आंगणेवाडीची श्री भराडी देवी

आज ४ फेब्रुवारी आंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रोत्सवानिमित्त…

कोकणी माणूस हा उत्सवप्रेमी असून सर्व सण व उत्सव येथे मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. कोकणी माणूस कुठेही असला तरी शिमगा (होळी), गणपती, दसरा, दिवाळी या उत्सवासाठी तो आपली हजेरी कोकणात आवर्जून लावीत असतो. या सण-उत्सवाप्रमाणे कोकणातील, गावोगावच्या यात्रांनाही तो आपली उपस्थिती लावीत असतो.

कोकणातील मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी आदी यात्राही अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत. मालवण तालुक्यापासून १५ किमीवर मसुरे गाव असून त्यातील आंगणे. आंगणे ग्रामस्थांची एक वाडी आहे. त्या ठिकाणी हे देवीचे स्थान असून ते भरडावर (माळरानावर) असल्यामुळे तसेच देवालयांचे माहेरघर असलेल्या मसुरे गावातील प्रसिद्ध देवालय म्हणजे आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी देवालय. मसुरे-आंगणेवाडीची देवी श्री भराडी देवी ही राज्यभरातच नव्हे, तर देशभरात नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. मसुरे गावची एक वाडी असलेल्या आंगणेवाडीची महती सातासमुद्रापार पोहोचली आहे, ती आई भराडी देवीमुळेच. भक्तांच्या हाकेला ओ देऊन संकटाला धावून जाणारी देवी भराडीने संपूर्ण मसुरे गावच पावन केले आहे.

या देवीबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. भरडावर देवी प्रकटली म्हणून तिला भराडी देवी असे म्हटले जाते. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार श्री देवी तांदळाच्या वड्यातून भरड माळावर प्रकटली असेही सांगितले जाते. ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकटली म्हणूनच आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. भराडी देवीची जत्रा कधी सुरू झाली हे निश्चित सांगता येत नसले तरी साधारणपणे ३०० वर्षांपूर्वी येथे पूजा-अर्चा सुरू असल्याचं सांगितलं जातं. श्रीभराडी देवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी अप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशीर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली आहे. ही देवी स्वयंभू असून भरड भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणून तिला भराडी देवी असे म्हणतात. या देवीच्या उगमाविषयी कथा सांगण्यात येते. याशिवाय देवीच्या नवसाला पावणाऱ्या अनेक चमत्कारांविषयी बोलले जाते. त्यापैकी एक कथा पेशवाईशी जोडली गेली आहे. आंगणेवाडीतील पराक्रमी वीर पुरुष, चिमाजी अप्पांच्या सेवेत होता. अटकेपार झेंडा फडकविण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता, असा इतिहास सांगितला जातो. या स्वराज्य सेवेवर प्रसन्न होऊन कुलस्वामिनी देवी तुळजाभवानी मसुरे गावातील आंगणेवाडी या छोट्याशा भरडावर प्रसन्न झाली. या वीर पुरुषाला दृष्टांत झाला. त्याची दुभती गाय पान्हा सोडत असलेल्या जागी त्याने पाळत ठेवली. तेथे जवळच राईत जाऊन पाषाणावर आपल्या पान्ह्याचा अभिषेक करताना गाय दिसली. या साक्षात्काराने प्रेरित होऊन राई मोकळी केली. गाय ज्या पाषाणावर पान्हा सोडायची, त्या जागी सजीव पाषाण सापडले. त्यानंतर पाषाणाची शुद्धता व प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

या देवीचा महिमा अगाध आहे. दक्षिण कोकणची ‘प्रति भवानी’ असाच भराडी देवीचा महिमा आहे. तिच्या भक्तगणांच्या भक्तीचा मळाच असा रसरशीत, भक्तिभावाने इतका चिंब झालेला आहे की, सारे पाहिले म्हणजे आई भराडी देवी भक्तजणांच्या नवसाला पावणारी, तर आहेच पण दक्षिण कोकणच्या पुण्यभूमीने, कधीकाळी भवानी मातेला साकडं घातलं असेल, नवस बोलला असेल म्हणूनच तुळजापूरची भवानी स्वत्वरूपाने आंगणेवाडीच्या या भरडमाळावर अवतरली असणार, असे वाटल्याशिवाय राहात नाही. भराडी आईचा साजरा होणारा यात्रोत्सव म्हणजे या पुण्यभूमीने बोललेल्या नवसाची फेड असावी, असे वाटू लागते म्हणूनच या भराडी देवीला ‘देवी माझी नवसाची’ असे बोलले जाते.

२५ वर्षांपूर्वीही जत्रा काही हजारांत होत होती. मात्र वर्षागणिक भक्ताच्या संख्येत वाढ होत असून ती सुमारे दहा लाखांपर्यंत पोहोचल्याचे बोलले जाते. आंगणेवाडीत पूर्वी असलेल्या जागेवर जीर्णोद्धार करून या जागी नवीन मंदिर बांधण्यात आलेले आहे. येथे पाषाणमूर्ती असून तिची नियमितपणे पूजाअर्चा केली जाते. दररोज नवस फेडणाऱ्या भाविकांचीही इथे मोठी गर्दी असते.

कोकणातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या वार्षिक जत्रोत्सवात महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांतून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते, मराठी अभिनेते, अभिनेत्री या यात्रोत्सवासाठी आवर्जून हजेरी लावतात. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस, होमगार्डसचे जवान तैनात असतात. राज्यातील मंत्रीमंडळातील मंत्री, विरोधी पक्षाचे नेते, मुंबई महापालिकेतील नेते या उत्सवात दर्शनासाठी हजेरी लावतात. श्रीभराडी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सरबत, आरोग्य तपासणी अशा सुविधा येथील राजकीय पक्ष देत असतात. जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवितात.

या देवीच्या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होणारा यात्रोत्सव होय. हा यात्रोत्सव आई भराडी देवी सांगेल, त्याच दिवशी होतो. विविध देव-देवतांच्या यात्रा-जत्रा महाराष्ट्रात आणि देशात ठिकठिकाणी होतात; परंतु भराडी देवीच्या यात्रेचे वैशिष्ट्य असे की, देवी सांगेल तीच जत्रेची तारीख आणि त्याच तारखेला जत्रोत्सव होतो.
देवदिवाळीच्या दुसऱ्या दिवशी डाळप (डाळ-मांजरी) होते. तिसऱ्या दिवशी प्रमुख आंगणे मानकरी देवळात जमतात.

देवीचा कौल घेऊन शिकारीस जाण्यात येते. ही पारध करण्यासाठी परिसरातील अनेक लोक सहभागी होतात. सात ते आठ जणांचे गट करून रान काढले जाते व डुकराचीच शिकार केली जाते. ही शिकार केल्यानंतर डुक्कर वाजत-गाजत देवळाजवळ आणला जातो. सुवासिनींकडून पारध करणाऱ्यांना ओवाळले जाते व डुकराची पूजा होते. मंदिराच्या उजव्या बाजूस ‘पातोळी’ असून या ठिकाणी डुक्कर कापले जाते व कोष्टी प्रसाद म्हणून दिले जाते. शिकार साधल्याच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा गाव देवळात जमतो. धार्मिकविधी झाल्यानंतर देवीपुढे पंचांग ठेवले जाते व तारीख ठरवून देवीचा कौल मागितला जातो. देवीने कौल देताच जत्रेची तारिख निश्चित होते. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटांत गाड्यांचे बुकिंग केले जाते. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १० लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यंदा ही यात्रा ४ फेब्रुवारीला घेण्याचे निश्चित झालेले आहे. आंगणेवाडीत येणारे हे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येथे येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. याच लाखो भाविकांना भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीय आणि आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असतात. अनेक व्यापारी, व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात.

यात्रोत्सवाच्या दिवशी रात्री देवीला नैवेद्य दाखवला जातो. मौनव्रत स्वीकारून आंगणेवाडीतील घराघरात महिला नैवेद्य शिजवतात. भाजी, भात, वरण, वडे असा नैवेद्य तयार केला जातो आणि एकाच वेळी रांगेने मंदिरात जात दाम्पत्यांकडून तो नैवेद्य दाखविला जातो. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो श्रद्धेने जमलेल्या असंख्य भाविकांना वाटप केला जातो. यात्रोत्सवात पूर्वी एकाच वेळी प्रसाद वाटप करणे शक्य होत नव्हते. यामुळे हा प्रसाद उडवला जात होता. त्यामुळे काहीजणांना तो मिळत नव्हता शिवाय तो पायाखालीही येत होता. त्यामुळे ग्रामस्थ मंडळाने ही पद्धत बदलली आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर घरोघरी भाविकांना प्रसाद वाटपाची सोय केली. येणाऱ्या भाविकाला कोणत्याही घरात जाऊन प्रसाद देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. ५ वर्षांपासून बदललेल्या प्रसाद वाटपाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. अशाच प्रकारे यात्रेची तारीख ठरविण्यापूर्वी केली जाणारी शिकारीची प्रथा बंद व्हावी, अशी अपेक्षाही भाविकांमधून व्यक्त केली जात आहे.

मालवणमधील भराडीदेवी ही अनेकांची कुलदैवत आहे. दरवर्षी भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी सुमारे दहा लाख भाविक येत असतात. कोरोना संकटामुळे सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे मंदिरे बंद असल्याने गेली दोन वर्षे यात्रा बंद ठेवण्यात आली होती. राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारने सर्व सणांवरील निर्बंध उठविल्यामुळे यंदाच्या या भराडीदेवीच्या यात्रेला भाविकांचा उत्साह प्रचंड द्विगुणित झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून यावेळी सुमारे २५ लाख भाविक भराडीदेवीच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एसटी प्रशासनाने सज्जता ठेवली आहे. जिल्ह्यातील विविध आगरांमधून तसेच प्रमुख रेल्वे स्थानकामधूनही आंगणेवाडीला एसटी बसेस सोडल्या आहेत. १४५ बसेसची व्यवस्था ठेवली असल्याची माहिती एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी पी. एस. देशमुख यांनी दिली आहे. देशमुख म्हणाले, ४ फेब्रुवारीच्या आंगणेवडीची जत्रेसाठी ५ फेब्रुवारीपर्यंत एसटी बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने शुक्रवारपासूनच बससेवा सुरू होत असून कणकवली आणि कुडाळ रेल्वे स्थानकातूनही प्रवासी उपलब्धतेप्रमाणे थेट आंगणेवाडीसाठी एसटी बसेस सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

-राजेंद्र साळसकर
[email protected]

अर्थसंकल्पावर चर्चा व्हायला हवी

देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका वर्षाचा कालखंड असला तरी एकूण जमा झालेल्या महसुलाचा विचार प्राधान्य क्रमाने करून विकासाला चालना दिली, तर देशाचा उत्तम प्रकारे विकास होऊ शकतो. त्यासाठी आर्थिक वर्षामध्ये ज्या योजना ठरविल्या असतील त्याचप्रमाणे ज्या तरतुदी केलेल्या आहेत, त्याचा योग्य प्रकारे विनियोग झाला पाहिजे. तेव्हा भारताचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी, २०२३ रोजी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा नूतन संसद भवनामध्ये अर्थसंकल्प सादर केला. आता त्यावरती प्रत्येक विभागात सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे.

दोन दशकांपूर्वीचा विचार करता एकदा का देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी संसदेत सादर केल्यानंतर जवळ जवळ एक ते दीड महिने अर्थसंकल्पावर चर्चा होत असायच्या. त्यामुळे अर्थसंकल्प म्हणजे काय? त्यातून देशातील सर्वसाधारण लोकांना काय मिळणार आहे, याची जोरदार चर्चा होत. त्यासाठी अर्थशास्त्रातील अभ्यासक मंडळींना निमंत्रित करून अर्थसंकल्प समजून घेतला जात असे. अलीकडच्या काळात फारशी अर्थसंकल्पावर चर्चा केली जात नाही. याहीपेक्षा अर्थसंकल्प तयार होण्यापूर्वी देशातील अर्थतज्ज्ञ आहेत, त्यांची स्वतंत्र बैठक आयोजित करून देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. असे जर करण्यात आले, तर विकासाला अधिक गती मिळेल. त्याचप्रमाणे महसुलामध्येसुद्धा कशाप्रकारे वाढ होऊ शकते, या विषयीसुद्धा सरकारला सूचना करू शकतात. कारण नवीन योजना किंवा तरतुदी या महसुलावर चालत असतात. जर महसुलच वाढला नाही, तर नव्या योजना राबविणार अशा? केवळ १०० टक्के दिलेला निधी खर्च केला म्हणजे विकास झाला, असे म्हणतात येणार नाही, तर त्याचा विनियोग असा करावा, हे अर्थतज्ज्ञ सांगू शकतात. तेव्हा देशाच्या विकासासाठी व अर्थसंकल्पापूर्वी देशातील अर्थतज्ज्ञांची परिषद घेऊन त्यांच्या विद्वत्तेमुळे अधिक देशाच्या विकासाचा संकल्प कसा करता येईल, त्यातून देशातील रिकाम्या हाताना काम देऊन गरिबी कशी कमी करता येईल त्या दृष्टिकोनातून पावले उचलणे आवश्यक आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर, आता बघा ना, सत्ताधारी व विरोधक यांच्यातील काही जन एका शब्दात, तर काहींच्या सात-आठ वाक्यांमध्ये प्रतिक्रिया फोटोसहीत वाचनात आल्या. त्यासाठी देशातील सर्वसाधारण लोकांच्याही प्रतिक्रिया वाचायला मिळायल्या हव्यात. असे असले तरी खऱ्या अर्थाने अर्थसंकल्प समजण्यासाठी प्रत्येक विभागात तसेच शाळा व महाविद्यालयात विशेष चर्चा होणे आवश्यक आहे. अर्थसंकल्पावर विस्तृत चर्चा केल्याने अर्थसंकल्पामुळे देशाची अर्थव्यवस्था भरीव होण्यासाठी कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, याची माहिती होते.
अर्थसंकल्पात कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत, याची माहिती मिळाल्याने मध्यमवर्गाला त्याचा अंदाज येतो. त्याप्रमाणे ते वस्तू खरेदी करू शकतात तसेच पर्यटन, महिलांचे सबलीकरण आणि शिक्षण कशा प्रकारे विकासाच्या दिशेने चालले आहे, हे कळणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपला देश हा शेतीप्रधान आहे. तेव्हा शेतकरी राज्याला नैसर्गिक शेतीसाठी कशा प्रकारे प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा कशा मिळणार याची माहिती होते. त्यामुळे उद्या सुविधा मिळाल्या नाहीत, तर शासन दरबारी आपल्या हक्कांसाठी शासनाला जागे करू शकतात. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे अनुदान कागदोपत्री लाटले जाते त्याला आळा बसेल.
महत्त्वाची बाब म्हणजे, ‘करप्रणाली’ होय. बऱ्याच वेळा करप्रणालीचे आपल्याला देणेघेणे नाही, असे वाटत असले तरी करदात्यांना त्याची जास्त उत्सुकता असते. यात सरकारी बाबू जास्त दास्तीत असतात. या वेळच्या अर्थसंकल्पात मागील आठ वर्षानंतर कररचनेत बदल केलेला आहे. यात तीन लाखांपर्यंत प्राप्तिकर घेण्यात येणार नाही. असे असले तरी करप्रणाली समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

दर वर्षी देशातील संरक्षण क्षेत्राला अधिक बळकटी दिली जाते. त्यानंतर रेल्वेची सेवा अधिक गतीने होण्यासाठी कोटीची तरतूद केली जाते. तसेच या वर्षी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी घसघशीत तरतूद करण्यात आली आहे. याचे तज्ज्ञ व्यक्तीने मार्गदर्शन केल्याने आपण जागृत होऊ शकतो. आपल्याला जरी निवाऱ्याच्या सोयीची गरज नसली तरी इतरांना त्याचा लाभ मिळवून देऊ शकतो. तेव्हा एकंदरीत देशाच्या अर्थसंकल्पाचा विचार करता देशातील शेतकरी, उद्योजक, बेरोजगारी, मागास समाज, शिक्षण, मत्स्य व्यवसाय, मध्यम वर्ग, पायाभूत सुविधा, महामार्ग, विमानसेवा, संरक्षण, रेल्वे, महिला वर्ग आणि समाजातील सर्व वर्गाच्या विकासाला कशी गती देण्यात येते. त्यासाठी दर वर्षी देशाचा अर्थसंकल्प संसदेत अर्थमंत्र्यांनी सादर केल्यानंतर किमान एक महिना तरी देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर विविध ठिकाणी विस्तृत चर्चा व्हायला हवी. हीच खरी देशाच्या विकासाची नांदी आहे.

-रवींद्र तांबे

अर्थसंकल्पाची करप्रणाली

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प होता, त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा होत्या; परंतु त्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही ते येणारा काळ ठरवेल. या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, “हा अर्थसंकल्प मागील अर्थसंकल्पात रचलेल्या पायावर आणि भारतासाठी काढलेल्या ब्ल्यू प्रिंटवर उभारण्याची आशा करतो. आम्ही एका समृद्ध आणि सर्वसमावेशक भारताची कल्पना करतो, ज्यामध्ये विकासाची फळे सर्व प्रदेश आणि नागरिकांपर्यंत पोहोचतात, विशेषत: आमचे तरुण, महिला, शेतकरी, ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, हा अर्थसंकल्प सात प्राधान्यक्रम ठरवले आहे.”

अर्थमंत्री यांनी प्रत्यक्ष करा, संदर्भातील तरतुदी जाहीर करताना सांगितले की, या प्रस्तावांचे उद्दिष्ट करप्रणालीची सातत्य आणि स्थिरता राखणे, अनुपालन ओझे कमी करण्यासाठी विविध तरतुदी अधिक सुलभ आणि तर्कसंगत करणे, उद्योजकतेच्या भावनेला चालना देणे आणि नागरिकांना कर सवलत देणे हे आहे. असे असले तरी या वर्षीच्या अर्थसंकल्पात जुन्या कर प्रणालीत विशेष असे काही बदल केले नसले तरी नवीन करप्रणालीत खालील बदल करण्यात आले आहेत. त्या तरतुदी खालीलप्रमाणे.

काही पात्रतेच्या बाबतीत गृहीत धरून कर आकाराला जातो, त्यानुसार व्यावसायिकांसाठी मर्यादा ५० लाखांवरून ७५ लाख आणि इतरांसाठी २ कोटींवरून ३ कोटी करण्यात आली आहे. एमएसएमईला वेळेवर पेमेंट मिळण्यास मदत करण्यासाठी, त्यांना प्रत्यक्षात केल्या गेलेल्या पेमेंटवर झालेल्या खर्चात कपात करण्याची परवानगी देण्याचा प्रस्तावही देण्यात आला.
सहकारी संस्थांना कर सवलत देताना पुढील तरतुदी करण्यात आल्या, त्यानुसार ३१ एप्रिलपर्यंत उत्पादन सुरू करणाऱ्या नवीन सहकारी संस्थांना १५ टक्के कमी कर दराचा लाभ मिळेल, जो सध्या नवीन उत्पादक कंपन्यांना उपलब्ध आहे. तसेच साखर सहकारी संस्थांना २०१६-१७ च्या मूल्यांकन वर्षाच्या अगोदरच्या कालावधीसाठी ऊस उत्पादकांना केलेल्या पेमेंटचा खर्च म्हणून दावा करण्याची संधी देण्याचा प्रस्तावही या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. यामुळे त्यांना रुपये १०,००० कोटींचा दिलासा मिळण्याची अपेक्षा अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली. पुढे सहकार क्षेत्रासाठी, प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि प्राथमिक सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकाद्वारे रोख ठेवींसाठी व कर्जासाठी प्रति सदस्य २ लाखांची उच्च मर्यादा प्रदान करण्यात येण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याचप्रमाणे, रोख पैसे काढण्यावर टीडीएससाठी ३ कोटींची उच्च मर्यादा सहकारी संस्थांना प्रदान करण्याचा प्रस्थाव मांडण्यात आला आहे. स्टार्ट-अप्सना प्राप्तिकर लाभांसाठी समावेश करण्याची तारीख ३१ मार्च २०२३ ची ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव या वर्षीच्या अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे. स्टार्ट-अप्सच्या तोट्याला कॅरी-फॉरवर्ड लाभ देण्याचा कालावधी स्थापनेपासून ७ वर्षांवरून १० वर्षे करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे.

कर सवलती आणि सूट यांच्या चांगल्या लक्ष्यासाठी, कलम ५४ आणि ५४ एफ अंतर्गत निवासी घरातील गुंतवणुकीवरील भांडवली नफ्यातून वजावट १० कोटींपर्यंत मर्यादित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अत्यंत उच्च मूल्याच्या विमा पॉलिसींमधून मिळणाऱ्या आयकर सवलत मर्यादित करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. सोन्याचे इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावतीत रूपांतर करणे याला भांडवली नफा म्हणून न घेणे, पॅन नसलेल्या प्रकरणांमध्ये ईपीएफ काढण्याच्या करपात्र भागावरील टीडीएस दर ३० टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत कमी करणे आणि मार्केट लिंक्ड डिबेंचर्सच्या उत्पन्नावर कर आकारणी, IFSC, GIFT सिटीमध्ये स्थलांतरित होणाऱ्या निधीसाठी कर लाभांचा कालावधी ३१.०३.२०२५ पर्यंत वाढवणे; आयकर कायद्याच्या कलम २७६ ए अंतर्गत गुन्हेगारीकरण; आयडीबीआय बँकेसह, इतर धोरणात्मक निर्गुंतवणुकीतील तोटा पुढे नेण्याची परवानगी देणे आणि अग्निवीर निधीला इ. इ. इ दर्जा प्रदान करणे, अशा तरतुदीही करण्यात आल्या आहेत.

२०२०च्या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली अस्तित्वात आली त्यानुसार ज्याचे उत्पन्न २.५ लाख आहे त्यांना कोणताही कर भरावा लागत नव्हता त्याची मर्यादा आता ३ लाख एवढी करण्यात आली असून, स्लॅब दारात बदल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, त्यानुसार पुढीलप्रमाणे बदल होणार आहेत. ३ लाख ते ६ लाख ५ टक्के कर, ६ लाख ते ९ लाख १० टक्के कर, ९ लाख ते १२ लाख १५ टक्के कर, १२ लाख ते १५ लाख २० टक्के कर आणि १५ लाखांहून अधिक उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्यात येणार आहे. पगारदार वर्ग आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांसह पेन्शनधारकांसाठी, ज्यांचे उत्पन्न १५.५ लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या पगारदार व्यक्तीला ५२,५०० चा फायदा होईल अशी तरतूद करण्यात आली आहे. सदरचा फायदा हा नव्या कर प्रणालीमध्येच उपलब्ध होणार आहे.

– महेश मलुष्टे

दिनेश कार्तिक आता नव्या भूमिकेत

मुंबई (वृत्तसंस्था) : फिनिशर खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा दिनेश कार्तिक आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत नव्या भूमिकेत दिसणार आहे. भारताचा हा यष्टीरक्षक फिनिशर मैदानावर नव्हे, तर तो कॉमेंट्री बॉक्समध्ये भारताची जबाबदारी सांभाळणार आहे. त्याने स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे आणि यासाठी तो स्वतः उत्सुक असल्याचे त्याने म्हटले आहे.

दिनेश कार्तिकने याआधी वनडे, कसोटी आणि टी-२० मध्ये कॉमेंट्री केली आहे, मात्र तो पहिल्यांदाच भारतात होणाऱ्या कसोटी सामन्याची कॉमेंट्री करणार आहे. त्याने ट्विट करून आपला उत्साह व्यक्त केला आहे. दिनेश कार्तिकच्या या ट्विटवर अनेक दिगज्जांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर चाहत्यांनी ही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

रस्ता गेला चोरीला, सरपंच बसणार उपोषणाला

इगतपुरी (प्रतिनिधी ): इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील रस्ता चोरी झाला असल्याची तक्रार सरपंच संगीता भाऊसाहेब धोंगडे यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबत तक्रारीची प्रत ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, वाडीवऱ्हे पोलीस ठाणे यांना पाठवण्यात आलेली आहे.

हा चोरी झालेला रस्ता शोधून न दिल्यास उपोषण करणार असल्याचे सरपंच सौ. संगीता धोंगडे यांनी सांगितले. शासकीय निधीतून होणारा खर्च जनतेसाठी खर्च व्हावा, कोणाच्याही खिशात हा निधी जाऊ देणार नाही. ह्या प्रकरणी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, संबंधित व्यक्तींकडून वसुली व्हावी, रस्ता शोधून द्यावा अशी मागणी भाऊसाहेब धोंगडे यांनी केली आहे.

दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे की कुऱ्हेगाव येथे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी गावकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन काशाबाई मंदिर ते हनुमान मंदिर हा १० लाखाचा रस्ता कॉंक्रिटीकरण काम मंजूर केले. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, कार्यारंभ आदेश सुद्धा देण्यात आला. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ह्या कामाची गावकऱ्यांनी जवळजवळ सहा महिने वाट पाहिली. त्यानंतर संबंधित विभागाकडे चौकशी केली असता रस्ता गावातून गायब झाला असे निदर्शनास आले. त्यामुळे सरपंच संगीता भाऊसाहेब धोंगडे यांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे. म्हणून कुऱ्हेगाव येथे खमंग चर्चा रंगली असून हा रस्ता नेमका गेला कुठे याची चर्चा आहे. हा रस्ता शोधून द्यावा अशी मागणी सरपंच धोंगडे यांनी केली आहे.

अनू मलिक आणि राजपाल यादव यांचा गौरव

मुंबई (वार्ताहर) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्योग, व्यवसाय, कला व समाजकार्य या विषयांमध्ये कार्य करणाऱ्या ४० गुणवंत व्यक्तींना राजभवन येथे ‘गौरव श्री सन्मान २०२३’ प्रदान करण्यात आले. मैत्री पीस फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्याला फाउंडेशनचे अध्यक्ष बौद्ध भिक्खू सुरजित बरुआ, संगीतकार अनू मलिक व बुद्धांजली आयुर्वेदचे कैलाश मासूम प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी संगीतकार अनू मलिक, अभिनेते राजपाल यादव, उद्योजक अजय हरिनाथ सिंह, डॉ. प्रसन्न पाटणकर, सम्बुद्ध धर, सचिन साळुंके, दीपक बरगे, सुनील निखार, परवेझ लकडावाला आदींना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी पालकमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मालेगाव (प्रतिनिधी ): गिरणा बचाव समितीच्या नावाखाली विद्यमान पालकमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक केली असून गिरणा मोसम शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. कंपनी स्थापन करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आाला आहे. याप्रकरणी पालकमंत्री दादा भुसे यांची चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

दाभाडी येथील अवसायनात आलेला गिरणा साखर कारखाना वाचवण्याचे नावाखाली गिरणा बचाव समितीच्या माध्यमातून विद्यमान पालकमंत्री भुसे यांनी गिरणा शुगर ॲग्रो ॲण्ड अलाइड इंडस्ट्रीज लि.हि कंपनी स्थापन केली. नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकरी बांधवांकडून प्रत्येकी हजार-हजार याप्रमाणे कोट्यावधी रुपये जमा केले. आणि फक्त कंपनीचे ४७ मुख्य भागधारक दाखवुन त्यांचेकडून १६ कोटी २१ लाख ८ हजार ८०० रुपयांचे भागभांडवल गोळा केल्याचे दर्शविले. मात्र पालकमंत्र्यांनी गिरणा सहकारी साखर कारखाना तर वाचवलाच नाही, उलट शेतकरी बांधवांची व मुख्य भागधारकांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणुक केली. म्हणून त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

येत्या १० दिवसात या प्रकरणाची चौकशी करून पालकमंत्र्यांवर गुन्हा दाखल करावा, फसवणूक झालेल्या शेतकरी बांधवांना आणि कपंनीच्या भागधारकांना त्यांचे पैसे व्याजासकट परत मिळवून द्यावेत. अन्यथा पालकमंत्री भुसे यांच्या निवासस्थानी फसगत झालेल्या शेतकरी बांधवांसह जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत धीरज लिंगाडे विजयी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): राज्य विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघात ३० तासांच्या प्रदीर्घ मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला.

दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत लिंगाडे यांना आघाडी मिळाली. त्यांनी निवडून येण्यासाठी आवश्यक कोटा पूर्ण केला नाही. पण मते अधिक असल्याने लिंगाडे विजयी झाले. निवडणूकअधिकाऱ्यांनी लिंगाडे यांच्या विजयाची घोषणा केली. धीरज लिंगाडे पाटील यांना ४६ हजार ३४४ मते मिळाली. तर रणजित पाटील यांना ४२ हजार ९६२ मते मिळाली. अत्यंत चुरशीच्या या लढतीत लिंगाडे यांनी अखेर बाजी मारली.

त्याआधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीतील चार जागांचे निकाल काल रात्री उशिरापर्यंत जाहीर झाले. कोकण शिक्षक मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने बाजी मारली. भाजपाचे ज्ञानेश्वर म्हात्रे येथून विजयी झाले. त्यांना वीस हजार ७४८ मते मिळाली. त्यांच्याविरुद्ध उभे असलेले महाविकास आघाडीकडून शेकापचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांना ९ हजार ३८ मते मिळाली.
नागपूर शिक्षक मतदारसंघात भाजपाने थेट उमेदवार न उतरवता महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे विद्यमान आमदार नागो गाणार यांना पाठिंबा जाहीर केला होता. याठिकाणी महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले विजयी झाले. त्यांना १४०६९ मते मिळाली. गाणार यांना ६३६६ मते मिळाली. येथील ९० टक्के मते जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावर अडबाले यांच्याकडे गेली. याच मुद्द्यावर अनेक शिक्षक संघटनांनी त्यांना सक्रिय पाठिंबा दिला होता. मराठवाडा शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम काळे पुन्हा एकदा निवडून आले. त्यांनी भाजपाचे किरण पाटील यांचा पराभव केला. त्यांना वीस हजार ९१ मते मिळाली तर किरण पाटील यांच्याकडे १३४९७ मते होती. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी बाजी मारली.

हॉस्पिटलमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे नागरिकांची पळापळ

कल्याण : कल्याण पूर्वेतील एका खाजगी रुग्णालयामध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची व हॉस्पिटलच्या स्टाफची पळापळ झाली.

कल्याण पूर्व चक्की नाका परिसरामध्ये जनकल्याण हॉस्पिटल मध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये धूरच धूर पसरला. शॉर्टसर्किटमुळे हॉस्पिटलला आग लागली म्हणून रुग्णांच्या नातेवाईक व हॉस्पिटलचा स्टाफची धावपळ सुरू झाली. परिसरातील नागरिक देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा झाले. रुग्णालयामध्ये २० ते २५ रुग्ण उपचार घेत आहेत परंतु या शॉर्टसर्किटमुळे हॉस्पिटल मधील रुग्णांना कोणतीही दुखापत झाली नाही. हॉस्पिटलच्या स्टाफने अग्निशामक दलाला कळवताच अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन परिस्थिती आटोक्यात आणली.

पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलींचं भयानक वास्तव समोर

मुंबई: सायंकाळ ७.३० ते ८ ची वेळ, स्थळ दादर स्टेशन. तिकिट काऊंटरच्या समोरील जागेवर सहा मुली जमिनीवर अंथरलेल्या एका बॅनरवर बसलेल्या. त्रस्त, चिंतीत आणि भयभीत! या मुली स्टेशनबाहेर तिकिट घरासमोर अशा जमिनीवर का बसल्या आहेत? असा प्रश्न तेथील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पडला होता. कुणीतरी तो प्रश्न त्यांना विचारलाच अन् समोर आलं भयानक वास्तव.

नाशिक जिल्ह्यातून मुंबईला पोलीस भरतीच्या परिक्षेसाठी आलेल्या या सामान्य शेतकऱ्यांच्या मुली. नायगांव येथेच ही पोलिस भरती प्रक्रिया सुरू होती. तेथेच त्यांची राहण्याची व्यवस्थाही होती पण ही जागा ऐनवेळी नाकारण्यात आली. जागा भरलेली असल्याने तेथून त्यांना परत जाण्यास सांगितले पण कुठे राहायचे याचा काही पत्ता दिला नाही. या बिचाऱ्या सहा मुली तेथे बराच वेळ वाट बघत तशाच बसलेल्या. त्यांच्यासमोर एकच प्रश्न होता आता रात्र काढायची कुठे?
सायंकाळच्या वेळेस नायगांव पोलिस भरती ग्राउंड वर राहण्याची सोय नाकारण्यात येते. गेस्ट रुममध्ये गेल्यानंतर ५ हजार रुपये भाडं या मुली कुठुन देणार? मग या मुली परत आल्या आणि पुन्हा दादर स्थानकातील तिकिटगृहाच्या बाहेर बसल्या. याबाबच एका पोलिस कॉन्स्टेबलकडे या मुलींच्या राहण्याची सोय होऊ शकते का अशी विचारणा केली. त्याने प्लॅटफॉर्मवर असलेल्या विश्रामगृहाचा रस्ताही दाखवला पण येथे २ तासांच्या वर राहता येणार नाही, असे तो म्हणाला.
रात्रीची मुंबई म्हणजे गर्दुल्ले, पाकीटमार यांची. या स्थानकाबाहेर तर या गर्दुल्ल्यांचा राबता असतो. तो पोलीस कॉनस्टेबल म्हणाला, मी आहे तोवर येथे बसा पण रात्रीचे इन्चार्ज आले तर ते तुम्हाला बसू देणार नाहीत. फक्त सामानाची काळजी तेवढी घ्या.

गावातील कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं आणि मुली पोलिस भरतीसाठी प्रचंड मेहनत घेऊन मुंबईत येतात. मुलांप्रमाणेच या मुलीही त्यांच्या कुटुंबीयांचा आधार असतात. पोलिस सेवेत भरती होऊन इतरांना सुरक्षा देण्यासाठी आलेल्या या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? पोलीस भरतीसाठी आदल्या दिवशी जागरण करुन दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता ग्राऊंडवर धावायचं. शारीरीक क्षमतेची चाचणी द्यायची. हे सर्व शक्य नेमकं करायचं तरी कसं? हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आज या सहा मुलींचा प्रश्न समोर आला आहे. आणखी कित्येक जणींना या प्रकाराला सामोरे जावे लागले असेल याची गणती नाही.