त्याचे दृष्टी ईश्वर दडला…

स्नेहा सुतार (गोवा)

भगवंत दाता | स्वामी तो आठवा आता || धृ || परामानंद प्रकाशवंत | ज्याला नाही आदी अंत | जो का ध्यानी अखंड संत | धरूनी जाती निर्गुण पंथ || आंतरिक्ष हे लावुनिया लय दक्ष होऊनी मोक्षसुखाला सहजसमाधी राहाता ||१|| जेथूनी झाली सकळ ही सृष्टी | याचा कर्ता न दिसें दृष्टी | म्हणवूनी होते मन हे कष्टी | ऐकुनी अवघ्या ग्रंथी गोष्टी | स्थावरजंगम नाना लीला विचित्र वर्णी | शोभत धरणी तापत तरणी अगम्य करणी चरित्र हे पाहता ||२|| ह्मणे सोहिरा अंगी जडला | आधीच आहे नाही घडला | प्राणी हा संदेही पडला | उपाधीत सापडला | त्याचे दृष्टी ईश्वर दडला | ऐसा वेदांती निवडीला | तो हा व्यापक आत्मा अंतरसाक्षी परिपूर्ण सनातन गोड दिसे गातां ||३||

ईश्वराचे रूप प्रत्येकाने आपापल्या परिने चितारलेले आहे. ज्याचे त्याचे रूपवर्णन अगम्य असेच. भगवंताला आठवावे ते त्याचे आनंद देणारे परम रूप. जे प्रकाशवंत आहे. ज्याच्या दर्शनाने सगळी किल्मिशे दूर होतात. ज्याला ना सुरुवात आहे, ना अंत आहे. जे रूप ध्यनी धरून संतमंडळी ध्यानस्थ होतात. ज्याच्या नामस्मरणे निर्गुण पंथाकडे आपोआपच पावले वळतात. त्याच्या नामातच एवढी किमया आहे की, या ठिकाणी एकरूप होता, मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो.

ईश्वर म्हणजे ते स्थान आहे, जिथे सृष्टीची निर्मिती झाली आहे. पण हो, तो कर्ता-करविता मात्र आपल्याला सहजासहजी दर्शन देत नाही. त्याला अनुभवावे ते ग्रंथातून, पुराणातून. त्या ईश्वराची नानाविध अगम्य रूपं, वेगवेगळ्या रूपातील त्याच्या वेगवेगळ्या लीला, ज्याने प्रत्येकाच्या मनात त्याच्याविषयी प्रेम निर्माण होते, कुतूहल निर्माण होते, असे ते त्याचे मोहक रूप. सरते शेवटी सोहिरोबानाथ स्वतःकडे कुतूहलाने पाहतात. हे ईश्वरचिंतन तर त्यांच्या मनी कायम दिवस-रात्र चालू असते. त्यांची ओळखही त्या ईश्वरापासूनच होते. ईश्वरमय अशा देहाची दृष्टीही ईश्वरमय झालेली असल्याने त्यांच्या दृष्टीतही ईश्वर दडला आहे. अशा वेदांताच्या पारायणाने त्याचे व त्या ईश्वराचे नाते अगदी दृढ होऊन त्या ईश्वराचे नामचिंतन करतानाचे त्यांचे स्वतःचे रूप सुंदर भासते.

sonchafisneha@gmail.com

कल्याणच्या ‘ताल’ बारमध्ये पोलीस ‘बेताल’

पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक

कल्याण (वार्ताहर) : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्राबार मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बार उशिरापर्यंत सुरू ठेवा, अशी धमकी बार मॅनेजरला दिली. कल्याणच्या ‘ताल’ बारमध्ये सोमवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात या पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या सहाजणांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम घोडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

टिटवाळा येथे राहणारा शेखर सरनोबत आपल्या काही मित्रांसोबत कल्याण पश्चिमेतील ‘ताल’ बारमध्ये पार्टी करण्यासाठी आला होता. शेखर सोबत त्याचे पोलीस मित्र उत्तम घोडे, मंगल सिंग चौहान, रिकीन गज्जर, हरिश्याम सिंह, विक्रांत बेलेकर हे होते. घोडे हा पोलीस कर्मचारी टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. रात्री बारमध्ये गाणे सुरु होते. मद्यधुंद अवस्थेत या सहा लोकांनी गाणे यापुढेही सुरू ठेवावे अशी मागणी बार मॅनेजर कडे केली. बार मॅनेजरने स्पष्टपणे सांगितले बार बंद करण्याची वेळ झाली आहे, तुम्ही बिल भरा आणि निघून जा. हे ऐकताच या ६ जणांनी बारमध्ये धिंगाणा सुरू केला.

जवळपास एक तास हा धिंगाणा सुरू होता. ‘गाणे सुरू केले नाही तर आम्ही बिल भरणार नाही’, असे धमकावत हरीश्याम सिंग यांनी आपली लायसनची रिव्हॉल्वर टेबलावर ठेवत बार मॅनेजरला धमकी देण्यास सुरुवात केली. बिल न भरता सर्व सहा जणांनी बार बाहेर येऊन परत धिंगाणा सुरू केला. त्वरित याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या सर्व आरोपींना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. या ६ जणांना मंगळवारी कल्याण रेल्वे कोर्टात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास महात्मा फुले पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी देविदास ढोले हे करीत आहेत.

फलंदाजीचा क्रम जुळवण्यास भारत सज्ज

अबुधाबी (वृत्तसंस्था): भारताचा संघ दुसऱ्या सराव सामन्यात बुधवारी (२० ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाशी झुंजेल. या लढतीद्वारे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ फलंदाजीचा क्रम निश्चित करण्याचा प्रयत्न करेल.

भारत आणि ऑस्ट्रेलियाने आपापल्या सराव लढती जिंकल्या. भारताने इंग्लंडवर सात विकेटनी मात केली. माजी विजेत्यांकडून फलंदाजीत ईशान किशन, लोकेश राहुल आणि रिषभ पंत तसेच गोलंदाजीत अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने छाप पाडली. मुख्य स्पर्धेत लोकेशसह उपकर्णधार रोहित शर्मा ओपनरच्या भूमिकेत असतील. तसेच कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर उतरणार असल्याचे भारताच्या संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध राहुलसह डावाची सुरुवात करताना यष्टिरक्षक, फलंदाज ईशानने मोठी खेळी उभारली. त्यामुळे त्याचे अंतिम संघातील स्थानासाठी दावेदारी पेश केली आहे. सूर्यकुमार यादवच्या आधी संधी मिळालेला नियोजित विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतने बॅटिंगमध्ये चमक दाखवली.

इंग्लंडविरुद्ध न खेळलेला रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्याने फटकेबाजी केली तरी तो कम्फर्टेबल वाटला नाही. त्याच्याकडून गोलंदाजीही करवून घेतली गेली नाही. पहिल्या सराव लढतीत शमीनंतर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा तसेच ऑफस्पिनर आर. अश्विनने प्रभावी मारा केला तरी अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि लेगस्पिनर राहुल चहरला प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व राखता आले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजासह वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर आणि वरुण चक्रवर्तीला संधी मिळू शकते.

ऑस्ट्रेलियानेही सराव सामन्यांत न्यूझीलंडला तीन विकेटनी हरवून विजयी सुरुवात केली. जोश इंग्लिसने शेवटच्या षटकात दोन चौकार ठोकल्याने त्यांचा विजय सुकर झाला. मात्र, अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला खाते उघडता आले नाही. परंतु, आघाडी फळीत माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथसह कर्णधार आरोन फिंच, मिचेल मार्श तसेच मधल्या फळीत अॅश्टन अॅगरने थोडा फार फलंदाजीचा सराव केला. गोलंदाजीत लेगस्पिनर अॅडम झम्पा आणि केन रिचर्डसनने छाप पाडली. परंतु, मिचेल मार्श महागडा ठरला. भारताविरुद्ध कांगारू संघ व्यवस्थापन अन्य क्रिकेटपटूंना संधी देताना मुख्य फेरीत योग्य संघ निवडण्यादृष्टीने प्रयत्न करेल.

वेळ : दु. ३.३० वा.

इंग्लंडसह न्यूझीलंड चुका सुधारण्यास उत्सुक

सराव लढतींमध्ये बुधवारी होणाऱ्या आणखी एका सामन्यात इंग्लंड आणि न्यूझीलंड आमनेसामने आहेत. पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने दोन्ही संघ चुका सुधारण्यास उत्सुक आहेत. सोमवारी इंग्लंडला भारताविरुद्ध तसेच ऑस्ट्रेलियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पाहावा लागला. इंग्लंडची फलंदाजी बहरली तरी गोलंदाजांनी निराशा केली. न्यूझीलंडची ढेपाळलेली बॅटिंग ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यास पुरेशी ठरली. किवींच्या गोलंदाजांनी मॅचमध्ये रंगत आणली तरी तुलनेत कमी आव्हानामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

पाकिस्तान-द. आफ्रिका आमनेसामने

वेस्ट इंडिजची गाठ अफगाणिस्तानशी

सराव सामन्यांच्या सायंकाळच्या लढतींमध्ये पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजची गाठ अफगाणिस्तानशी आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने चांगला सराव करताना आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व राखले. पाकिस्तानने वेस्ट इंडिजला ७ विकेटनी हरवले. द. आफ्रिकेने अफगाणिस्तानचा ४१ धावांनी पराभव केला. दोन्ही लढतीत गोलंदाजांनी छाप पाडली. त्यामुळे बुधवारी पाकिस्तान आणि द. आफ्रिकेतील फलंदाजांच्या सरावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या सामन्यात अपेक्षित सराव न झाल्याने वेस्ट इंडिजचे फलंदाज निराश झालेत. त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध बॅटिंगचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी आहे.

वेळ : सायं. ७.३० वा.

अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला अटक

मुंबई (प्रतिनिधी) : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करणाऱ्या सुरेश पुजारी याला बेड्या ठोकण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस सुरेश पुजारीच्या मागावर होते.

सुरेश पुजारीने २००७मध्ये भारताबाहेर पलायन केले होते. तेव्हापासून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जात होते. अखेर, पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक करण्यात आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार सुरेश पुजारीला १५ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली असल्याचे समजते. आता फिलिपिन्समधून त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरेश पुजारी मुंबई पोलिसांप्रमाणेच एफबीआय आणि सीबीआयच्या देखील रडारवरही होता. एफबीआयनेच त्याला संयुक्त कारवाईमध्ये अटक केल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महत्त्वाच्या तपास यंत्रणा सुरेश पुजारीच्या मागावर होत्या. गेल्या महिन्यात २१ सप्टेंबर रोजी सुरेश पुजारी फिलिपिन्समध्ये असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांनी याची माहिती इंटरपोलला दिल्यानंतर त्याच्या अटकेसाठी पावले उचलण्यात आली. अखेर त्याला फिलिपिन्सच्या परांकी शहरातून एका इमारतीच्या बाहेर तो उभा असताना अटक करण्यात आली आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी भाजप करणार निदर्शने

मुंबई : भाजप कामगार आघाडी संलग्न बेस्ट कामगार संघाच्या वतीने बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी निदर्शने करण्यात येणार आहे. वडाळा आगार येथे मोठ्या संख्यने निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती भाजप बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी दिली.

बेस्ट अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या ‘अ’ अर्थसंकल्पात विलीनीकरण करा, बेस्ट बस चालक इतर आस्थापनासाठी भाड्याने देण्याचा प्रस्ताव मागे घ्या, स्वतःच्या मालकीच्या बस ताफा कायमस्वरूपी राखा, कोविड चार्जशीट रद्द करा, कोविड भत्ता व एल.टी.ए. लवकरात लवकर द्या, बेस्ट कामगारांना सन २०२१ वर्षाचा सानुग्रह अनुदान मुंबई महानगरपालिका कर्मचऱ्यांप्रमाणे मिळाला पाहिजे या मागण्यांसाठी निदर्शने करण्यात येणार आहेत.

स्कॉटलंडचा सलग दुसरा विजय

अल-अमिरात (वृत्तसंस्था): पापुआ न्यू गिनी संघावर (पीएनजी) १७ धावांनी मात करत स्कॉटलंडने टी-ट्वेन्टी वर्ल्डकपसलग दुसरा विजय नोंदवला. तसेच चार गुणांसह पहिल्या फेरीत (ब गट गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

स्कॉटलंडचे १६५ धावांचे आव्हान पीएनजी संघाला पेलवले नाही. त्यांचा डाव १९.३ षटकांत १४८ धावांवर आटोपला. पापुआ न्यू गिनीला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. त्यांचे टॉनी उरा, लेगा सायका, अस्साद वाला, चार्ल्स अमिनी आणि सिमॉन अटई स्वस्तात बाद झाले. त्यामुळे ६ बाद ६७ धावा अशी त्यांची अवस्था झाली. सेसे बाऊ (२४ धावा)आणि नॉर्मन वानुआने चांगली खेळी केली. मात्र विजय मिळवून देण्यात अपयश आले. नॉर्मन वानुआ ४७ धावा करून बाद झाला. तिथेच पीएनजीचा पराभव निश्चित झाला. स्कॉटलंडकडून मध्यमगती गोलंदाज जोशुआ डॅवीने ४ विकेट घेत विजयात मोलाचे योगदान दिले.

त्याआधी, स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १६५ धावा केल्या. त्याचे क्रेडिट रिची बेरिंगटनला जाते. त्याने ४९ चेंडूंत ७० धावांचे सर्वाधिक योगदान दिले. जॉर्ज मुनसी (१५) आणि काइल कोएत्झर (६) ही सलामी जोडी अपयशी ठरल्यानंतर मॅथ्यू क्रॉस आणि रिची बेरिंगटन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. मॅथ्यू क्रॉसने ४५ धावा तर रिची बेरिंगटनने ७० धावांची खेळी केली. त्यानंतर मैदानात आलेले फलंदाज चांगली कामगिरी करू शकले नाही. एका पाठोपाठ एक करत बाद झाले. कलुम मॅकलेड (१०), मायकल लीक्स (९), ख्रिस ग्रीव्ह (२), मार्क वॅट (०), जोश डॅवे (०) अशी धावसंख्या करून बाद झाले. पापुआ न्यू गिनीकडून कॅबुओ मोरियाने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या.

स्कॉटिश मुख्य फेरीच्या दिशेने

स्कॉटलंडचा संघ पात्रता फेरीतील ब गटात दोन विजयांसह अव्वल स्थानी आहे. स्कॉटलंडच्या खात्यात आता ४ गुण असून धावगती +०.५७५ इतकी आहे. स्कॉटलंडचा गटातील तिसरा आणि अंतिम सामना ओमानविरुद्ध आहे.

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगचा ‘पुनश्च हरिओम’

लुसान (वृत्तसंस्था) : रिओ ऑलिम्पिकदरम्यानच्या सामना निश्चितीच्या (फिक्सिंग) आरोपांसह वादात सापडलेल्या एआयबीए अर्थात आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने बेलग्रेडमध्ये (सर्बिया) होणाऱ्या पुरुषांच्या जागतिक स्पर्धेद्वारे आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगची नव्याने (पुनश्च हरिओम) सुरुवात करण्याचे ठरवले आहे.

या स्पर्धेंसह भविष्यातील स्पर्धांमध्ये ग्लोव्हजचे रंग बदलण्यासह विजेत्याला बक्षीस म्हणून बेल्ट दिला जाणार आहे. बॉक्सर्सच्या ग्लोव्हजचा रंग पांढरा असेल. यापूर्वी, लाल आणि निळ्या रंगातील ग्लोव्हज वापरले जात होते. त्यावर एआयबीएचा लोगो असेल. पांढरे ग्लोव्हज हे आमच्या नव्या सुरुवातीचे प्रतीक असेल. प्रत्येक स्पर्धेतील निकालात पारदर्शकता, असेल, अशी माहिती एआयबीएचे अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांनी दिली आहे.

जागतिक स्पर्धा

२४ ऑक्टोबरपासून एआयबीएची जागतिक स्पर्धा २४ ऑक्टोबरपासून बेलग्रेडमध्ये खेळली जाणार आहेत. यात भारतासह १०० देशांचे ६००हून अधिक बॉक्सर सहभागी होणार आहेत. जागतिक स्पर्धेतील पदके ही संबंधित धातूंनी भरलेली असतील. त्या शिवाय, विजेत्यांसाठी २.६ दशलक्ष डॉलर इतके एकूण बक्षीस असेल.

ठाण्यात ‘रब्बी’चे क्षेत्र विस्तारासाठी प्रयत्न

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यात रब्बी हंगामात दुबार पिके घेण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित हरभरा बियाणे वाटप सप्ताह दि. २४ ऑक्टोबरपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. भात पड क्षेत्रात हरभरा पिकाची प्रात्यक्षिके ७४५ हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येत आहेत. त्यासाठी ४४७ क्विंटल बियाणांचा पुरवठा तालुकास्तरावर करण्यात आल्याची माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आली.

जिल्ह्यात खरीप हंगामात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिके घेतली जातात. त्यात प्रामुख्याने ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाचा समावेश होतो. उर्वरित क्षेत्रावर नाचणी, वरी, कडधान्ये व बांधावर तूर घेतली जाते. जिल्ह्यात रब्बी हंगामात पाहिजे त्या प्रमाणात पिके घेतली जात नाहीत. या हंगामातही दुबार पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी सांगितले.

भेंडी निर्यातीसाठी प्रयत्न यावर्षी रब्बी उन्हाळी हंगामात कडधान्य पिकाबरोबरच भाजीपाला क्षेत्र वाढीसाठीही विस्तार करण्यात येत आहे. निर्यातक्षम भाजीपाला उत्पादनासाठी भेंडी लागवड शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येत आहे. भेंडीची निर्यात करणे सोयीस्कर व्हावे यासाठी भेंडी उत्पादक शेतकऱ्यांची व्हेजनेट प्रणालीद्वारे नोंदणी केली जात आहे.

जिल्ह्यात रब्बी उन्हाळी हंगामात कडधान्य, गळीतधान्य, भाजीपाला लागवड व तृणधान्यमध्ये मका पिकाचा क्षेत्र विस्तारात समावेश करून एकूण क्षेत्र १२ हजार हेक्टरवर नियोजन केले आहे. १८ ऑक्टोबर २०२१ पासून जिल्हा कृषी विभागामार्फत हरभरा प्रमाणित बियाणे वितरण सप्ताह साजरा केला जात आहे. त्या माध्यमातून हरभरा क्षेत्र विस्तारासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे माने यांनी सांगितले. कडधान्य विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रात्यक्षिक घेण्यात येत असून खरीप हंगामात बांधावर तूर लागवडीच्या कार्यक्रमाचे २९२ हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके घेण्यात आले असून ६२.५४ क्विंटल बियाणे वाटप करण्यात आले आहे.

भात पड क्षेत्रात (भाताच्या काढणीनंतर मोकळे असलेले शेत) कडधान्य विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दुबार पिकाची लागवड करण्यासाठी हरभरा पिकाची प्रात्यक्षिके ७४५ हेक्टर क्षेत्रावर घेण्यात येत आहेत. त्यासाठी ४४७ क्विंटल बियाणांचा पुरवठा तालुका स्तरावर करण्यात आलेला आहे. भात पड क्षेत्रावर गळीतधान्य पिकाची लागवडीसाठी जिल्ह्यात १६२ हेक्टर क्षेत्रावर भुईमूग पिकाची प्रात्यक्षिके घेण्यात येणार असून ९७ क्विंटल भुईमूग बियाणे वाटप करण्यात येणार असल्याचे माने यांनी सांगितले.

कुडाळमध्ये अनधिकृत वाळू उत्खननाला दणका

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील अनधिकृत वाळू उत्खनन होणाऱ्या सोनवडे, वालावल व कवठी येथील सुमारे ३९ रॅम्प कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी उद्ध्वस्त केले. एकाच वेळी एवढे रॅम्प उद्ध्वस्त करण्याची कुडाळ तालुक्यातील पहिलीच घटना आहे.

कुडाळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे. राजरोसपणे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डंपर गोव्याच्या दिशेने जात असतात मात्र कोणतेही प्रशासन कारवाई करताना दिसत नाही. तथापि, कुडाळ तालुका तहसीलदार अमोल पाठक यांनी तालुक्यातील अनधिकृत वाळू उपसा होणाऱ्या सोनवडे, वालावल व कवठी या गावांमध्ये असलेले अनधिकृत रॅम्पवर सोमवारी एकाच दिवशी कारवाई केली. ही कारवाई दिवसभर सुरू होती.

यामध्ये सोनवडे येथील १४ रॅम्प, वालावल येथील १२ रॅम्प, कवठी येथील १३ रॅम्प नष्ट करण्यात आले आहेत. तहसीलदार अमोल पाठक यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आता हे रॅम्प उद्ध्वस्त केले आहेत. पुढील कारवाई ही होड्यांवर केली जाईल. अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे ते बंद करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

रेशन दुकानावरील मोफत धान्य नेमके जाते कुठे?

रत्नागिरी (वार्ताहर) : कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागल्यानंतर नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक कोरोनाचा मुकाबला करण्याबरोबरच लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करताना चार घास खात होता. मात्र हे धान्य गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना मिळाले नसल्याची ओरड सुरू आहे. शासनाकडून येणारे हे धान्य नेमके जाते कुठे? याचा शोध आता घेतला जात आहे.

कोरोनाच्या काळात मोफत धान्य रेशन दुकानावर दिले जाणार होते. हे धान्य अनेक गावांत तसेच रेशनकार्डावर अनेकांना मिळाले नसल्याचे पुढे आले असून काही रेशन दुकानांवर बायोमॅट्रीक पद्धतीने या धान्याची विक्रीच केली जात नसल्याचेही समोर आले आहे. धान्य अगोदर दिले जाते आणि बायोमॅट्रीक (अंगठा) नंतर घेतला जातो. पण रेशनच दिले जात नाही, असे घडत असल्याने त्याचा शोध घेणे सरकारला क्रमप्राप्त झाले आहे.

सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अन्नधान्यामुळे गोडावून मात्र तुडुंब भरली आहेत. पण प्रत्यक्षात रेशनदुकानावर हे धान्यच उपलब्ध नसते. कधी रेशन दुकानच नियमित वेळेत उघडी नसतात. याची तपासणी अधिकारी करत नाहीत. जरी अधिकारी तपासणी करत असले तरी त्यावर नियंत्रण ठेवणारे कर्मचारी कमी असल्याने त्याचा फायदा रेशन दुकानदारांकडून घेतला जात आहे. अनेकवेळा शासकीय दुकानातूनही ते नियोजितवेळी उघडले जात नाही. याकडे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.