- कोकणी बाणा: सतीश पाटणकर
ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आणि इनामदार श्री देव रामेश्वराच्या कृपाशीर्वादाने पावन झालेली भूमी म्हणजे इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा. आचरा हे मालवण तालुक्यातील एक गाव. इथे संस्थानकाळापासून पाळल्या जाणाऱ्या रूढी परंपरा संस्थांनी थाटाच्या उत्सवांमुळे आजच्या विज्ञान युगातही सर्वश्रुत आहेत. सण उत्सवात मिळून मिसळून राहणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांमुळे हे गाव समतेचा आदर्श निर्माण करत आहेत. मंदिर शिवशंभोचेही असूनही उत्सव साजरे होतात ते श्रीविष्णूचे. अशा प्रकारे शैव-वैष्णवांचा मिलाफ आचऱ्यातच अनुभवता येतो.
साताऱ्याचे मुत्सद्दी सेनानी छत्रपती शाहू महाराजांनी आचऱ्यातील रामेश्वर देवास १७२० मध्ये संपूर्ण गाव इनाम म्हणून दिलं आणि हे इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान नंतर आचरा गाव म्हणून प्रसिद्धीस आलं. या मंदिरातील नित्य नैमित्तिक कार्यक्रमांची मांडणी इतकी पद्धतशीरपणे बनवली आहे की, ती शिवकालापासून ते नंतरच्या पेशवे अंमलात, आंग्ल (इंग्रज) आमदानीत व आजच्या लोकशाहीतही तशीच पद्धतशीरपणे सुरू आहे. मंदिरासंबंधीच्या प्राचीन हस्तलिखितांमध्ये व जुन्या ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये मंदिर कसं बांधलं, याचा उल्लेख नसला तरी १६८४ पूर्वीपासूनचे उल्लेखही सापडतात. मंदिरातील प्राचीन शिलालेखावर मंदिराचा कोनशिला समारंभ १६८४मध्ये सिद्धीस आला, असा उल्लेख आहे. यावरूनच येथील मंदिराची प्राचीनता आणि ऐतिहासिकता स्पष्ट होते.
देव रामेश्वराच्या मंदिराची बांधनी अतिशय कलात्मक व ऐतिहासिक आहे. विशेष प्रकारचा गाभाऱ्याचा ढ़ाचा व तटबंदी हे या मंदिराचे ठळक वैशिष्ट्य आहे. भव्य सभामंडप, मंदिराच्या लाकडी खांबावरील कोरलेले नक्षीकाम भुरळ पाडणारे आहे. आंग्ल(इंग्रज) काळापासून १२० वर्षाहून अधिक काळ वाचन संस्कृती वाढवण्यात महत्त्वाचे योगदान देणारे वाचनालय संस्कारक्षम पिढी घडवण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे. आजच्या दूरदर्शनच्या जमान्यातही मुलांना वाचनाकडे आकृष्ट करत आहे. आचरे गावचे आणखी एक ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे सरदार तान सावंत-भोसले याचा दुमजली चिरेबंदी वाडा. वाड्याचे भव्य प्रवेशदार, देवली, सभागृह ही आजही इतिहासाची ठेव म्हणून राखून आहेत. या वाड्याच्या उत्तर बाजूला नागझरी नावाची गंधकयुक्त औषधी गुणधर्म असलेली पाण्याची तळी आहे. आबाल वृद्धांसाठी मनसोक्त डुंबण्याचे ते सुरक्षित ठिकाण आहे.
या संस्थानात साजऱ्या होणाऱ्या प्रत्येक उत्सवावर संस्थानी थाटाची छाप असते. आजही येथे चौघडा, नौबत तोफांचे आवाज निनादतात. दर पाच वर्षांनी येथे होणारी गावपळणची प्रथाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. सर्वधर्मीयांचं इथे वास्तव्य असतानाही रामेश्वराच्या एका कौल प्रसादावर सर्व गावकरी गुराढोरांसह गावाच्या वेशीबाहेर रानावनात राहुट्या उभारून तीन दिवस तीन रात्री गुण्यागोविंदानं एकत्र राहतात. दर तीन वर्षांनी होणारी डाळपस्वारी (श्रीदेव रामेश्वराची स्वारी), महिनाभर चालणारा कार्तिकोत्सव (पिढ्यान् पिढ्या कार्तिक महिन्यात चालणारा सांगीतिक महोत्सव) असो अथवा गुढीपाडव्यापासून रंगणारा रामनवमी उत्सव, सर्व सणोत्सवांवर राजेशाही थाटाची छाप दिसते.
गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीरामाची उत्सवमूर्ती येथील मानकरी कानविंदे यांच्या घरातून वाजत-गाजत आणून तिची रामेश्वर मंदिरात विधिवत प्रतिष्ठापना केल्यावर रामनवमी उत्सवास सुरुवात होते. यानंतर संस्थानचे वाखतकर, ग्रामोपाध्ये यांनी पंचागवाचन करून वर्ष फलश्रुती सांगितल्यानंतर उत्सवमूर्ती श्रीरघुवीराची मंदिरास प्रदक्षिणा होते. या प्रदक्षिणेची खासियत अशी की, दररोज एक याप्रमाणे या फेऱ्यांमध्ये वाढ होत जाते. रामनवमीच्या दिवशी यांची संख्या नऊ होते. यानंतर दुपारी ढोल-ताशांच्या गजरात होम होतो. पहिल्या रात्री रघुवीराच्या आरती आणि प्रदक्षिणेनंतर रंगतो पालखी उत्सव. या पालखी उत्सवासाठी मंदिर परिसर भाविकांनी फुलून जातो. छत्र-चामरे, भालदार-चोपदारांसह वाद्यवृंदांच्या साथीने हा पालखी उत्सव रंगतो. यावेळी पालखीत विराजित श्रीविष्णूंच्या आकर्षक मूर्तीची रामेश्वर मंदिरास प्रदक्षिणा घातली जाते. ही प्रदक्षिणा पण सोमसूत्री म्हणजेच मंदिरातून बाहेर पडून गोमुखापासून परत मागे फिरते. अशा या आगळ्यावेगळ्या प्रदक्षिणेची भव्यदिव्यता डोळ्यांचं पारणं फिटविणारी असते. यानंतर रात्री होणाऱ्या कीर्तनाला महोत्सवाचं रूपच आलेलं असतं. या उत्सव दरबारी गवई गाण्याची परंपरा आहे. रामेश्वराच्या सभामंडपात सकाळ, संध्याकाळ रंगणाऱ्या या गवई गाण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत गायक-गायिकांनी हजेरी लावली आहे. पु. ल. देशपांडे, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, प्रभाकर कारेकर, रामदास कामत, देवकी पंडित यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपल्या गायनाने या दरबारी गवई गाण्याच्या परंपरेची शान वाढवली आहे.
रामेश्वर मंदिरातील रामजन्म व हनुमान जन्मासाठी सज्जनगडावरून खास रामदासी बुवा येतात. मंदिराच्या आवारात रामदासी बुवांचं वास्तव्य असणाऱ्या निवासस्थानास ‘रामदास कोटी’ असं उल्लेखलं जातं. अशा या आचऱ्यातील इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानात साजरे होणारे उत्सव, रूढी-परंपरा या गावाची शान महाराष्ट्रापार वाढवत आहेत.
आचरे गावाला लाभलेला स्वच्छ, शुभ्र वाळूचा लांबच लांब समुद्र किनारा पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. किनाऱ्यावर दाटीवाटीने पसरलेली नारळाची झाडे, पोफलीच्या बागा, सुरूचे बन, कौलारू घरे, खाडीपात्र पर्यटकांना नेहमीच भावतो. आचरा समुद्रालगत खाडीत वसलेले नयनरम्य, नैसर्गिक परिसर व चारी बाजूंनी पाण्याने वेढलेले जामडूल हे हीरवळयुक्त पाचूंचे बेट आहे. या बेटावर मनुष्यवस्ती आहे. यामुळे या ठिकाणी सैर करण्यासाठी येणारे पर्यटक आणि त्यांच्या निवासस्थानासाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असे रिसॉर्ट आचरा गावच्या पर्यटन वृद्धीत वाढ करत आहे.