Sunday, May 19, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीDnyaneshwari : व्यवहार ‘ज्ञान’देव

Dnyaneshwari : व्यवहार ‘ज्ञान’देव

  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

‘ज्ञानेश्वरी’ वाचताना एकेका ओवीतून जीवनाला दिशा मिळते.
आसुरी दोष स्वतःमध्ये येऊ नयेत म्हणून ते श्रोत्यांना त्यापासून दूर राहण्यासाठी बजावतात.

‘ज्ञानियांचा राजा गुरू महाराव
म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसे।
तुका म्हणे युक्तीचिया खोली
म्हणोनि ठेविली पायीं डोई॥’

असं म्हणून संत तुकारामांनी ज्ञानदेवांचा गौरव केला आहे. तो किती सार्थ आहे! ‘ज्ञानेश्वरी’ वाचताना तर ठायी ठायी त्याचा अनुभव येतो. त्यातील एकेका ओवीतून जीवनाला दिशा मिळते. आज पाहूया अशाच काही अद्भुत ओव्या!

सोळावा अध्याय हा म्हटला तर खासच ! माणूस म्हणूसन काय मिळवावं आणि काय सोडावं? याचं भान आणि ज्ञान देणारा गीतेतील हा अध्याय. याचा उलगडा करताना माऊली ममतेने समजावतात दैवी संपत्ती (दैवी गुण), तर सावध करतात आसुरी संपत्ती सांगताना. अशाच काही या ओव्या आसुरी लोकांची लक्षणं सांगणाऱ्या.

‘ज्याप्रमाणे शहाणे लोक मेलेल्या वासराच्या पोटात पेंढा भरून ते गायीच्या पुढे उभे करून तिचे दूध काढून घेतात. (ओवी क्र. ३८६)

त्याप्रमाणे यज्ञाच्या मिषाने सर्व लोकांस आमंत्रण करून (आपल्यास काही मिळेल या आशेने ते आले असता) उलट त्यांच्यापासूनच अाहेर उपटून त्यांस नागवितात. ही ओवी अशी –
‘तैसें यागाचेनि नांवें ।
जग वाऊनि हांवे ।
नागविती आघवें । अहेरावारीं ॥’ ओवी क्र. ३८७
(‘वाऊनि’ याचा अर्थ ‘बोलावून’ असा आहे.)

मग आपल्यापुढे डंका निशाण लावून आम्ही दीक्षित आहो, अशी जगात व्यर्थ प्रसिद्धी करतात. ओवी क्र. ३८९.

काय हेतू आहे या ओव्यांचा? तो दुहेरी आहे. एका बाजूने हे आसुरी दोष स्वतःमध्ये येऊ नयेत म्हणून ते श्रोत्यांना त्यापासून दूर राहण्यासाठी बजावतात. दुसरीकडे हे दोष आहेत, अशा माणसांपासून सावध राहण्याचा इशारा देतात. साधारणपणे माणूस वरवरच्या गोष्टींना भुलतो, त्याला बळी पडतो. ही माणसाची कमजोरी आहे. तिचा गैरवापर आसुरी लोक करतात. एकीकडे यज्ञाचं आमंत्रण देतात. ते पाहून लोक खूश होतात. यज्ञाला गेल्यावर उलट लोकांकडून अाहेर उपटतात. आता इथे यज्ञ, आमंत्रण, अहेर हे सगळं सूचक आहे. आजच्या काळातही आपल्याला अनेकदा या प्रवृत्तीचा फटका बसतो. म्हणजे अगदी अलीकडील उदाहरण घेऊया. एखादा दूरध्वनी येतो ‘तुम्हांला मोठं बक्षीस लागलं आहे आणि त्यासाठी थोडीशी रक्कम भरा, त्याकरिता हा दुवा (ही लिंक) आहे, त्यावर क्लिक करा.’ प्रत्यक्षात तसं केल्यावर काय होतं? बक्षीस राहिलं बाजूला. उलट खात्यातून मोठी रक्कम काढली जाते. मग लुबाडलं गेल्याचं लक्षात येतं. पण उशीर झालेला असतो. वेळ हातातून निघून गेलेली असते. इथे ज्ञानदेवांनी वर्णिलेलं यज्ञाचं आमंत्रण म्हणजे आमिष असेल. कधी नोकरी, कधी छोकरी अशी वेगवेगळी प्रलोभनं दाखवणं. अाहेर उपटणं म्हणजे त्यासाठी आपल्याकडून पैसे उकळणं, असं म्हणता येईल. ज्ञानदेवांची ओवी आपल्याला सावध करते अशा आसुरी प्रवृत्तीविषयी, तेही अगदी साधं, सोपं उदाहरण देऊन. ते असे की, मेलेल्या वासराच्या पोटात पेंढा भरून गायीकडून दूध काढून घेण्याचं. म्हणजे गाईला फसवून तिच्याकडून काही फायदा करून घेणं. हे उदाहरण का दिलं आहे ज्ञानदेवांनी? त्यातही खूप अर्थ आहे. गाय ही साधारणपणे स्वभावाने गरीब, साधी मानली जाते. काही माणसंही अशीच साधीभोळी असतात. पण आपण असं गायीसारखं राहून कोणाहीकडून फसवून घ्यायचं का? ज्ञानदेवांची ही ओवी म्हणून आजही मार्गदर्शक ठरते. हीच का?, खरं तर प्रत्येक ओवी काही मंत्र देते. म्हणून म्हणावंसं वाटतं,
‘ज्ञानदेव देती व्यवहारज्ञान
आपण ठेवू त्याचे भान’

manisharaorane196@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -