Saturday, May 4, 2024
Homeकोकणरायगडवादळी पावसामुळे मुरूड किनाऱ्यावरील मासेमारी ठप्प

वादळी पावसामुळे मुरूड किनाऱ्यावरील मासेमारी ठप्प

अरबी समुद्रात वादळी वारे; १०० नौका किनाऱ्यावर

मुरुड (वार्ताहर) : गेल्या आठ दिवसांपासून समुद्रात सुरू असलेल्या वादळी हवामानामुळे अरबी समुद्रात मासेमारी करणे जोखमीचे आणि बेभरवशाचे झाले आहे. मुरूड समुद्रात मासेमारीस गेलेल्या जवळपास छोट्या- मोठ्या सुमारे १०० नौका मासे न मिळाल्याने राजापूरी, एकदरा, मुरूड, नांदगाव, मजगाव आदी खाडी बंदरात सोमवारी आणि मंगळवारी रिकाम्या हाताने परतल्या. मच्छीमारांवर मासेमारी बाबत संकटांची मालिकाच सुरू असून शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी रायगड मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी केली आहे.

मासेमारीचा मोठा हंगाम असला तरी समुद्रात अचानक बदलणाऱ्या वातावरणामुळे किनाऱ्यावर आलेले मासे काही कालावधीतच खोल समुद्रात निघून जात आहे. अचानक उठलेले उपरती वारे व हेटशी वाऱ्यांमुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळत असल्याने पारंपरिक नौका घेऊन खूप खोलवर मासेमारीस जाणे धोकादायक झाले आहे. शिवाय मासे मिळेल याची या वादळी स्थितीत शक्यता नाही. गेल्या आठ दिवसात अनेक कोळीबांधव नुकसान सोसून किनाऱ्यावर परतले आहेत. मार्केट मध्ये पापलेट, घोळ, सुरमई, रावस आदी मासळीबरोबर बोंबिल देखील आता दिसून येत नाहीत. समुद्रात वादळ सदृश परिस्थिती असून ते मच्छीमारांसाठी धोकादायक असल्याचे मुरूड येथील काही मच्छीमारांनी सांगितले.

राजापूरी येथील मच्छीमार धनंजय गिदी यांनी सांगितले की, जवळा देखील सध्या मिळत नाही. सामान्य प्रकारची मासळी मिळाली तरी पावसामुळे सुकवायला जागा नाही. लहरी हवामान मच्छीमारांच्या जीवावर उठले असून पारंपरिक मच्छीमार पार हवालदिल झाला आहे. मासळी पकडून त्यांची विक्री करणे या दिनक्रमावर कोळी बांधवांचा उदरनिर्वाह चालतो. सध्या दोन्ही बाजू ठप्प असल्याचे कोळी बांधवांनी सांगितले. सध्या सर्व नौका पाण्यात किनाऱ्यावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. मुख्य मासेमारी कधी पूर्वपदावर येणार याची चिंता कोळीबांधवाना लागली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -