Sunday, May 5, 2024
Homeताज्या घडामोडीEknath Shinde : आमचे पाऊल चुकीचे असते तर एवढे लोक आले असते...

Eknath Shinde : आमचे पाऊल चुकीचे असते तर एवढे लोक आले असते का?

माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरते मर्यादित आपलं काम नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

रत्नागिरी : बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल होण्यासाठी रांग लागली आहे. आमचे पाऊल चुकीचे असते तर एवढे लोक आले असते का? बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत कार्यकर्त्यांना मोठे केले. परंतु स्वार्थासाठी, मोहापायी, खुर्चीसाठी बाळासाहेबांची भूमिका आणि त्यांचे विचार बाजूला सारून जे काही घडले ते अघटित आहे. आज बाळासाहेबांना अभिप्रेत होते ते काम आपण करतोय. सत्तेपेक्षा नाव मोठे असते आणि ते जपायचे असते, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला.

शिवसंकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री (Eknath Shinde) रत्नागिरीत आले होते. येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मला काय मिळेल यापेक्षा माझ्या शिवसैनिकाला काय मिळेल, या राज्याला काय मिळेल याचा विचार आम्ही केला. आम्ही मागचा पुढचा विचार न करता जे धाडस केले ते संपूर्ण जगाने पाहिले आहे. महाराष्ट्रातले शेकडो कार्यकर्ते आपल्यासोबत येतायेत. सुरुवातीपासून बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसैनिकाने एकनाथ शिंदेंना साथ दिली आणि राज्यात सत्तांतर घडले. कोकणी माणसाचे बाळासाहेबांशी अतूट नाते आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाची त्यांची बांधिलकी आहे. खरी शिवसेना आपल्याकडे आहे. विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

अनेक लोकांना चिंता होती. आपण घेतलेली भूमिका योग्य आहे हे अनेकांना वाटत होते पण त्यात यश मिळेल की नाही याबाबत शंका होती. परंतु जनतेच्या आशीर्वादाने ते यश मिळाले. आमची भूमिका चुकीची आणि स्वार्थासाठी असती तर जनतेने आमच्याकडे पाठ फिरवली असती. आज इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित झाला ही आमच्या कामाची पोचपावती आहे, असे त्यांनी सांगितले.

तसेच आज बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करतायेत. कलम ३७० हटवलं, राम मंदिर उभारलं मग बाळासाहेबांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार कुणाला आहे? जे टिंगळटवाळी करत होते त्यांना मंदिर बांधूनही दाखवले आणि उद्घाटनाची तारीखही सांगितली. राम मंदिराचा विषय आपण कधीही राजकीय केला नाही. हा श्रद्धेचा, अस्मितेचा आणि भावनेचा विषय आहे. आपण जे बोलतो त्याचे परिणाम काय होतील हे समजून बोलायला हवे. बाळासाहेब असते तर मोदींना शाबासकी दिली असती. परंतु आज त्यांच्यावर टीका करताय. राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करताय, असे शिंदे म्हणाले.

आपण आज महायुती म्हणून काम करतोय. गेली ५०-६० वर्ष जी कामे झाली नाहीत ती गेल्या साडे नऊ वर्षात होतायेत. आज केंद्राकडून आपल्याला भरघोस निधी मिळतोय. परंतु पूर्वी अहंकारापोटी केंद्र सरकारकडे पैसे मागितले जात नव्हते. तुम्ही अडीच वर्षात महाराष्ट्राला कित्येक वर्ष मागे नेले. जर आम्ही हा निर्णय घेतला नसता तर आज आपण आणखी मागे पडलो असतो. अत्यंत विचार करून आम्ही हा निर्णय घेतला. देशाच्या विकासात महाराष्ट्र कुठेही कमी राहता कामा नये. राज्यात तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचे काम उद्योगमंत्री करतायेत असे शिंदेंनी सांगितले.

काही लोकांनी गरीबी हटावचा नारा दिला. त्यात गरिबांनाच हटवले. परंतु मागील ९ वर्षात मोदींनी गरिबांसाठी कित्येक योजना आणल्या. आपण आपलं पोट भरायचे आणि समोरच्याला काही द्यायचे नाही. देण्याची दानत लागते. आपले सरकार हे देणारे आहे. शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये दिले जातात. १ रुपयांत पीकविमा देण्याचा निर्णय महाराष्ट्राने पहिल्यांदा घेतला. महिलांना ५० टक्के एसटी सवलत देण्याचा निर्णय घेतला. महिला सक्षमीकरणाचा निर्णय घेतला. महिलांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी बचत गटांना निधी दिला जातोय. योजना आणि निर्णय यापूर्वीदेखील होते. परंतु त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळत नव्हता. महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरते मर्यादित आपलं काम नाही. हे सरकार सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने स्थापन झाले आहे, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -