ब्लॅकमेलिंगचे कॉल सेंटर

हॅलो इन्स्टंट लोन हवं आहे का?, एका दिवसात कर्ज खात्यावर जमा होईल’, असे फोन आपल्यापैकी अनेकांना आले असतील. कोविडनंतरच्या काळात पैशांची चणचण मध्यमवर्गीय, सर्वसामान्य नागरिकांना भासत होती. त्यामुळे सहज असे कर्ज उपलब्ध होत असेल, तर देवा पावला, अशी काही मंडळींची भावना झाली असेल. मात्र असे इन्स्टंट लोन घेतल्यानंतर पठाणी पद्धतीने हफ्ते भरण्यासाठी तगादा लागतो, हे किती जणांना माहीत आहे. तसेच अनेकदा अश्लील शिवीगाळीपासून कुटुंबाच्या इतर मंडळींना त्रास देण्याचे प्रकारही घडतात. त्यावेळी असे वाटते की, अशा खासगी लोकांकडून कर्ज घेण्याची बुद्धी का झाली…

औरंगाबाद शहरात असे एक कॉल सेंटर सायबर पोलिसांनी उद्ध्वस्त केले. त्यावेळी या ठिकाणावरून ब्लॅकमेलिंग करणारे फोन जात असल्याची माहिती तपासात उघड झाली. आजकाल बहुतांश काम मोबाइलवर होते. त्यात सध्या एका क्लिकवर इन्स्टंट लोनदेखील मिळते. मात्र याच लोनच्या माध्यमातून मनमानी वसुली होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात सायबर सेलकडे प्राप्त झाल्या होत्या. महाराष्ट्रात नव्हे, तर देशभरात अशा पद्धतीने अनेक लोकांची फसवणूक झाल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. मात्र या साऱ्यांचे केंद्रबिंदू औरंगाबाद या ठिकाणी असल्याचे उघड झाल्याने महाराष्ट्र पोलीस दलही चक्रावून गेले होते.

उत्तराखंडमधील डेहराडून पोलीस आले होते. औरंगाबाद पोलिसांची त्यांनी स्थानिक पातळीवर मदत मागितली आणि छापा टाकून कॉल सेंटरचा पदार्फाश केला. औरंगाबादमधील पैठण गेट परिसरात भर वस्तीत जोएब कुरेशी नावाची व्यक्ती हे कॉल सेंटर चालवत होता. त्यामध्ये तब्बल दीडशे तरुण-तरुणी काम करत होते. डेहराडून पोलिसांच्या माध्यमातून तब्बल १२ तास झाडाझडती घेतल्यानंतर हे कॉल सेंटर आता सील करण्यात आले. डेहराडून पोलिसांच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई आणि नंतर औरंगाबादपर्यंत या पथकाने तपास केला आहे.

यश एंटरप्राइजेसच्या नावाखाली हे कॉल सेंटर तिथे सुरू होते. मुळात यश एंटरप्राइजेस हे वोडाफोन, आयडीबीआय आणि भारत पे यांचे अधिकृत कॉल सेंटर असल्याचे कागदपत्री दिसत होते. मात्र डेहराडून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे असलेल्या तक्रारदारांना याच कॉल सेंटरमधून ३३ सीमकार्डद्वारे धमकीचे फोन करण्यात आल्याची पक्की माहिती हाती होती. तसेच त्यांचे लोकेशन पैठण गेट येथे याच कॉल सेंटरचे आढळून आले होते. पोलिसांच्या छाप्यात त्यापैकी २३ सीमकार्ड या ठिकाणी आढळून आले. त्यावेळी पोलिसांची खात्री पटली की, हे कॉल सेंटर नव्हे, तर ब्लॅकमेलिंगचे मुख्य केंद्र आहे. त्यानुसार पोलिसांनी १३४ साधे मोबाइल, दहा अँड्रॉइड मोबाइल, एक लॅपटॉप, तेराशे ते चौदाशे सीमकार्ड ताब्यात घेतले, अशी माहिती सायबर पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली.

या प्रकरणी सायबर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू ठेवली. त्यात अधिकृत कॉल सेंटर असलेल्या कंपन्यांना पत्रव्यवहार करण्यात आला. त्यातून या कंपन्यातील काही व्यक्ती या प्रकरणात सहभागी आहे का? याचाही शोध घेतला जात आहे. डेहराडून पोलिसांच्या मदतीने छापा टाकल्यावर, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सीमकार्ड मोबाइलबरोबर दोन तलवारी आढळून आल्या. त्यामुळे या आरोपींमध्ये कोणी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे का? याचा शोध घेतला जात आहे. यामध्ये कॉल सेंटरमधून इन्स्टंट लोन ॲपद्वारे कर्ज घेतलेल्यांना, ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सुरू असल्याचे पुरावे पोलिसांना आढळून आले आहेत. डेहराडूनमध्ये ब्लॅकमेलिंग करण्याच्या जवळपास अडीचशे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, असे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत मूळ मालक अद्याप सापडला नाही. त्यात तपासात आणखी सविस्तर माहिती समोर आली. जोएब नामक तरुण आधी कॉल सेंटरमध्ये काम करायचा. नंतर त्याने स्वतःच ऑपरेटर कंपन्यांसाठीचे कर्ज वसुलीचे कॉल सेंटर सुरू केले. त्याच्या नावाखाली त्याचे ब्लॅकमेलिंगचे कॉल सेंटर सुरू केले होते. दीडशे तरुण-तरुणी त्याच्याकडे काम करत होते. तो प्रत्येकाला १५ हजार रुपयांपर्यंत पगारही देत होता. जोएब हा एक मोहरा असला तरी पोलिसांनी कारवाई केल्यानंतर, मोठी माहिती उघड होईल, असा विश्वास सायबर पोलिसांना वाटत आहे. कारवाई करण्यात असलेल्या कॉल सेंटरमध्ये दीडशे युवक-युवती काम करत होते, ते पैठण गेट परिसरातील मध्यमवर्गीय वस्तीतील होते. त्यातील काहीजण तर पॉकेट मनी मिळावा, यासाठी या कॉल सेंटरमध्ये पार्टटाइम काम करत होते. पैठणच्या आसपास अनेक महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस आहेत. तसेच बाहेरगावावरून आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोयदेखील सोयीने उपलब्ध होते. त्यामुळे औरंगाबादमध्ये शिक्षणासाठी आलेली काही मुले या कॉल सेंटरमध्ये फावल्या वेळेत पैसे कमवण्यासाठी काम करत असल्याची माहिती समोर आली. मात्र पोलिसांना यात या मुलांचा काही दोष वाटला नाही.त्यामुळे त्यांच्यावर सध्या तरी कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांच्या तपासाचा फोकस हा ब्लॅकमेलिंगसाठी कॉल सेंटरचा वापर करणाऱ्या चतुर टोळीच्या मागे आहे. पोलीस पथक या टोळीच्या मुळाशी कुठपर्यंत जाणार आहे, ही माहिती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

तात्पर्य : इन्स्टंट लोनच्या नावाखाली खात्यावर पैसे पडतील. पण व्याज, चक्रवाढ व्याज याचे कोणताही मापदंड न ठरवता अवाच्या सव्वा रक्कम लोनच्या नावाखाली लुटमार करणारी टोळी कार्यरत आहे. त्याचे सेंटर महाराष्ट्रात असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. तेव्हा अशा भूलभुलैया, इन्स्टंट लोनच्या प्रकारांपासून सावधान!

-महेश पांचाळ

हॉटेल सह्याद्री शाकाहारी-मांसाहारी

मुंबई सेंट्रल : दक्षिण मुंबईमधील मोठ्या एसटी डेपोबाहेर गावावरून येणाऱ्या व बाहेरगावी जाणाऱ्या एसटी गाड्यांची वर्दळ. हाकेच्या अंतरावर मुंबई सेंट्रल. पश्चिम रेल्वेचे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे शेवटचे स्थानक. अशा या मुंबई सेंट्रल विभागात साधारण ३० वर्षांपूर्वी मुंबई सेंट्रल एसटी डेपोच्या समोर ‘सह्याद्री’ नावाचे हॉटेल सुरू झाले.

ईस्राईल साजी, या हॉटेलचे एक भागीदार गुजरातमधून आलेले साजी स्वच्छ व नीटनेटक्या कपड्यांमधील हसतमुख, लाघवी, व्यक्तिमत्त्व. ग्राहकांचे हसतमुखाने स्वागत करणारी व्यक्ती. प्रवेशद्वारातून आत शिरताच मन प्रसन्न करणारे वातावरण. स्वत: साजी यांनीच आमचे स्वागत केले. सुरुवातीच्या गप्पाटप्पा झाल्यानंतर आमच्यासमोर मांडली ‘चिकन क्रिस्पी’. नावातलाच क्रिस्पीपणा, कुरकुरीतपणा पदार्थांमध्ये उतरलेली चिकन क्रिस्पी. पहिलाच घास तोंडात जाताच पदार्थाचे वेगळेपण जाणवले. वर सांगितल्याप्रमाणे इतर ठिकाणी खाल्लेली व सह्याद्रीची चिकन क्रिस्पी खूपच वेगळी. वाजवी किमतीत पदार्थ जास्त प्रमाणात, हे इथले वैशिष्ट्य. तसेच मटण मसाला व चिकन बेगम बहार. हे पदार्थसुद्धा भरपूर प्रमाणात व वाजवी किमतीत. घरच्याच मसाल्यांमध्ये बनवलेले असल्यामुळे अप्रतिम चव व शेफचे कौशल्य घेऊन समोर येतात. तयार केलेल्या पदार्थांचा सुगंध मनाला मोहीत करतो व जठराग्नी प्रज्वलित करतो व आपण नकळत दोन घास जादा खाऊन तृप्त मनाने बाहेर पडतो. ते सुद्धा खिशाला जादा कात्री न लागता. त्याचप्रमाणे मुल्तानी चिकन, मुघलाई चिकन, कॅप्सा चिकन, व्हेज पटियाला, व्हेज जयपुरी या डिशसुद्धा वरीलप्रमाणेच प्रसिद्ध व रुचकर. पोट शांत करतील; परंतु मन नाही.

एसी व नॉन एसी विभागामध्ये विभागलेले हे हॉटेल सह्याद्री. येथे आपण कुटुंबासहित जाणार असाल, तर आपणासाठी ‘मैफल’ सजलेली तयार आहेच. शाकाहारी, मांसाहारी, चायनीज सर्व प्रकारच्या व्यंजनमुक्त या हॉटेलमध्ये एकदा तरी भेट द्या व वाजवी दरात पाहुणचार अनुभवा.

हॉटेल सह्याद्री
२९५, बेलासिस रोड, एसटी डेपो समोर, मुंबई सेंट्रल, मुंबई-४०० ००८

परिषदेच्या निवडणुकीतून ठाकरे गटाला धडा

गेल्या सहा महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी ठाकरे गटाकडून सोडण्यात आलेली नाही. राज्यपाल कोश्यारी यांच्यानिमित्ताने महापुरुषांचा मुद्दा उचलून धरून पाहिला. तळेगावचा फोक्सान वेदांतचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला, आता मराठी तरुणांच्या हातात काम कोण देणार असा प्रचार करत ठाकरे गट आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आरोपांची राळ उठवली. भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कसे महाराष्ट्रद्रोही आहे हे जनतेच्या मनात बिंबवण्याचा ऐनकेन प्रकार विरोधी पक्षांकडून केला गेला; परंतु या प्रचाराला महाराष्ट्रातील सुज्ञ नागरिक बळी पडले नाहीत, हे गुरुवारी विधान परिषदेच्या पाच जागांच्या निकालावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील पाच मतदारसंघांतील शिक्षक आणि पदवीधरांनी मतदान केले आहे. शिकला तो वाचला असे म्हणतात. त्याप्रमाणे आदर्श पिढी घडविण्याचे काम जे शिक्षक असतात, त्यांनी आपले अमूल्य मत दिले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुजाण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी पदवीधर मंडळींनी यावेळी मतदानांचा हक्क बजावला. या मतदानांतून मराठी अस्मितेच्या नावाने जनतेला भ्रमिष्ठ करणाऱ्या विरोधकांचा भ्रमाचा भोपळा फुटला आहे. कोकण हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो; परंतु कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने महाविकास आघाडीला धक्का दिला आहे. भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मविआचे उमेदवार आणि विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांचा २० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. खरं तर म्हात्रे हे मूळचे शिवसैनिक. मागील विधान परिषद निवडणूक त्यांनी लढवली होती. शिंदे गट आणि ठाकरे गट हे स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी शिंदे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता.

ही जागा भाजपच्या चिन्हावर लढवावी असा आग्रह भाजप नेतृत्वाकडून धरण्यात आला होता. त्यामुळे म्हात्रे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून ती जिंकली. पहिला निकाल जाहीर झाला तो म्हात्रे यांचा. ते जाएंट किलर ठरले आणि महाविकास आघाडी सपशेल अपयशी ठरली. अँटीइंकम्बसीचा फटका बाळाराम पाटलांना बसला. जुन्या पेन्शन योजनेसारखा मोठा मुद्दा भाजपच्या विरोधात असला तरी भाजपने कोकणात विजय खेचून आणला. खरं तर शिक्षक मतदारसंघाची समीकरणे वेगळी असतात. या निवडणुकीत पक्षापेक्षाही उमेदवाराचे संघटनात्मक काम कायमच निर्णायक ठरते हे या विजयाने पुन्हा अधोरेखित केले. म्हात्रे यांनी या मतदारसंघात गेले ६ वर्षं जोरदार मोर्चेबांधणी केली. शिक्षकांची मोठी फौज त्यांनी उभी केली. शिक्षक सेनेच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मतदारसंघातील तब्बल ३३ संघटनांचा पाठिंबा म्हात्रेंनी मिळवला. याच जोरावर म्हात्रेंचा दमदार विजय झाला. म्हात्रेच्या विजयामुळे ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील ठाकरे गटाला आता मोठेपणा करण्याची संधी मिळणार नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने सुरुवातीला पाठिंबा दिला. महाविकास आघाडीची ताकद पाटील यांच्या मागे उभी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाचव्या फेरीअखेर तब्बल ६८ हजार ९९९ मते मिळाली, तर शुभांगी पाटील यांना ३९ हजार ५३४ मते पडली. तांबे हे तब्बल २९ हजार ४६५ इतक्या मताधिक्क्याने विजयी झाले. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असतानाही शुभांगी पाटील यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात ठाकरे यांची किती चालते हे या निकालावरून स्पष्ट झाले.

दुसरीकडे या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या काही चुका सुधारण्यावर भर देत आत्मचिंतन करणार असल्याचे सांगितले आहे. कारण अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे- पाटील यांचा विजय झाला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार डॉ. रणजित पाटील यांचा पराभव केला आहे. रणजित पाटील यांचा पराभव हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्वच्छ प्रतिमा असलेले ना. गो. गाणार यांचा नागपूरमध्ये झालेला पराभव हाही अनेकांच्या भुवया उंचावणारा होता. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विक्रम काळे हे चाैथ्यांदा आमदार झाले आहेत. शिंदे गटाचे पाच आमदार या मतदारसंघात असताना, काळे यांना यावेळी पराभव स्वीकारावा लागेल, असे वाटत होते. त्यात राष्ट्रवादीतील फुटीर उमेदवार निवडणूक रिंगणार असतानाही काळे यांचा विजयाचा मार्ग कोणी रोखू शकले नाही. त्यामुळे भाजपकडून आत्मचिंतनाचा दिलेला सल्ला हा पुढील निवडणुकांमध्ये विजय खेचून आणण्यास कारणीभूत ठरेल. या निवडणुकीतून ठाकरे गटाला महाविकास आघाडीच्या छत्राखाली राहून भविष्यात यश मिळेल का? याचा विचार करावा लागणार आहे. कोकणात म्हात्रे यांच्यासारखा जुना शिवसैनिक हा भाजपच्या तिकिटावर विजयी होत असेल, तर आता शिवसैनिकांनाही भाजपशिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही, असे वाटल्यास आश्चर्य वाटायला नको. मातोश्रीच्या चार भिंतीत बसून राजकारण करणे हे पुढील काळात तितकेसे सोपे राहिलेले नाही, हे ठाकरे गटाला कळून चुकेल.

चर्चा तर होणारच…! कुशाग्र बुद्धीचा खेळ

ठरावीक हेतूने दोन क्रियाशील माणसे एकत्र येतात आणि झपाट्याने, वेगाने काम करायला लागतात. त्यामुळे स्वतःबरोबर समाज, प्रेक्षकवर्ग समृद्ध होतो. नाटक क्षेत्रात सुधीर भट आणि गोपाल अलगेरी ही त्यापैकी एक जोडी होती. मनोरंजनाबरोबर दर्जेदार नाटक निर्मिती करण्यात या जोडीने महत्त्वपूर्ण जबाबदारी बजावलेली होती. पुढे भट यांचे निधन झाले आणि प्रेक्षकात, माध्यमातून ‘सुयोग’ ही संस्था कोणाची ही चर्चा इतकी टोकाला पोहोचली की, दोन्हीही निर्मात्यांनी स्वतंत्रपणे काम करण्याचे ठरवले. ती चर्चा आता विस्मृतीला गेली आहे. या दोन्हीही संस्थेकडून प्रेक्षकांनी चर्चा करावी अशी नाटकाची निर्मिती होताना दिसते. गोपाल अलगेरी यांचे चिरंजीव विनय यांनी आता निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले आहे. वडिलांच्या पश्चात निर्मिती क्षेत्रात येणाऱ्या मुलांनी फक्त मनोरंजन करण्याच्या हेतूने नाटकाची निर्मिती केली नाही, तर प्रबोधन आणि प्रेक्षक चिंतन करतील, अशा नाटकाची निर्मिती केली आहे. ही मराठी रंगभूमीसाठी स्वागतार्ह गोष्ट आहे. ‘वेद प्रोडक्शन’ ही अलगेरी यांची संस्था आहे. त्यांनी कल्पना कोठारी यांच्या ‘रंगनील क्रिएशन’ या संस्थेला सोबत घेऊन ‘चर्चा तर होणारच’ या नाटकाची निर्मिती केली आहे. यासाठी आर्या विजनचे त्यांनी सहकार्य घेतले आहे. हेमंत ऐदलाबादकर हे या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आहेत.

नाटकात मृणाल आणि सत्यशील हे दोघे तसेच सांगलीतील एक पुस्तक निर्मितीत गुंतलेला आहे, तर दुसरी कष्ट, शोषित महिलांसाठी काम करण्यासाठी पुढे सरसावलेली आहे. दोघांचेही काम वेगळे असले तरी समाज परिवर्तन हे त्यांच्या कार्याचे सूत्र आहे. हे कार्य करत असताना वेळप्रसंगी मोर्चा, आंदोलने, प्रतिकार करणे या गोष्टीत हे दोघे सातत्याने भाग घेत असतात. संघर्ष करणे आणि होणाऱ्या अन्यायाला न्याय देणे हा त्यांच्या जिद्द, चिकाटीचा एक भाग आहे. दोघेही एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहेत. जिथे स्पर्धा तिथे सातत्याने ते भाग घेत असल्यामुळे दोस्ताना, वादविवाद या साऱ्या गोष्टी त्यांच्या जीवनात सातत्याने घडत असतात. त्यांचा वाद कितीही टोकाचा असला तरी हृदयाच्या कप्प्यात मैत्रीचा ओलावासुद्धा दडलेला आहे. अशा स्थितीत देशपांडे नावाचा एक व्यक्ती स्पर्धेच्या निमित्ताने त्यांच्या जीवनात येतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक कार्य करणारी एक संस्था समाजात सकारात्मक काम करणाऱ्या व्यक्तीला काही लाखाचे अनुदान देते. ठरावीक प्रश्नाची उत्तरे वादविवाद, चर्चा यातून योग्य पद्धतीने जो कोणी उत्तर देईल त्यालाही ही रक्कम दिली जाईल, अशी ही स्पर्धा असते. एवढी मोठी रक्कम मिळणार म्हटल्यानंतर एका प्रशस्त देखण्या बंगल्यात हे तिघे एकत्र आलेले आहेत. नाटकाच्या शीर्षकाप्रमाणे चर्चा तर होणारच, असे काहीसे इथे वाटायला लागते. पुस्तक निर्मिती, परंपरा आणि स्त्रीवाद असावा की नसावा? हे देशपांडे यांचे प्रश्न असतात. यात मृणाल विजेती होते. त्यामागे सुद्धा देशपांडे कोणाच्या तरी सांगण्यावरून कुटिल कारस्थान रचत असतो. त्याचा उलगडा नाटकाच्या अखेरच्या अंकात होतो. या चकित करणाऱ्या प्रसंगापर्यंत घेऊन जाण्यासाठी एदलाबादकर यांनी आपल्या लेखनात जी कसब दाखवलेली आहे. ती कौतुक करणारी आहे. विचार संघर्ष, प्रेक्षकात कुतूहल निर्माण होईल, असे प्रसंग, सोबतीला सहज, उस्फूर्त भाषा आणि अभिनय या साऱ्या गोष्टी नाटक शेवटपर्यंत पाहण्यासाठी प्रवृत्त करतात. कलाकारांचा अभिनय आणि एदलाबादकर यांचे लेखन या सर्व गोष्टीला याला कारणीभूत असल्या तरी लग्न सोहळ्यात अक्षता म्हणून तांदूळ टाकणे, दुधाचा अभिषेक करणे या पलीकडे नव्या विषयांचा शोध लेखकाने घ्यायला हवा. विकृती, संस्कृती, वृत्ती या शब्दांचा वापर करून अनेकदा नव सुविचाराची केलेली निर्मिती वाचनात, ऐकण्यात आलेली आहे. त्यामुळे तोही लेखकांने मोह येथे आवरायला हवा होता, असे वाटते. उत्तम काही पाहायचे आहे, ऐकायचे आहे, तर हे नाटक त्याची पूर्तता करू शकते.

‘चर्चा तर होणारच’ हे नाटक का पाहावे याला उत्तर द्यायचे झाले, तर वेगळा विषय, देखणे सादरीकरण, राहुल रानडे यांचे प्रसंग अवधान राखून केलेले संगीत, प्रेक्षकांची नजर सर्वत्र फिरेल, असे संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य असले तरी यात मृणालची भिडस्त, सामाजिक बांधिलकी जपणारी, बौद्ध विचारसरणीची व्यक्तिरेखा आदिती सारंगधर यांनी केलेली भूमिका सांगता येईल. मृणालचे स्वतःचे असे व्यक्तिमत्त्व यात दिसेल असे त्यांनी पाहिलेले आहे. ठासून बोलणे, कळवळा व्यक्त करणे हे असले तरी त्याच्याबरोबर व्यक्तिरेख्या सवयी सुद्धा सतत भूमिकेत डोकावेल, असे पाहिले आहे. संपूर्ण नाटकात भूमिका करताना त्याचे भान ठेवणे हे अभिनयाची जाण असलेला कलाकारच जमू शकतो. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात संभाव्य यादीत आदिती यांचे नाव झळकण्याची शक्यता आहे. आस्ताद काळे यांनी सत्यशीलची भूमिका तेवढीच सर्मथपणे केलेली आहे. हे नाटक प्रभावी होण्याला त्यांची भूमिका तेवढीच कारणीभूत आहे. स्वतःच्या विचाराशी ठाम असणे, वेळप्रसंगी भावूक होणे, संग्रामचे दडपण सारे काही भूमिकेत स्पष्टपणे दाखवले आहे. क्षितीज झारापकर यांनी देशपांडेची व्यक्तिरेखा यात साकारलेली आहे. अस्सल इंग्रजी भाषा, त्यातील लय ही या भूमिकेची गरज आहे. ती अपेक्षितपणे आली नाही, तर भूमिकेला ती मारक ठरू शकते. त्यामुळे तेही तितकेच लक्षात राहतात. अमोघ फडके यांनी प्रकाशयोजना तर मंगल केंकरे यांनी वेशभूषाची बाजू सांभाळलेली आहे. ‘चर्चा तर होणारच’ हे नाटक म्हणजे तीन पात्रांचा कुशाग्र बुद्धीचा खेळ सांगता येईल.

-नंदकुमार पाटील

वासुदेव आला हो… वासुदेव आला

वासुदेव आला हो वासुदेव आला….

काही दिवसांपूर्वी एकदा खेळण्यांच्या दुकानात गेले असता तेथील नाना प्रकारची खेळणी, शोभेच्या बाहुल्या, छोट्या मोठ्या वाहनांच्या प्रतिकृती, काही अभ्यासू खेळ, काही मनोरंजनाचे तर काही डोक्याला-विचारांना चालना देणारे नवनवीन आकर्षक खेळ पाहण्यात मी मग्न झाले होते. एवढ्यात अचानक एका चिमुरडीच्या रडण्याच्या आवाजाने माझी एकाग्रता भंग पावली. ती लहान मुलगी आईचा हात ओढत तिच्या चिमुकल्या डोळ्यांतून भली-मोठी आसवं गाळत म्हणत होती,

‘आई मला हाच सांताक्लॉज हवाय, बघ ना किती क्यूट दिसतोय तो आणि स्वीट गातोय!’ मी त्या रडणाऱ्या मुलीकडे आणि तिला समजावणाऱ्या आईकडे बघत राहिले. मग माझं लक्ष गेलं ते लांबसडक पांढऱ्या शुभ्र दाढीवाल्या ढगळ लाल सदरा घातलेल्या सांताबाबाकडे! आणि त्याच्याकडे पाहता पाहता मला माझ्या लहानपणीचा तो दिवस आठवला, जेव्हा मोठी साद घालत असाच एक बाबा दारोदारी टाळ आणि चिपळ्या वाजवत, नाचत, गाणी म्हणत भल्या पहाटे आम्हाला झोपेतून उठवायला दारी येई. आधी वाटायचं, आईने आम्हाला सकाळी लवकर उठवण्यासाठी हे कुठलं तरी गाणं लावलंय की काय? पण दररोज येणारा तो मधुर आवाज हळूहळू आम्हाला आवडायला लागला. आमच्या परिचयाचा झाला, तर आमच्या या बाबाचं नाव होतं वासुदेव! आई त्याला कधी घरातील धान्य, कधी पैसे देत असे व तो समाधानाने आशीर्वाद

देऊन गात गात पुढे मार्गस्थ होत असे.
दान पावलं, बाबा दान पावलं
वासुदेव आला, हो वासुदेव आला
सकाळच्या प्रहरी हरिनाम बोला ।।

हे बोल गात गात वासुदेव नित्यनेमाने सूर्य उगवल्याप्रमाणे रोज अवतरत असे. वासुदेवाची हाळी ऐकून आम्ही भावंडं अंथरुणातून पटकन उठून तयारी करून बसत असू आणि जसजसा त्याचा आवाज जवळ येई तसंतसं आतुरतेने त्याच्या प्रतीक्षेत दारात उभे राहत असू. आईलाही बरं वाटे की, कधीही लवकर न उठणारी ही मुलं वासुदेवाच्या दर्शनासाठी, त्याचा आवाज ऐकण्यासाठी लवकर उठू लागली आहेत आणि शहाण्यासारखी वागू लागली आहेत. सांताबाबासारखीच आमच्या या वासुदेवाकडेही एक जादूची झोळी असायची. त्यात तो नाना तऱ्हेचे पदार्थ, वस्तू, पैसे असं काहीबाही ठेवत असे. वाटायचे की, ही झोळी आहे की जादूची गुहा? जी कधी संपतच नाही. त्या झोळीला अनेक कप्पे असायचे आणि त्यात सगळं काही सामावून जायचं. वासुदेवाने गायलेले अभंग, कवनं, ओव्या, गाणी तेव्हा आम्हालाही पाठ होऊन गेली होती. त्याचा आवाज असा काही टिपेला लागे की, ऐकताना समोरच्याचं चित्त हरवून जाई. आई म्हणायची की, त्याला दान दिलं की ते पावतं. त्याचा आशीर्वाद सगळ्यांना लाभतो. असा हा वासुदेव आम्हाला विलक्षण बुद्धिमानही वाटे. कारण त्याला सगळी गाणी अभिनयासहित तोंडपाठ असत. शिवाय तो अखंड बोलत असे.

खरं तर वासुदेव ही महाराष्ट्रातील एक प्राचीन परंपरा. वारकरी पंथातील कृष्णवंशातील कृष्णाचे भक्त म्हणून घेणारी जमात म्हणजे वासुदेव. कलेला सोबत घेऊन लोकांना संगीतातून जागृत करण्याचं कार्य हा वासुदेव करत असे. कृष्णाची प्रतीकं म्हणून कपाळावर गंध, मोरपिसाचा उंच टोप, घेरदार झगा, सुरवार किंवा धोतर, खांद्यावर उपरणं, गळ्यात झोळी, कमरेला छोटी बासरी अशा रूपात हा वासुदेव गावागावांत भिक्षा मागत फिरायचा.

हा वासुदेव एकाच वेळी एका हाताने टाळ दुसऱ्या हाताने चिपळी, साथीला पायातील घुंगरांचा लयबद्ध नाद करत उपदेशात्मक अभंग बोधात्मक कवनं यांची वैविध्यपूर्ण रचना करून समाजाला प्रबोधन करीत असे. हे समाज कल्याणाचं कार्य तो फार पूर्वीपासून करत आलाय. अगदी शिवरायांच्या काळातही या बहुरूप्या वासुदेवाने हेरगिरीचं काम करून स्वराज्याच्या कार्यास हातभार लावल्याचे दाखलेही इतिहासात सापडतात.
वासुदेव भल्या पहाटे हरिनामाचा जयघोष करत गावाला जागवतो. लहान-थोरांना गोष्टी सांगून त्यांचं मनोरंजन तर करतोच. पण समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची ताकद त्याच्या गाण्यात, आवाजात आणि एकूणच त्याच्या दर्शनात असते. त्याचा मधुर आवाज, चेहऱ्यावरील निरागस भाव आणि गाण्यातून व्यक्त होणारी आपुलकी, प्रेम देत तो सर्वांना आपलंस करून टाकी. भक्तिभावातून जनसामान्यांचं मनोबल वाढवत समाज प्रबोधनाचं महान कार्य तो अविरत करत असे.

पण कालांतराने गावांना शहराचं रूप मिळालं अन् माणसं यंत्रवत जगू लागली. जागोजागी मोठमोठ्या इमारती, अपार्टमेंट उभी राहू लागली. त्यामुळे वासुदेवाला सहजतेने शिरकाव करणं आणि लोकांना भेटणं मग अशक्य होऊ लागलं. गल्ली-रस्त्यातून हाळी देत जाणारा वासुदेव आजही कधीतरी दुरून दिसतो. कोणी बोलावलं, तर येतो. नाहीतर नाइलाजाने आल्यापावली निघूनही जातो. पण एकूण त्याचं गाणं आणि दर्शन आता हळूहळू कमी कमीच होत चाललेलं आहे.
आजच्या टच स्क्रीनच्या जमान्यात कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या मुलांना सकाळी जागवणाऱ्या वासुदेवापेक्षा रात्री उशिरा येणारा सांताक्लॉज अधिक जवळचा वाटू लागला आहे. सांताक्लॉज म्हणे मुलांना गिफ्ट देतो. म्हणून ती त्याची वाट पाहतात. पण आपल्या मराठी मातीतल्या, आपल्या लोकपरंपरेचा वारसा पुढे चालवणाऱ्या साध्या भोळ्या वासुदेवाचा मात्र आज सर्वांनाच विसर पडत चालला आहे. नव्या पिढीला वासुदेवाचं आकर्षण वाटत नाही. अनेकांना त्याच्याबद्दल माहितीही नाही. अजूनही ग्रामीण भागात वासुदेव बरेचदा येतो. पण त्याची हाक सर्वांपर्यंत पोहोचत नाही किंवा पोहोचली तरी त्याची फारशी दखल घेतली जात नाही.

त्याच्याकडून मिळालेला उपदेश, त्याच्या आवाजातील गाणी, त्याची अलौकिक वेशभूषा आणि त्याची पिढीजात कला हा आपल्या संस्कृतीचा गौरव बिंदू आहे. मात्र दुर्दैवाने काळाच्या पडद्याआड आता तो झाकून गेलाय. आजही काही वासुदेव घराण्याचा वारसा म्हणून चिकाटीने ही कला जपताना दिसतात, पण त्यांना शासनाकडून किंवा समाजाकडून थोडंफार साहाय्य आणि प्रोत्साहन मिळालं, तर ही लोकपरंपरा जिवंत राहील आणि खऱ्या अर्थाने ‘दान पावलं’ असं खुद्द या वासुदेवाबद्दल आपल्याला म्हणता येईल.

-रूपाली हिर्लेकर
[email protected]

आंगणेवाडीची श्री भराडी देवी

आज ४ फेब्रुवारी आंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रोत्सवानिमित्त…

कोकणी माणूस हा उत्सवप्रेमी असून सर्व सण व उत्सव येथे मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. कोकणी माणूस कुठेही असला तरी शिमगा (होळी), गणपती, दसरा, दिवाळी या उत्सवासाठी तो आपली हजेरी कोकणात आवर्जून लावीत असतो. या सण-उत्सवाप्रमाणे कोकणातील, गावोगावच्या यात्रांनाही तो आपली उपस्थिती लावीत असतो.

कोकणातील मार्लेश्वर, कुणकेश्वर आणि आंगणेवाडी आदी यात्राही अत्यंत लोकप्रिय झाल्या आहेत. मालवण तालुक्यापासून १५ किमीवर मसुरे गाव असून त्यातील आंगणे. आंगणे ग्रामस्थांची एक वाडी आहे. त्या ठिकाणी हे देवीचे स्थान असून ते भरडावर (माळरानावर) असल्यामुळे तसेच देवालयांचे माहेरघर असलेल्या मसुरे गावातील प्रसिद्ध देवालय म्हणजे आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी देवालय. मसुरे-आंगणेवाडीची देवी श्री भराडी देवी ही राज्यभरातच नव्हे, तर देशभरात नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आहे. मसुरे गावची एक वाडी असलेल्या आंगणेवाडीची महती सातासमुद्रापार पोहोचली आहे, ती आई भराडी देवीमुळेच. भक्तांच्या हाकेला ओ देऊन संकटाला धावून जाणारी देवी भराडीने संपूर्ण मसुरे गावच पावन केले आहे.

या देवीबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. भरडावर देवी प्रकटली म्हणून तिला भराडी देवी असे म्हटले जाते. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार श्री देवी तांदळाच्या वड्यातून भरड माळावर प्रकटली असेही सांगितले जाते. ही देवी तांदळाच्या वड्यातून भरडावर प्रकटली म्हणूनच आजही आंगणे मंडळी गावात आलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून तांदळाचे वडे देतात व तेथेच खायला सांगतात. भराडी देवीची जत्रा कधी सुरू झाली हे निश्चित सांगता येत नसले तरी साधारणपणे ३०० वर्षांपूर्वी येथे पूजा-अर्चा सुरू असल्याचं सांगितलं जातं. श्रीभराडी देवीच्या महात्म्यामुळे आंगणेवाडीला हे महत्व प्राप्त झालेले आहे. पुण्याचे पेशवे श्रीमंत चिमाजी अप्पांनाही मोहिमेमध्ये भराडीदेवीचा कृपाशीर्वाद लाभल्यामुळे त्यांनी २२ हजार एकर जमीन या मंदिराला दान दिली आहे. ही देवी स्वयंभू असून भरड भागातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरूपी देवी अवतरली म्हणून तिला भराडी देवी असे म्हणतात. या देवीच्या उगमाविषयी कथा सांगण्यात येते. याशिवाय देवीच्या नवसाला पावणाऱ्या अनेक चमत्कारांविषयी बोलले जाते. त्यापैकी एक कथा पेशवाईशी जोडली गेली आहे. आंगणेवाडीतील पराक्रमी वीर पुरुष, चिमाजी अप्पांच्या सेवेत होता. अटकेपार झेंडा फडकविण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता, असा इतिहास सांगितला जातो. या स्वराज्य सेवेवर प्रसन्न होऊन कुलस्वामिनी देवी तुळजाभवानी मसुरे गावातील आंगणेवाडी या छोट्याशा भरडावर प्रसन्न झाली. या वीर पुरुषाला दृष्टांत झाला. त्याची दुभती गाय पान्हा सोडत असलेल्या जागी त्याने पाळत ठेवली. तेथे जवळच राईत जाऊन पाषाणावर आपल्या पान्ह्याचा अभिषेक करताना गाय दिसली. या साक्षात्काराने प्रेरित होऊन राई मोकळी केली. गाय ज्या पाषाणावर पान्हा सोडायची, त्या जागी सजीव पाषाण सापडले. त्यानंतर पाषाणाची शुद्धता व प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

या देवीचा महिमा अगाध आहे. दक्षिण कोकणची ‘प्रति भवानी’ असाच भराडी देवीचा महिमा आहे. तिच्या भक्तगणांच्या भक्तीचा मळाच असा रसरशीत, भक्तिभावाने इतका चिंब झालेला आहे की, सारे पाहिले म्हणजे आई भराडी देवी भक्तजणांच्या नवसाला पावणारी, तर आहेच पण दक्षिण कोकणच्या पुण्यभूमीने, कधीकाळी भवानी मातेला साकडं घातलं असेल, नवस बोलला असेल म्हणूनच तुळजापूरची भवानी स्वत्वरूपाने आंगणेवाडीच्या या भरडमाळावर अवतरली असणार, असे वाटल्याशिवाय राहात नाही. भराडी आईचा साजरा होणारा यात्रोत्सव म्हणजे या पुण्यभूमीने बोललेल्या नवसाची फेड असावी, असे वाटू लागते म्हणूनच या भराडी देवीला ‘देवी माझी नवसाची’ असे बोलले जाते.

२५ वर्षांपूर्वीही जत्रा काही हजारांत होत होती. मात्र वर्षागणिक भक्ताच्या संख्येत वाढ होत असून ती सुमारे दहा लाखांपर्यंत पोहोचल्याचे बोलले जाते. आंगणेवाडीत पूर्वी असलेल्या जागेवर जीर्णोद्धार करून या जागी नवीन मंदिर बांधण्यात आलेले आहे. येथे पाषाणमूर्ती असून तिची नियमितपणे पूजाअर्चा केली जाते. दररोज नवस फेडणाऱ्या भाविकांचीही इथे मोठी गर्दी असते.

कोकणातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या वार्षिक जत्रोत्सवात महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यांतून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. देवीच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते, मराठी अभिनेते, अभिनेत्री या यात्रोत्सवासाठी आवर्जून हजेरी लावतात. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस, होमगार्डसचे जवान तैनात असतात. राज्यातील मंत्रीमंडळातील मंत्री, विरोधी पक्षाचे नेते, मुंबई महापालिकेतील नेते या उत्सवात दर्शनासाठी हजेरी लावतात. श्रीभराडी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सरबत, आरोग्य तपासणी अशा सुविधा येथील राजकीय पक्ष देत असतात. जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवितात.

या देवीच्या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे फेब्रुवारी महिन्यात होणारा यात्रोत्सव होय. हा यात्रोत्सव आई भराडी देवी सांगेल, त्याच दिवशी होतो. विविध देव-देवतांच्या यात्रा-जत्रा महाराष्ट्रात आणि देशात ठिकठिकाणी होतात; परंतु भराडी देवीच्या यात्रेचे वैशिष्ट्य असे की, देवी सांगेल तीच जत्रेची तारीख आणि त्याच तारखेला जत्रोत्सव होतो.
देवदिवाळीच्या दुसऱ्या दिवशी डाळप (डाळ-मांजरी) होते. तिसऱ्या दिवशी प्रमुख आंगणे मानकरी देवळात जमतात.

देवीचा कौल घेऊन शिकारीस जाण्यात येते. ही पारध करण्यासाठी परिसरातील अनेक लोक सहभागी होतात. सात ते आठ जणांचे गट करून रान काढले जाते व डुकराचीच शिकार केली जाते. ही शिकार केल्यानंतर डुक्कर वाजत-गाजत देवळाजवळ आणला जातो. सुवासिनींकडून पारध करणाऱ्यांना ओवाळले जाते व डुकराची पूजा होते. मंदिराच्या उजव्या बाजूस ‘पातोळी’ असून या ठिकाणी डुक्कर कापले जाते व कोष्टी प्रसाद म्हणून दिले जाते. शिकार साधल्याच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा गाव देवळात जमतो. धार्मिकविधी झाल्यानंतर देवीपुढे पंचांग ठेवले जाते व तारीख ठरवून देवीचा कौल मागितला जातो. देवीने कौल देताच जत्रेची तारिख निश्चित होते. भराडी देवीच्या यात्रेकडे केवळ कोकणच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलेले असते. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे म्हणजेच रेल्वे, बसचे तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी उसळते. अवघ्या काही मिनिटांत गाड्यांचे बुकिंग केले जाते. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १० लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यंदा ही यात्रा ४ फेब्रुवारीला घेण्याचे निश्चित झालेले आहे. आंगणेवाडीत येणारे हे लाखो भाविक देवीच्या दर्शनाची आस घेऊन येथे येतात. वस्त्रालंकारांनी सजविलेली देवी याची देही याची डोळा पाहून जीवनाचे सार्थक झाल्याचा अनुभव भाविकांना या ठिकाणी येतो. याच लाखो भाविकांना भराडी मातेचे दर्शन होण्यासाठी आंगणे कुटुंबीय आणि आंगणेवाडीचे सर्व सदस्य मेहनत घेत असतात. अनेक व्यापारी, व्यावसायिक यांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या यात्रोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी उपस्थिती दर्शवितात.

यात्रोत्सवाच्या दिवशी रात्री देवीला नैवेद्य दाखवला जातो. मौनव्रत स्वीकारून आंगणेवाडीतील घराघरात महिला नैवेद्य शिजवतात. भाजी, भात, वरण, वडे असा नैवेद्य तयार केला जातो आणि एकाच वेळी रांगेने मंदिरात जात दाम्पत्यांकडून तो नैवेद्य दाखविला जातो. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो श्रद्धेने जमलेल्या असंख्य भाविकांना वाटप केला जातो. यात्रोत्सवात पूर्वी एकाच वेळी प्रसाद वाटप करणे शक्य होत नव्हते. यामुळे हा प्रसाद उडवला जात होता. त्यामुळे काहीजणांना तो मिळत नव्हता शिवाय तो पायाखालीही येत होता. त्यामुळे ग्रामस्थ मंडळाने ही पद्धत बदलली आणि नैवेद्य दाखवून झाल्यानंतर घरोघरी भाविकांना प्रसाद वाटपाची सोय केली. येणाऱ्या भाविकाला कोणत्याही घरात जाऊन प्रसाद देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. ५ वर्षांपासून बदललेल्या प्रसाद वाटपाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. अशाच प्रकारे यात्रेची तारीख ठरविण्यापूर्वी केली जाणारी शिकारीची प्रथा बंद व्हावी, अशी अपेक्षाही भाविकांमधून व्यक्त केली जात आहे.

मालवणमधील भराडीदेवी ही अनेकांची कुलदैवत आहे. दरवर्षी भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी सुमारे दहा लाख भाविक येत असतात. कोरोना संकटामुळे सरकारने घातलेल्या निर्बंधांमुळे मंदिरे बंद असल्याने गेली दोन वर्षे यात्रा बंद ठेवण्यात आली होती. राज्यात नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारने सर्व सणांवरील निर्बंध उठविल्यामुळे यंदाच्या या भराडीदेवीच्या यात्रेला भाविकांचा उत्साह प्रचंड द्विगुणित झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत असून यावेळी सुमारे २५ लाख भाविक भराडीदेवीच्या दर्शनासाठी येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एसटी प्रशासनाने सज्जता ठेवली आहे. जिल्ह्यातील विविध आगरांमधून तसेच प्रमुख रेल्वे स्थानकामधूनही आंगणेवाडीला एसटी बसेस सोडल्या आहेत. १४५ बसेसची व्यवस्था ठेवली असल्याची माहिती एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी पी. एस. देशमुख यांनी दिली आहे. देशमुख म्हणाले, ४ फेब्रुवारीच्या आंगणेवडीची जत्रेसाठी ५ फेब्रुवारीपर्यंत एसटी बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने शुक्रवारपासूनच बससेवा सुरू होत असून कणकवली आणि कुडाळ रेल्वे स्थानकातूनही प्रवासी उपलब्धतेप्रमाणे थेट आंगणेवाडीसाठी एसटी बसेस सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

-राजेंद्र साळसकर
[email protected]

अर्थसंकल्पावर चर्चा व्हायला हवी

देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अर्थसंकल्पाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एका वर्षाचा कालखंड असला तरी एकूण जमा झालेल्या महसुलाचा विचार प्राधान्य क्रमाने करून विकासाला चालना दिली, तर देशाचा उत्तम प्रकारे विकास होऊ शकतो. त्यासाठी आर्थिक वर्षामध्ये ज्या योजना ठरविल्या असतील त्याचप्रमाणे ज्या तरतुदी केलेल्या आहेत, त्याचा योग्य प्रकारे विनियोग झाला पाहिजे. तेव्हा भारताचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी, २०२३ रोजी २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा नूतन संसद भवनामध्ये अर्थसंकल्प सादर केला. आता त्यावरती प्रत्येक विभागात सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे.

दोन दशकांपूर्वीचा विचार करता एकदा का देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी संसदेत सादर केल्यानंतर जवळ जवळ एक ते दीड महिने अर्थसंकल्पावर चर्चा होत असायच्या. त्यामुळे अर्थसंकल्प म्हणजे काय? त्यातून देशातील सर्वसाधारण लोकांना काय मिळणार आहे, याची जोरदार चर्चा होत. त्यासाठी अर्थशास्त्रातील अभ्यासक मंडळींना निमंत्रित करून अर्थसंकल्प समजून घेतला जात असे. अलीकडच्या काळात फारशी अर्थसंकल्पावर चर्चा केली जात नाही. याहीपेक्षा अर्थसंकल्प तयार होण्यापूर्वी देशातील अर्थतज्ज्ञ आहेत, त्यांची स्वतंत्र बैठक आयोजित करून देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विकास आराखडा तयार करणे आवश्यक आहे. असे जर करण्यात आले, तर विकासाला अधिक गती मिळेल. त्याचप्रमाणे महसुलामध्येसुद्धा कशाप्रकारे वाढ होऊ शकते, या विषयीसुद्धा सरकारला सूचना करू शकतात. कारण नवीन योजना किंवा तरतुदी या महसुलावर चालत असतात. जर महसुलच वाढला नाही, तर नव्या योजना राबविणार अशा? केवळ १०० टक्के दिलेला निधी खर्च केला म्हणजे विकास झाला, असे म्हणतात येणार नाही, तर त्याचा विनियोग असा करावा, हे अर्थतज्ज्ञ सांगू शकतात. तेव्हा देशाच्या विकासासाठी व अर्थसंकल्पापूर्वी देशातील अर्थतज्ज्ञांची परिषद घेऊन त्यांच्या विद्वत्तेमुळे अधिक देशाच्या विकासाचा संकल्प कसा करता येईल, त्यातून देशातील रिकाम्या हाताना काम देऊन गरिबी कशी कमी करता येईल त्या दृष्टिकोनातून पावले उचलणे आवश्यक आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर, आता बघा ना, सत्ताधारी व विरोधक यांच्यातील काही जन एका शब्दात, तर काहींच्या सात-आठ वाक्यांमध्ये प्रतिक्रिया फोटोसहीत वाचनात आल्या. त्यासाठी देशातील सर्वसाधारण लोकांच्याही प्रतिक्रिया वाचायला मिळायल्या हव्यात. असे असले तरी खऱ्या अर्थाने अर्थसंकल्प समजण्यासाठी प्रत्येक विभागात तसेच शाळा व महाविद्यालयात विशेष चर्चा होणे आवश्यक आहे. अर्थसंकल्पावर विस्तृत चर्चा केल्याने अर्थसंकल्पामुळे देशाची अर्थव्यवस्था भरीव होण्यासाठी कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, याची माहिती होते.
अर्थसंकल्पात कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या वस्तू महाग झाल्या आहेत, याची माहिती मिळाल्याने मध्यमवर्गाला त्याचा अंदाज येतो. त्याप्रमाणे ते वस्तू खरेदी करू शकतात तसेच पर्यटन, महिलांचे सबलीकरण आणि शिक्षण कशा प्रकारे विकासाच्या दिशेने चालले आहे, हे कळणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपला देश हा शेतीप्रधान आहे. तेव्हा शेतकरी राज्याला नैसर्गिक शेतीसाठी कशा प्रकारे प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा कशा मिळणार याची माहिती होते. त्यामुळे उद्या सुविधा मिळाल्या नाहीत, तर शासन दरबारी आपल्या हक्कांसाठी शासनाला जागे करू शकतात. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे अनुदान कागदोपत्री लाटले जाते त्याला आळा बसेल.
महत्त्वाची बाब म्हणजे, ‘करप्रणाली’ होय. बऱ्याच वेळा करप्रणालीचे आपल्याला देणेघेणे नाही, असे वाटत असले तरी करदात्यांना त्याची जास्त उत्सुकता असते. यात सरकारी बाबू जास्त दास्तीत असतात. या वेळच्या अर्थसंकल्पात मागील आठ वर्षानंतर कररचनेत बदल केलेला आहे. यात तीन लाखांपर्यंत प्राप्तिकर घेण्यात येणार नाही. असे असले तरी करप्रणाली समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

दर वर्षी देशातील संरक्षण क्षेत्राला अधिक बळकटी दिली जाते. त्यानंतर रेल्वेची सेवा अधिक गतीने होण्यासाठी कोटीची तरतूद केली जाते. तसेच या वर्षी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी घसघशीत तरतूद करण्यात आली आहे. याचे तज्ज्ञ व्यक्तीने मार्गदर्शन केल्याने आपण जागृत होऊ शकतो. आपल्याला जरी निवाऱ्याच्या सोयीची गरज नसली तरी इतरांना त्याचा लाभ मिळवून देऊ शकतो. तेव्हा एकंदरीत देशाच्या अर्थसंकल्पाचा विचार करता देशातील शेतकरी, उद्योजक, बेरोजगारी, मागास समाज, शिक्षण, मत्स्य व्यवसाय, मध्यम वर्ग, पायाभूत सुविधा, महामार्ग, विमानसेवा, संरक्षण, रेल्वे, महिला वर्ग आणि समाजातील सर्व वर्गाच्या विकासाला कशी गती देण्यात येते. त्यासाठी दर वर्षी देशाचा अर्थसंकल्प संसदेत अर्थमंत्र्यांनी सादर केल्यानंतर किमान एक महिना तरी देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर विविध ठिकाणी विस्तृत चर्चा व्हायला हवी. हीच खरी देशाच्या विकासाची नांदी आहे.

-रवींद्र तांबे

अर्थसंकल्पाची करप्रणाली

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधीचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प होता, त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा होत्या; परंतु त्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही ते येणारा काळ ठरवेल. या वर्षीचा अर्थसंकल्प जाहीर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, “हा अर्थसंकल्प मागील अर्थसंकल्पात रचलेल्या पायावर आणि भारतासाठी काढलेल्या ब्ल्यू प्रिंटवर उभारण्याची आशा करतो. आम्ही एका समृद्ध आणि सर्वसमावेशक भारताची कल्पना करतो, ज्यामध्ये विकासाची फळे सर्व प्रदेश आणि नागरिकांपर्यंत पोहोचतात, विशेषत: आमचे तरुण, महिला, शेतकरी, ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, हा अर्थसंकल्प सात प्राधान्यक्रम ठरवले आहे.”

अर्थमंत्री यांनी प्रत्यक्ष करा, संदर्भातील तरतुदी जाहीर करताना सांगितले की, या प्रस्तावांचे उद्दिष्ट करप्रणालीची सातत्य आणि स्थिरता राखणे, अनुपालन ओझे कमी करण्यासाठी विविध तरतुदी अधिक सुलभ आणि तर्कसंगत करणे, उद्योजकतेच्या भावनेला चालना देणे आणि नागरिकांना कर सवलत देणे हे आहे. असे असले तरी या वर्षीच्या अर्थसंकल्पात जुन्या कर प्रणालीत विशेष असे काही बदल केले नसले तरी नवीन करप्रणालीत खालील बदल करण्यात आले आहेत. त्या तरतुदी खालीलप्रमाणे.

काही पात्रतेच्या बाबतीत गृहीत धरून कर आकाराला जातो, त्यानुसार व्यावसायिकांसाठी मर्यादा ५० लाखांवरून ७५ लाख आणि इतरांसाठी २ कोटींवरून ३ कोटी करण्यात आली आहे. एमएसएमईला वेळेवर पेमेंट मिळण्यास मदत करण्यासाठी, त्यांना प्रत्यक्षात केल्या गेलेल्या पेमेंटवर झालेल्या खर्चात कपात करण्याची परवानगी देण्याचा प्रस्तावही देण्यात आला.
सहकारी संस्थांना कर सवलत देताना पुढील तरतुदी करण्यात आल्या, त्यानुसार ३१ एप्रिलपर्यंत उत्पादन सुरू करणाऱ्या नवीन सहकारी संस्थांना १५ टक्के कमी कर दराचा लाभ मिळेल, जो सध्या नवीन उत्पादक कंपन्यांना उपलब्ध आहे. तसेच साखर सहकारी संस्थांना २०१६-१७ च्या मूल्यांकन वर्षाच्या अगोदरच्या कालावधीसाठी ऊस उत्पादकांना केलेल्या पेमेंटचा खर्च म्हणून दावा करण्याची संधी देण्याचा प्रस्तावही या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. यामुळे त्यांना रुपये १०,००० कोटींचा दिलासा मिळण्याची अपेक्षा अर्थमंत्र्यांनी व्यक्त केली. पुढे सहकार क्षेत्रासाठी, प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि प्राथमिक सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँकाद्वारे रोख ठेवींसाठी व कर्जासाठी प्रति सदस्य २ लाखांची उच्च मर्यादा प्रदान करण्यात येण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्याचप्रमाणे, रोख पैसे काढण्यावर टीडीएससाठी ३ कोटींची उच्च मर्यादा सहकारी संस्थांना प्रदान करण्याचा प्रस्थाव मांडण्यात आला आहे. स्टार्ट-अप्सना प्राप्तिकर लाभांसाठी समावेश करण्याची तारीख ३१ मार्च २०२३ ची ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव या वर्षीच्या अर्थसंकल्पात ठेवण्यात आला आहे. स्टार्ट-अप्सच्या तोट्याला कॅरी-फॉरवर्ड लाभ देण्याचा कालावधी स्थापनेपासून ७ वर्षांवरून १० वर्षे करण्याचा प्रस्ताव करण्यात आला आहे.

कर सवलती आणि सूट यांच्या चांगल्या लक्ष्यासाठी, कलम ५४ आणि ५४ एफ अंतर्गत निवासी घरातील गुंतवणुकीवरील भांडवली नफ्यातून वजावट १० कोटींपर्यंत मर्यादित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अत्यंत उच्च मूल्याच्या विमा पॉलिसींमधून मिळणाऱ्या आयकर सवलत मर्यादित करण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. सोन्याचे इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावतीत रूपांतर करणे याला भांडवली नफा म्हणून न घेणे, पॅन नसलेल्या प्रकरणांमध्ये ईपीएफ काढण्याच्या करपात्र भागावरील टीडीएस दर ३० टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत कमी करणे आणि मार्केट लिंक्ड डिबेंचर्सच्या उत्पन्नावर कर आकारणी, IFSC, GIFT सिटीमध्ये स्थलांतरित होणाऱ्या निधीसाठी कर लाभांचा कालावधी ३१.०३.२०२५ पर्यंत वाढवणे; आयकर कायद्याच्या कलम २७६ ए अंतर्गत गुन्हेगारीकरण; आयडीबीआय बँकेसह, इतर धोरणात्मक निर्गुंतवणुकीतील तोटा पुढे नेण्याची परवानगी देणे आणि अग्निवीर निधीला इ. इ. इ दर्जा प्रदान करणे, अशा तरतुदीही करण्यात आल्या आहेत.

२०२०च्या अर्थसंकल्पात नवीन कर प्रणाली अस्तित्वात आली त्यानुसार ज्याचे उत्पन्न २.५ लाख आहे त्यांना कोणताही कर भरावा लागत नव्हता त्याची मर्यादा आता ३ लाख एवढी करण्यात आली असून, स्लॅब दारात बदल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, त्यानुसार पुढीलप्रमाणे बदल होणार आहेत. ३ लाख ते ६ लाख ५ टक्के कर, ६ लाख ते ९ लाख १० टक्के कर, ९ लाख ते १२ लाख १५ टक्के कर, १२ लाख ते १५ लाख २० टक्के कर आणि १५ लाखांहून अधिक उत्पन्नावर ३० टक्के कर आकारण्यात येणार आहे. पगारदार वर्ग आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांसह पेन्शनधारकांसाठी, ज्यांचे उत्पन्न १५.५ लाख किंवा त्याहून अधिक उत्पन्न असलेल्या पगारदार व्यक्तीला ५२,५०० चा फायदा होईल अशी तरतूद करण्यात आली आहे. सदरचा फायदा हा नव्या कर प्रणालीमध्येच उपलब्ध होणार आहे.

– महेश मलुष्टे

दिनेश कार्तिक आता नव्या भूमिकेत

मुंबई (वृत्तसंस्था) : फिनिशर खेळाडू म्हणून प्रसिद्ध असलेला भारताचा दिनेश कार्तिक आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत नव्या भूमिकेत दिसणार आहे. भारताचा हा यष्टीरक्षक फिनिशर मैदानावर नव्हे, तर तो कॉमेंट्री बॉक्समध्ये भारताची जबाबदारी सांभाळणार आहे. त्याने स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे आणि यासाठी तो स्वतः उत्सुक असल्याचे त्याने म्हटले आहे.

दिनेश कार्तिकने याआधी वनडे, कसोटी आणि टी-२० मध्ये कॉमेंट्री केली आहे, मात्र तो पहिल्यांदाच भारतात होणाऱ्या कसोटी सामन्याची कॉमेंट्री करणार आहे. त्याने ट्विट करून आपला उत्साह व्यक्त केला आहे. दिनेश कार्तिकच्या या ट्विटवर अनेक दिगज्जांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर चाहत्यांनी ही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

रस्ता गेला चोरीला, सरपंच बसणार उपोषणाला

इगतपुरी (प्रतिनिधी ): इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव येथील रस्ता चोरी झाला असल्याची तक्रार सरपंच संगीता भाऊसाहेब धोंगडे यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे केली आहे. याबाबत तक्रारीची प्रत ग्रामविकास मंत्री, जिल्हाधिकारी, वाडीवऱ्हे पोलीस ठाणे यांना पाठवण्यात आलेली आहे.

हा चोरी झालेला रस्ता शोधून न दिल्यास उपोषण करणार असल्याचे सरपंच सौ. संगीता धोंगडे यांनी सांगितले. शासकीय निधीतून होणारा खर्च जनतेसाठी खर्च व्हावा, कोणाच्याही खिशात हा निधी जाऊ देणार नाही. ह्या प्रकरणी सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, संबंधित व्यक्तींकडून वसुली व्हावी, रस्ता शोधून द्यावा अशी मागणी भाऊसाहेब धोंगडे यांनी केली आहे.

दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले आहे की कुऱ्हेगाव येथे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी गावकऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद देऊन काशाबाई मंदिर ते हनुमान मंदिर हा १० लाखाचा रस्ता कॉंक्रिटीकरण काम मंजूर केले. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, कार्यारंभ आदेश सुद्धा देण्यात आला. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ह्या कामाची गावकऱ्यांनी जवळजवळ सहा महिने वाट पाहिली. त्यानंतर संबंधित विभागाकडे चौकशी केली असता रस्ता गावातून गायब झाला असे निदर्शनास आले. त्यामुळे सरपंच संगीता भाऊसाहेब धोंगडे यांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे. म्हणून कुऱ्हेगाव येथे खमंग चर्चा रंगली असून हा रस्ता नेमका गेला कुठे याची चर्चा आहे. हा रस्ता शोधून द्यावा अशी मागणी सरपंच धोंगडे यांनी केली आहे.