Friday, May 3, 2024
Homeमहत्वाची बातमीमहाराष्ट्रातील उद्योग प. बंगालमध्ये नेण्यास सेनेची मदत?

महाराष्ट्रातील उद्योग प. बंगालमध्ये नेण्यास सेनेची मदत?

भाजप नेते आशीष शेलार यांचा खडा सवाल

मुंबई (प्रतिनिधी) : ‘महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने त्यांची भेट घेणारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीची अधिकृत माहिती महाराष्ट्र शासनाने जाहीर करावी, हे एक कटकारस्थान असून इथले उद्योग पश्चिम बंगालमध्ये घेऊन जाण्यास सत्ताधारी शिवसेना मदत तर करीत नाही ना?’, असा खडा सवाल भाजप नेते आमदार अॅड. आशीष शेलार यांनी बुधवारी उपस्थित केला.

प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे मंगळवारी मुंबईत आगमन झाल्यानंतर महाराष्ट्राचे पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वतीने ही भेट आपण घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे या भेटीबाबत अॅड. आशीष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. या गुप्त बैठकीमध्ये कटकारस्थान तर नाही ना? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ममतादीदी यांचे महाराष्ट्रात सरकारी पक्षांनी स्वागत केले, ते प्रथेप्रमाणे अपेक्षितच आहे, पण त्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेली भेट व त्यांची झालेली बैठक कशासाठी होती? महाराष्ट्रात कोणीही आले की, आमचा कौटुंबिक स्नेह असल्याचे सांगून या भेटी घेतल्या जातात. तुमचा कौटुंबिक स्नेह असेलही; आम्हाला त्याबद्दल काय करायचे आहे? पण महाराष्ट्राचा त्याच्याशी काय संबंध? बांगलादेशीयांना संरक्षण देणाऱ्या ममतादीदी यांच्याशी कुठले आले कौटुंबिक संबंध? असा सवालही त्यांनी केला.

‘राज्यातील उद्योगांना आपल्या राज्यात यायचे आमंत्रण देण्यासाठी ममतादीदी येथे आल्या आहेत. देशभर सर्वत्र उद्योगधंदे असले पाहिजेत, हीच भाजपची भूमिका आहे. मात्र आपल्या राज्यातील उद्योग तुम्ही घेऊन जा, असे महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना दीदींना सांगते आहे काय? हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील रोजगार, व्यवसाय, उद्योग येथून इतरत्र नेण्यास शिवसेना ममतादीदींना मदत करते आहे काय? महाराष्ट्रात काँग्रेसला ना स्थान, ना इज्जत, ना किंमत. त्यामुळे काँग्रेसला काय ते त्यांचे त्यांनी ठरवावे. आमचा सवाल महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला पाठवून महाराष्ट्रातील तरुणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय?, असा खोचक सवाल त्यांनी केला.

सिद्धिविनायकाकडे कोणी कुणासाठी काय मागावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण केंद्रीय स्तरावर भाजपच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी ज्यांना यायचे आहे, त्यांचे कंडू शमन होईलच. एकदा आपापसात नेतृत्व कोण करणार ते तर ठरवा, असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी केला.

‘आम्हाला ‘जय हिंदू राष्ट्र’ हे मान्य आहे, ते ममतादीदींना मान्य आहे का? ते मान्य नसेल, तर ते शिवसेनेला मान्य आहे का?’ असा सवाल शेलार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या ममतादीदींच्या ‘जय बांगला, जय मराठा’ या घोषणेबाबत केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -