Thursday, May 2, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सWorld theatre day : रंगकर्मींचे अज्ञान आणि २७ मार्चचे शहाणपण...!

World theatre day : रंगकर्मींचे अज्ञान आणि २७ मार्चचे शहाणपण…!

  • पाचवा वेद : भालचंद्र कुबल

आम्हा नाटकवाल्यांना वर्षभरात दोन दिवस साजरे करावे लागतात. मराठी रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला आणि जागतिक रंगभूमी दिन २७ मार्चला. पैकी मराठी रंगभूमी दिनाबाबत या आधी विस्तृत लेखन झाले आहे. ५ नोव्हेंबर या दिवशी पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग (संगीत सीता स्वयंवर) सांगली येथे पटवर्धनांच्या वाड्यात पार पडला. मराठी नाटक तेव्हापासून सुरू झाले असे जुने नाट्याभ्यासक म्हणतात म्हणून ५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिन साजरा करतात, वगैरे वगैरे…! (वगैरे वगैरे का? तर नव नाट्याभ्यासकांच्या मते पहिल्या नाटकाबाबत मत-मतांतरे आहेत म्हणून…!) मात्र २७ मार्चला जागतिक रंगभूमी दिन का साजरा केला जातो, या बाबत मुद्दामहून रंगभूमीशी निगडीत असलेल्या दहा रंगकर्मींचे (वय वर्षे २२ ते ५२) सर्वेक्षण केले असता समोर आलेला निष्कर्ष अत्यंत धक्कादायक होता. जवळपास ७० टक्के रंगकर्मींना हा दिवस का साजरा केला जातो, या बाबतचे अज्ञान समोर आले.

जागतिक रंगभूमीवर मराठी रंगभूमीचे स्थान फार वरचे आहे. मराठी रंगभूमी भारतातच नाही, तर जगभरातील नाट्यसृष्टीत आपले वजन आणि स्थान कायम उच्च पातळीवर राखून आहे. मराठी भाषेतून रंगमंचावर जेवढे प्रयोग सातत्याने केले जात आहेत, तेवढे इतर भाषांमधून आढळणार नाहीत. याची प्रमुख कारणे म्हणजे नाट्यविषयक विविध विद्यापीठांनी अंगीकारलेले अभ्यासक्रम, महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने गेली ६२ वर्षे सुरू असलेली हौशी कलाकारांची नाट्य स्पर्धा, कामगार कल्याण विभाग आयोजित करीत असलेली ६९ वर्षांचा इतिहास लाभलेली कामगारवर्गासाठीची नाट्य स्पर्धा, अनेकविध पातळ्यांवर आयोजन केली जाणारी नाट्यशिबिरे आणि मुळात मराठी संस्कृतीत रुजलेली नाट्यजाणीव ही होत. मराठी रंगभूमीशी मग लोक रंगभूमी असो वा व्यावसायिक, प्रचंड मोठी जनशक्ती नाटक या माध्यमासाठी कार्यरत आहे, असे असतानाही जागतिक रंगभूमी दिनाविषयक रंगकर्मींमध्ये अज्ञान असणे, ही खेदाची बाब म्हणावी लागेल. भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि मराठी भाषा विभागाद्वारे प्रकाशित करण्यात येणाऱ्या मराठी विश्वकोषात जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने रंगभूमी अभ्यासक या नात्याने माहिती देण्यासाठी जेव्हा मला सांगण्यात आले, तेव्हा असे वाटून गेले की, अधिकतम रंगकर्मींना या दिवसाचे महत्त्व माहीत असावे, परंतू तसे झाले नाही आणि म्हणूनच या दिवसाचे महत्त्व विषद करणारे हे टिपण लेख स्वरूपात देण्यावाचून गत्यंतर नव्हते.

नाटक या कलेबाबत जनजागृती करण्यासाठी २७ मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. अभिनितकला माध्यमातील सर्व सामाजिक घटक आणि देश एकत्र यावेत व त्यांची एखादी संघटना उभारली जावी, असा ठराव दिनांक २७ मार्च १९६१ रोजी “थिएटर ऑफ नेशन” या संकल्पनेद्वारे युनेस्कोमध्ये मांडण्यात आला. थिएटर ऑफ नेशन अर्थात राष्ट्रीय रंगमंच स्थापन करण्यामागील काही महत्त्वाचे मुद्दे या संकल्पनेद्वारा जगासमोर ठेवले गेले. मानवजातीचा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी नाट्यकलेचा नाट्याविष्कार, हे सशक्त माध्यम मानले गेले आहे. या माध्यमाचा वापर वैदिक काळापासून ते आजच्या प्रस्थापित रंगभूमीपर्यंत जागतिक पातळीवर विविध अंगाने झाला आहे. त्यामुळे नाटक हे माध्यम सर्वव्यापी व्हावे, या उद्देशाने थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेची अंमलबजावणी इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट या संस्थेने केली.

नाट्यकलेची सर्वव्यापी सैद्धांतिक व्याख्या, नाटकाचे दृश्यात्मक सामर्थ्य, नाट्यकलेसमोरील आव्हाने, नाट्याभ्यास व संशोधन आणि नाट्यकर्मींची कर्तव्ये या मुद्द्यांवरील विस्तृत चर्चा या संकल्पनेद्वारा मांडण्यात इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट यशस्वी झाली. २७ मार्च १९६१ ते २७ मार्च १९६२ या कालावधीत एकूण ८५ देशांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यामुळे २७ मार्च १९६२ पासून युनेस्कोने हाच दिवस “जागतिक रंगभूमी दिन” म्हणून साजरा केला जावा, असा ठराव मंजूर केला. आजमितीला थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेशी जगातील ९० देश जोडले गेले आहेत.

जागतिक रंगभूमी दिनाच्या दिवशी एखाद्या मान्यवर नाट्यकर्मींचे नाट्यविषयक तात्त्विक विवेचन प्रसिद्ध केले जाते. १९६२ साली फ्रान्सच्या जीन काॅक्च्यू (Jean Cocteau) यांना आपले विचार मांडण्याचा पहिला मान मिळाला. या व्यासपीठावरून पुढे आर्थर मिलर, हेराॅल्ड पिंटर यांसारख्या जगविख्यात नाटककार-रंगकर्मींनी नाटकाविषयीचे आपले चिंतन मांडले. शेक्सपिअरने ‘जग ही एक रंगभूमी आहे’ असे म्हटलेलेच आहे; परंतु रंगभूमीवरून जगाकडे बघण्याचा दृष्टीकोण ‘थिएटर ऑफ नेशन’ या संकल्पनेने दिला. नाटकाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकास नाट्यसृष्टी आतून व बाहेरून पाहता येते. त्यामुळे नाट्याविष्काराचा प्रत्येक क्षण सजीव असतो व नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेत तो क्षण नव्याने जन्म घेत असतो, असे यावरील अभ्यासकांचे तात्त्विक चिंतन आहे.

नाट्यशास्त्राच्या अानुषंगाने वाचिक, आंगिक, आहार्य व सात्त्विक असे चार अभिनय प्रकार मांडले गेले आहेत. मात्र मागील २५ वर्षांच्या काळात विकसित झालेल्या मंचीय विचारांमुळे “तात्त्विक” हा नवा अभिनयप्रकार रुजण्यास ‘थिएटर ऑफ नेशन’ या चळवळीने योगदान दिले. जागतिक पातळीवर सैद्धांतिकदृष्ट्या “तात्त्विकतेचे” विश्लेषण व विवेचनाचे काम भारतातही नाट्यकर्मींद्वारा सुरू आहे. प्रेमानंद गज्वींसारख्या नाटककार अभ्यासकाने आपल्या विविध नाट्यविषयक विवेचनातून “तात्विक” नाट्यांगाबद्दलचा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. मात्र त्या विवेचनाला सैद्धांतिक बैठक नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. तात्त्विक नाट्यांगाच्या अभ्यासाला सैद्धांतिक विचारांची आणि सिद्धतेवरून निर्णयाप्रत येणाऱ्या अनुमानाची जोड असल्यास हा सिद्धांत मराठीतील अभ्यासकांच्याच नावे नाही, तर भारतीय रंगभूमीवरील एक सुवर्ण संशोधन ठरेल, याबाबत दुमत नाही. त्यामुळे जागतिक पातळीवर नाट्यविचारांचा प्रवाह एकत्रितपणे सुरू झाल्याकारणाने २७ मार्च हा दिवस “जागतिक रंगभूमी दिन” म्हणून साजरा केला जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -