Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपालघरऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ

ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ

वाडा (वार्ताहर) : ऐन सणासुदीच्या दिवसांत साखरेच्या भावामध्ये प्रचंड दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांची दिवाळी गोड कशी होणार? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. जुलैमध्ये ३७रूपये किलो असणारी साखर आता ४५रूपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात साखर भाव खाऊ लागली आहे. ही भाववाढ गोरगरीबांचे कंबरडे मोडणारी आहे.

साखर ही गोड असते. परंतु याच साखरेने दरवाढीत अग्रक्रम घेतला की सर्वसामान्यांसाठी ती कडू बनते. दसरा – दिवाळी हे मोठे सण ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये येतात. या दिवसांत गोडधोड पदार्थ बनवून खाणे हा रिवाज आहे. त्यामूळे साखरेची मागणी या महिन्यात निश्चित वाढते. सरकारही दरवाढ रोखून साखरेचे दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते. यावर्षी मात्र उसाचा हंगाम सुरू होण्याअगोदर आणि दिवाळी येण्याअगोदर दोन महिन्यांत साखरेचे भाव तब्बल आठ रूपयांनी वाढलेले आहेत. अगोदरच महागाईने मेटाकुटीस आलेले सामान्यजन या साखरेच्या भाव वाढीने पूर्णपणे वाकून जाणार आहेत.

सर्व खाद्य पदार्थाचे दर वाढत चालले असल्याने स्वयंपाक घरात शिजवायचे काय? असाच प्रश्न सामान्यांना सतावू लागला आहे. भाज्या शंभरीकडे वाटचाल करीत आहेत. पेट्रोल, डिझेलने शंभरी ओलांडली आहे. पोह्यांची दरवाढ झालेलीच आहे. शेंगदाणे महागच होत आहेत. दूध दरवाढ झालेली आहे. या सर्व दरवाढीत गरीब होरपळून निघत आहेत. आता साखरही आगीत तेल ओतू लागली आहे. या भाववाढी विषयी कोणीच सध्या काही बोलत नसल्याने सामान्यांच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार, याची चर्चा गावा गावांत आणि पारापारांवर रंगू लागली आहे. या महागाईकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, अशी जाणीव लोकांच्या चर्चेतून होऊ लागली आहे.

रोज मोलमजुरी करून तीनशे ते चारशे रूपये मिळतात. त्यामध्ये घर चालवणे सध्या फारच कठीण होऊन बसले आहे. गॅस सिलिंडर हजाराच्या पुढे, साखर पन्नाशी जवळ, भाजीपाला शंभरी जवळ अशी भरमसाट दरवाढ झाल्याने तीनशे – चारशे रूपयांत दिवस कसा काढायचा, असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने याकडे लवकर लक्ष वेधावे आणि महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा गृहिणी प्रभावती पाटील यांनी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -