नांदगाव-मुरुड (वार्ताहर) : मुरूड शहर आणि एकदरा गावाला जोडणारा समुद्र खाडीवरील एकदरा पूल राजपूरी, माझेरी, आगरदांडा, खार, उसडी, सावली, मिठागर, मांदाड, म्हसळा, वाशी आदी ३० गावांसाठी अतिशय जवळच्या अंतराच्या दृष्टीने महत्वाचा असून सध्या या पुलावर अस्वच्छता, दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. पुलावर दररोज मोकाट गुरांचा ठिय्या असून पादचाऱ्यांसह वाहन चालकही अक्षरशः त्रासले आहेत.
या पुलावरील गुरांचे मलमूत्र, चिखल, प्लास्टिक कचरा आदी विल्हेवाट लावणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला आहे. पुलावरील स्वच्छतेची कोणालाही चिंता पडलेली नाही, असे चित्र दिसून येत आहे. नागरी वस्ती जवळ असणाऱ्या या पुलाची स्वच्छता मुरूड नगरपरिषदेच्या अखत्यारीत येते की अन्य कोणाकडे हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. हा पूल अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा असून यावरून दररोज शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहने मुरूड तालुक्यातील गावे, रोहा, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, आगरदांडा- दिघी प्रकल्प, जंजिरा किल्ला आदी स्थळे आणि गावाकडे जात असल्याने या मार्गावर खूप भार पडलेला दिसून येत आहे.
पुलावर बसणाऱ्या मोकाट गुरांची संख्याही मोठी असल्याने एकदरा, मुरुडमधील ग्रामस्थांना चालताना मार्गही काढता येत नाही. तीच गत येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनांची होत आहे. अशा वेळी अपघात होण्याची दाट शक्यता आहे, यावर प्रशासनाने लक्ष घालून उपाययोजना करावी, अशी मागणी एकदरा कोळी समाजाचे अध्यक्ष पांडुरंग आगरकर आणि ग्रामस्थांनी केली आहे. मात्र हा पुल आणि मार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याचे अखत्यारीत येत असल्याने याची स्वच्छता कुणी करायची, हा प्रश्न अनेक दिवसांपासून ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पुलावर स्वच्छता होत नसून आरोग्यासाठी ही अस्वच्छता धोकादायक ठरू शकते. स्वच्छ सागर, सुरक्षित सागर मोहिमेत मुरुडच्या किनाऱ्याचा भारत सरकारने समावेश केलेला असून त्या पासून हाकेच्या अंतरावर एकदरा- मुरूड खाडीवरील हा पूल आहे.
एकदरा पुलाची सुरक्षितताच धोक्यात
१९६३ साली सा. बा. विभागाने एकदरा-मुरूड खाडीवरील या पुलाची उभारणी करून एकदरा गाव आणि मुरूड जोडले. या बांधकांमास आता ६० वर्षे झाली असून बांधकामही आता जीर्ण झाले आहे. पुलाचे कठडे देखील खिळखिळे झाले असून हादरे बसत असल्याने एकूणच बांधकाम अचानक सावित्री नदीवरील घटनेप्रमाणे दुर्घटना होण्याची शक्यता अनेक एकदरा येथील अनेक ग्रामस्थांनी बोलताना भीती व्यक्त केली आहे. सध्या तरी असे दिसून येते की, वाढता लोड असल्याने तसेच पुलाच्या बांधकामाची मुदत कधीच संपल्याने पुलाचा कमकुवतपणा वाढत आहे, त्यामुळे पुलाची एकूणच सुरक्षितता धोक्यात आलेली दिसून येते.
लवकरच आकारास येत असलेल्या आगरदांडा- दिघी बंदर प्रकल्पामुळे वाहतूक आधिक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाने अति जलद ऑडिट करून मजबूत नवीन पुलाची निर्मिती करणे ही काळाची आणि एकूणच जीवित हानी, वित्त हानी आणि दुर्घटना वेळीच टाळण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. असे मत आणि मागणी एकदरा कोळी समाज अध्यक्ष तथा मुरूड तालुका मच्चीमार कृती समिती अध्यक्ष पांडुरंग आगरकर, रोहन निशानदार, ग्रामस्थांनी केली आहे.