Thursday, May 2, 2024
Homeताज्या घडामोडीVasant More : 'मी अपक्ष उमेदवारीवर ठाम!' मविआत संधी न मिळाल्याने वसंत...

Vasant More : ‘मी अपक्ष उमेदवारीवर ठाम!’ मविआत संधी न मिळाल्याने वसंत मोरेंचा निर्धार

पक्षातून बाहेर पडल्यावर जास्त त्रास झाला : वसंत मोरे

पुणे : मनसेचे (MNS) निष्ठावान कार्यकर्ते समजले जाणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी काही दिवसांपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र केला. त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघ (Pune Loksabha constituency) चर्चेचा विषय ठरला होता. या मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी वसंत मोरेंची इच्छा होती. त्यांना पक्षातून त्रास झाल्याने त्यांनी मविआकडून उमेदवारी मिळतेय का यासाठी प्रयत्न केले. मात्र, मविआने पुण्यातून काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर केली, तर दुसरीकडे महायुतीकडून भाजपाचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता वसंत मोरेंनी थेट अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. मात्र, तिथे पोटनिवडणूक न घेतल्यामुळे आता पुण्यात नेमकं कोण निवडून येणार? यावर पुणेकरांमध्ये चर्चा पाहायला मिळत आहे. पुण्यातील मनसेच्या स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचं सांगत वसंत मोरे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी मविआमधून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नही केले. मात्र, आता मविआकडून काँग्रेसच्या धंगेकरांना अधिकृतपणे उमेदवारी दिल्यामुळे वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचा मानस बोलून दाखवला.

पक्षातून बाहेर पडल्यावर जास्त त्रास झाला

“महाविकास आघाडीकडे मी उमेदवारी मागण्यासाठी गेलो नव्हतो. पुण्याची समीकरणं कशी जमू शकतात त्याचा तुम्ही विचार करा हे मी त्यांना सांगू इच्छित होतो. पण मला वाटतं की कदाचित मी थोड्या दिवसांत सांगेन की मनसेच्या पुण्यातल्या कोणत्या नेत्यांनी माझ्या वाटेत पुन्हा एकदा काटे टाकले. कुणी कुठे बैठका घेतल्या हे सांगेन. मला हे कळत नाही की पक्षात होतो तेव्हाही मला त्रास दिला गेला. पण आता पक्षातून बाहेर पडल्यानंतर उलट जास्त त्रास झाला”, असं वसंत मोरे म्हणाले आहेत.

आता मी काय करतो हे सर्व पक्षांना कळेल…

“मला वाटतं की मी बाहेर पडल्यामुळे बऱ्याच जणांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना वाटलं की आता हा नक्की काय करतोय. जे कुणाला कधीच शक्य झालं नाही, ते शक्य करून दाखवतोय की काय. हा काय गणितं आखू शकतो? याची चिंता या लोकांना वाटायला लागली. त्यामुळे मी जी सांगड घालू पाहात होतो पुण्यात ती विस्कटली. पण मी विस्कटणार नाही. मी निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मी अपक्ष उमेदवारीवर ठाम आहे. आता मी कुणाकुणाला काय काय उपद्रव करतो हे पुणे शहरातल्या सर्व पक्षांना कळेल”, असा सूचक इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.

पुण्यात मीच पहिल्या क्रमांकावर

दरम्यान, पुणे लोकसभा निवडणुकीत आपणच पहिल्या क्रमांकावर राहणार असल्याचा दावा वसंत मोरे यांनी केला आहे. “मी पुण्यात पहिल्या क्रमांकावरच राहीन. पुणेकरांचा उमेदवार मीच असेन. पुणेकरांनी वर्षभरापूर्वी गिरीश बापट यांचं निधन झालं तेव्हाच हे ठरवलं आहे. आता मी पक्ष, संघटना या सगळ्या गोष्टींना तिलांजली दिली आहे. आता मी निवडणूक लढण्याच्या पूर्ण तयारीत आहे. आत्ता नाही, दोन वर्षांपासून माझी तयारी चालू आहे”, असं वसंत मोरे म्हणाले. त्यामुळे येत्या काळात पुणे लोकसभा मतदारसंघात आणखी काय काय पाहायला मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -