दिवा लाविते दिवा…

श्रीनिवास बेलसरे

भारतीय संस्कृती जशी अध्यात्म-केंद्रित आहे तशीच जीवनाकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने बघून जगण्याचा सोहळा करून टाकणारी उत्सवप्रेमी संस्कृती आहे. म्हणूनच आपण वर्षभर कोणते ना कोणते सण साजरे करतच असतो. शिवाय त्यांचा संबंध आपल्या पूर्वजांनी इथल्या ऋतूनुसार हवामानात होणाऱ्या बदलांशी, उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींशी जोडला. त्यामुळे आपण थंडीत, जेव्हा शरीराला जास्त कॅलरीची गरज असते तेव्हा, संक्रांतीला तीळगुळाची, तर होळीला पुरणाची पोळी, गुढी पाडव्याला कडुलिंबाचा कोवळा मोहोर गुळाबरोबर खातो. तर पावसाळ्यात, जेव्हा पचनक्रिया मंदावते तेव्हा, चातुर्मासाचे उपवासही करतो. उन्हाळ्यात चैत्रगौरीला कैरीचे पन्हे पितो. आपल्या दैवतांच्या जयंतीला होणारे प्रसाद सुद्धा फार विचारपूर्वक ठरवलेले आहेत.

सर्व सणाचा राजा दिवाळी आहे, हेही खरेच! दिवाळी म्हणजे उत्सव, आनंद, उत्साह! कापणी होऊन गेलेली असल्याने शेतकरी निश्चिंत झालेला असतो. नवे धान्य येऊन पडलेले असते. वर्षभर समृद्धी घरात नांदणार याची खात्री झाल्याने आनंद साजरा करायची सर्वांचीच इच्छा असते. त्यात हा दिव्यांचा सण सगळ्या आसमंतात आनंद पसरवतो.

पूर्वी सर्व भाषांतील सिनेमात दिवाळीची नोंद घेतलेली असायची. त्यात पती-पत्नीचे प्रेम, भावा-बहिणीचे प्रेम, शेतीतील प्राण्याबद्दलची कृतज्ञता, असे सगळे चित्रित केलेले असायचे. अलीकडे सिनेमात भारतीय देव क्वचितच दिसतात. भजने आणि आरत्यांच्या जागी कव्वाल्या आणि सुफी गाणी व भगवान शंकर, गणेश, हनुमान या देवतांच्या नावाच्या जागी खुदा, अल्ला, मौला केवळ हेच शब्द ऐकू येतात. जुन्या सिनेमात अल्लाहबरोबरच संतोषीमाता, माँ शेरोवाली, गणपती, शंकर अशा देवताही दिसत असत. अगदी परवापरवाच्या शोलेत धर्मेंद्र-हेमामालिनीला लग्नाला तयार करण्यासाठी भगवान शंकराच्या मूर्तीमागून बोलतो असा सीन होता.

सिनेमात बहुतेक सणावर खास लिहिलेली गाणी असत. त्यात कदाचित सर्वात जास्त गाणी दिवाळीवरचीच असतील! ‘तू सुखी राहा’ नावाच्या १९६३साली आलेल्या सिनेमात गदिमांनी लिहिलेले, आशाताईंनी गायलेले आणि वसंत पवारांनी संगीत दिलेले गाणे होते –

नवीन आले साल आजला
उजेड पडला नवा, दिवा लाविते दिवा

त्यात नायिका भाऊबीजेसाठी घरी आलेल्या आपल्या मामांचे वर्णन ‘चंद्र’ तर आपल्या आईचे वर्णन ‘धरणी’ असे करते –

घरी पाहुणे आले मामा
धरणीच्या घरी जसा चंद्रमा
अंधाराला येई उजाळा
थंड सुवासिक हवा,
दिवा लाविते दिवा…

‘ते माझे घर’ नावाचा सिनेमा आला होता १९६२ला! सुधीर फडकेंचे संगीत आणि आवाज पुन्हा आशाताईंचा! रवींद्र भटांचे शब्द होते –

तबकामध्ये इथे तेवती निरांजनाच्या वाती,
दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते, तुझी न् माझी प्रीती

एकेकाळचे लोकप्रिय गाणे! यात तर गीतकारांनी दिवसापेक्षा रात्र मोठी असणाऱ्या या काळातील आकाशात चमचमणाऱ्या तारकांचे होणारे सुंदर दर्शन आणि दिवाळीनिमित्त सगळीकडे लावलेल्या दिव्यांची छान तुलना केली होती –

समईसंगे आज उजळल्या या नयनांच्या वाती
आकाशातील नक्षत्रांच्या लक्ष लाविल्या ज्योती
दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते, तुझी न् माझी प्रीती

कवीने तर अगदी पाडव्याच्या महत्त्वाचाही वेगळा उल्लेख केला होता –

सुवासिनी मी वाट पाहते घेऊन पूजा हाती,
आज उगवला दिन सोन्याचा हितगुज येई ओठी,
पतिदेवाला पूजायाला भावफुलांची दाटी,
दिवाळीत या मंगळसूत्रा शोभा येईल कंठी,
दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते, तुझी न् माझी प्रीती

भाबड्या एकनिष्ठ प्रेमाचा तो काळ! असेच एक दिवाळीची खास नोंद घेणारे गाणे ‘अष्टविनायक’(१९७९) या गाजलेल्या सिनेमात होते. अनुराधा पौडवाल या गोड आवाजाच्या गायिकेने अनिल-अरुण यांच्या दिग्दर्शनात गायलेल्या मधुसूदन कालेलकरांच्या गीताचे शब्द होते –

आली माझ्या घरी ही दिवाळी,
सप्तरंगात न्हाऊन आली,
मंद चांदणे, धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे,
जन्मजन्म रे तुझ्या संगती एकरूप मी व्हावे,
प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे, कोर चंद्राची खुलते भाळी,
आली माझ्या घरी ही दिवाळी…

शिर्डी के साई बाबा (१९७७) हाही खूप गाजलेला सिनेमा! त्यात आशाताईंनी गायलेले असेच एक ‘दिवाळी गीत’ होते! गीतकार आणि संगीतकार होते पांडुरंग दीक्षित! राजेंद्रकुमार, मनोजकुमार, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, सुधीर दळवी अशा नामवंतांच्या भूमिका असलेल्या शिर्डी के साईबाबा नावाच्या त्या सिनेमातील हे सुंदर गाणे होते-

दीपावली, मनाये सुहानी दीपावली,
मेरे साई के हाथों में जादू का पानी
दीपावली मनाये सुहानी,
मेरे बाबा के हाथों में जादू का पानी,
दीपावली…

त्याकाळी हिंदी सिनेमा काहीही नुसते हवेत सोडून देत नसत. गाण्यातून द्यायचा संदेश गीतकार दीक्षितांनी अगदी स्पष्ट केला होता.

श्रद्धा के दीपक भक्ती की ज्योती,
सत्य प्रेम की जलती निशानी,
दीपावली मनाई सुहानी!

आज जेव्हा आपण सगळ्या गोष्टी विकत आणून दिवाळी साजरी करतो तेव्हा जुन्या दिवाळीची आठवण येतेच. या गाण्यांची आणि त्यात व्यक्त झालेल्या निरागस भावभावनांची आठवण येते. मनात वारंवार विचार येत राहतो, अंधारावर उजेडाच्या विजयाचा संदेश देणारा हा आगळा सण उत्साहात साजरा करताना आपण त्यांच्या मूळ आशयापासून खूप दूर तर आलेलो नाही ना?

ट्रॉफी हुकली, पण पाकिस्तानने मने जिंकली

सुनील सकपाळ

मुंबई : सातव्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठीचा प्रबळ दावेदार पाकिस्तान संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. बाबर आझम आणि सहकाऱ्यांनी सलग पाच विजय मिळवताना भन्नाट खेळ केला. मात्र, ऑस्ट्रेलियापुढे काहीच चालले नाही. पाकिस्तानच्या युवा संघाला ट्रॉफी उंचावण्यात अपयश आले तरी त्यांनी क्रिकेटचाहत्यांची मने जिंकली.

पराभवाला जबाबदार कोण आफ्रिदी की हसन अली?

पाकिस्तानच्या पराभवासाठी मॅथ्यू वॅडेची कॅच सोडणारा हसन अली आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांना जबाबदार ठरवले जात आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांचे समजू शकतो. मात्र, पाकिस्तानचा कर्णधार आझमचेही आश्चर्य वाटते. वॅडेचा झेल टिपला गेला असता तर कदाचित जिंकलो असतो, तसे त्याने सामना संपल्यानंतर सांगितले. समजा, वॅडे बाद झाला असता तरी मार्कस स्टॉइनिस मैदानावर होता. आपल्या सहकाऱ्याने आक्रमक पवित्रा घेतल्याने त्याने एक बाजू टिकवून ठेवली. पॅट कमिन्स किंवा मिचेल स्टार्क यांच्यातही फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. शिवाय, ऑस्ट्रेलियाने सहा चेंडू राखून सामना जिंकला, हेही विसरू नका. वॅडे बाद झाला असता तर कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा निकाल लांबला असता. हसन अलीला सीमारेषेवर चेंडू जज करता आला नाही, हे मान्य आहे. मग स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने शेवटचे दोन चेंडू त्याच पद्धती (यॉर्कर) टाकण्याची गरज काय होती. वॅडेने प्रतिस्पर्धी गोलंदाजाची कमकुवत बाब ओळखली आणि शेवटचे दोन सिक्सर एका एकाच पद्धतीने मारले. मुळात क्रिकेट सांघिक खेळ आहे. यात यशासाठी सर्वच्या सर्व ११ जण जबाबदार असतात. त्याचप्रमाणे पराभवाची जबाबदारीही संपूर्ण संघाचीच असते.

कांगारूंकडून किवींचे अनुकरण

उपांत्य फेरीतील दोन्ही सामन्यांचे वैशिष्ट्य धावांचा यशस्वी पाठलाग. दोन्ही सामन्यांत टॉस जिंकलेल्या कर्णधाराने प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिला सामना अबुधाबीतील झायेद स्टेडियमवर झाला तर दुसरा दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने बाजी मारली तरी त्यांच्या फलंदाजांनी तयार केलेला प्लान योग्य प्रकारे अमलात आणला. न्यूझीलंड संघातून सलामीवीर डॅरिल मिचेलने एक बाजू लावून धरली. पाकिस्तानविरुद्ध तेच काम फॉर्मात असलेला सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने केले. डेव्हॉन कॉन्व्हे आणि जेम्स नीशॅनच्या रूपाने मार्कस स्टॉइनिस आणि मॅथ्यू वॅडे आला. कांगारू असो किंवा किवीज् फलंदाज. झटपट क्रिकेट असूनही संयम बाळगला. प्रतिस्पर्धी संघाला कुठे खिंडीत पकडायचे, याचा त्यांनी योग्य अभ्यास केला. त्यासाठी हाणामारीच्या षटकांची (स्लॉग) निवड केली. दोन्ही संघांच्या उंचावलेल्या फलंदाजीतील कॉमन बाब म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये निकाल न नेण्याचा निर्धार. न्यूझीलंडपेक्षा ऑस्ट्रेलियासमोरील आव्हान मोठे होते. परंतु, विचार करण्याची एकच पद्धत. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांचे प्लान चुकीचे ठरतात. सामना शेवटच्या षटकापर्यंत गेल्यास हुकमी बॉलरचा वापर करू, असे अनेक कर्णधार ठरवतात. मात्र, १९व्या षटकात सामना संपल्यास तोंडघशी पडतात. बाबर आझमने वॅडे आणि स्टॉइनिसची रणनीती ओळखत १९वे षटक फॉर्मात असलेल्या शाहीन शाह आफ्रिदीला दिले. मात्र, प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात आफ्रिदीलाही अपयश आले.

सलग पाच विजयानंतरचा पराभव जिव्हारी

सुपर-१२ फेरीत सर्वच्या सर्व पाच सामने जिंकणारा पाकिस्तान हा एकमेव संघ होता. गटवार साखळीत हार न मानल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आणि तोही सेमीफायनलमधील पराभव म्हटल्यानंतर पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अधिक वेळा बाद फेरीत (उपांत्य किंवा अंतिम फेरी) खेळण्याचा अनुभव ऑस्ट्रेलियाच्या कामी आला. कांगारूंची झटपट क्रिकेटमधील कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांनी विक्रमी पाच वेळा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. त्यात सलग तीन जेतेपदांचा समावेश आहे. सहा प्रयत्नांत एकदाही टी-ट्वेन्टी वर्ल्डकप उंचावता आला नसला तरी यंदाच्या हंगामासह तीन उपांत्य तसेच एकदा अंतिम फेरी (२०१०) गाठली आहे. पाकिस्तानने सुरुवातीच्या दोन हंगामांमध्ये फायनल प्रवेश करताना एकदा ट्रॉफीही पटकावली. त्यानंतर सलग दोनदा उपांत्य फेरी गाठली. मात्र, बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाला आयसीसी स्पर्धांच्या नॉकआउट सामन्यांत खेळण्याचा अनुभव कमी आहे. २०१६ टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये सुपर टेन, २०१९ वनडे वर्ल्डकप गटवार साखळीत आव्हान संपुष्टात आले. २०१८ आशिया चषकात उपांत्य फेरी आणि २०१७ आयसीसी चँपियन्स ट्रॉफीचे जेतेपद ही गेल्या चार वर्षांतील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.

पराभवातून बोध घ्यायचा असतो. पाकिस्तानच्या कर्णधाराने तसे बोलून दाखवले. मात्र, टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील उंचावलेल्या कामगिरीनंतर पाकिस्तान संघाकडून त्यांचे बोर्ड तसेच चाहत्यांच्या अपेक्षाा वाढल्यात हे नक्की.

विजेता कुणीही असो… पाकिस्तान संघाचा खेळ कायम लक्षात राहणार

सातव्या स्पर्धेच्या रूपाने जगाला नवा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप विजेता मिळणार आहे. यंदाची ट्रॉफी ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडकडे गेली तरी पाकिस्तानच्या जिगरबाज खेळाची कायम चर्चा राहणार. कर्णधार बाबर आझमने सहा सामन्यांत चार हाफ सेंच्युरी ठोकताना ३०३ धावा फटकावल्या आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान (३ अर्धशतकांसह २८१ धावा) त्याच्या पाठोपाठ आहे. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने धडाकेबाज सुरुवात केली. मात्र, त्याला सातत्य राखता आलेले नाही. लेगस्पिनर शादाब खानने मात्र, सातत्य राखले.

पालिका निवडणुकीसाठी पश्चिम उपनगराकडे राजकीय पक्षांचे लक्ष

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य मंत्रिमंडळाने २२७ वरून २३६ नगरसेवकांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र यात सर्वच पक्षांचे लक्ष हे पश्चिम उपनगराकडे लागले आहे. महापालिकेच्या निवडणुकीतील सत्तेचे गणित पश्चिम उपनगरातील संख्याबळावर निश्चित होईल असा अंदाज बांधला जात आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. यासाठी राज्य सरकारने नगरसेवकांची संख्या वाढवून २३६ केली आहे. भाजपने याला विरोध केला असून शिवसेना राजकीय हेतूंसाठी, निवडणूक जिंकण्यासाठी हे करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दरम्यान महापालिकेचे एकूण नगरसेवक हे २२७ आहेत. यापैकी सर्वात जास्त म्हणजे १०२ प्रभाग हे पश्चिम उपनगरात आहेत. त्यामुळे आता नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आली असली तरी नक्की कुठला प्रभाग वाढवला जाणार? याची अद्यापही माहिती नसल्याने सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष पश्चिम उपनगराकडे लागले आहे.

ऑक्टोबरमध्ये पालिका प्रशासनाने मुंबईतील प्रभागांच्या फेररचनेचा कच्चा आराखडा तयार करून निवडणूक आयोगाला सादर केला होता. त्यावर शिवसेना सोयीचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपने केला होता.

मुंबईत कोरोना नियंत्रणात

केवळ १५ इमारती सील

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्यानंतर आता सील बंद केलेल्या इमारतींची संख्या देखील कमी होताना पाहायला मिळत आहे. मुंबईत पूर्ण सील केलेल्या इमारती या आता केवळ १५ असल्याचे समजते.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा हाहाकार सुरू होता. तर कोरोनाला रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरण सुरू झाले. कोरोना प्रतिबंधक लस सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्या कमी व्हायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर दुसरी लाटही पालिकेने थोपवली असून सध्या मुंबईतील रुग्णसंख्या पाहता तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर दिसत आहे. मात्र असे असताना वर्षा अखेरपर्यंत मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

वर्षाअखेर पर्यंत सण किंवा त्यामुळे होणारी गर्दी पाहता पालिकेने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दिवसभरात २६२ रुग्णांची नोंद

दरम्यान मुंबईत शुक्रवारी नोंद झालेल्या कोरोना रुग्णाची संख्या ही २६२ आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या ही २९०६आहे. विशेष म्हणजे बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के इतका आहे. तर कोविड वाढीचा दर ०.०३ टक्के आणि रूग्ण दुपटीचा दर २१३६ दिवस आहे. तसेच पूर्ण सील केलेल्या इमारती या केवळ १५ आहेत तर कंटेन्मेंट झोन झोपडपट्टी आणि चाळींमध्ये शून्य असल्याचे समोर आले आहे.

सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवावी

आमदार नितेश राणे यांचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनांचे भांडवल करून शुक्रवारी राज्यातील अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेली दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत.

त्रिपुरा हिंसाचाराचे अमरावती, नांदेड, मालेगावात पडसाद

राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे. तसेच, मालेगावमध्ये पोलिसांनी परवानगी दिलेली नाही तरी मोर्चा निघतो, दगड फेकले जातात, ताकद दाखवली जातेय.

महाराष्ट्रात हिंदूंना घाबरवलं जातंय आणि महाराष्ट्र सरकार गप्प आहे, हे योग्य नाही. महाराष्ट्र सरकारने हे मोर्चे थांबवले नाहीत, तर हिंदूंचेही मोर्चे निघतील, हे राज्य सरकारने लक्षात ठेवावे, असा इशाराही आ. राणे यांनी दिला आहे.

त्रिपुरा हिंसाचाराचे अमरावती, नांदेड, मालेगावात पडसाद

मुंबई (प्रतिनिधी) : त्रिपुरातील हिंसाचाराचे पडसाद शुक्रवारी मुंबईसह महाराष्ट्रात उमटलेले पाहायला मिळाले. राज्यातील अमरावती, मालेगाव, नांदेड, भिवंडी यांसह अनेक शहरांत मुस्लीम संघटनांनी मोर्चे काढले. या मोर्चाला मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, तिन्ही शहरांत मोर्चाला हिंसक वळण लागल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली असून स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

त्रिपुरात काही िठकाणी जातीय हिंसाचाराच्या घटना घडल्याचे वृत्त असून त्याचा निषेध करण्यासाठी मुस्लीम संघटनांकडून अनेक भागांमध्ये बंद पाळण्यात येत आहे. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी निषेध मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांना अमरावती, मालेगाव, नांदेड या शहरांत हिंसक वळण लागले. मोर्चेकऱ्यांनी अनेक दुकानांची तोडफोड केली असून पोलिसांनाही काही ठिकाणी लक्ष्य करण्यात आले आहे. या घटनांनंतर अमरावतीत उद्या ‘बंद’ची हाक देण्यात आली आहे.

भिवंडीतही मुस्लीम समाजानं बंद पुकारला आहे. शहरातल्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. भिवंडीतल्या बंदला एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे. अमरावती शहरात दुकाने बंद ठेवत त्रिपुरातील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोर्चेकरी घरी परतत असताना काही जणांनी जयस्तंभ चौकात दुकानांवर दगडफेक केली आणि एका वाहनाची नासधूस करण्यात आली. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हिंगोलीत बंद

त्रिपुरा येथील हिंसाचाराचा हिंगोलीत दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. त्रिपुरातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मालेगावात दगडफेक

मालेगावात प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोठा जनसमुदाय निघाला होता. या निषेध मोर्चात जवळपास १० हजार लोक सहभागी झाले होते. निषेध मोर्चावेळी जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याने या मोर्चाला गालबोट लागले आहे, त्यामुळे जमावावर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

नांदेडमध्येही पडसाद

नांदेड येथे काही युवकांनी त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करत दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर हे युवक आक्रमक झाले. दुपारच्या वेळी शिवाजीनगर येथील दुकानांची नासधूस करत व्यापाऱ्यांना मारहाण करण्यात आली. यावेळी शिवाजीनगर, बरकत चौक, देगलूर नाका या भागात दगडफेक करण्यात आली. रस्त्यावर वाहन जाळत दारूच्या बाटल्या फोडण्यात आल्या. त्यामुळे नांदेड शहरात काही वेळ तणावाचे वातावरण होते.

कोलंबियावर मात; २०२२ फिफा वर्ल्डकपसाठी ब्राझील पात्र

साओ पावलो (वृत्तसंस्था) : पात्रता फेरीत कोलंबियावर १-० अशी मात करताना ब्राझीलने कतारमध्ये होणाऱ्या २०२२ फिफा वर्ल्डकपसाठी पात्रता सिद्ध केली आहे. विश्वचषक फुटबॉलसाठी पात्र ठरलेला ब्राझील हा पहिला दक्षिण अमेरिकन संघ आहे.

गुरुवारी झालेल्या सामन्यात लुकास पॅक्वेटाने ७२व्या मिनिटाला केलेला एकमेव गोल ठरला. त्याने मारलेला अचूक फटका कोलंबियाचा गोलकीपर डेव्हिड ऑस्पिनाला अडवता आला नाही. हा ब्राझीलचा सलग ११वा विजय आहे. कोलंबियाविरुद्धच्या विजयासह ब्राझीलने १० टीमचा समावेश असलेल्या दक्षिण अमेरिकन ग्रुपमधून १२ सामन्यांत ३४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. दुसऱ्या स्थानी असलेल्या अर्जेंटिनाच्या खात्यात २५ गुण आहे. या गटातील अव्वल चार संघ २०२२ फिफा वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील.

दुखापतग्रस्त कॉन्व्हे फायनलमध्ये खेळणार नाही

दुबई (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडचा यष्टिरक्षक, फलंदाज डेव्हॉन कॉन्व्हे हाताच्या दुखापतीमुळे टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या अंतिम फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार नाही.

उपांत्य फरीत इंग्लंडविरुद्ध कॉन्व्हेच्या हाताची दुखापत बळावली. क्ष-किरण चाचणीमध्ये दुखापत गंभीर असल्याचे दिसून आले. त्यानंतर अंतिम फेरीत तो उपलब्ध नसल्याचे न्यूझीलंड संघ व्यवस्थापनाने जाहीर केले.

उपांत्य फेरीत चौथ्या क्रमांकावर खेळताना ३८ चेंडूंत ४६ धावांची खेळी करताना इंग्लंडचे १६७ धावांचे आव्हान पार करण्यात कॉन्व्हेने मोलाचा वाटा उचलला. वर्ल्डकपच्या फायनलसह भारत दौऱ्यातील टी-ट्वेन्टी मालिकेलाही तो मुकला आहे.

आर्यन खानची एनसीबी कार्यालयात हजेरी

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अडकलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई कार्यालयात हजेरी लावली. वकिलांसह तो एनसीबी कार्यालयात आला होता. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तो माघारी परतला. मुख्य म्हणजे आर्यनचा १३ नोव्हेंबर रोजी वाढदिवस असून त्याला तपास यंत्रणेला सामोरे जावे लागले.

दरम्यान, ड्रग्ज पार्टी प्रकरणामुळे आर्यनचा वाढदिवस यंदा साधेपणानेच घरात साजरा केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. जवळपास एक महिना त्याला कोठडीत काढावा लागला. त्याची सध्या जामिनावर सुटका झाली असून जामीन मंजूर करताना मुंबई हायकोर्टाने त्याला १४ अटी घातल्या आहेत. त्यातील एक प्रमुख अट म्हणजे दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत त्याला एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्यास सांगण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या शुक्रवारी आर्यन एनसीबी कार्यालयात आला होता. त्यानंतर आजही आर्यनने एनसीबीपुढे हजेरी लावली.

आर्यन आज एनसीबी कार्यालयात आला तेव्हा त्याच्यासोबत त्याचे वकील होते. एनसीबीसमोर येऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तो माघारी परतला. यावेळी माध्यमांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, आर्यनने माध्यमांना टाळले. आर्यनच्या आधी याच प्रकरणातील अन्य एक आरोपी मुनमून धामेचा हिनेही एनसीबी कार्यालयात हजेरी लावली.

दरम्यान, ड्रग्ज पार्टी प्रकरणाला गंभीर वळण लागलेले आहे. यात खंडणीचा आरोप करण्यात आलेला आहे. आर्यनवर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच त्याच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी मागण्यात आली होती, असा याच प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईल याचा आरोप आहे. तसे प्रतिज्ञापत्रच त्याने दिले आहे. त्याने किरण गोसावी, सॅम डिसूझा या दोघांसह एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे नाव घेतले आहे. याचा तपास मुंबई पोलीस आणि एनसीबीचं पथक यांच्याकडून स्वतंत्रपणे सुरू आहे. या प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिला समन्स बजावण्यात आले असून तिच्यासह आर्यनचा जबाब नोंदवला जाणार आहे.

मॅक्सवेलकडून डीआरएस घेण्यास नकार

0

दुबई (वृत्तसंस्था) : मॅक्सवेलने डीआरएस घेण्यास मनाई केल्याने अंपायर्सनी बाद दिल्यानंतर डेव्हिड वॉर्नर मैदानाबाहेर पडला, असे ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू वॅडेने म्हटले आहे.

वॉर्नरने डीआरएस का घेतला नाही यावर, हो, आम्हाला याबद्दल जास्त बोलायला वेळ मिळाला नाही. फक्त एक दोन गोष्टी घडल्या, मला वाटते की काहीतरी आवाज आला, वॉर्नरलाच खात्री नव्हती की तो नेमका कसला आवाज आहे. चेंडू बॅटला लागला असे त्याला वाटत नव्हते, पण नॉन-स्ट्रायकर एंडवर मॅक्सवेलला काही आवाज ऐकू आला. अशा परिस्थितीत हे समजणे फार कठीण आहे. मॅक्सवेलने वॉर्नरला डीआरएस घेण्यास मनाई केली. नंतर अल्ट्राएजवर समजले की चेंडू बॅटला लागला नाही, असे वॅडेने या घटनेमागील रहस्य उलगडले आहे.

डेव्हिड वॉर्नर आणि मॅथ्यू वेड ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचे हीरो ठरले. वॉर्नर हा ३० चेंडूंत ४९ धावांवर असताना शादाब खानच्या गोलंदाजीवर यष्ट्यांमागे झेलबाद झाला. हा चेंडू वॉर्नरच्या बॅटला लागला नसल्याचे रिप्लेमध्ये दिसून आले. पण तरीही वॉर्नर पॅव्हेलियनमध्ये परतला.

वॉर्नर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाची पकड सैल होईल, असे वाटत असताना स्टॉइनिस आणि वॅडेने पाकिस्तानच्या तोंडातून विजयी घास हिरावून घेतला.