Friday, May 3, 2024
Homeदेशआधी म्हणाले 'बलात्काराची मजा घ्या', नंतर मागितली माफी

आधी म्हणाले ‘बलात्काराची मजा घ्या’, नंतर मागितली माफी

बेळगावी : कर्नाटक विधानसभेचे माजी स्पीकर आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. आर. रमेश कुमार (Ramesh Kumar) यांनी विधानसभेत बोलताना ”बलात्कार टाळता येत नाही तेव्हा त्याची मजा घ्या”, असे धक्कादायक आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. मात्र याबाबत विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी आता विधानसभेत माफी मागितली आहे.

माझ्या वक्तव्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागण्यात माझी काहीही हरकत नाही. मी मनापासून माफी मागतो, असे काँग्रेस नेते के. आर. रमेश कुमार म्हणाले. त्यानंतर विधानसभा स्पीकर विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी कुमार यांच्या सुरात सूर मिसळत त्यांनी माफी मागितली आहे; त्यामुळे विषय आता पुढे वाढवण्याची गरज नाही, असे म्हटले.

बेळगावी येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बोलताना रमेश कुमार यांनी सभापतींना सांगितले की, तुमची स्थिती या म्हणीसारखी आहे की, तुम्ही बलात्कार थांबवू शकत नसाल तर झोपा आणि मजा करा. गुरुवारी राज्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीवर बोलण्यासाठी काँग्रेस नेते वेळ मागत होते, मात्र सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी टाळण्याचा प्रयत्न करत होते. “तुम्ही जे काही ठरवाल ते मी हो म्हणेन. मी विचार करत आहे की आपण परिस्थितीचा आनंद घेत आहोत. मी व्यवस्था नियंत्रित करू शकत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही,” असे सभापतींनी आमदारांना सांगितले.

यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे आमदार रमेश कुमार यांनी सभापतींना उत्तर देताना सांगितले की, “एक म्हण आहे की जेव्हा बलात्कार अपरिहार्य असतो तेव्हा झोपा आणि त्याची मजा घ्या. तुम्ही अगदी त्याच स्थितीत आहात.” आश्चर्याची गोष्ट म्हणजे रमेश कुमार असे बोलल्यानंतर त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाला विरोध करण्याऐवजी कर्नाटक विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभेतील सदस्यांमध्ये हशा पिकला.

रमेश कुमार यांनी असे वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन वर्षांपूर्वीही त्यांनी बलात्काराच्या मुद्द्यावर अशी टीका केली होती. कुमार यांनी यापूर्वी २०१८-१९ मध्येही विधानसभेचे अध्यक्ष असताना अशी टिप्पणी केली होती.

कर्नाटक विधानसभा अध्यक्ष असताना रमेश कुमार यांनी स्वत:ची तुलना बलात्कार पीडितेशी केली होती. त्यावेळी त्यांच्या पक्षाच्या महिला सदस्यांसह आमदारांनी अधिवेशनात त्यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला होता. “अशा घृणास्पद आणि निर्लज्ज वर्तनासाठी सभागृहाने संपूर्ण स्त्रीत्वाची, प्रत्येक माता, बहीण आणि मुलींची माफी मागितली पाहिजे,” असे आमदार सौम्या रेड्डी यांनी म्हटले होते.

फेब्रुवारी २०१९ मध्ये रमेश कुमार यांनी, माझी अवस्था बलात्कार पीडितेसारखी झाली आहे. बलात्कार फक्त एकदाच झाला. तिथं सोडलं असतं तर ते संपलं असतं. बलात्कार झाल्याची तक्रार केल्यावर आरोपीला तुरुंगात टाकले जाते. हे कसे, कधी आणि किती वेळा घडले याची चौकशी त्यांचे वकील किंवा ईश्वरप्पा (तेव्हाचे आमदार आणि आता भाजपाचे मंत्री) यांच्यासारखे करतात असे म्हटले होते. खटल्याच्या शेवटी, पीडिता उलटतपासणी दरम्यान म्हणेल की, बलात्कार प्रत्यक्षात एकदाच झाला होता, परंतु कोर्टात अनेक वेळा झाला. माझीही अवस्था अशीच झाली आहे, असे धक्कादायक वक्तव्य रमेश कुमार यांनी केले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -