Friday, May 3, 2024
Homeदेशअतिवृष्टीमुळे नऊ जणांचा मृत्यू

अतिवृष्टीमुळे नऊ जणांचा मृत्यू

बंगळूर : राज्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगून पावसाच्या आपत्ती निवारणासाठी सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) चार पथके तैनात करणार आहेत, असे महसूलमंत्री आर. अशोक यांनी सांगितले. दरम्यान, राज्याच्या काही भागांत पावसाचा जोर कमी झाला असला, तरी अद्यापही धोका टळलेला नाही.

चिक्कमगळूर, मंगळूर, उडुपी, कोडगू, शिमोगा, दावणगेरे, हासन आणि उत्तर कन्नड या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन अशोक यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत २०४ हेक्टर शेतीचे आणि ४३१ हेक्टरवरील बागायती पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. २३ घरांचे पूर्ण नुकसान झाले.

‘एनडीआरएफ’च्या चार तुकड्या मंगळूर, कोडगू, बेळगाव आणि रायचूर येथे तैनात असतील. एक वेगळी टीम बंगळूरमधील परिस्थितीवर लक्ष ठेवेल. दरम्यान, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ)ही मॉन्सून संबंधित संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. पूर किंवा भूस्खलनाच्या वेळी तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक राखीव वाहन तयार ठेवले आहे.’’

राज्यातील काही भागांत आज पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले तरी दक्षिण कर्नाटक, मलनाड, किनारपट्टी प्रदेश आणि उत्तर कर्नाटकातील काही भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे. विजांच्या कडकडाटाने राज्यभरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिमोगा जिल्ह्याला प्रतिकूल हवामानाचा सर्वाधिक फटका बसला. बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. शहरातील पूरग्रस्त रस्त्यांवरून वाहतूक करताना वाहनधारकांची दमछाक झाली. शिमोगा येथील स्थानिक प्रशासनाने काल शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती.

संततधार पावसाने जुन्या म्हैसूर भागातील अनेक तलाव भरले. हुनसूर तालुक्यातील लक्ष्मणतीर्थ नदी कोडगूच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. म्हैसूर जिल्ह्यातील अलिग्रामाजवळ कालव्याला तडा गेल्याने सुपारी, केळी आणि नारळाची अनेक एकर लागवड पाण्याखाली गेली. म्हैसूर येथील विडी कामगार वसाहतीमधील ८० हून अधिक घरे पाण्याखाली गेली आहेत. हारणगी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने पातळी वाढली आहे. २४ तासांत मडिकेरी शहरात नऊ सेंटिमीटर पावसाची नोंद झाली. हसन आणि चिक्कमगळूर जिल्ह्यांतील अनेक भागात काल जोरदार पाऊस सुरूच होता.

कोप्पळ, विजयनगर, बळ्ळारी, दावणगेरे आणि चित्रदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे अनेक शाळांच्या इमारती व घरांचे नुकसान झाले. काल कल्याण जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने एका महिलेसह दोन शेतकरी आणि जनावरांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत, यादगीर जिल्ह्यातील हुनसगी तालुक्यातील होरट्टी येथे भीमप्पा कोडली (वय ६२) हे त्यांच्या शेतातील झाडाखाली आश्रय घेत असताना वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -