Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीVarsha Gaikwad : 'जागावाटपात मला विचारात घेतलं नाही!' वर्षा गायकवाड यांनी जाहीरपणे...

Varsha Gaikwad : ‘जागावाटपात मला विचारात घेतलं नाही!’ वर्षा गायकवाड यांनी जाहीरपणे व्यक्त केली खदखद

मविआच्या जागावाटपावर अजूनही नाराजीसत्र

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) एकत्र पत्रकार परिषद घेत जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. यामध्ये ठाकरे गट २१, काँग्रेस १७ तर शरद पवार गट १० जागा लढवणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या जागावाटपावरुन काँग्रेसच्या नेत्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. नाना पटोलेंसह (Nana Patole) सर्व नेते यावर नाराज आहेत. मुंबई काँग्रेसने बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनीच दांडी मारल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आणि त्यांची नाराजी आणखी स्पष्टपणे दिसून आली. त्यातच आज त्यांनी ‘जागावाटपात मला विचारात घेतलं नाही!’ अशी मनातील खदखद माध्यमांसमोर जाहीरपणे बोलून दाखवली. त्यामुळे येत्या काळात मविआमध्ये आणखी बिनसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वर्षा गायकवाड यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्या म्हणाल्या, पक्षाने घेतलेल्या निर्णयानंतर आम्ही कामाला लागलो आहोत. आमचं काही म्हणणं असेल तर ते पक्षासमोर मांडू. असं असलं तरी मुंबईचं एक वेगळं अस्तित्व आहे, पक्षसंघटनेत काम करत असताना कार्यकर्त्यांच्याही काही अपेक्षा असतात, त्याचा विचार करण्याची गरज आहे. मुंबईमध्ये पक्षाला प्रतिनिधीत्व मिळावं ही आमची अपेक्षा आहे, आमच्या पक्षाने कठोर भूमिका घ्यायला पाहिजे होती. मुंबईतलं जागावाटप करताना विश्वासात घेतलं नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

पुढे त्या म्हणाल्या, मुंबईत सन्मानजनक जागावाटप होणे गरजेचे होते; परंतु उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने मुंबईतील चार जागांवर परस्पर उमेदवार जाहीर केले, अशी काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांची नाराजी आहे. त्यातही, ज्या दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर एकेकाळी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड विजयी झाले होते, त्या जागेवर अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. ही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह वर्षा गायकवाडांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरला आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांनी नाराजी थेट दिल्लीला फोन करून कळवली असल्याचे समजते.

आम्हाला दोन ते तीन जागा मिळाव्यात

मुंबईमध्ये मागील काळात आम्ही पाच जागा लढायचो आणि राष्ट्रवादी एक सीट लढायची. सध्या महाविकास आघाडीमध्ये आम्ही देखली समान सहभागी आहोत. जागावाटपानंतर मी काही प्रमाणात नाराज आहे. यासंदर्भात मी पक्ष श्रेष्ठी आणि राज्यातील नेत्यांना देखील सांगितलं आहे. आम्हाला कमीत कमी दोन ते तीन जागा मिळाव्यात, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. मविआमध्ये काहीही आलबेल नसल्याची ही चिन्हे आहेत. त्यामुळे निवडणुकीपर्यंत मविआ एकत्र राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -