Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीशीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला जामीन

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत गाजलेल्या शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. इंद्राणी मुखर्जीला २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर तिने त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. १० वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ मध्ये शीना बोराची हत्या झाली होती. स्वतःची मुलगी शीना बोराची हत्या केल्याचा आरोप असलेल्या इंद्राणी मुखर्जीला सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे.

६.५ वर्षांपासून इंद्राणी मुखर्जी या कोठडीत आहेत, हा खटला लवकर पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, बी.आर. गवई आणि ए.एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने जामीन देण्याचा आदेश दिला. नोव्हेंबर २०२१मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळल्याच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेवर खंडपीठापुढे सुनावणी झाली. हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे आणि ५०% साक्षीदार जरी फिर्यादीने सोडले तरी खटला लवकर संपण्याची शक्यता नाही. या प्रकरणातील सहआरोपी इंद्राणी मुखर्जीचा पती पीटर मुखर्जी याला यापूर्वी जामीन मंजूर करण्यात आला होता, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. पतीसोबत कट रचून स्वतःच्या मुलीची हत्या केल्याचा आरोप तिच्यावर आहे.

याचिकाकर्त्यातर्फे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी युक्तीवाद केला. एप्रिल २०१२ मध्ये मुंबई पोलिसांत शीना बोराचे अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंद्राणीच्या ड्रायव्हरला, ज्याला दुसऱ्या एका प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्याने बोराची हत्या केल्याची कबुली दिली आणि मुंबई पोलिसांना कळवले की तिची आई इंद्राणीचा या हत्येत सहभाग होता. सीबीआयने २०१५ मध्ये तपास हाती घेतला. तिला अटक करण्यात आली आणि त्याचप्रमाणे तिचे पती पीटर मुखर्जी यांना मार्च २०२० मध्ये विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.

शीना बोरा ही पहिल्या पतीची मुलगी

या हायप्रोफाईल हत्याकांडाचा तपासही सीबीआयने केला, मात्र हे प्रकरण अद्याप सुटलेले नाही. हे असे एक मर्डर मिस्ट्री आहे, ज्याचे गूढ आजपर्यंत उलगडलेले नाही. हत्येचे गूढ इतके गुंतागुंतीचे होते की, सुरुवातीला शीना बोराचा मृतदेह सापडल्यानंतर इंद्राणी मुखर्जीने तिची बहीण असल्याचे सांगितले होते, मात्र पोलिसांच्या चौकशीत तिने ती आपली मुलगी असल्याचे उघड केले. इंद्राणी मुखर्जीने दोन लग्न केली होती. शीना बोरा ही तिच्या पहिल्या पतीची मुलगी होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -