Friday, May 17, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखफेरीवाले, रिक्षाचालक; शिस्त कोण लावणार?

फेरीवाले, रिक्षाचालक; शिस्त कोण लावणार?

रोज सकाळी उठून कार्यालय किंवा रोजगाराची, कामाची ठिकाणे गाठण्यासाठी मुंबई, ठाणे परिसर म्हणजेच महामुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांना मोठी कसरत करत कधीकधी ‘जान हथेली पर’ घेऊन प्रवास करावा लागतो. सर्वच रेल्वे स्थानकांच्या परिसरात कमी अधिक प्रमाणात अशीच नरकपुरी दिसेल. वेड्यावाकड्या लावलेल्या रिक्षा… रिक्षाचालकांचा आरडाओरडा, डोकेदुखी होईल असा कमालीचा गोंगाट… जमिनीवर सर्वत्र कचरा, धूळ, प्रदूषण… त्यातून वाट काढत पुढे जावे तर फेरीवाले, टपरीवाल्यांनी पदपथ अडवलेला… मध्येच एखादी बेस्टची बस रस्ता अडवून उभी… आणि रिक्षावाले व बसवाले यांच्यातील हमरीतुमरी… हे प्रकार तर नित्याचेच. उपनगरीय लोकल ही चाकरमान्यांची लाईफलाईन समजली जाते. मुंबई, ठाणे आणि ठाण्याच्या पलीकडे अगदी बदलापूरपर्यंत रोज लाखो चाकरमानी पोटापाण्यासाठी या लाईफलाईनने प्रवास करतात. सकाळ , संध्याकाळच्या वेळेची लोकलमधील गर्दी ही पाचवीला पुजलेली असली, तरी रोज या प्रवासासाठी गाठाव्या लागणाऱ्या रेल्वे स्थानकांच्या परिसरातून वाट काढताना नरकपुरी वाटावी अशा प्रचंड बजबजपुरीच्या ‘छळा’लाही चाकरमान्यांना सामोरे जावे लागत आहे.

अस्ताव्यस्त आणि मनमानीप्रमाणे पसरलेले व सतत वाढत चाललेले छोटे – मोठे फेरीवाले, त्यांच्या जोडीला जणू पाचवीला पुजल्याप्रमाणे बेशिस्त रिक्षावाल्यांचा गलका आणि घोळका, तर काही ठकाणी बेकायदा बांधकामांचीही गर्दी अशा बजबजपुरीने सगळ्याच स्थानकांना घेरल्याचे त्रासदायक चित्र दिसत आहे. गेले कित्येक दिवस न बदललेली ही स्थिती सुधारण्याची खरीखुरी जबाबदारी ही संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि रेल्वे प्रशासनाची आहे. सध्या नगरसेवक नसल्याने संबंधित पालिका अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणा कधी कधी धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याने त्यांच्या डोळ्यांना जणू पट्टी बांधलेली आहे. कारण त्यांची उपस्थिती जाणवत नाही अशी स्थिती सध्या दिसत आहे. या साऱ्यांच्या डोळ्यांदेखत शहरं बकाल आणि बेशिस्त भासू लागली आहेत. त्यात दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. यंत्रणांच्या या भोंगळ, ढिसाळ कारभाराचा फार मोठा फटका मात्र सर्वसामान्य प्रवाशांना नियमित बसत आहे. रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरावर फेरीवाले, रिक्षा, टॅक्सी स्टँड असू नयेत. परिसर मोकळा असावा असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचे येथे सर्रास उल्लंघन केले दिसते. मनमानी पद्धतीने रिक्षा उभ्या केलेल्या असतात. ध्वनिप्रदूषण आणि वायू प्रदूषणाने येथे कधीच मर्यादा ओलांडली आहे. रिक्षाचालक गुटखा, मावा खाऊन कुठेही थुंकत असल्याने येथे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.

मुंबई सीएसएमटी, चर्चगेट यांसारख्या मोठ्या स्थानकांचा परिसर म्हणा किंवा तेथील भुयारी मार्ग, हे नेहमीच फेरीवाल्यांनी गिळंकृत केल्यासारखे दृश्य असते. भुयारी मार्ग म्हणजे फेरीवाल्यांसाठी जणू मुक्त कुरण. भुयारी मार्गांच्या उतरणाऱ्या पायऱ्यांपासून दुसरीकडे वर जाण्याच्या मार्गांवर फेरीवाले आपली पथारी पसरून, कोकलत उभे असतात. तसेच तेथील अधिकृत दुकानांच्या गाळ्यांसमोरही सर्वत्र फेरीवाले बसत असल्याने त्यांनी जणू संपर्ण भुयारी मार्गच अडविलेला असतो. लोकलच्या गर्दीत पुरता पिचून बाहेर पडलेला मुंबईकर पुढे जाऊन या फेरीवाल्यांच्या जंजाळात अडकतो व तेथून मार्ग काढत त्याला वेळेवर ऑफिस गाठण्याची कसरत करावी लागते. या त्रासाबद्दल अलीकडेच काही वृत्तपत्रांत बातम्या छापून आल्यानंतर सीएसएमटी परिसरात पालिका, पोलिसांनी कारवाई करून सध्या थोडा दिलासा दिला आहे. अशाच प्रकारे भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे, दिवा, डोंबिवली, अंबरनाथ, बोरिवली अशा सर्वच स्थानकांच्या परिसरात ही बजबजपुरी असते. काही तक्रारी झाल्यावर किंवा काही ठरावीक काळानंतर पालिकांचे पथक अचानक (सामान्यांना वाटते) तेथे येते, फेरीवाल्यांची थोडीशी पळापळ होते. बहुतेकांना या कारवाईची आधीच खबर लागलेली असल्याने त्यांनी हवी तशी सावधगिरी बाळगलेली असते. पण काही बेसावध असलेल्यांना कारवाईच्या बडग्याला सामोरे जावे लागते. एकूणच कारवाई केली जात असल्याचे चित्र दिसू लागते. रस्ते काही काळासाठी मोकळे होतात. सर्वांनाच बरं वाटतं. पण ते फारच थोड्या काळासाठी हे समाधान टिकते. पुन्हा सारं ‘येरे माझ्या मागल्या’ प्रमाणे…

वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकालगत काही दिवसांपूर्वी पालिकेने हातोडा चालविल्यानंतर या परिसरातील अराजकतेचा विषय ऐरणीवर आला आहे. या भागातील झोपड्यांच्या तीन ते चार मजली टॉवर इतकाच तेथील रिक्षांचा विषय डोकेदुखी ठरला आहे. पालिका, वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्यानंतर एक – दोन दिवस शिस्त लागते. त्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’च दिसते. पलीकडे वांद्रे पश्चिमेला चांगली स्थिती आहे, अशातला भाग नाही. मात्र तिथे स्थानकाबाहेर मोठी जागा असल्याने प्रवाशांना ये-जा करताना थोडे सुसह्य होते.पूर्वेकडील परिसर आधीच लहान असून त्यात रिक्षांचा मोठा अडसर आहे. रेल्वेच्या पुलावरून खाली पाऊल टाकताच प्रवाशांची कसरत सुरू होते. पुरेशा साफसफाईअभावी अस्वच्छता आणि कमालीचा बकालपणा या भागाला आला आहे. रिक्षा उभ्या असलेल्या ठिकाणीच ‘बेस्ट’चे बस थांबे आहेत. एकीकडे रिक्षांची गर्दी, दुसरीकडे रस्त्यात बस उभी राहते तेव्हा काही काळ येथे वाहतुकीची पार वाट लागते. रेल्वे स्थानकापासून बीकेसी, कुर्ला येथे जाण्यासाठी रिक्षाशिवाय दुसरा पर्याय नसल्याने त्याचा गैरफायदा रिक्षाचालकांनी उठवला आहे. मीटर पद्धतीने प्रवासी न नेता एका रिक्षात चार प्रवासी कोंबून वाटेल तसे पैसे मागितले जातात. वांद्रे हे एक प्रातिनिधिक स्थानक. हीच परिस्थिती कमी अधिक प्रमाणात सर्वच रेल्वे स्थानकांच्या परिसरात दिसते. विशेष म्हणजे या स्थानकांबाहेरची ही बजबजपुरी हजारो, लाखो प्रवासी दररोज मुकाटपणे सहन करतात. हे परिसर स्वच्छ होऊन तेथील फेरीवाले आणि रिक्षावाले यांना कधी तरी शिस्त लागेल की नाही, असा सवाल मुंबईकरांना पडला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -