कोकणातून जाणाऱ्या रस्त्यांचे काम २५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करा – मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा रस्तेमार्ग प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी कोकणातील रस्त्यांच्या दुरस्तीची कामे २५ ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. सध्या या महामार्गावर खड्डे भरण आणि दुरस्तीची कामे कंत्राटदारांकडून सुरू आहेत. ही कामे अधिक जलद गतीने होण्यासाठी आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त कंत्राटदारांकडून कामे करून घ्या आणि पूर्ण ताकदीने आणि युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आजच्या बैठकीत दिल्या.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, खासदार सुनील तटकरे, विनायक राऊत, आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगावले, नितेश राणे, वैभव नाईक, राजन तेली, योगेश कदम, रविशेट पाटील, शेखर निकम, किरण पावसकर, राजन साळवी, अनिकेत तटकरे, आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) एस. एस. साळुंखे, सचिव (बांधकाम) पी. डी. नवघरे, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, कोकण विभागाचे मुख्य अभियंता एस. एन. राजभोग, रायगडच्या वरिष्ठ अभियंता सुषमा गायकवाड, रत्नागिरीच्या वरिष्ठ अभियंता नाईक, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) जाधव आदी उपस्थित होते.

मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात उपस्थित सर्व आमदार आणि खासदार यांनी आपापल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सूचना केल्या असून या सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यावर तात्काळ आणि जलदगतीने निर्णय घेऊन काम करण्याच्या सूचना मंत्री चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या.

याचबरोबर संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी जास्तीत जास्त ट्रॅफिक वॉर्डन तैनात करून वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे आदेशही वाहतूक विभागाला देण्यात आले. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ज्या ज्या कंत्राटदारांकडे देण्यात आली आहेत, त्यांच्या कामावर नजर ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील एक अभियंता नेमून देऊन या दोघांचीही नावे शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले.

मनोर पोलिसांकडून विदेशी दारूचा ७२ लाखांचा साठा जप्त

बोईसर (वार्ताहर) : मनोर पोलिस विभागाने मनोर हद्दीत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई विक्रमगड तालुक्यातील शीलशेत गावच्या हद्दीतील नालशेत रस्त्यावर रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास कारवाईत करण्यात आली. अवैधरित्या विनापरवाना गोवा राज्य निर्मित विदेशी दारू वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्यानंतर मनोर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

मनोर पोलिसांकडून दारू तस्करीवर मोठी कारवाई करण्यात आली असून ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कारवाईत गोवा राज्यातून पालघर जिल्ह्यात विक्रीसाठी आणलेला दारूचे ७६० बॉक्स जप्त करण्यात आले. कारवाईमध्ये चार वाहने आणि ६ हजार ५६६ बल्क लिटर दारू साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून हा जप्त दारू साठा म्हसरोळी गावातील कल्पेश पाटील या दारू तस्कराने गणेशोत्सव काळात विक्रीसाठी गोव्यावरून महाराष्ट्रात आणल्याची माहिती समोर येत आहे. या अगोदरही सदर व्यक्तीवर दारु तस्करीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गणेशोत्सव काळात पालघर जिल्ह्यात विक्रीसाठी दमण आणि गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा विक्रमगड तालुक्यातील शीळशेत- म्हसरोळी भागात आणला जाणार असल्याची गोपनीय माहिती मनोर पोलिसांना मिळाली होती. माहितीनुसार मनोर पोलिसांच्या पथकाने रविवार रात्री विक्रमगड तालुक्यातील शीळशेत गावच्या हद्दीतील नाळशेत रस्त्यावर सापळा रचला होता. यावेळी नाळशेत गावच्या दिशेने एक संशयित पीक अप टेम्पो जात असल्याचे दिसल्यानंतर पोलिसांच्या पथकाने टेम्पोचा पाठलाग सुरू केला होता. पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच टेम्पो चालकाने शीळशेत गावच्या हद्दीत नालशेत रस्त्यालगत कच्च्या रस्त्यावर आडोशाला टेम्पो सोडून पळून गेला. टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्ये दारूचा साठा आढळून आला.

त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूला शोधमोहीम राबवली असता मोठा टेम्पो, एक पीक अप टेम्पो आणि एक इकोस्पोर्ट कार आढळून आली. तीनही वाहनांची झडती घेतली असता या वाहनांमध्ये दारूचा साठा आढळून आला. घटनास्थळी पोलीस येणार असल्याची चाहूल लागल्याने दारू तस्कर वाहने आणि दारूचा साठा सोडून पळून गेले होते. दारूच्या साठ्यासह चारही वाहने पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत.

याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या ६५ (अ) व (ई) आणि मोटार वाहन कायदा कलम १९८८ चे कलम ६६ (१1)/१९२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलिबागच्या बाजारात पिठोरी, गौरींच्या पुजेसाठी लागणारी सुपे दाखल

अलिबाग (वार्ताहर) : गौरी-गणपतीचा सण जवळ येऊन ठेपल्याने रायगड जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. पिठोरी, गौरी तसेच गणपतीच्या पुजेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तुही बाजारात दाखल झाल्या असून, पिठोरी, गौरींच्या पुजेसाठी लागणारी सुपेही बाजारात दाखल झाली आहेत.

रायगड जिल्ह्यात काही ठराविक तालुक्यांमध्ये बुरुड समाज सुपे तयार करीत असले तरी बरीचशी सुपे ही रायगड जिल्ह्याबाहेरील पुणे जिल्ह्यातून येत असतात. सुप बनविण्यासाठी लागणाऱ्या बांबुचे वाढते दर, कारागिरांची वाढती मजुरी पहाता, पूर्वीपेक्षा कैकपटीने सुपांचे दर वाढले आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिवापुरच्या गावच्या सुपविक्रेत्या लता दत्तात्रय सकपाळ सध्या अलिबाग शहरात सुप विक्रीच्या व्यवसाय करीत आहेत. त्यांचा सुप तयार करून त्यांची विक्री करणे, हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय असून बारमाही ते सुप विक्रीचा व्यवसाय करतात. अलिबाग व पोयनाड येथेही त्यांचे कुटुंब सुपविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे सांगताना १९८४ साली त्यांचे लग्न झाले त्यावेळी त्या २५ रुपयांना एक सुप विकायच्या; परंतु सध्याची वाढती महागाई, तसेच सुप बनविण्यासाठी लागणाऱ्या बांबुचे वाढते दर, कारागिरांची वाढती मजुरी पहाता, पूर्वीपेक्षा कैकपटीने सुपांचे दर वाढले आहेत. त्यामुळे सध्या एक सुप २०० रुपयांना विकण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील शिवापूर येथे त्यांच्या मालकीचे घर किंवा शेतजमीन नसल्याने गाव सोडून अन्य ठिकाणी सकपाळ कुटुंब भाड्याने राहतात. सुपविक्रीच्या व्यवसावरच कुटुंबाला पोट भरावे लागते. वर्षभरात ४०० ते ५०० सुपांची विक्री होते, असेही त्या म्हणाल्या. सुपांची विक्री करताना पोलिसांचा किंवा समाजकंटकांचा त्रास नसला तरी अलिबागला सुप विक्रीसाठी आम्ही जातो, तेव्हा तेथील स्थानिक भाजी विक्रेत्यांचा त्रास अधिक असल्याचे लता सकपाळ `दै. प्रहार’शी बोलताना सांगितले.

मुरूड- एकदरा खाडी पुलावर स्वच्छतेची ‘ऐशी की तैशी’ 

नांदगाव-मुरुड (वार्ताहर) : मुरूड शहर आणि एकदरा गावाला जोडणारा समुद्र खाडीवरील एकदरा पूल राजपूरी, माझेरी, आगरदांडा, खार, उसडी, सावली, मिठागर, मांदाड, म्हसळा, वाशी आदी ३० गावांसाठी अतिशय जवळच्या अंतराच्या दृष्टीने महत्वाचा असून सध्या या पुलावर अस्वच्छता, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. पुलावर दररोज मोकाट गुरांचा ठिय्या असून पादचाऱ्यांसह वाहन चालकही अक्षरशः त्रासले आहेत.

या पुलावरील गुरांचे मलमूत्र, चिखल, प्लास्टिक कचरा आदी विल्हेवाट लावणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. पुलावरील स्वच्छतेची कोणालाही चिंता पडलेली नाही, असे चित्र दिसून येत आहे. नागरी वस्ती जवळ असणाऱ्या या पुलाची स्वच्छता मुरूड नगरपरिषदेच्या अखत्यारीत येते की अन्य कोणाकडे हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. हा पूल अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा असून यावरून दररोज शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहने मुरूड तालुक्यातील गावे, रोहा, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, आगरदांडा- दिघी प्रकल्प, जंजिरा किल्ला आदी स्थळे आणि गावाकडे जात असल्याने या मार्गावर खूप भार पडलेला दिसून येत आहे.

पुलावर बसणाऱ्या मोकाट गुरांची संख्याही मोठी असल्याने एकदरा, मुरुडमधील ग्रामस्थांना चालताना मार्गही काढता येत नाही. तीच गत येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांची होत आहे. अशा वेळी अपघात होण्याची दाट शक्यता आहे, यावर प्रशासनाने लक्ष घालून उपाययोजना करावी, अशी मागणी एकदरा कोळी समाजाचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर आणि ग्रामस्थांनी केली आहे. मात्र हा पुल आणि मार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याचे अखत्यारीत येत असल्याने याची स्वच्छता कुणी करायची, हा प्रश्न अनेक दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पुलावर स्वच्छता होत नसून आरोग्यासाठी ही अस्वच्छता धोकादायक ठरू शकते. स्वच्छ सागर, सुरक्षित सागर मोहिमेत मुरुडच्या किनाऱ्याचा भारत सरकारने समावेश केलेला असून त्या पासून हाकेच्या अंतरावर एकदरा- मुरूड खाडीवरील हा पूल आहे.

एकदरा पुलाची सुरक्षितताच धोक्यात

१९६३ साली सा. बा. विभागाने एकदरा-मुरूड खाडीवरील या पुलाची उभारणी करून एकदरा गाव आणि मुरूड जोडले. या बांधकांमास आता ६० वर्षे झाली असून बांधकामही आता जीर्ण झाले आहे. पुलाचे कठडे देखील खिळखिळे झाले असून हादरे बसत असल्याने एकूणच बांधकाम अचानक सावित्री नदीवरील घटनेप्रमाणे दुर्घटना होण्याची शक्यता अनेक एकदरा येथील अनेक ग्रामस्थांनी बोलताना भीती व्यक्त केली आहे. सध्या तरी असे दिसून येते की, वाढता लोड असल्याने तसेच पुलाच्या बांधकामाची मुदत कधीच संपल्याने पुलाचा कमकुवतपणा वाढत आहे, त्यामुळे पुलाची एकूणच सुरक्षितता धोक्यात आलेली दिसून येते.

लवकरच आकारास येत असलेल्या आगरदांडा- दिघी बंदर प्रकल्पामुळे वाहतूक आधिक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाने अति जलद ऑडिट करून मजबूत नवीन पुलाची निर्मिती करणे ही काळाची आणि एकूणच जीवित हानी, वित्त हानी आणि दुर्घटना वेळीच टाळण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. असे मत आणि मागणी एकदरा कोळी समाज अध्यक्ष तथा मुरूड तालुका मच्चीमार कृती समिती अध्यक्ष पांडुरंग आगरकर, रोहन निशानदार, ग्रामस्थांनी केली आहे.

नगरविकास खात्यात वरूण सरदेसाई काय करायचे? : नितेश राणे यांचा विधानसभेत सवाल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मागच्या सरकारच्या काळात नगरविकास विभागाच्या आढावा बैठका कोण घेत होते? वरुण सरदेसाई तेथे काय करत असायचे, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी सोमवारी विधानसभेत केला.

नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये थेट लोकांमधून निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष पद्धतीचा अवलंब करणारी सुधारणा करणारे विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले. त्याचे समर्थन करताना राणे बोलत होते. मुख्यमंत्री कमी बोलतात, पण काम जास्त करतात. पण गेल्या सरकारमध्ये नगरविकास खाते त्यांच्याकडे होते. पण, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य होते का? ते निर्णय घेऊ शकत होते का, की त्यांना निर्णय घ्यावे लागत होते? का त्यांना मंत्रीपदे सोडून वेगळा मार्ग स्वीकारावा लागला? एखादा सरपंचही आपले पद सोडत नाही. मग, सात – सात जण मंत्रीपदे सोडून वेगळा मार्ग का स्वीकारतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे.

कोणीतरी सदस्य म्हणे की, एकनाथ शिंदे यांनी आपल्या विचारांवर ठाम राहावे. मागच्या सरकारमध्ये त्यांनी नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याची सुधारणा केला होती. ते आपल्या विचारावर ठाम आहेत. हिंदुत्वाचा विचार त्यांनी सोडलेला नाही. त्यामुळेच ते आपल्या सहकाऱ्यांसह जनतेने दिलेला कौल स्वीकारत त्यांनी हे सरकार स्थापन केले, असेही राणे म्हणाले.

मागच्या सरकारमध्ये त्यांना निर्णय घेता येत नव्हते. तेथील निर्णय कलानगरच्या वैभव चेंबर्समधून घेतले जायचे. सरकारच्या बैठकीत वरुण सरदेसाई काय करायचे? आठवड्यातल्या आढावा बैठका कोण घ्यायचे? शिंदे घ्यायचे की, माजी पर्यावरण मंत्री घ्यायचे? कोणीतरी सदस्य म्हणाले की, थेट निवडणुकीमध्ये धनदांडगेच निवडून येतील. गरिबांना निवडणूक लढविणे शक्य होणार नाही. आपण सर्व आमदार आहोत. आपल्या निवडणुकीवर होणाऱ्या खर्चातला काही भाग नगराध्यक्षासाठी उभे राहणाऱ्या सामान्य उमेदवाराला दिला तरी ते खर्च करू शकतील, असेही त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांना आता मोकळेमोकळे वाटत आहे. त्यामुळेच एक चागले विधेयक त्यांनी आणले आहे. सर्वांनी ते मंजूर केले पाहिजे, असेही राणे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनीही राणे यांच्या भाषणाची दखल घेत आपल्या भाषणात त्याला दाद दिली.

सरपंच, नगराध्यक्षांची निवड जनतेतून होणार

मुंबई : आता थेट जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. बहुमताने विधानसभेत हे विधेयक मंजूर झाले आहे. नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड ही थेट जनतेतून करावी अशी मागणी जनतेचीच होती, आमचा काही अजेंडा नाही, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या विधेयकाला विरोधकांनी कडाडून विरोध केला. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी जोरदार भूमिका मांडली. तसेच महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत औद्योगिक नगरी पंचायत विधेयक २०२२ संमत करावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला आणि हे विधेयक बहुमताने मंजूर झाले.

सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी, मुख्यमंत्र्यांचीही निवड जनतेतून करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, घटनेच्या तरतुदीनुसार आपण नगराध्यक्षाची निवड करत असतो आणि त्यासंदर्भातील अधिकार राज्याला दिले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री विधानसभेत बोलताना म्हणाले की, जे काही झालं ते का झालं? हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यावर मी जास्त बोलणार नाही. जेव्हा एखादा निर्णय घेतला जातो तेव्हा अनुभवामुळेच बदलला जातो. अजित दादाही म्हणाले होते की, जनतेतून नगराध्यक्षांची निवड करण्यात यावी.

राज्यातील ९ हजार ग्रामपंचायतींनी थेट जनतेतून सरपंच निवडीची मागणी केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांचे ऐकतो, त्यावरून हा निर्णय घेतला असून आमचं सरकार सक्षम आहे. आम्ही बहुमताच्या जोरावर काम करणार नसून विरोधकांचा मान ठेवून काम करणार आहोत, असे ते म्हणाले.

ओव्हरटेक करण्याच्या नादात विनायक मेटेंच्या गाडीचा अपघात

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार अपघातात मृत्यू झाल्याच्या प्रकरणावर सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. या संबंधात आज विधानसभेतही प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर निवेदन करताना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की मेटे यांच्या चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात घडला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

१४ ऑगस्ट रोजी रायगड जिल्ह्यातील माडप बोगद्याजवळ एक्‍स्प्रेस वेवर मुंबईच्या दिशेने निघालेल्या कारने ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५२ वर्षीय मेटे ठार झाले आहेत. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते बीड येथून मुंबईला येत होते. मेटे यांच्या अपघाती मृत्यूबाबत कॉंग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला फडणवीस यांनी सोमवारी उत्तर दिले.

फडणवीस म्हणाले की, ड्रायव्हरने लेन बदलली आणि मधल्या लेनमध्ये एका जड व्यावसायिक वाहनाला डावीकडून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. डाव्या लेनमध्ये आधीच दुसरे अवजड वाहन होते आणि त्याला ओव्हरटेक करण्यासाठी जागा नव्हती. हा ड्रायव्हरचा पूर्णपणे चुकीचा निर्णय होता असे फडणवीस म्हणाले. त्यामुळे कारमध्ये मागे बसलेल्या मेटे यांच्यावर अपघाताचा धक्का बसला. वाहनाच्या चालकाच्या बाजूस अपघाताचा कोणताही परिणाम किंवा नुकसान झाले नाही, असे फडणवीसांनी यावेळी सांगितले.

समर्थ रामदासांचे ‘देव’ चोरीला

जालना : समर्थ रामदासांच्या जन्मगावी असलेल्या मंदिरातून साडे चारशे वर्षे प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या आहेत. स्वतः समर्थ रामदास ज्या मूर्तींची पूजा करायचे त्याच मूर्ती चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे.

समर्थांचे जालन्यातील जन्मगाव जांब समर्थ येथील राम मंदिरातून राम, लक्ष्मण, सीता, भरत, शत्रुघ्न यांच्या प्राचीन मूर्ती चोरीला गेल्या आहेत. समर्थ रामदास स्वतःत्या झोळीत जी मूर्ती ठेवायचे ती देखील चोरीला गेलीय. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे..

इसिस भारतावर हल्ला करणार

रशियात अटक केलेल्या इसिसच्या दहशतवाद्याकडून धक्कादायक माहिती उघड

मॉस्को : रशियन सुरक्षा एजन्सीने इसिसच्या दहशतवादी संघटनेशी संबंधित एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. धक्कादायक बाब म्हणजे चौकशीमध्ये या दहशतवाद्याने इसिस भारतावर हल्ल्याची योजना आखत असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर, भारतातील मोठ्या नेत्यांवरही आत्मघातकी हल्ला करण्याच्या कट इसिसने रचल्याचा खुलासादेखील केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

रशियन न्यूज एजन्सी स्पुतनिकच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक चौकशीदरम्यान, या दहशतवाद्याने कबूल केले आहे की, त्याने एका सर्वोच्च भारतीय नेत्याला लक्ष्य करण्याचा कट रचला होता. एवढेच नव्हे तर, इसिस भारतात हल्ल्याची योजना आखत असल्याचेही त्याने सांगितले. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याची आयएसआयएसने तुर्कस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बर म्हणून नियुक्ती केली होती.

रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने या दहशतवाद्याला ओळखले आणि त्याला अटक केली असून, हा दहशतवादी मूळचा मध्य आशियाई भागातील असल्याचे सांगितले जात आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा, १९६७ अंतर्गत भारताने इसिस आणि त्याच्याशी संलग्न सर्व संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इसिसने इंटरनेटवरील कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यांची विचारधारा पसरवली. सायबर स्पेसवरील एजन्सी याबाबत दक्ष आहेत आणि कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

राज ठाकरेंचे पक्षवाढीकडे लक्ष!

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हिप बोनच्या शस्त्रक्रियेनंतर आता ॲक्टिव्ह मोडमध्ये आले असून त्यांनी आता पक्षवाढीकडे लक्ष दिले आहे. २३ ऑगस्टला मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. तर २५ तारखेपासून मनसे राज्यभरात सदस्य नोंदणी सुरु करणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने या बैठकांना विशेष महत्त्व आहे. त्यांनी सदस्य नोंदणीसह पक्षवाढीवर भर देण्याबाबत या बैठकीत चर्चा केली.

लोक सध्याच्या राजकारणाला कंटाळले आहेत, लोक आपल्याला मत देण्यास तयार आहेत. लोक आपला विचार करत आहेत. म्हणून लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सदस्यता नोंदणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचा. आपण केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवा. वेगवेगळे कार्यक्रम घेऊन लोकांना पक्षाशी जोडा. योग्य रित्या काम केल्यास यंदा आपल्याला नक्की यश मिळेल, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे.

यादरम्यान राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले आहेत. जास्तीत जास्त लोकांची नोंदणी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहेत.

राज ठाकरे यांच्यावर २० जून रोजी मुंबईतील लीलावती रुग्णालात हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मागील दोन महिने राज ठाकरे विश्रांती घेत असल्याची माहिती होती. मात्र आता पुन्हा एकदा राज ठाकरे राजकारणात ॲक्टिव मोडमध्ये आले असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

मागच्या काही दिवसांत मनसेची भाजपसोबतची जवळीकता वाढली होती. आता राज ठाकरे ॲक्टिवह मोडमध्ये आल्यानंतर ही जवळीक कायम ठेवणार की ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेणार हे पाहणे आता महत्त्वाचे आहे. कारण दोन महिन्यांपूर्वी राज्यात जी परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही. मध्यंतरीच्या काळात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना सोबत नसल्यामुळे निर्माण झालेली मराठी मतांची पोकळी शिंदे सेनेमुळे आता पूर्ण होणार आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे मनसेचे देखील लक्ष असणार आहे.

शिवसेनेने साथ सोडल्यानंतर मनसे-भाजप युती होणार अशीच राज्यात चर्चा होती. याला आणखी खतपाणी मिळाले ते मनसेने भाजपला राज्यसभा, विधान परिषद आणि शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी केलेल्या मदतीमुळे. त्यानंतर पुढे देखील हिच चर्चा कायम असल्याची पाहायला मिळाले होते. कारण भाजपच्या सांगण्यावरुन शिंदे गट मनसेत विलीन होणार यापासून ते नव्या सरकारमध्ये मनसेला मंत्रिपद मिळणार इथपर्यंत चर्चा सुरुच होत्या.