Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सINT Ekankika : बड़ी देर कर दी, सनम आते आते आते...!

INT Ekankika : बड़ी देर कर दी, सनम आते आते आते…!

  • पाचवा वेद : भालचंद्र कुबल

१९९२-९३ साल भारताच्या जागतिकीकरणाचं वर्ष समजलं जातं. ब्रँडिंग नावाच्या फंडामेंटल्सनी याच काळात उसळी घेतली आणि यात शिक्षणक्षेत्र देखील मागे नव्हते. मुलुंडच्या अत्तर उद्योजक भाऊसाहेब केळकरांनी स्थापन केलेल्या केळकर-वझे महाविद्यालयाला ब्रँडिंगची गरज भासू लागली होती.

रुईयामधून पासआऊट झाल्यावर नाट्यक्षेत्रासाठी उमेदवारी करण्यासाठी म्हणा किंवा एकांकिका करण्यासाठी एखादे काॅलेज मिळावे या हेतूने मी अरुण म्हात्रेला भेटलो. अरुण मला वझे काॅलेजच्या डाॅ. प्रमोद पाब्रेकरांकडे घेऊन गेला…आणि बघितलं तर इथलं सारं कल्चर रुईयाचंच होतं. रुईया काॅलेजमधला बराचसा ज्युनिअर स्टाफ इथे सीनियरच्या पोझिशनवर वावरत होता. त्यात डाॅ. लऊळ सर तर नाटकासाठी जन्मलेला रंगकर्मी, उपप्राचार्याच्या खुर्चीत बसलेले. माझ्या दिग्दर्शनासाठीच्या एंट्रीचा पुढला मार्ग अत्यंत सुलभ झाला होता. साल १९९३, कै. विनायक गणेश वझे महाविद्यालय सादर करीत आहे, अरुण म्हात्रे लिखित आणि भालचंद्र कुबल दिग्दर्शित, आकार प्रश्नचिन्हाचा सरळ आहे..! पडदा उघडला आणि विथीचा जन्म झाला. वझे थिएटर या शब्दांवरुन प्रा. जयप्रकाश लब्धेनी सुचवलेला शब्द वझे काॅलेजातील रंगकर्मींच्या रंगकर्तृत्वाला कायमचा चिकटला. पुढे, अनेक वर्तमानपत्रांतून या एकांकिकेविषयी लिहून यायचे तेव्हा तेव्हा मुलुंडच्या वझे काॅलेजचे नाव प्रकर्षाने घेतले जायचे. अॅकॅडमिक आणि स्पोर्ट्समध्ये १९८४ पासून नावारूपाला आलेल्या या काॅलेजचे हेच तर “कल्चरल ब्रँडिंग” होते, हे आज ३० वर्षांनंतर आय.एन.टी. सारख्या काॅलेज विश्वात अव्वल समजल्या गेलेल्या एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्टचा शिक्का उमटल्यावर दृष्टांतागत समजतेय.

आनंद केळकर, वैभव परब, उदय आगाशे सारख्या धडपड्यानी तो सांस्कृतिक वारसा पुढे नेण्याचा जणू चंगच बांधला होता. पुढील काही वर्षे, कधीतरी वर्षभरात ऐकू यायचं की सर इथे प्राईज मिळालं, तिथे माती खाल्ली, अमक्या- तमक्या काॅलेजला चोपलं, इथला परफाॅरमन्स तुम्ही बघायला हवा होतात सर…! पण आय.एन.टी. बाबतचा एकही मेसेज त्या दहा वर्षांत काही आला नव्हता. त्या दहा वर्षांत बऱ्याच घडामोडी होऊन विथी पूर्वपदावर येऊन ठेपली होती. याची प्रमुख दोन कारणं होती, पहिलं कारण म्हणजे ज्या विद्यार्थ्यानी विथी स्थापन केली ती सारी पासआऊट झाली होती आणि काॅलेजमधला बराचसा स्टाफ रिटायर्ड झाला होता. आता डाॅ. पाब्रेकर उपप्राचार्य म्हणून स्थिरावला होता. (इथे एकेरीत उल्लेख अशासाठी आहे की जगासाठी मान्यवर असलेले पाब्रेकर सर माझ्यासाठी पाब्र्या होता.) काॅलेज मधील नाट्यचळवळ पुन्हा सुरू व्हावी ही मनोमन इच्छा असलेले पाब्रेकर-लब्धे कामाला लागले होते; परंतु मुलं आता डायमेन्शन्स, आविष्कार हा इंट्रा काॅलेजिएट महोत्सव आणि युनिव्हर्सिटी युथ फेस्टिव्हलमध्ये सक्रिय झाली होती. नाटक हा असा कलाप्रकार आहे जो समूहात रुजला तरच तो पुढल्या पिढ्यांमधे झिरपतो. वर्ष होते २००३. मला पुन्हा काॅलेजकडून बोलावण्यात आले. स्पर्धेमधे विशेषतः आय.एन.टी.साठी नंबरात यायचे तर सादरीकरणाचे एक समीकरण असते. एव्हाना बऱ्याच स्पर्धा बघून ते गणित डोक्यात फिट्ट बसले होते. या अनुभवाचा फायदा घेत एखादी माॅबची एकांकिका करावी असे ठरले; परंतु त्या समीकरणात चपखल बसेल अशी एकांकिका काही सापडेना. मग विचार आला की आपलीच एखादी एकांकिका केली तर? पण तेही जमेना. मग माझंच एक नाटक कापून त्याची एकांकिका बनवली “अस्वस्थ अपूर्णांकाचे पडघम”. एरवी एकांकिकांची नाटके झालेली आपण पहातो; परंतु नाटकाची एकांकिका हा प्रयोग बहुधा विरळाच. एकूण ८७ मुलां-मुलींना घेऊन केलेली ही एकांकिका त्या वर्षीची “टाॅक आॅफ द टाऊन’ ठरली. रवींद्र पाथरे, कमलाकर नाडकर्णी यांनी तर आपापल्या काॅलममधून त्यावर लेख लिहिले आणि त्या वर्षी ‘अस्वस्थ’ने आय.एन.टी. गाजवली. मी गाजवली हा शब्दप्रयोग इथे जाणूनबुजून करत आहे कारण अंतिम फेरीत ह्या एकांकिकेला फेकून देण्यात आलं होतं. इनमिन तीन प्रशस्तिपत्रकं देऊन वझे महाविद्यालयाला परीक्षकानी ज्या पद्धतीने वाटेला लावलं होतं ते संजय कुलकर्णीसारख्या नाट्यसमीक्षकाला पटलं नव्हतं. त्याने याची जोरदार झाडाझडती आपल्या लेखातून घेतली होती.

दहा वर्षांनंतरही आय.एन.टी.ची ट्राॅफी हातातून निसटली होती. त्या दिवशी घरी परतताना अख्खी बस रडत होती. आपण कुठे कमी पडलो याचं कारण मीच काय पण कुणीही देऊ शकत नव्हतं. मुलांचा उत्साह आणि आवेश काही काळानंतर परतला आणि तब्बल २७ स्पर्धांमधे ‘अस्वस्थ” अव्वल ठरली. वझे महाविद्यालयाला एक लाख आणि कित्येक हजार बक्षीस रूपाने मिळाले. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची अध्यक्षीय उपस्थिती लाभलेल्या सोलापूर येथील नाट्यसंमेलनात “अस्वस्थ”ने आपली मोहोर उमटवली. माझा सत्कार करताना भाऊसाहेब केळकरांनी पंचवीस हजारांचा चेक मला दिला आणि दुसर्‍या पिढीची नाट्यचळवळ पुन्हा मार्गस्थ झाली. नाट्यशास्त्राच्या २२ व्या अध्यायानुसार दशरुपक विधानामध्ये विथीचा परामर्ष आढळतो. दोन किंवा अधिक पात्रांनी केलेला नाट्यसंवाद म्हणजे विथी. सहजता सादर करणारं अनेक रसांनी परिपूर्ण लघुनाट्य म्हणजे विथी आणि रंगकर्मींमध्ये नाट्यभावना जागृत करणारी “नाट्यवृत्ती” म्हणजे विथी. जयप्रकाश लब्धेने जन्मास घातलेल्या या नाट्यवृत्तीने पुढे आकाश राऊत, संग्राम समेळ, केतकी विलास,मधुरा ओक, संजय सातवसे, आशय सहस्त्रबुद्धे आणि प्रा. दत्तात्रय गायकवाड व प्रा. चंद्रकांत शिंदे सारखे खंबीर नेतृत्व दिले. मग पुन्हा पुढली दहा वर्षे विथीच्या नाट्यसंस्कृतीचा आलेख चढउतार सहन करीत राहिला.

साल २०१३. वाढत्या समाज माध्यमांच्या प्रभावामुळे आणि बदललेल्या इलेक्ट्राॅनिक माध्यमांच्या भडीमार वृत्तीचा प्रभाव नव्या पिढीवर नको तेवढा दिसून येत होता. अशा वेळी पुन्हा काॅलेजच्या सोशल ब्रँडिंगचा मुद्दा उफाळून डोकं वर काढून आवासून उभा होता. अशा वेळी त्यावेळचे प्राचार्य डाॅ.बी.बी. शर्मांना माझी आठवण झाली आणि “अहमा” नामक एकांकिका घेऊन वझे काॅलेज पुन्हा एकदा आय.एन.टी.त सहभागी झाली. ओडिशातील छाऊ या लोककलेवरील कथानकाचा हा प्रयोग पूर्णतः फसला होता.

आय.एन.टी.च्या दुसऱ्या फेरीपर्यंत प्रेक्षकप्रिय ठरलेली “अहमा” ही एकांकिका अंतिम फेरीत प्रवेश करू शकली नव्हती आणि पुन्हा एकदा आय.एन.टी. ट्राॅफी हातातून निसटली होती. मात्र यावेळी हार पचवायची सवय झाली होती म्हणा किंवा वयाच्या मॅच्युरिटीमुळे म्हणा फारसं दुःख झालं नाही. मुलांनीही समजुतीने घेत उंबरठा आणि तत्सम स्पर्धांमधून पारितोषिके पटकावत विथी जिवंत ठेवली. मधल्या काळात चॅनल्स, ओटीटी, शाॅर्ट फिल्म्स, सोशल मीडिया आणि लाईव्ह गॅझेट्सचा एवढा सुळसुळाट झाला की रंगभूमी हे माध्यम कुठल्या तरी इलेक्ट्राॅनिक माध्यमाच्या आहारी जातंय की काय? ही भीती थरकाप उडवू लागली. कारण देखील तसेच होते. लाॅकडाऊनमुळे नाटकावरील प्रेमाने स्माॅल स्क्रिनला अॅडिक्ट झालेला प्रेक्षकवर्ग थिएटरपर्यंत आणणे कठीण होऊन बसले. थिएटर मोबाईल स्क्रिनमधे अडकले..! मग ठरवले कि यंदाची आय.एन.टी. तिकिट काढून थिएटरला जाऊन बघायची. पण कसलं काय…! तिकिटं आधीच विकली गेली होती व सालाबाद प्रमाणे यंदाही अंतिम फेरी हाऊसफुल्ल होती. कसाबसा थिएटरात घुसून अक्षरशः दरवाजातून “एकूण पट १” बघून पाणावल्या डोळ्यांनी बाहेर पडलो. वझे काॅलेजचे विद्यार्थी खऱ्या अर्थाने “नाटक” सादर करत होते. मनात आलं की खरे नाट्यकर्मी परीक्षक असतील ना…! तर एकूण पट १ चा विचार नक्कीच पहिल्या नंबरासाठी केला करतील. कारण कुठल्याही गिमिक्सच्या आहारी न जाता वझेचे रंगकर्मी खरं नाटक सादर करीत होते. बक्षीस समारंभासाठी न थांबता थेट घरी निघालो, टॅक्सीतून उतरताच एकाचा फोन आला, “भाल्या, तुझ्या वझे काॅलेजने आय.एन.टी. जिंकली रे…!” ओह..ऊफ्फ, वाॅव..म्हणत चिंब झालेले डोळे ओघळलेच…आणि आठवला तो हा तीस वर्षांपासूनचा फ्लॅशबॅक.

३० वर्षांपूर्वी आय.एन.टी. ट्राॅफी पटकवावी या आशेने लावलेलं विथी नामक छोटंसं रोपटं २०२३ साली बहरलं होतं. एकूण पट १ या एकांकिकेने यंदाच्या यंदाच्या कै. प्रवीण जोशी आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या ट्राॅफीवर, सर्वोत्कृष्ट एकांकिका, सर्वोत्कृष्ट लेखक-दिग्दर्शक अमित पाटील व सिद्धेश साळवी, सर्वोत्कृष्ट अभिनय मनस्वी लगाडे आणि राहुल पेडणेकर यानी आपली नावे कोरली आहेत. या साऱ्यांचेच गेल्या तीस वर्षांत विथीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाकडून मनःपूर्वक अभिनंदन…!

२५ वर्षांपूर्वी इप्टा ह्या हिंदी आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेला हिंदी चित्रपट सृष्टीतले प्रख्यात कथा, पटकथा तथा संवाद लेखक कादरखान पारितोषिक वितरण समारंभात अध्यक्षीय भाषण करताना अगदी अस्साच अनुभव सांगत होते. इप्टाची कै. बलराज साहनी ट्राॅफी मिळवायला अशीच वीस-पंचवीस वर्षे त्यांना द्यावी लागली होती आणि एकांकिकेचं नाव होतं…“बड़ी देर कर दी सनम आते आते..!” आज तीस वर्षांनंतर अ च्या लकी ठरलेल्या नावाची “एकूण पट १” ही एकांकिका अव्वल ठरायला विथीच्या माजी पटावरल्या प्रत्येक रंगकर्मीचे आशीर्वादच लागतात हे देखील तितकंच खरं…!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -