Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीMVA Seat alloaction : मविआत पुन्हा धुसफूस! उद्धव ठाकरेंविरोधात नाना पटोले भडकले

MVA Seat alloaction : मविआत पुन्हा धुसफूस! उद्धव ठाकरेंविरोधात नाना पटोले भडकले

काय आहे वाद?

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) जागावाटपावरुन (Seat alloaction) वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांच्यातील मतभेद थेट माध्यमांसमोर येत आहेत. त्यातच आज काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही मविआतील धुसफूस कायम असल्याचे चित्र आहे.

ठाकरे यांनी काल सांगलीचा उमेदवार जाहीर केला. मिरजेच्या (Miraj) सभेत बोलताना त्यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी जाहीर केली. या घोषणेनंतर आता चंद्रहार पाटील हिरीरीने प्रचाराला लागले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या याच घोषणेनंतर महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. ठाकरेंनी सांगलीचा उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भडकले.

नाना पटोले यांनी चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये एकतर्फी उमेदवारी जाहीर करणे हे अडचणीचे झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये हे व्हायला नको आहे. एकीकडे चर्चा चालू असताना दुसरीकडे त्या जागेवर नाव जाहीर करायला नको होते. उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीने नाव जाहीर करणे योग्य झालेलं नाही, अशा शब्दांत पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.

सांगलीमुळे काँग्रेस-शिवसेनेत वादाची ठिणगी

सांगलीच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीमध्ये काही दिवसांपासून वाद चालू होता. आम्ही कोल्हापूरची जागा सोडली. त्यामुळे सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही, असा दावा ठाकरे गटाने केला होता. तर सांगली हा आमचा मतदारसंघ आहे. त्यामुळे आम्ही ती जागा सोडणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. काँग्रेस या जागेवर विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याच्या विचारात होती. मात्र उद्धव ठाकरेंनी भर सभेत चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता निवडणुकीपर्यंत मविआमध्ये आणखी काय उलथापालथी होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -