्रमाचे माझगाव येथील सर एली कदुरी हायस्कूलमध्ये आयोजन केले होते. या कार्यक्रमात जागतिक शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे यांच्या हस्ते विजू पेणकर यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत, मराठी क्रीडा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष हरचेकर, कार्याध्यक्ष सुहास जोशी, सचिव संदीप चव्हाण, कोषाध्यक्ष मंगेश वरवडेकर उपस्थित होते.

मुंबई आणि महाराष्ट्रासाठी एकाच वेळी दोन खेळांमध्ये खेळणाऱ्या धडाकेबाज आणि जिगरबाज विजू पेणकर यांनी कबड्डीत आपले नाव गाजवल्यानंतर १ ऑक्टोबर १९७२ साली भारत श्री या प्रतिष्ठेच्या किताबावर आपले नाव कोरले होते. ही त्यांची पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा होती आणि त्याच जेतेपदाची पन्नाशी साजरी व्हावी आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाची आठवण ताजी व्हावी म्हणून मराठी क्रीडा पत्रकार संघाने सोनेरी कामगिरीचा सुवर्णोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -