नाही चिरा नाही पणती…!

विभावरी बिडवे

भारतीयांसाठी १९४७ नंतरचा कोणताही १६ ऑगस्टचा दिवस तसा दुय्यमच! कारण त्याचं दिवसमाहात्म्य काही नाही. पण तरी स्वातंत्र्याच्या आनंदात, देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात, हुतात्म्यांच्या पावन स्मृतीत, तरीदेखील आशादायक आणि सकारात्मक विचाराने उजाडणारी ती सकाळ. ‘जरा याद करो कुर्बानी’ ऐकत ऐकत एखाद्या आपल्या स्वतःच्या कोशात रमलेल्या माणसालाही काही करायची उमेद येईल, अशी एखादी सकाळ. मग देशासाठी एखाद्या आयुष्य वाहून दिलेल्या व्यक्तीसाठी, तर हा दिवस किती सकारात्मक असेल? पण स्वातंत्र्यानंतर ४४ वर्षांनी स्वातंत्र्यदिनाच्या दुसऱ्या दिवशी एका कार्यालयात काही माणसं येतात आणि विचारतात, “प्रमोद दीक्षित आहेत का?” इतर कार्यकर्त्यांबरोबर कार्यमग्न असणारी ती व्यक्ती अस्खलित आसामी भाषेत म्हणते, “हो, मीच प्रमोद दीक्षित.” आणि निमिषाचाही अवधी न जाता रिव्हॉल्वर रिकामं होईपर्यंत गोळ्या मारल्या जातात आणि पुढच्या क्षणाला एक निष्काम कर्मयोगी धारातीर्थी पडतो. तसं तर त्याला धारातीर्थी पडणंही कोणी म्हणत नाही आणि त्याचं निष्काम कर्मही असं की ते कधीच समोर येत नाही.

‘उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’, असं म्हणायचीही गरज नव्हती. त्या काळात कोणाला तरी दूरदृष्टीने वाटलं, स्वातंत्र्य मिळतंय पण ते अबाधित राहण्यासाठी मतभेद, कलह आणि विविधता विसरून एकत्र येणं आणि राहणं आवश्यक ठरेल. स्वातंत्र्यानंतर एका प्रबळ आणि पुनरुत्थानशील राष्ट्रनिर्माणासाठी ही सर्वात महत्त्वाची गरज. हे केवळ वाटलंच नाही, तर त्यासाठी हळूहळू निर्माण होत गेलं एक मोठं संघटन! एकमेकांना जोडत गेले निष्ठेने आपलं आयुष्य अर्पून द्यायला तयार शेकडो कार्यकर्ते. पण कार्यकर्ता हा शब्द आपपर भाव जपतो.

समाजाच्या गरजा ओळखून स्वयंस्फूर्तीने काम करणारा तो स्वयंसेवक आणि असे स्वयंसेवक ज्या संघटनेमध्ये निर्माण होतात आणि देशाप्रती आणि एकमेकांसाठी सात्त्विक प्रेमाने जोडलेले राहतात ती संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्यांच्या पेटवलेल्या मशाली फक्त १५ ऑगस्टपुरत्या मर्यादित नाहीत. धगही तितकीच, मात्र त्याला दिवसमाहात्म्य नाही! आपण सामान्य लोक एक दिवस राष्ट्रोत्सव साजरा करतो आणि ह्या १६ ऑगस्टला दुय्यम समजतो.

तर प्रमोद दीक्षित! ५ जून १९४९ म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा जन्म! पुण्यामधल्या फर्ग्युसन कॉलेजमधून बी.एस्सी. झाले. आणीबाणीमध्ये शशिकांत पंडित हे नाव घेऊन भूमिगत राहिले. कोकण, मराठवाडा इथल्या कामानंतर १९७८ साली संघ प्रचारक म्हणजे संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून आसाममध्ये नियुक्त झाले. आपल्या घरापासून दूर, वेगळी भाषा, वेगळी संस्कृती. सगळ्या सुखांकडे पाठ फिरवून शेकडो मैल दूर आसाममधल्या नलबाडी येथे एका शाळेत मुलांना शिकवण्याचं काम सुरू केले.

१९८३ मध्ये गुवाहाटी महानगर प्रचारक म्हणून जबाबदारी आली. त्यादरम्यान व्यावसायिक रक्तदात्यांनी त्यांचा दर वाढविण्याची मागणी करून संप पुकारला. सर्वच दवाखाने, हॉस्पिटल्समध्ये रक्ताची चणचण भासू लागली. वैद्यकीय महाविद्यालयांमधली ऑपरेशन्स बंद झाली. काही विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान करणे सुरू केले. स्वतः प्रमोदजींनी पण रक्तदान केले. मात्र हा कायमस्वरूपी तोडगा असू शकत नाही, ह्या उद्देशाने प्रमोदजींनी स्वयंसेवकांची बैठक घेऊन एक अतिशय विस्तृत अशी रक्तगट सूची बनविली. या कामात डॉक्टर्सना जोडून घेऊन रक्तगट चाचणी शिबिरेही आयोजित केली. बरोबरीने या कामात सामान्य लोकांनाही सामावून घेऊन ती यादी अजून विस्तृत केली. वैद्यकीय महाविद्यालयामधून रक्ताची मागणी आली की, अशा रक्त यादीतील व्यक्तीला सूचित करून ती पूर्ण केली जाऊ लागली. या कामाला पुढे व्यापक स्वरूप आल्यानंतर ‘डॉ. हेगडेवार स्मारक रक्तानिधी’ ही नोंदणीकृत संस्था निर्माण केली. पूर्ण आसाममध्ये या संस्थेचं काम सुरू झालं. जवळपास कधीही, कुठेही रक्ताची गरज पडली, तर पहिला फोन हा संघ कार्यालयात यायचा, असं त्यांचे सहकारी सांगतात. स्वतः प्रमोदजींनी सलग ८ वर्षे दर तीन महिन्यांनी असं २५ हून अधिक वेळा रक्तदान केलं. त्याबद्दल त्यांना विशेष पुरस्कारही दिला गेला होता. एकूणच समाजाच्या वेळोवेळी लागणाऱ्या गरजा ओळखून स्वयंस्फूर्तीने हे काम त्यांनी केलं आणि म्हणूनच त्याची व्याप्ती वाढली.

व्याप्ती! ही गोष्ट साधी नाही. एक सामान्य व्यक्ती म्हणून प्रमोदजींच्या या कामाची व्याप्ती (किंबहुना संघाची व्याप्तीसुद्धा) कशी वाढली असेल याचं मला कुतूहल वाटतं. त्याचं उत्तरही खरंतर संघाच्या मूळ उद्देशातच असावं. ते म्हणजे माणसं जोडणं! प्रमोदजींचे तेव्हाचे सहकारी सांगतात, ‘अतिशय लाघवी माणूस! माणसे जोडण्यात हातखंडा. अगदी रेल्वे, दुकानातसुद्धा लोकांशी गप्पा मारून घनिष्टता वाढवत असत. नलबाडीला असताना एका कम्युनिस्ट नेत्याची ओळख झाली आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्या घराचं जेवणाचं निमंत्रणही स्वीकारलं. गुवाहाटीला वैद्यकीय महाविद्यालयात रोग्यांशी गप्पा मारणे, त्यांची विचारपूस करणे हा त्यांचा नित्यक्रम.

बरपेटा येथे जिल्हा प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती होती, पण दुर्दैवाने ती शेवटची ठरली. ४२व्या वर्षी बरपेट्याच्या ‘केशवधाम’ संघ कार्यालयात उल्फा अतिरेक्यांकडून मृत्यू! उल्फा – युनाइटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (ULFA) हे एक नाव. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत अशा कितीतरी उग्रवादी आणि आतंकवादी संघटना देशाला आव्हान देत उदयास आल्या. स्वातंत्र्यानंतर अशा फुटीरतावादी संघटनांपासून असो वा अंतर्गत कलहापासून देशाचं रक्षण करणं हे सध्याचं आव्हान! ते कदाचित सीमेवरच्या जवनांसारखं, पोलिसांसारखं प्रत्यक्ष नसेल. पण राष्ट्रबांधणीचं काम! घरदार सोडून कुठेही दूरवर पूर्णवेळ समर्पित भावनेने संघ नेमून देईल ते काम प्रमोदजींसारखे अनेक प्रचारक करत आहेत. स्वातंत्र्यासाठी जे लढले ते तर अजरामर झालेच, जे सीमेवर लढत आहेत. त्यांच्याप्रति आपण मनात कृतज्ञतेचे भाव ठेवून आहोतच. पण असेही काही लढताहेत. वस्तुतः शाळेत शिकवणं, रक्तदानासाठी कार्य करणं, ही काही कोणती लढाई नाही. पण एखाद्या फुटीरतावादी संघटनेला का बरं असा शाळेत शिकवणारा, समाजातील उणिवा भरून काढणारा प्रचारक शत्रू वाटावा?! ज्याने आसाममधील बांधवांसाठीच रक्तदानासारखा महान यज्ञ चालविला, त्याचे रक्त शेवटी त्याच भूमीत सांडून वाया का जावं?! का त्याची हत्या व्हावी?!

याचं अगदी सध्या तर्काने उत्तर सामान्य माणसालाही मिळू शकतं. संघाचं समन्वयाचं, देशांतील विविधतेला एका धारेत आणण्याचं, राष्ट्रभक्तीचं, एकमेकांविषयी सात्त्विक प्रेमच शिकवणारं काम, हे राष्ट्रविघातक शक्तींसाठी निश्चितच विरुद्ध विचारांचं आणि देशाला तोडण्याच्या त्यांच्या कामात विघ्न आणणारं आहे आणि त्यासाठी कोणत्याही थराला जाऊन हे काम संपुष्टात आणण्यासाठी आजपर्यंत अशा शेकडो प्रचारक आणि स्वयंसेवकांच्या हत्या झाल्या आहेत. मग त्या आसाममधील असोत किंवा केरळमधील. जून २००५ मध्ये गुवाहाटी विभाग कार्यवाह शुक्लेश्वर मेढी यांची नलबाडी येथेच अशीच रक्षाबंधनाच्या दिवशी दिवसाढवळ्या हत्या केली गेली. मुरली मनोहर, ओमप्रकाश चतुर्वेदी, प्रफुल्ला गोगोई, पन्नाल ओस्वाल, जयंत दत्ता, बिरेन पुखन, प्रसंथ गोगोई, मधू मंगल शर्मा हे फक्त आसाममध्ये उल्फा अतिरेक्यांकडून हुतात्मा झालेले काही संघ स्वयंसेवक. याबरोबरच पूर्वांचलातील इतर राज्ये, केरळ, तामिळनाडू, पंजाब, हरयाणा, जम्मू-काश्मीर येथील यादीही मोठी आहे.

देशाचे तुकडे आता केवळ युद्ध लढून होणार नाहीत आणि ते होण्यापासून वाचविणे हेही केवळ युद्ध लढून होणार नाही. फक्त आसामचाच विचार केला, तर उल्फाव्यतिरिक्त NDFB (The National Democratic Front of Bodoland), KLNLF (The Karbi Longri N.C. Hills Liberation Front), UPDS (The United People’s Democratic Solidarity), DHD (The Dima Halam Daoga), KLO (Kamtapur Liberation Organisation) अशा संघटना फुटीरतेचा झेंडा घेऊन उभ्या आहेत. बांगलादेश आणि भूतानच्या सीमांमुळे आसाम विषय नाजूक आहे.

तो ऑगस्ट १९९१ होता. आमचं दहावीचं वर्ष नुकतंच सुरू झालं होतं. तेव्हा प्रमोदजींची पुतणी असलेली माझी एक मैत्रीण म्हणाली, “काकांची हत्या झाली.” फार विचार करण्याइतक्या जाणिवा नव्हत्या तेव्हा. आज इतकी वर्षं झाली तेव्हा त्याचं महत्त्व लक्षात आलं. प्रमोदजींचे मारेकरी ना पकडले गेले, ना शिक्षा! तेव्हाच्या आसाम गणपरिषदेच्या सरकारची अनास्था, उल्फा उग्रवाद्यांबद्दल सहानुभूती अशी अनेक कारणे. पण ना सरकारला कोणी जबाबदार धरले, ना मीडियाने त्याविषयी आवाज उठवला, ना सर्वसामान्यांपर्यंत ही बातमी पोहोचली, ना मेणबत्त्या हातात घेऊन कोणी निषेध केला! दिवंगत प्रमोद दीक्षितांच्या अस्थी आसाममधील तत्कालीन ज्येष्ठ प्रचारक (स्व.) मधुकरजी लिमये पुण्याला घेऊन आले. प्रमोदजींचे सहकारी प्रचारक त्यांच्या कुटुंबाला प्रमोदजी तेथे असताना सुरू झालेले ‘शंकरदेव शिशू निकेतन’ व्यवस्थित चालू असल्याचे पत्राद्वारे कळवितात. बरपेटा येथे त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अजून एक रक्तदान केंद्र सुरू केले गेले. त्यांच्या कार्याचा दीप तेवत ठेवण्यासाठी आणि त्यांची स्मृती जपण्यासाठी स्वयंसेवकांकडून त्यांना वाहिलेली ही सर्वोत्तम आदरांजली!

नाटेठोम

डॉ. विजया वाड

“बाबा, तू घरीच?” तेजूनं आश्चर्यानं विचारलं.
“जवळजवळ चोवीस तास!”
“काय सांगतोस?”
“मी अख्खा दिवस लॅपटॉप नि आयपॅडवरून चॅनल चालवणार आहे तेजू.”
“काय सांगतोस?”
“माझा एंटरटेन्मेंट चॅनल असल्यानं ते शक्य आहे.”
“जुने प्रोग्रॅम्स रन करणार?”
“हो. भरपूर स्टॉक आहे.”
“वाऊ.” तेजूने आनंदाने उडीच मारली.
“मालूमावशी कुठाय रे?”
“ती गावी गेली. राष्ट्रव्यापी कर्फ्यू लागणार आजपासून म्हणून रात्रीच मी तिला वसईला तिच्या मुलाबाळात पोहोचवून आलो. आज काही गाडी बाहेर काढता यायची नाही.”
“ओह! हाऊ स्वीट! बाबा, यू आर सोss स्वीट!”
तेजू बाबांच्या गळ्यात पडली नि तिनं त्याच्या गालाचा
मुका घेतला.
“स्वीट काय त्याच्यात?”
“नोकर-चाकराचा इतका विचार करतोस!”
“आपली ड्युटीच आहे ती तेजू. किती पैसा मिळवला हे नाही गं महत्त्वाचं. किती माणूसपण जपलं हे महत्त्वाचंय.”
“यू आर राईट बाबा. आय विल फॉलो धिस फिलॉसॉफी.”
“खूप छान.”
तेजू बाथरूमपाशी गेली, तर आई सुन्नात होऊन बाहेर येत होती. केसांना टॉवेल बांधला होता. पण इतकी लालुस आणि तरतरीत दिसत होती की तेजू जामच खूश झाली.
“तू भी घरमें?”
“मग? चित्रीकरणाला सुट्टी आहे.”
“काय सांगतेस?”
“खरं सांगत्येय, सुट्टी आहे चित्रीकरणाला.”
“मग मालिकेचं काय होणार?”
“कोरोनाचं संकट टळलं की पुन्हा चालू होईल चित्रीकरण. तेजू नथिंग टू वरी.”
तेजूला आठवलं.
सकाळी नऊ ते रात्री नऊ आईची चित्रीकरणाची वेळ असे. फिल्मसिटीत असलं की तिला अर्धा तास आधी निघावं लागे. पण नालासोपारा गाठायचं असलं की, दीड तास एका प्रवासाला लागे. म्हणजे नऊची शिफ्ट आली, तर साडेसातला घराबाहेर पडावे नि रात्री साडेदहाला घराकडे परतावे इतके टाइट शेड्यूल असे.
आली की इतकी थके, इतकी थके की तिच्यात बोलायचीही ताकद नसे. शिवाय सारे अंतर, जवळ असो की लांब… स्वत: ड्राइव्ह करी. ड्रायव्हिंग वॉज अॅण्ड इज हर पॅशन.
“माझा एपिसोड बघितलास?” ती आल्यावर
तेजूला विचारी.
“म्हंजे काय अय्युडा!”
“कसा झाला?”
“यू वेअर द बेस्ट.”
“खरंच?”
“तुझी शपथ!”
असं बोलणं चाले. तेजूची आई स्क्रीनवर इतकी सुंदर दिसे की सारं पब्लिक तिच्यावर प्रेम करी.
“यवढी मोठी पंधरा वर्षांची मुलगीय त्यांना असं वाटतं का तरी? आणि एमेस्सी गोल्ड मेडलिस्ट आहेत. किती हुश्शार! पण किती डाऊन टू अर्थ!”
आपल्या आईबद्दल इतके चांगले उद्गार कोणाला आवडणार नाहीत? तेजूचे कानही तेजतर्रार होत. चेहेराभर आनंद पसरे.
आपल्या आई-वडिलांचा तिला भारी अभिमान वाटे.
शाळेत ती कधी याबद्दल बोलली नाही, तरी साऱ्यांनाच तिच्या आई-बाबांच्या लोकप्रियतेची कल्पना होती.
पण फार एकटे वाटे. हा केवळ तिचा अनुभव होता. दहा ते पाच जॉब करणाऱ्यांच्या आई नि बाबांचे काही तास तरी मुलांच्या वाट्याला येतात ना!
तेजू मात्र टीव्ही पाहत वेळ घालवी. ट्यूशन टीचरसोबतच गृहपाठ पूर्ण करी आणि मालूमावशीला काही तरी छान कर, नवे कर असा लकडा लावी.
“आई, किती दिवस कोरोनाचं संकट आहे गं?” तिनं आईला विचारलं.
“आता फाइट करतोय ना आपण?”
“पण अॅण्टीडोटला इतका वेळ का लागतोय?”
“तेजू बेटा, अॅण्टीडोट शोधणं, विकसित करणं, त्यानंतर तो प्राणिमात्रांवर ट्राय करणं, त्याचा यश-अपयशाचा आलेख निरसणं या सोप्या गोष्टी आहेत का बेटा? पण आय अॅम शुअर, भारतीय शास्त्रज्ञ या सर्व चाचण्या यशस्वीरीतीने पार पाडतील.”
“खरंय आई. मला तर वाटतं, कोणत्याही बुद्धिमान माणसाला भारताबाहेर जाऊ देऊ नये. इतर देशांचा विकास आम्ही करण्यापेक्षा आमच्या देशाचा विकासच आम्ही करू ना!”
“युवर थॉट इज व्हेरी गुड. तू तो नक्की अमलात आण. इतर देशात प्रगत शिक्षण अवश्य घे, पण त्याचा उपयोग स्वदेशासाठी कर. आय अॅम सो प्राऊड ऑफ यू तेजू.”
आईने मायेने जवळ घेतले लेकीला. आंजारले, गोंजारले. त्या स्पर्शातली माया तेजूला इतकी हवी हवीशी वाटली की, ती कोरोनाचे दु:ख विसरली.
“असा असावा काळही सुंदर
असे असावे भरलेले घर!
आई-बाबा तेजू यांचा,
मेळ असावा असाच सुंदर…!” तिला वाटले.
फक्त हे होण्या “कोरोना” कारणीभूत नसावा, असे मात्र तेजूला खूप मनापासून वाटत राहिले. तेवढ्यात तेजूचा बाबा आला.
“बाबा, ये ना, गप्पा ठोकायला.”
“हाजिर हूँ मॅडम ! पण माझ्या मनात आलं तू, मी नि आई… तिघं मिळून पत्ते खेळूया.”
“काय खेळूया डिअर बाबा?”
“पाच तीन दोन?”
“नको. अरे तू नि आई दोघं सदा कामात असता, तर घर ओकेबोके असते. “नॉट अॅट होम” हीच स्थिती सदा असते.
“काय करणार तेजू?”
“म्हणून तर सांगते, आज तिघं नाटेठोम खेळूया.”
“येस्स्स!” आई-बाबा रंगले. दार घट्ट बंद! नि पत्त्यांचा डाव रंगला… नॉट अॅट होम! अेटले? नोट ठोम!

सत्ता आणि मालमत्ताही देवाचीच…

अनुराधा परब

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या भारतवर्षामध्ये आजही विविध प्रांतांमध्ये राजवंश अस्तित्वात आहेत.  खरंतर ते रूढार्थाने कोणत्याही विशिष्ट प्रदेशाचे सत्ताधीश नाहीत.  समाज आणि लोकमानसामध्ये त्या राजवंशातील आजच्या पिढ्यांविषयी पूर्वीइतकाच सन्मान, आदरभावना आहे.  स्थानिक पातळीवर होणाऱ्या वेगवेगळ्या उत्सव, समारंभांमध्ये यांना मानाचे स्थानही आहे. ‘तरीही उरे काही उणे’ अशी भावना कायम असल्याचे असे हे सोहळे पाहताना वाटू शकते. त्याचे कारण राजेशाही सोहळ्यांची सर त्याला येत नाही म्हणून. सिंधुदुर्ग जिल्हा मात्र या सगळ्याला अपवाद ठरतो. सिंधुदुर्गात सावंतवाडी येथे लखम सावंतांचा राजवंश आणि इनामदार देवस्थानांचा रुबाब आजही श्रीमंती थाटाचा आहे.  दक्षिण कोकणात देवालाच गावं इनाम मिळालेली असल्यामुळे इथे सत्ता देवाची चालते. पर्यायाने या देवस्थानांमधील दैनंदिन कार्यक्रमातील षोडशोपचार पूजाअर्चा,  विधी ते वर्षातील विविध उत्सवांचे स्वरूप हे राजवर्खीच असते.

सिंधुदुर्गामध्ये साळशी,  किंजवडे, कोटकामते, आचरा अशी काही इनामदार देवस्थाने आहेत आणि त्यांचा कारभार हा देवाच्या संमतीनेच चालतो. इथल्या प्रथा – परंपरा, उत्सव यावर संस्थानिक दर्जाचा ठसा आहे. साधारणपणे समूहाच्या, देवस्थानाच्या वहिवाटीसाठी तर कधी देखभाल खर्चासाठी इथपासून ते शौर्य गाजवलेल्या किंवा बुद्धिचातुर्य दाखवलेल्या व्यक्तींच्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी राज्यकर्त्यांनी दिलेले उत्पन्नाचे नेमस्त साधन म्हणजे इनाम किंवा वतन. या इनामामध्ये चाकरी, अधिकार, हक्क, नेमणूक यांच्या जोडीने आखून दिलेली कर्तव्ये करणे अपेक्षित असते. उत्पन्नाच्या शाश्वतीची ही हमी वंशपरंपरागत कायम राहण्यासंबंधीचा दस्तऐवज कधी ताम्रपत्र, शिलालेख, सनद इत्यादी माध्यमांतून सोपविलेला असतो. काही ठिकाणी ग्रामसंस्थांचा कारभार सुरळीत चालण्यासाठी राज्यकर्त्यांनी वतने लिहून दिल्याच्या नोंदी सापडतात. इनाम म्हणून अलंकार, जडजवाहिरे, मुद्रा दिल्याच्या गोष्टी इतिहासाच्या पानोपानी सापडतील. मात्र अशा प्रकारे गावं इनाम देण्याची पद्धत काही अभ्यासकांच्या मते इसवी सनाच्या सुरुवातीपासून असावी.  चालुक्य  –  राष्ट्रकुटांच्या काळापासून गावातील शासनव्यवस्थेसाठी काही कुळांकडे अधिकार देण्याची प्रथा रूढ झाली असावी. कायदेशीररीत्या जमीन इनाम देऊन ग्रामव्यवस्थेचा गाडा दक्षतेने चालविण्यासाठीची ही सोय होती.  यादव काळामध्ये तर याला प्रस्थापित रूप आले. मध्ययुगात राजसत्ता बदलल्या तरी ग्रामसंस्कृतीमध्ये इनाम मिळालेल्या गावांच्या स्थानिक नैमित्तिक कामात, लोकव्यवहारामध्ये फारसा बदल घडला नाही. मराठेशाहीमध्ये वेतनव्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली. महसूल वसुलीकरिता त्यांनी विविध पदांची निर्मिती केली.  स्वराज्यनिष्ठांना अभय आणि शत्रूंशी हितसंबंध ठेवणाऱ्या वतनदारांकडील वतनांवर कठोर निर्बंध घातले गेले.

सतराव्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी कुडाळच्या लखम सावंताच्या विनंतीवरून तहाच्या द्वारे (सन १६६३) कोकणप्रांत ताब्यात घेतल्याची नोंद सापडते.  शिवराज्य स्थापल्यानंतर कान्होजी आंग्रे यांनी केलेल्या आरमाराच्या कारवायांच्या माध्यमातून या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता आली. उपलब्ध कागदपत्रांनुसार, सिद्धेश्वर व पावणाई ही साळशीची कुलदैवते आहेत. सोळाव्या शतकापर्यंत साळशी हे लहानसे गाव होते. स्थानिक धुरी हे तेथील वतनदार होते.  सतराव्या शतकात कोल्हापूरच्या शंभू महाराजांनी हे गाव कुलदेवता असलेल्या पावणाईला सनद देऊन इनाम दिले. त्यानंतर अमात्यांना कोल्हापूरच्या राजांनी बावड जहागिरी बहाल केल्यानंतर हा भाग अमात्यांच्या आधिपत्याखाली आला. भगवंतराव अमात्यांनीही साळशीच्या सिद्धेश्वर आणि पावणाईला सनद दिली. देवस्थानांना, देवाला दिलेल्या संस्थानांची इनामदारी ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतरही कायम राहिली.

आचरा हे गाव रामेश्वर आणि महत्त्वाचे व्यापारी बंदर अशा दोन कारणांमुळे पंचक्रोशीमध्ये विशेषत्वाने सुपरिचित आहे. कोल्हापूर संस्थानाधिपतींनी अर्थात दुसऱ्या शंभुराजांनी रामेश्वराची महती जाणून देवालाच आचरे गाव सन १७२० साली विशेष सनदेमार्फत, तर कालांतराने जवळचेच मजरे गाऊडवाडी गावही कायमस्वरूपी इनाम दिल्याची नोंद सापडते.  ही दोन्ही गावे कायदेशीररीत्या रामेश्वराला दिलेली इनामे आहेत. दानपत्रामध्ये मंदिराचा उल्लेख श्री देवस्थान महास्थान असा करण्यात आलेला आहे. हे इनाम उत्तरोत्तर चालत राहील, अशी नोंदही त्यात करण्यात आलेली आहे. या दानपत्रामध्ये (जे सध्या उपलब्ध नाही, मात्र ब्रिटिशांनी हेच दानपत्र सनदीच्या स्वरूपात नोंदवून ठेवल्याचे कागदपत्र संशोधनादरम्यान पाहण्यासाठी उपलब्ध झाले.) देवाला  इनामदार हा किताब देण्यात आला आहे. रामेश्वर अर्थात शिव हा देवच इथला सत्ताधीश असून त्यायोगे आचरा देवस्थानाला संस्थानाचा दर्जा देण्यात आलेला आहे.

सरखेल कान्होजी आंग्रे यांनी आपल्या शौर्याने कोकण प्रांती वचक ठेवलेला होता.कामते गावात आंग्रेंची सत्ता होती. या गावात असलेल्या किल्ल्यावरून गावाला कोटकामते नाव पडले. येथे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी भगवती दिलेल्या केलेल्या नवसपूर्तीनिमित्ताने शके सोळाशे सत्तेचाळीसमध्ये देवी भगवतीचे मंदिर बांधल्याचा शिलालेख मंदिरामध्ये आजही पाहायला मिळतो. या शिलालेखानुसार कामते गाव हा आंग्रे यांनी देवीला इनाम दिल्याचे लक्षात येते. गावात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या किल्ल्याच्या तटबंदी आणि बुरुजाचे काही अवशेष आज शिल्लक आहेत. प्रमुख कब्जेदार म्हणून इनाम संस्थानातील गावांतील देवस्थानांचा शिक्का गावातल्या तेथील जमिनीच्या सात बारावर असतो. किंजवडे गावातील स्थानेश्वराला कोल्हापूरच्या छत्रपती शंभू महाराजांनी संपूर्ण गाव वहिवाटीसाठी इनाम दिले आहे. तिथेही अशाच प्रकारे इनामदार संस्थान देवाच्या, स्थानिक जमीन आणि सत्ता ही स्थानेश्वराच्याच नावे आजही अस्तित्वात आहे. इनाम देण्यात आलेले देवच इथले सत्ताधिकारी असल्याने त्यांच्या मालमत्ता विक्रीचा अधिकार अन्य कुणालाही नसल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने इनाम गावांतील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारावर कायदेशीररीत्या आता निर्बंध आलेले आहेत.

संशोधक म्हणून लक्षात आलेला महत्त्वाचा भाग म्हणजे इनामदारी मिळून अस्तित्वात आलेली संस्थाने – गावे ही सागरी व्यापाराशी संबंधित आहेत. सागरी मार्गाने होणारा हा व्यापार पुढे घाटमार्गे जात असल्याने वरील सर्व इनाम गावे, त्यांचे महसूल तसेच स्थानिक देवतांचे महात्म्य यांचा परस्पर संबंध धर्म आणि अर्थ असा स्पष्टपणे दाखवता येतो. त्यामुळेच असे विधान करता येते की, ज्याप्रमाणे व्यापारी मार्गांवर लेणी निर्माण झाल्या, त्याचप्रमाणे इनामदार संस्थानेही व्यापारी मार्गांवरच वसविण्यात आली; किंबहुना म्हणूनच व्यापारी मार्गावरीलही स्थळे महात्म्याच्या दृष्टीने तसेच आर्थिक, राजकीय आणि व्यापारदृष्ट्या कायम महत्त्वाची राहिलेली आहेत.

‘मातृदेवोभव’

मृणालिनी कुलकर्णी

हिरव्या रंगाच्या छटांनी, रानफुलांनी, रिमझिम पावसाच्या सरींनी, ऊन-पावसाच्या लपंडावात सरणारा श्रावण, वातावरण आल्हाददायक करून, पशु-पक्षी, प्राणी, वनस्पती साऱ्यांनाच आनंद देतो. वेगवेगळ्या व्रतवैकल्याने सण उत्सवाने भरलेला, भारलेल्या मंगलमय श्रावणात प्रत्येक दिवसाचे, सणांचे महत्त्व वेगळे असते. नागपंचमी ते पिठोरी अमावस्येमध्ये येणाऱ्या सणात वर्षभर नि:स्वार्थीपणे साथ देणाऱ्यांचे आपण पूजन करून कृतज्ञता व्यक्त करतो. असा हा नाती जपणारा श्रावण महिना!

पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी, मुलाच्या सुखसमृद्धीसाठी, दीर्घायुष्यासाठी आई (बेसनच्या) पिठापासून दुर्गामातेसह ६४ देवीच्या मूर्ती आणि पूजेसाठी दिवे बनविते. यालाच श्रावणी अमावास्या किंवा मातृदिन असेही म्हणतात. याच दिवशी बैलपोळा असतो. परंपरेनुसार बैलाची पूजा केल्यानंतर आई मुलाला वाण देते.

आई! जन्माबरोबर मिळणारे मातृत्व. ईश्वर जगात सर्वत्र जाऊ शकत नाही म्हणून आईची निर्मिती केली असे म्हणतात. माणसाच्या जीवनातील पहिली ओळख, पहिला गुरू आई! आई या शब्दांत संपूर्ण कुटुंब सामावलेले असते. ‘मातृ देवो भव!’

मोलमजुरी करणाऱ्यांपासून अगदी उच्च पदस्थापर्यंत आपल्या मुलाला घडविणारी, मुलाच्या मागे मैत्रीण बनून खंबीरपणे उभी राहणारी आईच असते. अनेकांनी जगात स्वतःचा ठसा उमटविला त्यामागे आईची शिकवण असते.

काही मायलेकरांच्या अतूट जोड्या

१. जिजाऊंच्या संस्कार शिक्षणातूनच शिवाजी महाराज हे तेजस्वी नेतृत्व जन्मास आले.
२. यशोदा सदाशिव साने! श्यामची आई! सानेगुरुजी! अत्यंत दारिद्र्यात कमालीची स्वाभिमानी यशोदाने श्यामला छोट्या-छोट्या प्रसंगातून, जाणिवेतून शिकविले. मायलेकातील प्रवाही संवाद जो आज पाल्य पालकात दिसत नाही. आचार्य अत्रे म्हणतात, श्यामची आई हे मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र आहे.
३. शुद्ध चारित्र्याचा आणि लष्करी नेतृत्वाने अमेरिकेला स्वातंत्र्य मिळवून देणारे पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन आणि त्यांना संस्कारित करणारी त्याची आई मेरी बाॅल. पेड्रिक्स बर्गला बसविलेल्या कोनशिलेवर ‘वॉशिंग्टनची आई मेरी’ ही अक्षरे कोरली आहेत.

आपल्याच मातीतील एक शौर्यकथा

१. केवळ तान्हुल्याच्या काळजीपोटी, आपले बाळ भुकेलेले असेल, या एकाच विचाराने हिरा (हिरकणी) गवळण २७०० फूट उंच असलेल्या गडाच्या एका कड्यावरून खाली उतरते.

२. ताडोबाच्या जंगलात आपल्या बछड्याला धोका आहे, कळताच बेफान होऊन डरकाळी फोडत बछड्याच्या दिशेने झेपावणारी वाघीण वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ऋताने पाहिली. सर्व प्राणिमात्रांत आईची माया सारखीच असते.

आईची शिकवण

१. विख्यात शास्त्रज्ञ चंद्रशेखर सुब्रह्मण्यमच्या वडिलांच्या बदली नोकरीमुळे चंद्राला आईनेच शिकविले. चंद्राचे काका हिंदुस्थानातले पहिले नोबेल पुरस्कार विजेते सर सी. व्ही. रमण! आईने सातत्याने चंद्राला ‘काकांपेक्षा मोठा हो!’ हे बिंबवले. खगोलभौतिक विषयांत नोबेल पारितोषक मिळवून चंद्रशेखरने आईची इच्छा पूर्ण केली.
२. ‘तुझ्याकडे शब्दांच धन आहे, त्यामुळे तू लिहीत जा’ हे सांगून बालवयातच आईने आपल्या मुलीची उमेद वाढविली, त्या प्रसिद्ध लेखिका डॉ. विजया वाड.
३. शात्रज्ञ थॉमस एडिसन आणि जपानची दूरदर्शन कलाकार आणि युनिसेफची सद्भावना दूत झालेल्या तोतोचान (तेतसुको कुरोयानाशी) यांच्या यशस्वितेचे मूळ दोन्ही आयांनी आपल्या मुलांना बालपणी तुम्हाला शाळेतून काढून टाकण्यात आले होते हे सांगितले नव्हते.
४. प्रख्यात चित्रकार विजयराज बोधनकर यांनी स्वतःच्या चित्र प्रदर्शनात ‘होमलीडर’ शीर्षकाखाली त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या, संस्कार करणाऱ्या आपल्या आई-वडिलांचे पेंटिंग्स केले होते. ते म्हणतात, आई-वडील हेच घर या संस्थेचे ‘होमलीडर’ असतात.
५. पोलीस इन्स्पेक्टर अरविंद इनामदारांना त्यांची आई म्हणायची, ‘स्वतःसाठी देवाजवळ सगळेच मागतात, दुसऱ्यासाठी प्रार्थना कर, परमेश्वर तुझेही कल्याण करील’!
आई आपल्या मुलासाठी काही अंशी स्वार्थी असते हे पूर्णतः नाकारता येणार नाही. त्याच समाजात ज्यांना कोणीही नाही अशा मुलांना जवळ करणारेही अनेक तरुण मुले, काही जोडपी आहेत. अनाथांची माय सिंधुताई सकपाळ; दुर्लक्षित, उपेक्षित मुलांसाठी कार्ये करणाऱ्या रेणू गावस्करांना पाहता, आपली उंची किती कमी आहे हे तीव्रतेने लक्षात येते.
जरा हटके उदा.

१. इतिहासातले अतिशय दुर्मीळ, दुर्लभ, उत्तुंग उदाहरण पन्नादाईचे. मेवाडच्या भविष्यासाठी स्वतःच्या मुलाचे आपल्या डोळ्यांसमोर बलिदान दिले.
२. खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवरील एका कलाकाराचे भाष्य मला स्पर्शून गेले होते. ते म्हणाले, मी माझी कला आईला डेडिकेट करतो. क्षणभर थांबले नि म्हणाले आई म्हणजे फक्त माझी आई नव्हे, तर आईपण निभावणाऱ्या सर्व! पुन्हा क्षणभर थांबून बोलले, मग ती स्त्री असो व पुरुष हे मला अभिप्रेत नाही.
३. घर लहान, पैसे बेताचेच असूनही घरातही आई-वडिलांची सेवा करणाऱ्यांना मी जवळून पहिले आहे. तरीही आज वाढणारी वृद्धाश्रमाची संख्या हे चित्र भयावह आहे. समवयस्कांना भेटायला गेल्यावर वर्तनातून घरातील नातेसंबंध लक्षात येतात.

मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा होणाऱ्या ‘मदर्स डे’चा जगव्यापी अर्थ ‘एका आईचा नाही, तर आईपणाचा, मातृत्वाच्या भावनेचा सोहळा व्हावा’ हा आहे. शेवटी आईपणा मागचा व्यापक अर्थ; ‘आई ही व्यक्ती असली तरी आईपण ही वृत्ती आहे, भावना आहे. ती भावना व्यापक हवी. म्हणजेच तिने सर्वांशीच मायेच्या ममतेने वागायला हवे. त्याचे उदा. मदर टेरेसा होय. तिच्यामध्ये सर्वांविषयी प्रेम, माया, शांतता, बंधुत्व सामावले जाईल, अशा व्यापक व्याख्येत, आजचा मदर्स डे वैयक्तिक झाला. आईला कार्ड्स, फुले, गिफ्ट्स देऊन बाजारीकरण झाल्यामुळे, ती व्यापकता संकुचित झाली. म्हणून आईनेच सुरू केलेल्या ‘मदर्स डे’संबंधी तिची मुलगी अॅना जार्विस म्हणते, आईला पत्र लिहा, तिला जाऊन भेटा, तिच्याशी संवाद साधा, तुमचा सहवास द्या, हा तिचा आग्रह होता.

‘आई’वर लिहिले गेलेले साहित्य समृद्ध आहे; परंतु भिंतीच्या आतला अनुभव प्रत्येकाचा वेगळा असतो! पिठोरी अमावस्येच्या निमित्ताने आई मुलाच्या नात्याचा हा अल्पसा ऊहापोह. मातृदेवोभव !

अर्धशून्य भासे मज हा कलह जीवनाचा…

श्रीनिवास बेलसरे

महाभारतातील सत्यवतीची कहाणी सर्वांना परिचित आहे. त्यावरच प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांनी ‘मत्स्यगंधा’ नावाचे संगीत नाटक लिहिले होते. महाभारतात सत्यवतीचे आयुष्य व्यासमुनींनी एक शोकांतिका म्हणूनच रंगवले आहे. खरे तर महाभारत हीच मुळात जीवनाचा गूढ अर्थ सांगणारी एक महा-शोकांतिका आहे!

नियतीने लादलेली सतत गुंतागुंतीची आणि भावनिक कोंडीची अनुभूती जीवनभर घेतल्यावर सत्यवती खूप उदास झाली आहे. तिला कशातच काही अर्थ वाटत नाही. एकंदर जगण्यातला वैय्यर्थच तिच्या लक्षात आला आहे. मोठमोठ्या शब्दांना काही अर्थच नाही, असे लक्षात येऊ लागते. कधी कधी सगळे जगणेच व्यर्थ आहे, असे वाटू लागते. धर्म, न्याय, नीती ही जी जीवनमूल्ये आपल्याला शाश्वत आणि महान वाटत होती. त्यांना वास्तवात काहीच अर्थ नाही. नियतीच्या क्रूर खेळापुढे या केवळ कल्पना ठरतात, असे सत्यवतीला जाणवते.

‘उपदेशक’ या बायबलमधील एका भागात राजा शलमोनाने लिहिलेले एक वाक्य अशा वेळी हमखास आठवते. जीवनातील सर्व सुखोपभोगांचे आकंठ रसपान केल्यावर आयुष्याच्या शेवटी तोही म्हणतो, “व्यर्थ हो व्यर्थ! सारे काही व्यर्थ! या जगात नवे असे काहीच नाही!” नकळत राजा शलमोनाचे हे वाक्य सत्यवतीची मन:स्थिती अगदी नेमक्या शब्दांत वर्णन करणारे ठरते!

कविवर्य वसंत कानेटकरांनी हाच आशय अधिक व्यापक स्वरूपात नाटकातील एका पदात मांडला आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या मार्गदर्शनाखाली आशालता वाबगावकरांनी गायलेल्या या गाण्याची लोकप्रियता एके काळी खूप होती. आकाशवाणीच्या सर्व केंद्रावर हे पद नेहमी ऐकायला मिळत असे. त्यात ‘मत्स्यगंधा’मधील विषण्ण मन:स्थितीत असलेली सत्यवती म्हणते –

“अर्धशून्य भासे मज हा कलह जीवनाचा
धर्म, न्याय, नीती, सारा खेळ कल्पनेचा”

…आणि खरे तर हा तसा किती सार्वत्रिक अनुभव आहे! कोणत्या ना कोणत्या क्षणी, जवळजवळ प्रत्येकालाच असे वाटून गेलेले असते की, आपण ज्या मूल्यांना इतकी वर्षे उरीपोटी धरून बसलो त्याला व्यावहारिक जगात काडीची किंमत नाही! या जगात आपल्याला न्याय मिळाला नाही, तर निदान तो ‘वरचा न्यायाधीश’ आपल्याला कधी तरी न्याय देईल म्हणून वाट पाहत आपण अवघे आयुष्य घालवतो. पण न्याय मिळत नाही, इतकेच काय मनाला थोडाही दिलासाही मिळत नाही! आयुष्यभर ज्याने नीतीमत्तेला धरून जीवन जगले, त्याची वाताहत होताना तर ज्याने वाईट मार्गांचा बिनदिक्कतपणे वापर केला, त्यांची सतत भरभराट होताना दिसत राहते.

कानेटकर हाच अनुभव चित्रमय पद्धतीने मांडतात. माणूस मोठ्या उमेदीने आयुष्याबद्दल सोज्वळ, सुंदर स्वप्ने रंगवतो आणि एखाद्या सुंदर शिल्पावर वीज कोसळावी, तसे विदारक वास्तव अचानक त्याच्यासमोर येते. त्याची सगळी स्वप्ने एका झटक्यात जळून भस्मसात होतात आणि समोर उभा राहतो तो केवळ विनाश!

म्हणून सत्यवती म्हणते, हा तर जगाचा नियमच दिसतोय, जे जे निर्माण झाले त्याला या जगात काही चांगले भवितव्य नाहीच! सगळ्याचा विनाशच होणार!! या विश्वात शाश्वत असे काही नाहीच का?

“ध्यास एक हृदयी धरूनी स्वप्न रंगवावे
वीज त्यावरी तो पडूनि शिल्पा कोसळावे!
सर्वनाश एकच दिसतो नियम या जगाचा
अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा.”

त्यातही कधी असे होते की, एखाद्याला वैभव प्राप्त होते, तो इतक्या सुखासमाधानात जगत असतो की, अनेकांना त्याचा हेवा वाटू लागतो. ‘यथार्थ जीवन म्हणजे काय ते हेच!’ असे दुसऱ्यांना वाटू लागते. मात्र जरा नशिबाचा फेरा उलटला की, त्याचेही होत्याचे नव्हते होऊन बसते. मग माणसाच्या हातात उरते काय, तर जसा एखादा लाकडाचा निर्जीव ओंडका प्रवाहाबरोबर दिशाहीनपणे वाहत राहतो, तसे जीवनप्रवाहात वाहत जाणे! हेच का मानवी जीवन?

“दैव ज्यास लाभे त्याला लाभ वैभवाचा
दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा
वाहणे प्रवाहावरती धर्म एक साचा…”

कानेटकरांनी प्रश्न उभा करून तसाच सोडून दिला आहे. अभिजात साहित्याचे तेच लक्षण असते. ते आपल्याला जीवनातील अनेक विषयांवर नव्याने विचार करायला भाग पाडते. मात्र अनेक पर्यायी शक्यता समोर ठेवूनही एखादे मत न लादता आपले स्वतंत्र मत बनवायला आपल्याला मोकळे सोडून देते.

सत्यवतीच्या आयुष्यातील शोकांतिकेच्या विचाराने काहीशा उदास करून टाकणाऱ्या या गाण्यावर विचार करताना इंग्रजी कवी पर्सी बिश शेले यांची एक कविता आठवते. त्यांच्या “टू अ स्कायलार्क” या कवितेत दोन सुंदर ओळी होत्या.
स्कायलार्क या पक्ष्याला उद्देशून लिहिलेल्या कवितेत ते म्हणतात, “आपण कधी भूतकाळाचा, तर कधी भविष्याचा विचार करत असतो आणि जे नाही त्याबद्दल दु:खी होतो, कुढत बसतो. कधी आपण खळखळून हसलो तरीही त्या हास्याला वेदनेच्या एका अदृश्य उपस्थितीने घेरलेले असतेच. म्हणून तर आपली तीच गाणी मनात चिरकाल टिकतात. ज्यांच्यात एखाद्या दु:खाचा विचार अलगद गुंफलेला असतो.”

“We look before and after,
And pine for what is not;
Our sincerest laughter
With some pain is fraught;
Our sweetest songs are those
that tell of saddest thought.”

महाराष्ट्राचा सुपरस्टार आज ठरणार

दीपक परब

गायन क्षेत्रात नाव कमविण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांना त्यांचे टॅलेंट सिद्ध करता यावे यासाठी स्टार प्रवाह या वाहिनीने त्यांना हक्काचा मंच उपलब्ध करून दिला आहे. या स्पर्धकांच्या स्वप्नांना मुर्त रूप देण्यासाठी एक प्रवास सुरू झाला व तो म्हणजे ‘मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ ही स्पर्धा. वयाचे बंधन नसल्यामुळे अगदी ४ वर्षांच्या चिमुरड्यापासून ७० वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकानेच या मंचावर आपली कला सादर केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या या गायकांनी स्वतःला सिद्ध केले आणि त्यातील २ सर्वोत्तम गायक आणि २ ग्रुप्सनी आता महाअंतिम फेरी गाठली आहे. अप्रतिम गाणी सादर करून प्रेक्षकांची मन जिंकलेल्या ‘मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’, या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रविवारी २१ ऑगस्टला रंगणार आहे. मुंबईचा राम पंडित, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचा ‘शिलेदार ग्रुप’ आणि गोव्याच्या ‘जिग्यासा ग्रुप’ यांच्यात महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज कोण ठरणार याची उत्सुकता वाढली आहे.

महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांमधली महाजुगलबंदी पाहायला मिळणारच आहे आणि सोबतीला ‘दगडी चाळ २’ च्या टीमने खास हजेरी लावत या सोहळ्याची शान वाढवली आहे. तेव्हा ‘मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’, या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ला फटका

कलेक्शनही घसरले, शो रद्द करण्याचीही वेळ!

अभिनेता आमिर खान याचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारच निराशाजनक कामगिरी केली आहे. मंगळवारी सुट्ट्या संपल्यानंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये कमालीची घट झाली. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो रद्द करावे लागल्याचेही वृत्त आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची ही अवस्था पाहून लवकरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरून बाहेर पडेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

‘चतुर चोर’मध्ये झळकणार ‘पाठक बाई-राणादा’

हॉरर कॉमेडी’ला सध्या प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सोशल मीडियावरही कॉमेडीची जागा अद्याप कोणीही घेतलेली नाही, तसेच काहीसे चित्रपटांच्या बाबतीतही घडताना दिसत आहे. हॉरर कॉमेडी म्हटले की, हॉरर आणि कॉमेडी दोन्हीकडील प्रेक्षकवर्ग एक होऊन या चित्रपटास योग्य तो न्याय देतो. लवकरच एक नवा कोरा ‘हॉरर कॉमेडी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे पार पडले आहे. तगड्या स्टारकास्टचा हा चित्रपट असून, या चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री प्रीतम कागणे आणि अक्षया देवधर हे कलाकार झळकणार आहेत. हार्दिक, प्रीतम आणि अक्षयाने या चित्रपटात काय हॉरर कॉमेडी केली आहे, हे पाहणे विशेष रंजक ठरणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर पेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राची लाडकी जोडी, ‘पाठक बाई-राणादा’ म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

कोण असणार ‘चतुर चोर’?

या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा किरण कुमावत, स्वाती खोपकर, सुरेखा कागणे, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक यांनी पेलली असून, सहनिर्माते म्हणून तबरेज पटेल आणि निनाद भट्टीन यांनी बाजू सांभाळली आहे, तर दिग्दर्शक आणि छायाचित्रकार अमोल गोळे यांनी संपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण केले आहे, तर चित्रपटाची कथा लेखक सुमित संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे. आता या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, हार्दिक, प्रीतम, अक्षयासोबत इतर कोणते कलाकार या सिनेमात झळकणार, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. लंडनमध्ये चित्रित झालेल्या या हॉरर कॉमेडीतील ‘चतुर चोर’ चतुर चोर नेमका कोण असेल, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

अमृत महोत्सवानिमित्त आरोग्याची पंचसूत्री

डॉ. लीना राजवाडे

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  एक राष्ट्र म्हणून आपण केलेल्या प्रगतीबद्दल आपले सर्वांचे कौतुक केले तसेच २०४७ साली भारताचे स्वातंत्र्याचे १००वे वर्ष साजरे होत असताना भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करण्याची ही वेळ आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून  ‘अमृतकाल’ असे संबोधित पुढील २५ वर्षांच्या वाटचालीत देशवासीयांसाठी पाच प्रतिज्ञांची यादी करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताची ताकद ही विविधता आणि महत्त्वाकांक्षी समाजात आहे.

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात प्रत्येक भारतीय नागरिकाने स्वत:साठी आणि अर्थातच देशासाठी करावयाच्या ५ प्रतिज्ञा सांगितल्या. ‘माझे आरोग्य, माझी जबाबदारी’ या संकल्पपूर्तीसाठीदेखील या पाचही प्रतिज्ञा सूत्रांचा नक्कीच विचार करता येईल, असे मा‍झ्या मनात आले. तेव्हा त्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून मी अधिक विचार मांडण्याचा प्रयत्न आजच्या लेखात करते आहे.

२०४५ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवणे : पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०४५ मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्याच्या १००व्या वर्षात प्रवेश करेल, तेव्हा प्रत्येक भारतीयाने भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला पाहिजे.  “मी तरुणांना त्यांच्या आयुष्यातील पुढील २५ वर्षे देशाच्या विकासासाठी समर्पित करण्याचे आवाहन करतो; आम्ही संपूर्ण मानवतेच्या विकासासाठी काम करू”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. याचा अर्थ आपण वैयक्तिक, सामाजिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.

वसाहतवादाच्या सर्व खुणा काढून टाकणे : पंतप्रधान म्हणाले की, “प्रत्येक भारतीयाने आपल्या कृतीतून आणि आपल्या मानसिकतेतून वसाहतवाद आणि गुलामगिरीच्या अवशेषांपासून स्वत:ची सुटका करणे महत्त्वाचे आहे.” “आम्ही ‘विकसित भारत’साठी काम करण्याचा संकल्प केला पाहिजे आणि आपल्या हृदयाच्या कानाकोपऱ्यांतून औपनिवेशिक मानसिकतेच्या सर्व खुणा काढून टाकल्या पाहिजेत,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. शारीरिक आरोग्यासोबत मानसिक, वैचारिक, भावनिक आरोग्यासाठी आपण तेवढेच महत्त्व दिले पाहिजे.

आपली मुळे आणि वारशाचा अभिमान बाळगणे : पंतप्रधान म्हणाले की, “प्रत्येक भारतीयाने देशाच्या वारशाचा अभिमान बाळगला पाहिजे आणि आपण विकासात प्रगती करत असताना रूजले पाहिजे.” “आपल्या वारशाचा, आपल्या मुळांचा आपल्याला अभिमान असायला हवा.  कारण जेव्हा आपण आपल्या मुळाशी जोडलेले राहतो, तेव्हाच आपण उंच उडू शकतो आणि जेव्हा आम्ही उंच उड्डाण करू, तेव्हा आम्ही संपूर्ण जगाला उपाय देऊ,” पंतप्रधान म्हणाले. भारतीय शाश्वत मूल्यं, विज्ञान, वैद्यक शास्त्र यात संशोधन झाले पाहिजे. पर्यायी नव्हे, तर ते पहिले वैद्यक शास्त्र वाटले पाहिजे.

एकता आणि अखंडता : समानता हा भारताच्या प्रगतीचा आधार स्तंभ आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, एक राष्ट्र म्हणून आपण ‘भारत प्रथम’ या मंत्राद्वारा एकजूट आहोत, याची खात्री करणे आवश्यक आहे.  “विविधतेत एकता सुनिश्चित करण्यासाठी आपण लैंगिक समानता सुनिश्चित केली पाहिजे.  आणि हे साध्य करण्यासाठी आपण आपल्या घरातील असमानतादेखील संपवली पाहिजे.”  मुली आणि पुत्रांना समान वागणूक दिली नाही, तर एकता राहणार नाही. स्त्री-पुरुष दोघांचेही आरोग्य महत्त्वाचे आहे.

नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना : पंतप्रधान मोदी म्हणाले की, “पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसह भारतातील प्रत्येक नागरिकाने हे सुनिश्चित केले पाहिजे की, देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्यासाठी ते कर्तव्याच्या भावनेने परिपूर्ण आहेत.  वीज, पाणी वाचवणे हे लोकांचे कर्तव्य आहे. जर आपण याचे पालन केले, तर आपण वेळेपूर्वी अपेक्षित परिणाम गाठू शकतो, तसेच “कोणत्याही राष्ट्राने प्रगती केली आहे, हे त्यांच्या नागरिकांमध्ये शिस्त कशी रूजलेली आहे, यावरून समजते. सर्वांनी आपल्या जबाबदाऱ्या पाळल्या, तर भारताचा उदय लवकर होईल.”

काय भुललासी…?

ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा
काय भुललासी वरलीया रंगा…

प्रियानी पाटील

संत चोखामेळा यांच्या या अभंगातून वरवरचं रूपडं आणि अंतरंग यांचा परस्पर काही संबंध नसतो या अर्थानेच माणसाचं वरवरच दिसणं आणि त्याचा स्वभाव यात कधी कधी जमीन अस्मानाचा फरक असू शकतो हे देखील तितकेच खरे आहे.

मग ती स्त्री असो अथवा पुरुष.

एक अंकल आपल्या जीवनातील किस्सा सांगताना आपल्या पत्नीची ओळख देताना म्हणाले, ही एकदम मनाने चांगली आहे. आहे गव्हाळ रंगाची पण तितकीच ती अंतरंगाने सोन्यासारखीच आहे. आपल्या पत्नीची ओळख देताना त्यांनी आपल्या चष्म्याची काच दोनदा पुसली. म्हणाले, लग्नात मुलगी पाहताना माझी दुसऱ्यांदा फसगत होऊ नये म्हणून मी हा नवा चष्मासुद्धा घेतला. त्यांच्या बोलण्यातून फसगत हा शब्द आला आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. तसे ते म्हणाले, पहिल्यांदा जेव्हा मी मुलगी पाहण्यास गेलो होतो, तेव्हा मुलीला एका क्षणात पसंत केली होती. काय तो चेहरा, काय ते सौंदर्य वर्णन करताना तिच्या गोऱ्या म्हणण्यापेक्षा पांढऱ्या रंगाचं कौतुक करायला ते अजिबात विसरले नाहीत. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पुन्हा न राहावल्यामुळे हे महाशय त्या मुलीला आठ दिवसांतच कुणालाही न कळवता तिच्या घरी भेटायला गेले. तेव्हा मुलगी दाखवायच्या कार्यक्रमात उपस्थित नसलेली एक व्यक्ती त्यांच्या नजरेस पडली. त्यांना वाटले

मुलीची मावशी किंवा आत्या असावी. त्यांनी तिला आपली ओळख देत म्हटले, मावशी… मावशी मी आलोय म्हणून सांगा मुलीला किंवा तिच्या वडिलांना किंवा आईला.

या मावशीला असं सांगताच ती हातातलं काम टाकून लाजली आणि आत पळणार इतक्यात मुलीची आई बाहेर आली. या महाशयांनी पुन्हा तोंड उघडले, म्हणाले, मावशी कुठे असतात, म्हणजे कार्यक्रमात नव्हत्या ना म्हणून म्हटले.

तशी मुलीची आई वरमली. म्हणाले, तुम्ही काय बोलताय. मुलीची ओळख आठ दिवसांतच विसरलात, तर जन्मभर काय सांभाळणार तुम्ही हिला? त्यांच्या लक्षात काही येईना. ते भांबावले. ते या मावशीकडे पाहतच राहिले. तशी ती आणखी लाजली.

तशी आई म्हणाली, ही काही कुणी मावशी नाही, माझी मुलगीच आहे आणि तुमची होणारी पत्नी. जा गं आत जा आणि चांगला परवासारखा मेकअप करून ये. तुझा होणारा नवरा तुझी ओळखच विसरून गेलाय. कसं व्हायचं पुढे तुमचं म्हणून ती हसायला लागली. भावी सासुबाईंचे हे बोलणे ऐकून हे अंकल एवढे धास्तावले की घामाने भिजले.

अरे हा काय प्रकार आहे? मुलीचा कार्यक्रमावेळचा पांढरा रंग आणि आताचा रंग यात जमीन अस्मानाचा फरक आहे. केवढी फसवणूक आहे, म्हणून अंकल काय समजायचे ते समजले आणि त्यांनी तिथून तत्काळ काढता पाय घेतला. आणि स्पष्ट नकार कळवला.

अंकलनी हा किस्सा सांगताना असंही म्हटलं शेवटी… मी त्या कार्यक्रमात मुलगी पाहायला गेलो होतो, तेव्हा त्यांनी मुलीला बिना मेकअप समोर आणली असती तरी मी एकवेळ पसंत केली असती, पण मेकअपच्या आतील चेहरा एक, वरवरचा रंग एक अशा प्रकारे केलेली ही फसवणूक माझीही होती आणि माझ्या घरातील माणसांचीही होती. जे आहे ते लपवायचं कशाला? मला फसवणूक बिलकूल मान्य नाही म्हणून मी ते लग्न मोडलं, असे अंकल स्पष्टच बोलले आणि त्यांनी एक सत्यता स्पष्ट केली.

सत्य आणि असत्याची बाजू मांडतानाही आपण सत्याच्या मार्गाने चालण्याचे धाडस दाखवले पाहिजे. नाही तर एक खोटं बोलता बोलता माणूस हजारदा खोटं बोलून ते पचनी पाडतो.

अलीकडे फोटो एडिटिंग करूनही असणं एक आणि दिसणं एक असं समीकरण बनू लागलं आहे. यामुळेही अनेकदा फसगत होऊ शकते. खरं तर रंग कोणताही असो, काळा किंवा गोरा यात भेद न मानता मनाच्या खऱ्या रंगाची ओळख पटवून घेतली पाहिजे. अंकलनी त्या मुलीला नकार देण्याचं कारण हे त्या मुलीचा रंग नव्हताच मुळी, तर त्यांच्याकडून झालेली फसगत हे होतं. हे कुणालाही सहज कळण्यासारखं होतं.

आपला रंग काळा असो अथवा गोरा आपल्या मनात असं न्युनगंड निर्माण जेव्हा होतं, तेव्हा इतरांपेक्षा आपण सरस दिसण्यासाठी असे नवनवीन रंग चेहऱ्यापासून मनापर्यंत तयार झालेले असतात. जे दुसऱ्यांना कमी लेखण्यापर्यंतही कधी कधी उमटतात.

रंगांच्या दुनियेत प्रत्येक रंग हा आपली ओळख घडवितो. माणसाच्या बाह्य रंगापेक्षा अंतरंग किती चांगले आहे हे जाणणे गरजेचे आहे. सफेद केसांना काळा रंग तारुण्य जपताना दिसतो. तारुण्याचा खरा रंग असतो तो मनाचा सच्चेपणा. जेवढं सच्चेपणानं वागलं जाईल तितकं समाधान मनाला लाभेल.

कधी कधी खोटं बोलणंही माणसाचा खरा रंग दाखवून जातो. उगाचच खोटं बोलण्याच्या सवयीमुळे माणूस समोरच्या माणसाचा विश्वास गमावून बसतो. खोटं बोलण्याची सवय लागू नये म्हणून घरातून लहानपणापासून चांगले संस्कार आवश्यक असतात. लहान मुलांना खोटं बोलू नये अशी शिकवण देऊन ती अंगीकारण्याची त्यांना सवय लावणंही तितकंच गरजेचे आहे.

रंग असो, स्वभाव असो तो पारदर्शक असणं आवश्यक असतो. खरं ते खरं, खोटं ते खोटं ठरवतानाही पारदर्शकता महत्त्वाची ठरते. आपणाला केव्हा पण चांगल्या गोष्टीच हव्या असतात. पण कधी कधी वाईट गोष्टी पदरी पडतात, तेव्हा त्या स्वीकारताना मन खट्टू होऊन जातं, पण जेव्हा त्याची खरी ओळख पटते तेव्हा आपण किती चुकीचा विचार करत होतो, हे लक्षात येते. बाह्यरंगापेक्षा अंतरंग सरस ठरते. दिखावा, फसवणूक, वरवरचे रंग यामध्ये अंतरंग कसे हे पाहणे जरुरी ठरते. आयुष्यात आपण वरवरच्या गोष्टींवर भुलण्यापेक्षा सच्चेपणाचे अंतरंग पारखणे गरजेचे आहे.

सोन्याचा मुलामा

माधवी घारपुरे

आमची ऑस्ट्रेलिया ट्रीप छानच झाली. नुसत्याच भौगोलिक विविध स्थळांव्यतिरिक्त माणसांचे विविध स्वभावही वाचता आले. ‘केल्याने देशाटन…’ हे चूक नाही. ट्रीपमध्ये सर्व सधन आणि उच्चशिक्षित होते. चारच लोक पुण्याचे भाजीविक्रेते आणि रुखवताचं सामान विकणारे होते. शिक्षणही बेताचेच असले तरी स्वभावाने चांगले वाटले. ते चौघे अलग नाहीत हे कळूनही ते अलग पडले होते. विमानात त्यांच्या सीट्स नेमक्या आमच्या मागेच होत्या. काही फॉर्म भरणे, एअर होस्टेस काही म्हणाली, त्यांना कळत नव्हते. साहजिकच त्यांनी माझी मदत घेतली. मला क्षणभर हसू आलं आणि आपण कुणी मोठं असल्याचा भास झाला जो क्षण अत्यंत क्षुद्र होता. मन म्हणालं, तूच त्यांना नीट गोष्टी समजावून सांगितल्या तशी त्यांची भीड चेपली गेली.

सीडनीला पोहोचलो ते थेट हार्बर ब्रीज, मरियम चेअर वगैरे पाहून ३ वाजता हॉटेलवर पोहोचलो. रूम्स देताना त्या चौघी. दोन रूम आमच्याच उजव्या-डाव्या बाजूला आल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपला नाही आणि इतरांच्या सुद्धा! कार्ड स्वाइप करून दार उघडण्यापासून माहिती करून घ्यावी लागली. मलाही त्यात आनंद मिळत होता. एक दोनदा त्यांनी ब्रेकफास्ट, लंचला इतरांबरोबर बसण्याचा प्रयत्न केला. पण दुर्लक्षितच झाले. माणसाचा खेडवळपणा माणसाला इतका अडगळीत टाकतो का? हा प्रश्न मला सतावत नव्हता, तर व्यवहारातल्या सत्याची जाणीव करून देत होता. हळूहळू ट्रीप संपत आली. उद्याला मुंबईला रवाना व्हायचं. सकाळचा आजचा वेळ पूर्णपणे ऑपेरा हाऊस बघण्यात गेला. संध्याकाळी एका देखण्या हॉलमध्ये सगळी जमा झाली. खरं तर लोकांनी आपापल्या ओळखी करून घेतल्या होत्या. पण वेळ होता म्हणून टूर मॅनेजरने परत ओळखी, आपापली स्पेशालिटी, छंद, बैठे खेळ असा प्रोग्रॅम आखला होता.

कुणी गाणी, कुणी बॅडमिंटन, कुणी ब्रिलियर्डस, कुणी डान्स आपापल्या हॉबीज सांगितल्या. समाजकार्य हे तर प्रत्येकच करतो, असे सांगत होता. एकाने तर सांगितलं,
“We can not live without society. The person who lives without society he may be the god or the beast. So we must help others. etc….”

आता माझा नंबर आला. मी उठले तोवर ठाण्यावरून मुलाचा फोन आला. हे म्हणाले, “मी सांगतो, तोवर तू बोलून घे.” मी फोन घेतला. मुलगा सांगत होता, “आई तू गेलीस आणि तिसऱ्याच दिवशी आपली कामवाली नीलाबाईच्या मुलाला ट्रेनमधून पडून अपघात झाला. तुला कळवले नाही. आज मात्र त्याचा पाय गुडघ्यापासून काढायचे निश्चित झाले. नंतर आर्टिफिशियल बसवणार आहेत. ६०-७० हजाराला प्रकरण जाईल.” नीलाबाईला आता १५०० चा चेक दिलाय जो तू गरजेसाठी सही करून दिला होतास. बाकी संस्थांकडून बघू असे तिला सांगितले. तू रागावणार नाहीस याची खात्री होती.

मी सांगितले, “Dont Worry. You have done a good job.” मला वाटलं, अगदी योग्य वेळेला लेकाचा फोन आलाय. इथे प्रत्येकाला समाजकार्य करायचं आहे. आपण फक्त १/१ हजाराचं आवाहन करू. २५/३० हजार आरामात जमतील. आताच फोन आलाय. खोटं काहीच नाही.

माझं फोनवर बोलणं होईपर्यंत त्यांच्यानंतर त्या चौघांतील एक पुरुष उभा राहिला. म्हणाला, “आमचा धंदाच असा आहे की, पहाटे चार, साडेचारला भाज्या आणायला मार्केटला जावं लागतं. खूप छंद जोपासावे वाटतात, पण वेळ नाही. पोरांना मात्र चांगलं शिकवतो, पैसा चांगला कमावतो. येळ मिळाला की, पुस्तकं वाचतो. इतकंच शिकलो की, देवाने इतकं दिलंय. मुलं पण शिकताहेत तर मिळकतीतले १०० रु. भाग १० रु. देवाला द्यायचे.” नमस्कार करून तो खाली बसला.

सर्वात शेवटी मी होते. योग्य ती माहिती देऊन सर्वांना एक एक हजार मदत करण्याचे आवाहन केले. प्रत्येकाने “वा छानच संधी! २-२ हजारही देऊ”, असे सांगितले. माझ्या मनाची झाडं खरं पारिजातकासारखी बहरतात. नंतर मात्र एकेकजण हळूहळू काढता पाय घेऊ लागला. कुणाकडे इंडियन करन्सी नव्हती. कुणाकडे खरेदीनंतर पैसेच शिल्लक राहिले नव्हते. कुणी आधीच उसने घेतले होते. कुणी सांगितले की, इंडियात गेल्यावर तुमच्या खात्यावर ट्रान्स्फर करू. एकूण नन्नाचा पाढा. एक दोघांनी फुलाची पाकळी नाही. पण परागकण तरी म्हणून ५००/५०० रुपये दिले.

बहरलेल्या प्राजक्ताची फुलं लवकरच कोमेजली. दुसरे दिवशी एअर पोर्टवर निघण्यासाठी जमलो, असं लक्षात आलं की, माझी नजर लोकं चुकवताहेत. मुंबई एअर पोर्टवर तर मला लांबूनच टाटा-बाय बाय केला गेला. आम्ही पण ट्रॉलीवर सामान टाकून निघालो तर मागून ताई-ताई आवाज आला. बघते तर भाजीवाले होते. म्हणाले, “ताई, खरेदी करून इतकेच ३५०० शिल्लक राहिले बघा. पुण्याच्या टॅक्सीचे पैसे ठेवून घेतलेत. तो पोरगा त्याच्या त्याच्या पायावर उभा राहिला की, हे पैसे सार्थकी लागतील. बराय! पुण्याला आला की, लेकीच्या लग्नाचं रुखवत आमच्याकडूनच घ्या बरं!” इतकंच बोलून गेले. माझं कोमेजलेलं झाड परत टवटवीत झालं. मन म्हणालं, “सोन्याचे मुलामे जरी समाजात असले ना, तरी निखळ सोनंही असतं बरं. फक्त ते ओळखता आलं पाहिजे.”

रोहिंग्या शरणार्थी नव्हेत घुसखोर……

सुकृत खांडेकर

म्यानमारमधून हाकलून दिलेले आणि बांगलादेशमार्गे भारतात घुसलेल्या रोहिंग्यांचा प्रश्न भारताला डोकेदुखी बनला आहे. त्यांना ठेवायचे कुठे आणि परत पाठवायचे कसे, असा पेच भारतापुढे निर्माण झाला आहे. ते भारताचे नागरिक नाहीत, ते म्यानमारचे रहिवासी असले तरी तो देश त्यांना नागरिक मानायला तयार नाही आणि बांगलादेशातून त्यांनी भारतात धाव घेऊन ते या देशात बस्तान मांडू इच्छित आहेत. कुणाचे ओझे कुणी सांभाळावे, अशी भारताची अवस्था झाली आहे.

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी एक ट्वीट करून रोहिंग्यांना बाह्य दिल्लीतील बक्करवाला अपार्टमेंटमध्ये स्थलांतरित करण्यात येईल, असे जाहीर केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दिल्लीत आपचे सरकार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारला केंद्रातील मोदी सरकारशी संघर्षाला एक नवे निमित्त मिळाले. हरदीप पुरी यांच्या घोषणेला ‘आप’ने लगेचच विरोध केला. भाजप विरुद्ध आप नवा वाद सुरू झाला. ज्या रोहिंग्यांना भाजपने सदैव विरोध दर्शवला तोच पक्ष सत्तेवर असताना त्यांना राहायला घरे देणार, असे कसे होऊ शकते? या वादानंतर रोहिंग्या मुस्लीम पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले.

म्यानमारच्या पश्चिमेला रखाइन प्रदेश आहे. सोळाव्या शतकापासून मुस्लीम लोक तेथे राहात आहेत. १८२६ मध्ये अंग्लो – बर्मा युद्धानंतर प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला. तेव्हा बंगालमधून (आजच्या बांगला देशातून) मजूर म्हणून मुस्लीम लोकांना आणले गेले. हळूहळू रखाइनमधील मुस्लीम लोकसंख्या वाढत गेली. याच लोकसंख्येला रोहिंग्या म्हणून ओळखले जाते. १९४८ मध्ये म्यानमारवर असलेली ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली व तो देश स्वतंत्र झाला. तेव्हा त्या देशात बौद्धांची लोकसंख्या सर्वाधिक होती. बौद्ध विरुद्ध मुस्लीम असा तेथे नवा वाद सुरू झाला. रोहिंग्यांची वाढती लोकसंख्या हा त्या देशाला मोठा प्रश्न भेडसावू लागला. १९८२ मध्ये म्यानमार देशात नवा राष्ट्रीय कायदा जारी झाला. या कायद्यानुसार रोहिंग्या मुस्लिमांना दिलेला नागरिकत्वाचा दर्जा रद्द करण्यात आला. म्यानमार सरकार रोहिंग्यांना देश सोडून जाण्यासाठी भाग पाडत आहे, त्यातून हे लोक बांगला देश आणि भारतात पलायन करू लागले आहेत. बांगला देशातून भारतात रोहिंग्यांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी चालू असून त्यातून कायदा-सुव्यस्थेचा प्रश्न अनेक राज्यात निर्माण झाला आहे.

म्यानमारमधील रखाइनमध्ये सन २०१२ मध्ये जातीय दंगली झाल्या. त्यानंतर रोहिंग्यांची भारतात घुसखोरी वाढू लागली. रखाइनमधील हिंसाचारात हजारो लोकांचे बळी गेले. लाखो लोक बेघर झाले. २०१४ मध्ये म्यानमारमध्ये झालेल्या जनगणनेमध्ये रखाइनमधील दहा लाख लोकांची नावे सामील करून घेतली नाहीत. रोहिंग्यांना म्यानमारमध्ये राहणे तेथील व्यवस्थेमुळे अशक्य झाले व म्यानमारलासुद्धा बांगला देशातून येणारे लोंढे नकोसे झाले. म्यानमारमधून घुसखोरी केलेले लाखो रोहिंग्या बांगलादेशात बिना दस्ताऐवज वर्षानुवर्षे राहत आहेत. त्यातलेच हजारो रोजगारासाठी भारतात घुसले आहेत. भारतात गेली अनेक वर्षे वास्तव्यास असणाऱ्या रोहिंग्यांकडे बनावट पॅनकार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र आहेत.

रोहिंग्यांच्या घुसखोरीवर संसदेत अनेकदा चर्चा झाली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हजारो रोहिंग्यांनी देशात बेकायदा घुसखोरी केल्याचे मान्य केले आहे. रोहिंग्यांचे भारतात येणे हे बेकायदेशीर आहेच, पण ते वेगवेगळ्या मार्गाने भारतात आले आहेत. देशात घुसखोर रोहिंग्यांची संख्या नेमकी किती आहे, हे सरकारलाही सांगता येत नाही. कारण त्यांची नोंद नाही. सर्वोच्च न्यायालयात रोहिंग्यांविषयी एक याचिका गेली सात वर्षे प्रलंबित आहे. सन २०१७ मध्ये भाजप नेता व कायदे तज्ज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका केली. भारतात बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी मुस्लीम व रोहिंग्या मुस्लिमांची ओळख पटवून एक वर्षाच्या आत त्यांना त्यांच्या देशात परत पाठवावे, अशी त्यांनी मागणी केली आहे. या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडे त्यांची भूमिका काय आहे, अशी विचारणा केली. अनेक राज्यांनी त्यावर उत्तर दिले नाही. बहुतेकांनी सर्वोच्च न्यायालय जो आदेश देईल, त्याचे आम्ही पालन करू, असे म्हटले आहे.

देशातील रोहिग्यांनी नामवंत वकील प्रशांत भूषण यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयाकडे आम्हाला शरणार्थीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांना त्यांच्या देशात परत पाठवले जात नाही, तोपर्यंत सरकारने त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये (बंदिस्त) ठेवावे, अशी सूचना न्यायालयात करण्यात आली होती.

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी रोहिग्यांना दिल्लीत फ्लॅट देण्याची घोषणा करताच राजकीय वर्तुळात मोठा वादंग निर्माण झाला. पण, केंद्रीय गृह मंत्रालयाने तत्काळ खुलासा केला व असा कोणताही निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट केले. रोहिंग्यांना डिपोर्टेशन सेंटर (निर्वासित छावण्यांमध्ये) ठेवण्यात यावे, अशी एकीकडे चर्चा चालू असताना त्यांना दिल्लीत फ्लॅट राहायला देणे व त्यांना नाष्टा व भोजन देण्याची सरकारने तयारी दर्शवली आहे, असे वृत्त पसरल्यामुळे रोहिग्यांच्या प्रश्नाला विनाकारण फाटे फुटले. बाह्य दिल्लीतील बक्करवाला येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी फ्लॅट्स उभारले आहेत. त्या वसाहतीत रोहिग्यांचे स्थलांतर केले जाईल व तेथे २४ तास सुरक्षा व्यवस्था दिली जाईल, असे ट्वीट केंद्रीय मंत्री पुरी यांनी केल्याने कमालीचा गोंधळ निर्माण झाला. बक्करपुरा येथे अडीचशे फ्लॅट्स आहेत व मदनपुरा येथे एक हजार फ्लॅटस तयार आहेत. ही घरे काय घुसखोरांना द्यायची का, असा वादंग सुरू झाला. या फ्लॅटमध्ये पंखा, तीन वेळचे खाणे, लॅण्डलाइन फोन, टेलिव्हिजन, आदी सुविधा असतील, अशी चर्चा सुरू झाल्याने त्याला राजकीय वळण मिळाले. दिल्लीमध्ये मदनपुरा भागात रोहिंग्यांचा मुक्काम असून तेथे तंबू उभारले आहेत. या तंबूंसाठी दरमहा दिल्ली सरकार सात लाख रुपये भाडे मोजत आहेच. रोहिंग्यांना दिल्लीत घरे देण्यास विश्व हिंदू परिषदेने कठोर शब्दांत विरोध केला आहे.

सन २०१२ नंतर म्यानमारमधील हिंसाचारानंतर भारतात रोहिंग्यांची संख्या वाढली. गृहमंत्रालयाने युनायटेड नेशन्स ह्युमन राइटस कमिशनचा हवाला देऊन भारतात २०२१ पर्यंत १८ हजार रोहिंग्या मुस्लीम होते, अशी माहिती दिली होती. सन २०१७ मध्ये मोदी सरकारने राज्यसभेत माहिती देताना भारतात ४० हजार रोहिंग्या बेकायदा राहात असल्याचे म्हटले होते. दोन वर्षांत रोहिंग्यांची संख्या चौपट वाढली. देशात जम्मू-काश्मीर, हैदराबाद, दिल्ली-एनसीआर, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान व मणिपूरमध्ये रोहिंग्या आहेत. बांगलादेशी व रोहिंग्यांसाठी देशात शरणार्थींसाठी छावण्या नाहीत, हे सरकारने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १० डिसेंबर २०२० रोजी ठामपणे म्हटले होते – भारतात रोहिंग्यांचा कधीही स्वीकार केला जाणार नाही, रोहिंग्या हे शरणार्थी नसून ते घुसखोर आहेत, हीच भारताची भूमिका आहे.