Wednesday, May 22, 2024
Homeताज्या घडामोडीसंगमनेर शहरात शिवाजी पुतळ्याजवळ ट्रक दुचाकीचा भीषण अपघात, महिलेचा जागीच मृत्यू

संगमनेर शहरात शिवाजी पुतळ्याजवळ ट्रक दुचाकीचा भीषण अपघात, महिलेचा जागीच मृत्यू

संगमनेर : संगमनेर शहरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. दुचाकी मोपेड व ट्रकचा भीषण अपघात झाला असून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज शनिवारी दिं. १३ जानेवारी रोजी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ घडली आहे.

या घटनेत आपल्या मोपेडवरुन रस्ता ओलांडणाऱ्या महिलेच्या वाहनाला धडक लागल्याने झालेल्या भीषण अपघातात नीतू सोमनाथ परदेशी ही महिला ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून मृत झाली आहे. या घटनेनंतर आसपासच्या नागरिकांनी तत्काळ जखमी महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मयत महिला नेहरु चौकातील सोमनाथ परदेशी यांच्या पत्नी आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास एक रिकामा मालट्रक (क्र. एम.एच. २०/ ए ५८५८) बसस्थानकाकडून दिल्ली नाक्याकडे जात होता. सदरील मालट्रक अतिशय गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आला, त्याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने आपल्या मोपेडवरुन महामार्ग ओलांडत असताना नीतू सोमनाथ परदेशी (वय ३७, रा. पानसरे गल्ली, नेहरु चौक) यांच्या मोपेडला ट्रकची धडक बसली. त्यामुळे त्यांची मोपेड ट्रक खाली अडकली. यावेळी ट्रक चालकाने ब्रेक लावण्याचाही प्रयत्न केला. मात्र वाहन जागेवर न थांबता काही अंतर पुढे गेल्याने पुढील चाकातून वाचलेल्या परदेशी पाठीमागील चाकाखाली सापडून चिरडल्या गेल्या.

या घटनेनंतर आसपास जमलेल्या नागरिकांनी धाव घेत जखमी झालेल्या महिलेला तातडीने खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत संगमनेर शहर पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या घटनेनंतर संगमनेरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सिग्नल असून अडचण नसून खोळंबा

संगमनेर शहरातील चौका चौकात सिग्नल असुन अडचण नसून खोळंबा आहे. संगमनेर शहरातील वाहतुकीवर कुणाचाही अंकुश राहिला नाही. उस वाहतूक करणारे ट्रॅक्टर व बैलगाड्या हे देखील शहरातील गर्दीच्या ठिकाणाहून वाहतूक करत असल्याने छोटे मोठे अपघात होत आहेत. संगमनेर शहर पोलीस आता तरी वाहतुक व्यवस्थेकडे लक्ष देतील का? सदर घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर गाढ निद्रेत असलेले वाहतूक पोलीस आता तरी जागे होतील अशी आशा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -