Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुती सरकारचे कार्यकर्ते एकत्र...

Nitesh Rane : पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुती सरकारचे कार्यकर्ते एकत्र येणार!

महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांचा निर्धार

कणकवली : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली असून यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. असं असलं तरी जनतेचा प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा ओघ पाहता महायुतीचंच पारडं जड आहे. शिवाय मविआत होतात तसे मतभेद महायुतीत नाहीत. सर्वजण एकत्रितपणे करत असलेली विकासाची कामे जनतेच्या पसंतीस उतरत आहेत. यामुळे येत्या निवडणुकीतही महायुतीचाच विजय होण्याची शक्यता जास्त आहे.

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे हात बळकट करण्यासाठी महायुती सरकारचे कार्यकर्ते एकत्रित येऊन रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मताधिक्य घेऊन उमेदवार लोकसभेत पाठवणार आहेत. यासाठी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची मने जुळवून एकत्रित लढा देण्याचे निश्चित केले आहे. म्हणूनच येत्या १४ ला कणकवलीत भगवती मंगल कार्यालयात महायुतीचा पहिला संयुक्त मेळावा आयोजित केला असल्याची माहिती महायुतीचे (Mahayuti) समन्वयक आणि भाजपा कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संयुक्त पत्रकार परिषदेतून दिली. पत्रकार परिषदेला प्रभाकर सावंत, संजय आंग्रे, अबिद नाईक, काका कुडाळकर, अशोक दळवी आदी उपस्थित होते.

या लोकसभा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार असणार याबाबत प्रत्येक पक्षाचे नेते दावा करत आहेत, असं विचारलं असता नितेश राणे म्हणाले, “प्रत्येक पक्षाचा तो अधिकार आहे. आपल्या पक्षाचा उमेदवार असावा, अशी मागणी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची असते. तशीच मागणी आतापर्यंत भाजप, शिवसेना या पक्षाच्या प्रमुखांनी केली आहे. प्रत्येकाने मताची आकडेवारीची बेरीज ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, याचा अर्थ ठराविकच पक्षाला उमेदवारी दिली जाईल असा नाही.

तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि केंद्रातील नेते याबाबत योग्य तो निर्णय घेऊन, जो उमेदवार या मतदारसंघासाठी मिळेल, त्या उमेदवाराला निवडून आणणे ही आमची महायुतीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी राहील. हा मतदारसंघ आतापर्यंत विरोधी पक्षाकडे राहिला आहे. मात्र, यापुढे मोदींच्या सभागृहात या मतदारसंघाचा खासदार असेल”, असं नितेश राणे यांनी स्पष्ट केलं.

कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला ठाकरे गटाकडून विरोधाचेच काम

कोकणात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला आजवर ठाकरे गटाकडून सातत्याने विरोध झाला आहे. रिफायनरी प्रकल्प असू दे किंवा पूर्वीचा सी-वर्ल्ड प्रकल्प, सातत्याने विरोधाची भूमिका घेतली जात आहे. त्यामुळे येथे विकासात्मक कामे होण्यासाठी हक्काचा खासदार असायला हवा. देशात विकासाची प्रगती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या तुलनेत आपण मागे पडत आहोत. कारण खासदार विनायक राऊत यांनी केवळ विरोधाचेच काम केले आहे. हा शिक्का आम्हाला पुसायचा आहे. म्हणून आम्ही एकत्रित ही निवडणूक लढवत आहोत, असं नितेश राणे यावेळी म्हणाले.

नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नाईक म्हणाले, ‘‘पक्षाच्या वरिष्ठांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे तो आम्हा सर्वांना मान्य आहे. आम्ही आता लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. उमेदवार कोण? त्यापेक्षा आपण महायुतीने दिलेला उमेदवार निवडून आणायचा आहे. इतकेच उद्दिष्ट आमच्यासमोर आहे. त्या अनुषंगाने या मेळाव्याला तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित येऊन सहभाग घेतील. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढणार आहोत.’’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -