Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणमुंबई-गोवा महामार्गावर दुहेरी अपघात, २४ ठार

मुंबई-गोवा महामार्गावर दुहेरी अपघात, २४ ठार

बस उलटून १४ प्रवाशांचा मृत्यू, तर कार-ट्रकच्या धडकेत १० जणांनी गमावला जीव

कणकवली : रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये आज पहाटे दोन भीषण अपघात घडले. कणकवलीजवळ खासगी बस उलटून झालेल्या अपघातात १४ प्रवाशी ठार, तर २२ जण जखमी झाले आहेत. बसमध्ये ३६ प्रवासी होते. तर माणगावमध्ये कार-ट्रकच्या धडकेत १० जणांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये एका ४ वर्षीय मुलाचा समावेश आहे.

गोवा-मुंबई महामार्गावर कणकवलीजवळ खासगी बसचा ब्रेक अचानक फेल झाला. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस उलटल्याने ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर, २३ जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर १० जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे अपघातातील मृतांची संख्या १४ वर गेली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील रेपोली गावाजवळ कार आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली. यात कारचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातात एकूण १० प्रवाशी ठार झाले आहेत.

रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, आज पहाटे ४.४५ वाजता रेपोली येथे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक व मुंबईकडून गुहागरकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये ५ पुरुष ३ महिला आणि एका लहान मुलगी व एक लहान मुलगा, अशा १० जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतक एकमेकांचे नातेवाईक आहेत. ते सर्वजण गुहागर तालुक्यातील हेदवी येथे जात होते. एका नातेवाईकाच्या निधनाच्या शोकसभेला उपस्थित राहून हे सर्वजण परतत होते. त्याचदरम्यान काळाने त्यांच्यावर घाला घातला.

अपघात नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकले नाही. अपघाताची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पोलिस व वाहतूक पोलिसांनी मार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक पूर्ववत केली.

दरम्यान, अपघातातील मृतांची व जखमींची नावे अद्याप समजू शकली नाही. मात्र, आज पहाटेच दोन्ही अपघात हे मुंबई-गोवा महामार्गावर झाले. त्यामुळे महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्प्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. तसेच, महामार्गावर अनेक खड्डे आहेत. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे या महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -