पत्नीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १० लाख उकळले

पुणे: जबरदस्तीने विवाह केल्यानंतर पत्नीसोबतच्याच शरीरसंबंधाचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पतीने तब्बल १० लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पीडीत २२ वर्षीय तरुणी अन् आरोपी एकमेकांना ओळखत होते. सौरभने तरुणीला वेळोवेळी लग्न करण्याचा आग्रह केला. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. तिच्याशी ऑक्टोबर २०२१ मध्ये जबरदस्तीने रजिस्टर विवाहही केला.

विवाहानंतर तो त्यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. त्यासाठी त्याने तब्बल १० लाख रुपये देखील तरुणीकडून उकळले. हा प्रकार झाल्यानंतरही तिला आपल्या घरी राहण्यासाठी जबरदस्ती केली. यावर तिने नकार दिल्यानंतर तिच्या कुटंबियांना शिवीगाळ करुन तो वेळोवेळी पाठलाग करत होता. याप्रकरणी पुण्याच्या भवानी पेठ परिसरात राहणाऱ्या सौरभ सुपेकर याच्याविरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुक्तांनी ‘यासाठी’ मानले ठाणेकरांचे आभार!

ठाणे : ठाणे महानगरपालिकेकडे मागील वर्षीच्या तुलनेमध्ये ११० कोटींनी अधिकचा मालमत्ता कर वसुल झालेला आहे. आयुक्त अभिजीत बांगर यांनी ठाणेकरांना मालमत्ता कर भरण्याबाबत केलेल्या आवाहनाला ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने आयुक्तांनी करदात्यांचे आभार व्यक्त केले आहेत. अजूनही दोन महिने बाकी असून ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापर्यत मालमत्ता कर भरलेला नाही त्यांनी तो त्वरीत भरुन करुन महापालिकेस सहकार्य करावे असेही त्यांनी नमूद केले आहे.

मालमत्ता कराचा भरणा वेळेवर व्हावा यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी वेळोवेळी बैठका घेवून संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते व त्यानुसार योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. नागरिकांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी महापालिकेची सर्व प्रभाग कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. तसेच ऑनलाईन प्रणाली सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली होती. आयुक्त बांगर यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ठाणेकरांनी मालमत्ता कर भरल्याने मागील वर्षीच्या तुलनेत जानेवारी २०२३ अखेरीस महापालिकेने ११० कोटीचा अधिकचा मालमत्ता कर वसुल केल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
९० टक्के करवसुली धनादेश, डी.डी आणि ऑनलाईनपद्धतीने

नागरिकांना सुलभरित्या कर भरता यावा ठाणे महानगरपालिकेच्या https://propertytax.thanecity.gov.in/ या लिंकद्वारे तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम, आणि भीम अॅपद्वारे ऑनलाईन पध्दतीने करता येऊ शकते. या सुविधेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद दिला असून घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने तसेच धनादेश, डी.डी.च्या माध्यमातून ९० टक्के कर भरणा केला आहे. तर १० टक्के कर भरणा महापालिकेच्या प्रभागस्तरावरील संकलन केंद्राच्या माध्यमातून जमा झाला असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. याशिवाय पाणीटंचाई निर्माण झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी ७ कोटी ६१ लाख ५८ हजार रुपयांचा पाणीटंचाई आराखडा तयार करुन तो मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठवला आहे. या आराखड्यात १ हजार ३२८ गावे व वाड्यांचा समावेश आहे. येथील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

रायगड जिल्ह्यातील काही गावांना एप्रिल, मे महिन्यात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आतापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्याचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात विहिरी खोल करणे, त्यामधील गाळ काढणे, टंचाईग्रस्त गावांना टँकर, बैलगाडीच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणे, नवीन विंधन विहीर खोदणे, विंधन विहीरीची दुरुस्ती, नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करणे या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार १ हजार ३२८ गावे वाड्यांवर संभाव्य पाणीटंचाईच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.

रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी याबाबत अधिक माहिती देताना म्हटले, संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाण्याचा वापर जपून करावा, अपव्यय करू नये, पिण्याच्या पाण्याच्या मुख्य स्त्रोतांव्यतिरिक्त परिसरातील इतर उपलब्ध स्त्रोतांमधील पाण्याचा दैनंदिन वापरासाठी वापर करावा, पाणी स्त्रोत दूषित होणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी, कुठे पाणीपुरवठा पाईपलाइन फुटली असल्यास निदर्शनास आणून द्यावी.

शौचालयांसाठीचा निधी गैरमार्गाने लाटणाऱ्या लाभार्थींचा पर्दाफाश

पालघर: शौचालय उभारण्यासाठी शासनाकडून १२ हजार रुपये देण्यात येतात, परंतु या योजनेचा लाभ काही सधन व अपात्र कुटुंबेदेखील घेत असल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने गेल्या दोन वर्षांतील कार्यकाळात मंजूर झालेल्या अनुदानित शौचालयांची उभारणी, तसेच वापराची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे शासकीय निधी गैरमार्गाने लाटणाऱ्या लाभार्थींचा पर्दाफाश होणार आहे.

वाणगाव येथील ७८ लाभार्थींना शौचालय उभारणी केल्याबद्दल अनुदान देण्यात आले होते. मात्र, त्यामध्ये काही सधन, तर काही बंगल्यात व इमारतीत राहणाऱ्या नागरिकांचा समावेश होता. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी पाणी व स्वच्छता विभागाला दिले आहेत. कोरोनाकाळात अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यावेळी पंचायत समिती स्तरावरील काही अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक अथवा कर्मचाऱ्यांना हाताशी धरून काही प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे दिसून आले आहे. वितरणापूर्वी सर्व संबंधित ग्रामपंचायत ग्रामसेवकांना लाभार्थीच्या शौचालयाची खातरजमा करण्याचे व त्यानंतर संमतीपत्र देण्याचे बंधनकारक होते. मात्र, त्याचे गांभीर्य न घेता संमती दिल्याने लाभ घेण्यास पात्र नसणाऱ्या नागरिकांनाही अनुदानाचे वितरण झाले आहे.

गेल्या दोन वर्षांत सुमारे तीन हजार लाभार्थींना शौचालय अनुदान देण्यात आले आहे. या लाभार्थींच्या शौचालय उभारणी व वापरासंदर्भात ग्रामपंचायतीकडून पुन्हा तपासणी करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारस्कर यांनी सांगितले. लाभार्थी संशयास्पद आढळल्यास त्याची प्रत्यक्षात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

सूर्या पुन्हा तळपला, ठरला नंबर वन फलंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. मात्र त्याच्या रेटिंगमध्ये काहीशी घसरण झाली आहे.

बुधवारी आयसीसीने टी-२० फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली. त्यानुसार सूर्यकुमार यादवने आपले अव्वल स्थान टिकवले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात, सूर्यकुमार यादवने ४७ धावांची खेळी खेळून आपल्या क्रमवारीत ९१० रेटिंग गुण मिळवले होते, हे रॅकिंग सूर्याच्या आतापर्यंतच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम रॅकिंग आहे. लखनऊमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यानंतर सूर्याच्या रेटिंगमध्ये काहीशी घसरण झाली. दुसऱ्या सामन्यात त्याने २६ धावांची नाबाद खेळी खेळली. त्यानंतर रँकिंगमध्ये तो पहिल्या क्रमांकावर राहिला खरा, परंतु त्याचे रेटिंग ९१० वरून ९०८ पर्यंत घसरले. टी-२० आंतरराष्ट्रीय, इंग्लिश क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत डेव्हिड मलानने आयसीसी क्रमवारीत सर्वाधिक ९१५ रेटिंग मिळवले आहे. मलानने २०२०मध्ये हे रेटिंग मिळवले होते. तेव्हापासून आतापर्यंत मलानच्या रेटिंगची बरोबरी कोणी करू शकलेले नाही.

ठाण्यात ४ फेब्रुवारीपासून ‘मुख्यमंत्री चषक’ कबड्डी स्पर्धा

ठाणे (वार्ताहर) : ठाणे जिल्हा कबड्डी असोशिएसनच्या मान्यतेने जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेना ठाणे यांच्या वतीने ४ ते ९ फेब्रुवारी या कालावधीत ‘मुख्यमंत्री चषक’ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष प्रथम व द्वितीय श्रेणी, महिला, कुमार- कुमारी अशा ५ विविध गटात तसेच १४ वर्षांखालील व १७ वर्षांखालील मुले व मुली असे एकूण ९ विविध गटात स्पर्धा घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान, ठाणे (पश्चिम) येथे होणाऱ्या या स्पर्धेत २३००पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. प्रथम व द्वितीय श्रेणी या दोन्ही गटात प्रत्येकी ३२ संघांनी सहभाग नोंदविला आहे. महिला गटात १९, कुमार गटात २१, तर कुमारी गटात १४ संघांचा सहभाग आहे. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात १६, तर मुलींच्या गटात १३ संघांना सहभाग देण्यात आला आहे. १७ वर्षांखालील मुलांच्या २१, तर मुलींच्या १० संघांनी भाग घेतला आहे. स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघांना सात लाख रुपयांच्या पारितोषिकासह आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे

स्पर्धेचे उद्घाटन शनिवार ४ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे. आंतर शालेय स्पर्धा ४ व ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत खेळविण्यात येईल. उपांत्य व अंतिम फेरीचे सामने ९ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वाजता खेळविण्यात येतील. सर्व जिल्हास्तरीय गटाचे सामने दि. ४ फेब्रुवारी पासून सायं. ६ ते रात्री १० या वेळेत खेळविण्यात येतील.

बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राला दोन पदके

भोपाळ (वृत्तसंस्था) : खेलो इंडिया युथ गेम्स २०२३मध्ये महाराष्ट्राच्या अन्वर शेख व उस्मान अन्सारी यांनी उपांत्य फेरीत धडक मारत मुष्टीयुद्ध स्पर्धेत दोन पदके निश्चित केली.

तात्या टोपे क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या ४८ किलो गटात अन्वर याने मध्य प्रदेशच्या लोकेश पाल याचा ५-० असा पराभव केला. सुरुवातीपासूनच त्याने आक्रमक ठोसे व उत्कृष्ट बचाव अशा दोन्ही तंत्रांचा कल्पकतेने उपयोग केला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला फारशी संधी दिली नाही. अठरा वर्षांचा हा खेळाडू अर्जुन पुरस्कार विजेते व माजी ऑलिंपिकपटू मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. खेलो इंडिया स्पर्धेत तो प्रथम सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे त्याची सिदरा व साद ही भावंडे देखील मुष्टियुद्ध खेळातच करिअर करीत आहेत. या भावंडांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली आहेत.

उस्मान याने ५१ किलो गटात हरियाणाच्या गंगा कुमार याचा चुरशीच्या लढतीनंतर ४-१ असा पराभव केला. ही लढत शेवटपर्यंत रंगतदार झाली मात्र उस्मान याने अतिशय शांत चित्ताने आपल्या प्रतिस्पर्ध्यास चांगला प्रतिकार करीत विजयश्री खेचून आणली. तो बारावी येथे शिकत असून सध्या औरंगाबाद येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अकादमीत सनी गहलावत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

ठाणे: अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी २० फेब्रुवारीपासून बेमुदत संप आहे. राज्यामध्ये २२ लाख अंगणवाडी कर्मचारी आहेत. या अंगणवाडी सेविकांना ५ हजार रुपये तसेच मदतनीसांना ३ हजार तीनशे रुपये अनुदान दिलं जातं.

अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना शासन कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदही कायदेशीरित्या निर्माण केलेली पद आहेत. म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय वेतनश्रेणीप्रमाणे भत्ते लागू करावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये समाधानकारक वाढ करण्याचं आश्वासनही दिलं होतं पण अद्याप त्याबाबत निर्णय न झाल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

अंगणवाडीतील मुलांना आठ रुपये प्रतिदिन आहारासाठी देण्यात येतात. आता गेल्या पाच वर्षात महागाई दुप्पट झाली आहे म्हणून आहाराचा दर दुप्पट करावा अशी अंगणवाडी सेविकांची मागणी आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देणे, रिक्त जागा भरणे, सेविकेमधून मुख्य सेविकेची पदोन्नती करणे, मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकांइतके मानधन आणि इतर फायदे देणे, लाभार्थ्यांच्या आहारामध्ये वाढ करणे असे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे याबाबत योग्य निर्णय न झाल्यास २० फेब्रुवारीपासून राज्यव्यापी बंदचा इशारा देण्यात आला आहे.

चॅटजीपीटी वापरताय? मग आता पैसे भरा

मुंबई: चॅटजीपीटी वापरणाऱ्यांनो आता पैसे भरायला तयार राहा. चॅटजीपीटीने आता चॅटजीपीटी प्लस हा सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये अतिरिक्त अनेक नवीन फीचर्स तुमच्यासाठी उपलब्ध होतील. दरम्यान, चॅटजीपीटीची विनामूल्य सेवा बंद होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

चॅटजीपीटी प्लस सबस्क्रिप्शनसाठी दर महिन्याला तुम्हाला २० डॉलर मोजावे लागतील पण हा सबस्क्रिप्शन प्लान सध्या फक्त यूएसमध्ये उपलब्ध आहे. ते लवकरच इतरही देशांमध्ये लाँच केला जाणार आहे.

चॅटजीपीटी प्लसची वैशिष्ट्ये

  • चॅटजीपीटी (ChatGPT) प्लस सबस्क्रिप्शन वापरकर्त्यांना नवीन सेवा अन् चॅट करताना आणखी वेगाने प्रतिसाद मिळेल.
  • चॅटजीपीटी लाँच करणाऱ्या ओपन एआय या कंपनीने लोकांचा प्रतिसाद आणि प्रतिक्रियांची नोंद घेत यात बदल करण्याचे सुतोवाच केले आहे. तसेच बिझनेस करणाऱ्यांसाठी नवी सेवा लॉन्च करणाप असल्याचेही सांगितले.

लोखंडी रॉडने मारहाण अन् विवस्त्र करून व्हिडिओ केला व्हायरल

पुणे: मुलीसोबत पळून जाऊन लग्न केले म्हणून संबधित तरुणाच्या बहिणींना लोखंडी रॉडने मारहाण तसेच विवस्त्र करुन व्हिडिओ तयार केल्याची घटना घडली आहे. या बहिणींना ही व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे.

या प्रकरणी पीडीत तरुणींपैकी एकीने सात जणांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी नंदकुमार माटे, सुंदराबाई माटे, आरती पिंपळे, बाळासाहेब पिंपळे, सागर जगताप, श्रीराम गोसावी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोपी पुणे-सोलापूर रस्त्याजवळ उरळी कांचन येथे घडली आहे. यापैकी एका तरुणीचे वय २४ वर्षे आहे. या दोन्ही बहिणींचे अपहरण करुन त्यांना विवस्त्र करुन खोलीत डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर मोबाइल कॅमेऱ्याद्वारे त्याचे चित्रीकरण करुन ही व्हिडिओ क्लिप समाजमाध्यमावर प्रसारित केली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.

पळून जाऊन लग्न केलेले जोडपे आणि आरोपी नातेवाईक आहेत. आरोपी नंदकुमार माटे यांना त्यांच्या नात्यातील तरुणीला तक्रारदार महिलेच्या भावाने पळवून नेल्याचा संशय होता. याच रागातून त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक काळे पुढील तपास करत आहेत.