Friday, May 3, 2024
Homeक्रीडाIPL 2024मुंबईला नडायचं नाय...

मुंबईला नडायचं नाय…

वानखेडेवर ग्रीन वादळ; ४७ चेंडूंत ठोकले शतक

मुंबई (प्रतिनिधी) : ‘करो या मरो’ अशा सामन्यात मुंबई इंडियन्सने रविवारी सनरायझर्स हैदराबादला धूळ चारत मोठा विजय साकारला आणि त्यांनी ‘प्ले ऑफ’च्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले. अटीतटीच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला.

मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य होते. रोहित शर्माच्या संघाने अवघ्या १८ षटकांत २ बाद २०१ धावा करत सामना जिंकला. त्याचबरोबर या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबादचा ८ विकेट्स आणि १२ चेंडू राखून पराभव करत आपले प्ले ऑफचे आव्हान जिवंत ठेवले. मुंबईकडून महागड्या कॅमरून ग्रीनने आपले टी २० मधील पहिले वहिले शतक ठोकत हा विजय साकारला. ग्रीनने ४७ चेंडूत नाबाद शतक ठोकले. त्याने विजयासाठी आणि त्याच्या शतकासाठी १ धावेची गरज असताना चौकार मारला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने ५६ धावांची अर्धशतकी खेळी करत ग्रीनसोबत दुसऱ्या विकेटसाठी १२४ धावांची धडाकेबाज भागीदारी रचली. कॅमेरून ग्रीनने ४७ चेंडूत १०० धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ८ षटकार मारले. याशिवाय रोहित शर्माने ३७ चेंडूत ५६ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ८ चौकार आणि १ षटकार लगावला.

मुंबईच्या या विजयामुळे त्यांचे १४ सामन्यात ८ विजयांसह १६ गुण झाले आहेत. मुंबई इंडियन्सला पहिला धक्का एकूण २० धावांवर बसला, जेव्हा सलामीवीर इशान किशन १२ चेंडूत १४ धावा करून भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण यानंतर रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांच्यात १२८ धावांची भागीदारी झाली. रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीनच्या भागीदारीने मुंबई इंडियन्सचा विजय जवळपास निश्चित केला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने १६ चेंडूत २५ धावा करत उर्वरित काम पूर्ण केले.रोहित शर्माला सूर गवसला आणि मुंबईने विजय साकारला, असेच म्हणायला हवे. या सामन्यात रोहितने अर्धशतकासह दमदार फलंदाजी केली. रोहितला यावेळी कॅमेरून ग्रीनने चांगली साथ दिली आणि त्यामुळेच मुंबईला विजय साकारता आला.

हैदराबादच्या २०१ धावांचा पाठलाग करताना मुंबईला इशान किशनच्या रुपात पहिला धक्का बसला, त्याला १४ धावा करता आल्या. पण इशान बाद झाला आणि त्यानंतर कॅमेरून ग्रीन आणि रोहित शर्मा यांची जोडी चांगलीच जमल्याचे दिसले. ग्रीन यावेळी रोहितपेक्षा जास्त आक्रमक होता आणि त्यामुळेच त्याने रोहितनंतर येऊनही त्याच्यापूर्वी आपले अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर रोहितही काही शांत बसला नाही, रोहितनेही चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. पण रोहितला त्यानंतर जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. कारण रोहित यावेळी ५६ धावांवर बाद झाला. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आणि कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय किती चुकीचा होता हे हैदराबादच्या सलामीवीरांनी दाखवून दिले. हैदराबादच्या सलामीवीरांनी यावेळी सुरुवातीलाच आपले इरादे स्पष्ट केले होते. कारण हैदराबादच्या विव्रांत शर्मा आणि मयांक अगरवाल या जोडीने संघाला दमदार सुरुवात करून दिली. या जोडीने १३.५ षटकांत १४० धावा फलकावर लावल्या होत्या. या दोघांनी १० च्या सरासरीने फटकेबाजी केली आणि मुंबईच्या गोलंदाजीची हवाच काढून टाकली होती. पण अखेर विव्रांत बाद झाला आणि मुंबईला पहिले यश मिळाले. विव्रांतने यावेळी ४७ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. यापूर्वी त्याचे नाव कुणालाच माहिती नव्हते. पण या एका खेळीमुळे त्याचे नाव संपूर्ण क्रिकेट विश्वाला ठाऊक झाले. आतापर्यंतच्या सामन्यांत मयांक अगरवालला चांगला सूर गवसला नव्हता. पण या सामन्यात मात्र त्याला चांगली लय सापडली. कारण मयांक यावेळी शतकासमीप आला होता. पण त्याचे शतक १७ धावांनी हुकले. मयांकने यावेळी ४६ चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ८३ धावांची खेळी साकारली. या दोन्ही सलामीवीरांच्या जीवावर हैदराबादच्या संघाने २० षटकांत २०० धावा केल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -