Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वरोजगारवाढ आणि स्वस्त इंधनाची आशा

रोजगारवाढ आणि स्वस्त इंधनाची आशा

  • अर्थनगरीतून… : महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक

सामान्य ग्राहकवर्गाच्या हिताच्या काही बातम्या सरत्या आठवड्यामध्ये समोर आल्या. यानिमित्ताने खासगी क्षेत्रातील काही निर्णयांमुळे ग्राहकहित जपले जाणार, हे पाहायला मिळाले. टाटा समूह देशात हेलिकॉप्टरची निर्मिती करणार असल्याची, तर मुकेश अंबानी इंधनदरात स्वस्ताई आणणार असल्याची बातमी आहे. दरम्यान, आता सर्व रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती आहे.

जनसामान्य तसेच ग्राहकवर्गाच्या हिताच्या काही बातम्या गेल्या काही काळात समोर आल्या. यानिमित्ताने खासगी क्षेत्रातील काही निर्णयांमुळे ग्राहकहित जपले जाणार आहे.

टाटा समूह आणखी एका उद्योगात पाय रोवण्यासाठी तयार आहे. या उद्योगसमूहाने ‘एअरबस’ या विमान आणि हेलिकॉप्टर निर्मिती कंपनीसोबत करार केला आहे. ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्यासाठी आता एअरबस कंपनी आणि टाटा समूहामध्ये करार झाला आहे. फ्रान्सची जेट निर्माती कंपनी एअरबस टाटा समूहासोबत देशातील हेलिकॉप्टरसाठी अंतिम असेंब्ली लाइन सेट करण्यासाठी भागीदारी करत असल्याचे ‘एअरबस हेलिकॉप्टर्स’ने जाहीर केले आहे. हा करार देशात सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आणि इतर विमानांच्या निर्मितीसाठी आहे. भारतातील उत्पादनाला चालना देण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. टाटा समूह भारतासाठी आपल्या नागरी श्रेणीतून एअरबसचे सर्वाधिक विकले जाणारे एच १२५ हेलिकॉप्टर तयार करेल. त्यामुळे आता एअरबस हेलिकॉप्टर्स ‘मेड इन इंडिया’ असतील. इतकेच नाही, तर टाटा ही हेलिकॉप्टर्स शेजारील देशांमध्येही निर्यात करेल. भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाचा भाग होत देशाच्या विकासाला हातभार लावणारे हे ऐतिहासिक पाऊल आहे. भारतात हेलिकॉप्टर निर्मिती सुविधा उभारण्यात खासगी क्षेत्राने पुढाकार घेतल्याचे हे पहिले उदाहरण आहे. टाटा समूह आणि एअरबस यांच्यातील या करारामुळे देशातील उत्पादनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने उचललेले हे एक मोठे पाऊल आहे. परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी या कराराची घोषणा केली.

एअरबस आणि टाटा समूहाने संयुक्तपणे युरोपियन विमान निर्माती कंपनी एअरबसच्या एच १२५ सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरची निर्मिती करण्यासाठी करार करताना गुजरातमधील वडोदरा येथे व्यावसायिक वापरासाठी ‘फायनल असेंब्ली लाइन’ (एफएएल) सेट करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. या करारांतर्गत ‘एफएएल’ २०२४ च्या मध्यापर्यंत तयार होईल आणि नोव्हेंबर २०२४ पर्यंत काम सुरू होईल. ‘एफएएल’ हैदराबादमध्ये एअरबसच्या मेन कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली (एमसीए) लाईनवर उत्पादित केलेले भाग वापरेल आणि अंतिम असेंब्लीसाठी वडोदरा येथे पाठवेल. या करारांतर्गत ४० सी-२९५ वाहतूक विमानेही तयार करण्यात येतील. हैदराबादमधील एअरबसच्या मुख्य घटक असेंब्ली लाईनवर विमानाचे भाग तयार केले जातील. नोव्हेंबर २०२४ पासून तेथे कामाला सुरुवात होईल. तेथून हेलिकॉप्टरचे भाग तयार करून वडोदरा येथे पाठवले जातील. वडोदराच्या असेंब्ली लाईनमध्ये विविध पार्ट जोडून हेलिकॉप्टर बनवले जातील. ही भारतातील खासगी क्षेत्रातील पहिली हेलिकॉप्टर असेंब्ली सुविधा असेल. ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी याबद्दल सांगितले की, या सुविधेमध्ये जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या एअरबस एच १२५ सिंगल इंजिन हेलिकॉप्टरची अंतिम असेंब्ली लाइन असेल. एअरबसच्या सहकार्याने या सुविधेमध्ये निर्मित एच १२५ सिंगल इंजिन हेलिकॉप्टर भारतात वापरले जातील आणि त्यांची निर्यातही केली जाईल. सध्या भारताला अशा ८०० हेलिकॉप्टरची गरज आहे. बडे उद्योगसमूह आणि व्यावसायिकांकडून या हेलिकॉप्टर्सना मोठी मागणी आहे. टाटा आणि एअरबस यांच्यातील करारामुळे ही मागणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

आशियातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी हेदेखील एक खेळी खेळणार आहेत. त्यांच्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई येऊ शकते. पेट्रोलियम मंत्रालयाने घेतलेल्या एका निर्णयानुसार, व्हेनेझुएला या देशाकडून कच्चे तेल खरेदी करण्याची आशा पल्लवित झाली आहे. २०१९ मध्ये या देशावर निर्बंध घालण्यात आले होते. ते हटल्यानंतर आता कच्च्या तेलाच्या खरेदीचा निर्णय होऊ शकतो. ‘कापलेर’ या कमॉडिटी मार्केट एनॅलिटिक्स फर्मनुसार, सर्वात शेवटी व्हेनेझुएलाकडून भारताला नोव्हेंबर २०२० मध्ये कच्च्या तेलाची खेप पाठवण्यात आली होती. आता सरकार ताजी खरेदी करणार नसले तरी अंबांनी खासगीरीत्या खरेदी करून दरांमधील सवलतीचा फायदा सामान्य ग्राहकांना करून देऊ शकतात. डिसेंबर २०२३ च्या सुरुवातीला व्हेनेझुएलाकडून कच्चे तेल खरेदी करण्याचा सौदा होऊ शकतो हे स्पष्ट झाले होते. मुकेश अंबानी यांची ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ त्यासाठी थेट सौदा करणार असल्याचे समोर आले होते. कंपनीने या देशाकडे सध्या नमुना ऑर्डर म्हणून तीन टँकर कच्च्या तेलाच्च्या खरेदीचे बुकिंग केले आहे. जानेवारी २०२४ पासून हे कच्चे तेल भारतात यायला सुरुवात होईल. ही खेप आल्यानंतर पुढील व्यवहार तडीस जाताच देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात होण्याची दाट शक्यता आहे. भारत सध्या रशियाकडून सवलतीच्या दरांमध्ये कच्च्या तेलाची आयात करत आहे; पण आता ही सवलत केवळ दोन डॉलर प्रति पिंप दरापर्यंत खाली आली आहे. व्हेनेझुएलाकडून देशाला ८ ते १० डॉलर प्रति पिंप दरापर्यंत स्वस्तात कच्चे तेल मिळू शकते. परिणामी, अंबांनींचा व्यवहार झाल्यास मिळणारे कच्चे तेल रशियातून आयात होणाऱ्या तेलापेक्षा स्वस्त असणार आहे. आता आणखी एक शुभवार्ता. यापुढे सर्व हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस उपचार उपलब्ध होणार असून जनरल इन्शुरन्स कौन्सिलने विमा कंपन्यांसोबत याबाबत करार केला आहे. ‘जनरल इन्शुरन्स कौन्सिल’(जीआयसी)ने सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांशी बोलल्यानंतर विविध रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार सुरू केले आहेत. या उपक्रमाला ‘कॅशलेस एव्हरीव्हेअर’ असे नाव देण्यात आले आहे. आरोग्य विमा पॉलिसीधारक आता विमा कंपन्यांच्या नेटवर्कमध्ये नसलेल्या रुग्णालयांमध्येही कॅशलेस सुविधा घेऊ शकतात. आतापर्यंत आरोग्य विमा पॉलिसीधारक फक्त विमा कंपनीने करार केलेल्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार घेऊ शकत होता. विमा कंपनी थेट नेटवर्क हॉस्पिटलसोबत वैद्यकीय खर्चाची पूर्तता करते. नॉन-नेटवर्क हॉस्पिटलमधील पॉलिसीधारकाला मात्र स्वतःच्या खिशातून संपूर्ण रक्कम भरावी लागते. तथापि, ‘कॅशलेस एव्हरीव्हेअर’ प्रणालीअंतर्गत, पॉलिसीधारक कॅशलेस हॉस्पिटलायझेशन सुविधेद्वारे आपल्या आवडीच्या रुग्णालय विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये नसलेल्या रुग्णालयात उपचार घेऊ शकतो. नॉन-लिस्टेड हॉस्पिटलमध्ये ‘कॅशलेस एव्हरीव्हेअर’ सुविधेचा लाभ घेण्यासाठी आरोग्य विमा पॉलिसीधारकांनी तीन अटी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ग्राहकाने प्रवेशाच्या किमान ४८ तास आधी विमा कंपनीला कळवायला हवे. आपत्कालीन उपचारांसाठी ग्राहकाने अॅडमिट झाल्यानंतर ४८ तासांच्या आत विमा कंपनीला कळवणे आवश्यक असणार आहे. याखेरीज पॉलिसीच्या अटी आणि शर्तींनुसार दावा मान्य करणे आवश्यक असणार आहे. याव्यतिरिक्त, विमा कंपनीच्या परिचालन मार्गदर्शक तत्त्वानुसार कॅशलेस सुविधा स्वीकार्य असणेही आवश्यक असेल.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण झाले. राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दर वर्षी अयोध्येत पाच कोटी पर्यटक येतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दोन लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

एका अहवालानुसार, अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्या आणि त्याच्या आसपासच्या शहरांमध्ये पुढील पाच वर्षांमध्ये दीड ते दोन लाख लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची शक्यता आहे. कारण पर्यटक मोठ्या प्रमाणात अयोध्येत दाखल होत आहेत. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने अयोध्येला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या माध्यमातून अयोध्येत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहेत. पाच वर्षांमध्ये येथे दीड लाख ते दोन लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -