Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेEknath Shinde : बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, हे घरगडी समजतात

Eknath Shinde : बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, हे घरगडी समजतात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

ठाणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आपल्या सहकाऱ्यांना पक्षातील नेत्यांना स्वत:च्या सवंगड्यांप्रमाणे वागवत होते. मात्र, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्षाला स्वत:ची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी समजतात. सहकाऱ्यांना ते घरगडी समजतात, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ठाणे येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान सुरु झाले. यावेळी ते बोलत होते.

घराणेशाहीवरुन एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केली. एकनाथ शिंदे म्हणाले, दौरा करायचा लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. आमच्या स्वच्छता दौऱ्यामुळे पक्षातील अनेक वर्षांची घाण देखील साफ केली आहे. उद्धव ठाकरे स्वत:चे घर व्यवस्थित सांभाळू शकले नाहीत. घराणेशाही म्हणजे काय याची व्याख्या काय त्यांनी सांगितली पाहिजे. त्यांनी घरातील सर्वांना बाहेर काढले. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ एवढ्यापुरतेच उद्धव ठाकरे मर्यादित आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

स्वच्छतेसाठी आम्हाला लोक चळवळ निर्माण करायची आहे. स्वच्छ भारत मोदीजींनी सुरु केले तेव्हा लोक चेष्टा करत होते. मात्र, स्वच्छ भारत अभियानचे महत्व आज देशाला समजले आहे. महाराष्ट्रात देखील डीप क्लीन ड्राईव्हबाबत जागृती निर्माण होत आहे. डीप क्लीन ड्राईव्हची चळवळ आम्ही सर्व महाराष्ट्रभर राबवत आहोत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे म्हणाले, स्पर्धा लोकांना कळते. बाळासाहेबांचे राम मंदिर बांधण्याचे स्वप्न होते. ते स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलेले आहे. यांचे राम मंदिराबद्दल वेगळेच प्रेम आहे. ‘मंदिर वही बनायेंगे तारीख नहीं बतायेंगे’ असे म्हणून उद्धव ठाकरे चेष्टा करत होते. मात्र, आज नरेंद्र मोदींनी मंदिर बांधलेही आणि आता त्याचे उद्घाटनही होत आहे. राम मंदिर हा करोडो राम भक्तांच्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. तो आमच्यासाठी राजकीय होऊ शकत नाही. परंतु हे सर्वजण प्रत्येक गोष्टीवर राजकारण करतात. प्रत्येक गोष्ट राजकीय पद्धतीने घेतात. त्यामुळे जनता चांगले ओळखून आहे. जनताच त्यांना जागा दाखवेल, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -